रोखठोक – इतिहास थांबला आहे!

नवे संसद भवन वादाचा विषय ठरत आहे. 2014 नंतर ‘भारत’ निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांचे हे नवे संसद भवन. त्याला इतिहास नाही. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंट कार्यालयात जात तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे अशी त्यांची भावना होत असे. नव्या संसद भवनाच्या लॉबीत चालताना असे वाटेल? इतिहास 2014 नंतर थांबलाय.

दिल्लीत नव्या संसद भवनाचे जोरदार उद्घाटन झाले. त्या सोहळय़ात राज्यघटनेचे, राजधर्माचे पालन झाले नाही. ‘सन्गोल’ म्हणजे राजदंडाचे आगमन दिल्लीत झाले. राजदंडासमोर पंतप्रधान मोदी यांनी साष्टांग दंडवत घातल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ‘सन्गोल’ हे राजेशाही म्हणजे बादशाहीचे प्रतीक आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांना राज्यघटना बाजूला करून देशाचे राजे व्हायचे आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला.

अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी बहाद्दुरी गाजवली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तेथील संसदेची निर्मिती झाली. तेव्हा एका सभासदाने वॉशिंग्टन यांच्या शौर्याची स्तुती करून वॉशिंग्टनला अमेरिकेचा राजा करण्याची सूचना केली, पण वॉशिंग्टन याने ती लगेच फेटाळून लावली. प्रजासत्ताक राज्याची कल्पना स्वीकारण्यात आली. घटना समितीच्या बैठकीनंतर एका वृद्ध महिलेने बेंजामिन फ्रँकलिनला विचारले, “आपल्याला काय मिळाले? राजेशाही की प्रजासत्ताक?” फ्रँकलिनने उत्तर दिले, “अर्थात प्रजासत्ताक! पण तुम्ही ते टिकवले तर!” राज्यघटनेची अंमलबजावणी चुकीच्या लोकांच्या हाती गेली तर काय होते याचा अनुभव सध्या जगातले अनेक देश घेत आहेत. रेगन, निक्सन, ट्रम्प, क्लिंटन यांच्या काळात अमेरिकेनेही तो घेतला. हिंदुस्थान सध्या तो घेत आहे. मोदी यांचे समर्थक म्हणतात, “देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले!” मोदी आल्यानंतर हिंदुस्थान निर्माण झाला असे त्यांना वाटते. त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2014 पर्यंत या देशात प्रजासत्ताक होते. त्यानंतर ते संपले. सन्गोल हे त्याचे प्रतीक आहे.

पराक्रमी व साहसी?

मोदी व शहा हे दोन्ही नेते पराक्रमी आणि हिमतीचे आहेत असे सांगितले जाते, पण पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसतील तर या सगळय़ांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. मोदींच्या सरकारला याच काळात नऊ वर्षे पूर्ण झाली, पण गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी हे पत्रकार परिषद घेत नाहीत. ते का बोलत नाहीत याचे उत्तर अमित शहा यांच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आहे. तामीळनाडूच्या ‘दिनामलार’ या वृत्तपत्राचे पत्रकार के. व्यंकटरमन यांनी अमित शहांना विचारले, “सर, आपण नव्या संसदेचे उद्घाटन केले. आपण लोकसभेत सन्गोल आणला. चोला साम्राज्याचे सत्तेचे ते प्रतीक आहे. दक्षिणेत सन्गोलला मान आहे.” व्यंकटरमन यांच्या या सुरुवातीच्या निवेदनावर अमित शहा खुश झाले, पण व्यंकटरमन यांनी पुढे विचारले, “सन्गोल हा फक्त तामीळनाडूतील चोला राजवंशाचा विषय नाही. तामीळनाडूतील पांडय़ा, चेरा, चोल असे अनेक राजवंश सन्गोलचा वापर करीत. दक्षिणेतील राज्यांची ही परंपरा, पण दक्षिण भारतातील जनतेने भाजपसाठी दरवाजा बंद केला आहे!” याबरोबर अमित शहा सावध झाले व त्यांनी पत्रकार व्यंकटरमन यांना, “आता पुरे, बस झाले. तुम्हाला काय म्हणायचे ते समजले. आता तुम्ही बोलू नका. चला, पुढचा प्रश्न विचारा!” असे बोलून व्यंकटरमन यांचा प्रश्न टाळला. हे कसले लक्षण समजायचे?

गांधी अमेरिकेत!

आपले पंतप्रधान श्री. मोदी हे सर्वज्ञानी आहेत. त्यांना परखड प्रश्न विचारलेले आवडत नाही. पत्रकारिता, व्यक्तिस्वातंत्र्य या सर्व अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे आपल्या उद्योगपती मित्रांना हाताशी धरून त्यांनी सर्व ‘मीडिया’ विकत घेतला. तरीही एखादा व्यंकटरमन धाडसाने प्रश्न विचारतो व सत्ता त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. राहुल गांधी हे सध्या अमेरिकेत आहेत. तेथील भारतीय श्री. गांधी यांच्या भाषणास गर्दी करीत आहेत. राहुल गांधी एका भाषणात म्हणाले, “आपले पंतप्रधान सर्वज्ञानी आहेत. त्यांना विज्ञानापासून तंत्रज्ञानापर्यंत सगळे कळते. देव त्यांना भेटले तर ते देवांनाही ‘ब्रम्हांड’ कसे चालवायचे याचा सल्ला देतील.” गांधी यांच्या मार्मिक टिप्पणीवर देशातील भाजप खवळला. याचा अर्थ गांधी खरे बोलत आहेत.

