रोहीत शेखर हत्येप्रकरणी पत्नी अपूर्वा पोलिसांच्या ताब्यात, आठ तास कसून चौकशी

23

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी (एनडी तिवारी) यांचा मुलगा रोहीत शेखर तिवारी यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. यापार्श्वभूमीवर रोहीत शेखर यांची पत्नी अपूर्वासह दोन नोकरांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या हत्याप्रकरणात अपूर्वा मुख्य संशयित आरोपी आहे.

पोस्टमार्टम अहवालात रोहीत यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दिल्ली पोलिसांची तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली. रोहीत व त्याची पत्नी अपूर्वा यांचे पटत नव्हते व लवकरच ते घटस्फोट घेणार होते. तसेच अपूर्वाचा रोहीतच्या संपत्तीवर डोळा होता. असा गंभीर आरोप रोहीत यांची आई उज्जवला यांनी केला होता. त्यानंतर रविवारी पोलिसांनी अपूर्वा व घरातील दोन नोकरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

गुरुवारी पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पोलिसांनी रोहीतच्या हत्येविरोधात गुन्हा दाखल केला. रोहीतचा मृत्यू गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले. नंतर शनिवारी अधिकाऱ्यांनी दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या रोहीत तिवारी यांच्या घरी जाऊन अपूर्वा यांची आठ तास चौकशी केली.

दरम्यान, उज्जवला यांनी रोहीतची एका महिलेशी जवळीक असल्याचे व पत्नी अपूर्वाबरोबर पटत नसल्याचे सांगतिले होते. यामुळे रोहीत मृत्यु प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. त्याचदरम्यान रोहीत व त्याचा भाऊ सिद्धार्थ यांच्यात संपत्तीवरून वाद असल्याचेही समोर आले. दिल्ली व उत्तराखंड येथे शर्मा कुटुंबियांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या