रोह्याचे सी.डी. देशमुख नाट्यगृह सुरू होण्याआधीच वादाची ‘तिसरी घंटा’;निष्काळजीपणामुळे उभे राहिलेले पिलर तोडण्याची वेळ

लाखो रुपये मोजून नेमण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सीने रोह्याच्या सी.डी. देशमुख नाट्यगृहाचा आराखडाच चुकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निष्काळजीपणामुळे नाट्यगृहाचे उभे राहिलेले आरसीसी कॉलम तोडण्याची नामुष्की ओढवली असून या तोडफोडीने ही वास्तू उभी राहण्याअगोदरच खिळखिळी होण्याची भीती आहे. त्यामुळे रोह्याची नवी ओळख बनणारे हे नाट्यगृह सुरू होण्याआधीच वादाची ‘तिसरी घंटा’ वाजली आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासन आणि एजन्सीच्या साट्यालोट्यामुळेच कोट्यवधी रुपये खर्चुन उभ्या राहात असलेल्या सी. डी. देशमुख नाट्यगृहाच्या आराखड्याची पुरी वाट लागल्याचा आरोप रोहेकरांनी केला आहे.

रोह्यातील डॉ. चिंतामणराव देशमुख नवीन नाट्यगृहाच्या इमारतीसाठी शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरपालिकेने या प्रकल्पाच्या आराखड्याचे काम मुंबईच्या वांद्रे येथील मे. डिझाईन वर्कशॉप या कंपनीला काम
दिले आहे. या कंपनीने सादर केलेल्या प्लॅननुसार नाट्यगृहाची इमारत उभी केली जात आहे. याकरिता अंदाजपत्रकाच्या १.९३ टक्के म्हणजेच तब्बल ५० लाख रुपयांची फी दिली गेली आहे. परंतु पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे नाट्यगृहात आराखड्यानुसार काम न करता उभे कॉलम अर्ध्यावर पोटात तोडून त्यामध्ये छताचे लोखंडी रॉड घुसवले जात आहेत. इमारतीवरील लोखंडी ट्रस स्ट्रक्चर काँक्रीटचा एका भल्यामोठ्या कॉलमलाच मध्यावर भगदाड पाडण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत चौकशी करून एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

हनुमान मंदिराच्या नकाशातही फेरफार                                                                          काहाबरोबरच शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या पुरातन श्री हनुमान मंदिराचेदेखील सुशोभीकरण करण्यात येत आहे. याकरिता ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून याचा आराखडा करण्याचे कामदेखील याच एजन्सीला दिले गेले आहे. परंतु नाट्यगृहाप्रमाणेच हनुमान मंदिराच्या नकाशातही फेरबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या कामात मूळ लाईन आऊटप्रमाणे काम न केल्याने उभे केलेले कॉलम तोडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे वास्तुविशारद व कन्सल्टंट यांच्या कौशल्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक आर्किटेक्टची मदत घेण्याची नामुष्की
नाट्यगृह व हनुमान मंदिराच्या कामात केलेल्या तोडफोडीनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने हे काम पूर्ण करण्यासाठी आता स्थानिक आर्किटेक्टची मदत घेतली आहे. परंतु डिझाईन वर्कशॉप या कंपनीला लाखो रुपये मोजून पुन्हा स्थानिक आर्किटेक्टच्या देखरेखीखाली काम करण्याची नामुष्की आल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.