श्री. राहुल गांधी अमेरिकेत आहेत. मोदी सरकारच्या कृपेने त्यांचा राजनैतिक पासपोर्ट काढून घेतला गेला. खासदारकी, घर व राजनैतिक पासपोर्ट सगळेच गेले. साध्या पासपोर्टवर ते अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे पोहोचले. तेव्हा अमेरिकेतील भारतीयांनी विमानतळावर राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले. लोक स्वत:हून गांधी यांच्या स्वागतासाठी आले. गांधी यांच्याकडे राजनैतिक (diplomatic) पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना इमिग्रेशनच्या रांगेत इतर लोकांबरोबर तीन तास थांबावे लागले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन ते बाहेर पडले. रांगेतल्या लोकांनी राहुल गांधी यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. आपल्याकडे राजनैतिक पासपोर्ट नसल्यामुळे तीन तास विमानतळावरील रांगेत उभे राहावे लागले. यावर गांधी म्हणाले, “मी खासदार नाही. आता एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे मला सामान्य माणसांप्रमाणे राहायला आवडते.” एका बाजूला दिल्लीत ‘सन्गोल’चा उदोउदो करीत ‘राजेशाहीचा थाट सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या नेहरू-गांधी कुटुंबाने देशात लोकशाही टिकविण्यासाठी त्याग केला त्यांचे नातू आणि पणतू अमेरिकेच्या विमानतळावर एका सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे होते. हीच आपल्या लोकशाहीची परंपरा आहे.

दुराग्रही राजकारण

स्टालिनचे एक चरित्र वाचनात आले. स्टालिन हा कमालीचा हट्टी, दुराग्रही आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीचा होता. तो त्याच्या मनाप्रमाणे धर्माचे अवडंबर माजवी, पण धर्म आणि परमेश्वर यापैकी कुणावरही त्याचा विश्वास नव्हता. स्टालिनच्या कारकिर्दीत त्याची खोटी चरित्रे लिहिली गेली. इतिहासही खोटा लिहिला गेला. 1905 च्या उठावात स्टालिनने शौर्य गाजवले अशा धादांत खोटय़ा कथा प्रसिद्ध झाल्या. स्टालिन हा साहसी, पराक्रमी होता याबाबत अनेक दंतकथा त्याच्या काळात रचल्या गेल्या व लोकांत पसरवल्या गेल्या. लेनिनची अनेक वचने स्टालिनने आपल्या सोयीप्रमाणे वापरली. लेनिनच्या दृष्टीने स्टालिन हा एक नंबरचा बेमुर्वतखोर, सत्तापिपासू होता व लेनिनने तसे लिहून ठेवले. स्टालिनच नव्हे तर कोणाही नेत्याच्या हाती अनिर्बंध सत्ता येऊन तो मदांध होऊ नये ही लेनिनची इच्छा होती. 1923 साली एका डोंगराळ भागात झिनोव्हिव्ह बुखारीन, व्होरोशिलॉव्ह वगैरे नेते जमले व सामुदायिक नेतृत्व कसे आणावे यावर चर्चा सुरू केली, पण त्यांच्यात एकमत झाले नाही. बुखारीन त्यांच्यातून फुटला. पुढे बुखारीनला हाताशी पकडून स्टालिनने इतर नेत्यांचा काटा काढला. पुढे बुखारीनला काही काळ वापरून स्टालिनने त्याचाही काटा काढला. स्टालिनने विरोधकांना संपवले. त्यासाठी पोलीस व गुप्तचर यंत्रणांचा वापर केला. आज पुतिनही तेच करीत आहेत. आपल्या देशातही वेगळे काय घडते आहे!

इतिहास चालतो!

हिंदुस्थानातील प्रवास राजेशाही, साम्राज्यशाही, लोकशाहीकडून पुन्हा राजेशाहीकडेच येताना दिसत आहे. सध्याच्या राजकारणी व्यक्तींना वाचनासाठी वेळ नसतो, पण जे वाचत नाहीत ते सत्तेवर राहण्यास पात्र नाहीत, असे मत ब्रिटनच्या मजूर पक्षाचे नेते मायकेल फूट यांनी व्यक्त केले होते. आपले राज्यकर्ते इतिहासाचे वाचन करीत नाहीत. किंबहुना इतिहासाची पाने फाडून नवा इतिहास लिहू पाहत आहेत, पण पुस्तकाची पाने फाडून इतिहास बदलता येईल काय? राजकारण हे सत्तेसाठीच असते, पण सत्ता देशाचा पायाच उखडून टाकणारी असेल तर लोकांना पुढे येऊन देश वाचविण्याचा लढा उभा करावा लागतो. देशाची स्थिती ही राज्यघटना व लोकशाहीला मारक आहे. नवी संसद देशाच्या इतिहासाची साक्षीदार खरेच आहे काय? नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमधील कार्यालयात जात, तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे, अशी त्यांची भावना होत असे. हिंदुस्थानच्या जुन्या पार्लमेंटमध्ये चालताना भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचा, राज्यघटना निर्मितीचा इतिहास आपल्या बाजूने चालत आहे असे नेहमीच वाटत आले!

आता नवे संसद भवन उभे राहिले. 2014 नंतरच्या कोणत्या घटना सोबत चालतील तेवढेच पाहायचे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]