रोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया

rokhthok

इंदिरा गांधींच्या काळात सोशल मीडिया असता तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला नसता. देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक समाज माध्यमांच्या हातात जावी हे दुर्दैव! कारण दोन्ही बाजूला गोबेल्सच्या फौजा आहेत. अफू, गांजाइतकीच नशा समाज माध्यमांची आहे!

कोणतीही निवडणूक आता कार्यकर्ते कमी व समाज माध्यमांतील (Social Media) फौजा जास्त लढत आहेत. त्या गोंधळात सत्य भरकटले आहे. भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकीत समाज माध्यमांचा सर्वाधिक वापर केला व काँग्रेसला नामोहरम केले. खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करून दाखविणारे साधन म्हणून मी समाज माध्यमांकडे पाहतो. इंदिरा गांधी यांच्या काळात आजच्याप्रमाणे समाज माध्यमांचा जोर असता तर आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला नसता व संजय गांधींचे सक्तीचे कुटुंब नियोजनही बदनाम झाले नसते. जाहीर सभांचीही गरज आता उरलेली नाही. संपूर्ण देश जणू समाज माध्यम व वृत्तवाहिन्यांच्या अमलाखाली झिंगला आहे व त्याच अमलाखाली तो आपले निर्णय घेत आहे. देशाचे उद्याचे सरकारही तो याच अमलाखाली निवडेल असे आजचे चित्र आहे.

धर्म आणि राजकारण

राजकारणात धर्म आहे, पण धर्माने राजकारण कोणी करायला तयार नाही हे समाज माध्यमांतील लढाईवरून स्पष्ट होते. वृत्तपत्रांना आचारसंहिता आहे, पण समाज माध्यमांवर निर्बंध नाहीत. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् ऍपसारख्या माध्यमांतून सध्या जी चिखलफेक सुरू आहे, त्यामुळे निवडणुकीचे मूळ मुद्देच बाजूला गेले. ‘मोदींचे भक्त व विरोधी इतर सर्व’ असा हा लढा म्हणजे एका महायुद्धाप्रमाणेच सुरू आहे व गोबेल्सचे बाप दोन्ही बाजूला आहेत. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदी याला लंडनच्या पोलिसांनी अटक केली व वेस्टमिन्स्टर कोर्टात उभे केले. यावर आपल्याकडे समाज माध्यमांनी असे चित्र रंगवले की, नीरव मोदीस साखळदंडांनी जखडून कोर्टात नेले व त्याच अवस्थेत फरफटत हिंदुस्थानात आणले जाईल. दुसरा हास्यास्पद प्रकार म्हणजे अनिल अंबानी यांच्याबाबत. इरिक्सन कंपनीचे देणे अनिल अंबानी यांनी थकवले, कोर्टासमोर मान्य करून 450 कोटी रुपये समोरच्या कंपनीस दिले नाहीत. हा कोर्टाचा अवमान झाल्याचा ठपका ठेवून सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना ‘‘पैसे भरा नाहीतर तुरुंगात जा’’ असे बजावले. मुकेश अंबानी यांच्या मदतीने अनिल अंबानी यांनी ही रक्कम भरली व तुरुंगवारी टाळली. याचे कौतुक असे की, श्री. मोदी हे पंतप्रधान आहेत म्हणून अनिल अंबानी यांनी हे पैसे भरले व देशाचे नुकसान टाळले असा सूर समाज माध्यमांत उमटला. मुळात या सर्व व्यवहाराशी सरकार व पंतप्रधान मोदी यांचा काहीही संबंध नाही. हा संपूर्ण खासगी व्यवहार होता. समाज माध्यमांच्या घोड्यावर बसणाऱ्यांनी सत्याचे भान ठेवू नये याचे आश्चर्य वाटते.

