
संतापाने एखाद्याच्या नावाने आंघोळ करण्यास आपल्या शास्त्रात मान्यता आहे. पण त्याच संताप आणि चिडीतून एखाद्या बेइमानाच्या नावानं थुंकणे यावर राजकीय गदारोळ होतो. शिवसेनेशी बेइमानी केलेल्या आमदार-खासदारांवर प्रश्न येताच संजय राऊत रागाने थुंकले. हा काहींच्या दृष्टीने अपराध ठरला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे त्यावर दाखले दिले. त्या थुंकण्यासाठी इतिहासात मान्यता आहे हे विसरता येत नाही!
आपल्या महान लोकशाहीवादी देशात कधी कोणत्या विषयाला उकळी फुटेल व त्यावर निरर्थक चर्चा घडतील याचा नेम नाही. गेल्या आठवडय़ात निदान महाराष्ट्रात तरी ‘थुंकण्या’वर चर्चा झाली. निषेध व्यक्त करण्यासाठी संतापाने थुंकणे हा काही लोकांना अपराध वाटू लागला. त्यात बेइमान व्यक्तीवर थुंकाल तर याद राखा असे वारंवार बजावण्यात आले. सूर्यावर थुंकण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मोदी किंवा शहा यांच्यावर टीकात्मक बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकणे असेच आहे. भाजपातील अंधभक्तांना तरी असेच वाटते. त्यामुळे भाजपच्या सूर्यावर थुंकणे हा राष्ट्रद्रोह ठरला आहे, पण महाराष्ट्रातील ‘बेइमान’ राज्यकर्त्यांवरील संताप व्यक्त करण्यासाठी थुंकणे हेसुद्धा आता अंधभक्तांच्या पचनी पडत नाही. अशा लोकांना मी वीर सावरकर यांचे उदाहरण दिले.
जॅक्सन वध प्रकरणी बॅ. विनायक दामोदर सावरकरांना लंडन येथे अटक करून मुंबईला आणले. त्या वेळी एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने त्यांना मुंबईतील एका राजेशाही इमारतीसमोर उभे केले आणि म्हटले, “ही भव्य इमारत कोणाची आहे ते माहीत आहे काय?” तो इंग्रज अधिकारी पुढे म्हणाला, “ही एका बॅरिस्टराच्या मालकीची इमारत आहे. तुम्ही हे उद्योग सोडून जर बॅरिस्टरी केली असती तर अशी इमारत तुम्ही बांधली असती. तुम्ही अशिलांचे खटले चालविले असते तर असे श्रीमंत बनले असता.”
सावरकरांनी ताडकन उत्तर दिले, “मी खटला चालवीत नाही व बॅरिस्टरी करीत नाही असे तुम्हाला कोणी सांगितले? सध्या मी एक मोठा खटला चालवीत आहे. तो खटला अपामणाचा आहे. तुम्हा इंग्रजांचे आमच्या देशावरील बेकायदा अपामण. ते हुसकावून लावण्यासाठी मी देशाचे वकीलपत्र घेतले आहे आणि श्रीमंतीबद्दल म्हणाल तर ज्या वेळी देशाचे हे वकीलपत्र घेतले त्या वेळी घरादारावर मी तुळशीपत्र ठेवले आहे. त्यामुळे आपले इमान विकून इमले विकणाऱ्यांवर मी थुंकतो!”
…आणि सावरकर खरंच संतापाने थुंकले!
बेइमानांच्या नावाने थुंकणे ही संतप्त प्रतिक्रिया आहे.
प्रबोधनकारांचा संताप
संयुक्त महाराष्ट्र लढय़ात, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे संतापून जाहीरपणे म्हणाले होते, “अरे, थुत तुमच्या जिंदगानीवर.” याच तेव्हा महाराष्ट्राच्या भावना होत्या. थुंकणे हे आंदोलकांचे एक शस्त्र आहे. निषेध व्यक्त करण्याचे हत्यार आहे. 1857च्या बंडात दिल्लीचा बादशहा बहाद्दूरशहा जफर याचा सहभाग होता. त्याने इंग्रजांशी युद्ध केले, पण शेवटी पराभूत झाला. इंग्रजांनी बादशहाच्या सर्व मुलांना दिल्लीच्या रस्त्यावर निर्घृणपणे मारले. ब्रिटिश सैनिकांची एक शंभर जणांची तुकडी बादशहा बहाद्दूरशहा जफर यास अटक करण्यास जुन्या दिल्लीतील महालात गेली. पण जफर हा शेवटचा मुगल बादशहा होता. कॅ. विलियन हॉडसन हा शंभर सैनिकांसह दिल्लीच्या रस्त्यावरून बादशहाला अटक करण्यासाठी निघाला. तेव्हा दिल्लीच्या रस्त्यावर अफरातफरी माजली होती. विद्रोही रस्त्यावर होते, पण त्यातील कोणीही कॅ. हॉडसनच्या तुकडीवर हल्ला केला नाही. हुमायूनच्या मकबऱ्यापाशी सैन्य आणि लोकांची गर्दी होती. त्यामुळे सुरुवातीला विलियम हॉडसन आत जाण्यास कचरला, पण तरीही तो आत गेला व त्याने अखेरच्या मुगल बादशहास जेरबंद करून बाहेर आणले. तोपर्यंत दिल्लीच्या रस्त्यावर शेकडो लोक जमा झाले होते. इतिहासकार लिहितात, “दिल्लीच्या रस्त्यावर तेव्हा चाळीस हजार लोक दोन्ही बाजूला उभे होते व त्या गर्दीतून बादशहाला जेरबंद करून कॅ. हॉडसन नेऊ लागला. ते चाळीस हजार लोक नुसते थुंकले असते तरी त्यात दिल्लीतले ब्रिटिश सैन्य वाहून गेले असते!” ही आहे थुंकण्याची ताकद.
ब्रिटिशांवर थुंकले!
13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड घडले. तेव्हा ब्रिटिशांच्या त्या निर्घृण कृत्यावर सारे जग थुंकले! अन्याय, अत्याचार, दडपशाहीचा निषेध म्हणून जग सतत अशा प्रवृत्तीवर संतापाने थुंकत आले. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात क्रांतिकारकांनी तर ‘थुंकणे’ हे निषिद्ध मानले नव्हते. क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा प्रसंग इथे मुद्दाम देतो.
23 डिसेंबर 1912 रोजी लॉर्ड हार्डिंग्ज आपल्या लवाजम्यासह कोलकात्याहून निघून दिल्लीत प्रथमच पोहोचणार होता. एखाद्या राजासारखी हत्तीवरील हौद्यात बसून त्याची लेडीसह मिरवणूक निघणार होती. अन्य मांडलिक राजांचे हत्ती, घोडे, उंट त्याच्यापुढे असणार होते. इंग्रजांशी एकनिष्ठता दाखवण्याची उत्तम संधी! रासबिहारी बोस आणि त्यांचे सहकारी यांनी या हत्तीवरच बॉम्ब फेकायचा निर्धार केला. जुन्या किल्ल्यापासून लाहोर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तीन मजली इमारत त्यांनी हेरली. मिरवणुकीच्या वेळी इथे महिला घराच्या माडय़ांवर बसून गंमत पाहणार हे उघड होते. इमारतीत महिलेच्या वेशात जाