टीम इंडियाला धक्का, ‘हिटमॅन’ रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे व कसोटी मालिकेतून बाहेर

न्यूझीलंडिविरुद्ध होणाऱ्या आगामी एक दिवसीय आणि कसोटी मालिकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर ‘हिटमॅन’ रोहित शर्मा एक दिवसीय आणि कसोटी मालिकेला मुकणार आहे. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 लढतीदरम्यान रोहित शर्मा याच्या पायाला दुखापत झाली होती. फलंदाजी करताना रोहितच्या पायाचे स्नायू खेचले गेले होते. यामुळे तो रिटायर हर्ट झाला होता. यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नव्हता. रोहित ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुल याने कर्णधारपद सांभाळले होते.

के.एल. राहुलची ‘हनुमान’ उडी, टी-20 कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला

‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आगामी एक दिवसीय आणि कसोटी मालिकेला मुकणार आहे. पाच टी-20 सामन्यांची मालिकेत यजमान संघाला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाल्याने तो या मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवाल याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा देखील खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्याला मुकला आहे.

अखेरच्या टी-20 लढतीमध्ये विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा याने टीम इंडियाचे नेतृत्व केले. प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या स्थानावर आलेल्या रोहितने 60 धावांची खेळी केली. मात्र फलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्याने रोहितने माघार घेतली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही रोहित मैदानात उतरला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत राहुलने संघाची कमान सांभाळत टीम इंडियाला 7 धावांनी हा सामना जिंकून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या