‘चौकीदार’ जोरात
सध्या ‘चौकीदार’ या शब्दाने निवडणुकीच्या मैदानात मोठाच धुरळा उडवला आहे व हे मैदान समाज माध्यमांचेच आहे. श्री. मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी जाहीर केले, ‘‘आपण ‘पंतप्रधान’ नसून देशाचे ‘प्रधान सेवक’ आहोत. ‘प्रधान सेवक’ म्हणून देशाची सेवा करीन.’’ त्यानंतर भाजपच्या अनेक खासदारांनी ‘सेवक’ असे लिहिलेले बिल्ले आपल्या छातीवर शौर्यपदकाप्रमाणे लावलेले मी पाहिले. खासदार विकास महात्मे हे त्यातले एक. ‘प्रधान सेवका’ची कल्पना लोकप्रिय ठरली. लोकांनी या कल्पनेवर टाळ्या वाजवल्या. आता ‘प्रधान सेवक’ ही पदवी स्वतःच दूर करून मोदी यांनी स्वतःला देशाचे ‘चौकीदार’ म्हणून घोषित केले. राफेल प्रकरणातील ‘चौकीदार चोर है’ ही पिचकारी राहुल गांधींनी मारली, पण आता ‘मैं भी चौकीदार’ असा कार्यक्रम मोदींनी जाहीर केला व समाज माध्यमांवर त्याचे पडसाद उमटले. प्रत्येक जण स्वतःला ‘मैं चौकीदार’ म्हणवून घेत आहे. अण्णा हजारे यांनी पाच वर्षांपूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केले होते तेव्हा ‘मैं भी अण्णा’ अशा मजकुराच्या गांधी टोप्या घालणाऱयांची लाट आली, ती लगेच विरून गेली. अण्णांनी पुन्हा याच मुद्द्यावर वारंवार उपोषण व आंदोलन केले, पण ‘मैं भी अण्णा’ टोपीवाले तिकडे फिरकलेच नाहीत. लोकांना तेव्हा वाटले, अण्णा हजारे हेच देशाचे चौकीदार आहेत व सर्व काही ठीक होईल, पण राळेगणसिद्धीत अण्णा हजारे आजही विमनस्क आणि हताश होऊन बसले आहेत. ‘चौकीदार’ शब्दास इतके महत्त्व कधीच आले नव्हते, ते या निवडणुकीत आले. पुलवामा हल्ला आणि हवाई हल्लाही मागे पडला, इतके महत्त्व ‘चौकीदारा’स मिळाले आहे. ‘‘चौकीदार नेपाळमधून स्वस्तात आणू, आम्हाला पंतप्रधान हवाय’’ अशी टीका काँगेसने केली. ‘‘चौकीदार तर श्रीमंतांच्या घराला असतात, गरीबांना चौकीदाराची गरज काय?’’ असा प्रश्न प्रियंका गांधींनी विचारला व समाज माध्यमांनी त्यावर चर्चा केली. ‘चौकीदारी’ची सगळ्यात ‘टपली’ मारली ती श्री. स्वराज कौशल यांनी. कौशल हे ज्येष्ठ कायदेपंडित व मिझोरामचे माजी राज्यपाल. त्यांनी ‘ट्विटर’वर टाकले, ‘‘आज सकाळी मी उठलो तर पाहिलं, माझी पत्नी चौकीदार झाली!’’ सुषमा स्वराज या त्यांच्या पत्नी. त्यामुळे स्वराज दांपत्याची ‘चौकीदारी’ही समाज माध्यमांवर गाजली.

‘बेरोजगार’ हार्दिक
हार्दिक पटेल हे समाज माध्यमांवर सगळ्यात जास्त सक्रिय आहेत व मोदी यांना छेडण्याची एकही संधी ते सोडायला तयार नाहीत. मोदीभक्तांनी सोशल मीडियावर स्वतःच्या नावामागे ‘मैं चौकीदार’ उपाधी लावताच हार्दिक पटेल यांनी आपल्या नावामागे ‘‘मैं बेरोजगार’’ असे लावले व ‘चौकीदार विरुद्ध बेरोजगार’ असे नवे युद्ध सुरू झाले. ‘बेरोजगार हार्दिक’ ही त्यांची नवी ओळख झाली. चौकीदारांना ‘चोर’ म्हटल्यामुळे चौकीदारांचा अपमान झाला, चौकीदारांच्या इमानदारीवर शंका घेतली. हे बरोबर नाही म्हणून आपणच चौकीदारांची माफी मागतोय असा नवा ‘फंडा’ पंतप्रधान मोदी यांनी केला. गरिबी हटाव, अच्छे दिन हे सर्व मागे पडले व ‘चौकीदारी’ या एका शब्दाभोवती देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक लढवली जात आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा ‘हास्यस्फोट’ आहे. समाज माध्यमांच्या मैदानावर ही हास्ययात्रा सुरू आहे. धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हटले जात होते. समाज माध्यमांची नशा अफू, गांजापेक्षा कडवट आहे. नशेतला माणूस बडबडतो, नंतर शांत होतो. समाज माध्यमांची नशा उतरणारी नाही. त्या नशेत मतदान करून देशाचे भवितव्य ठरवू नका!

Twitter- @rautsanjay61
Email- rautsanjay61@gmail.com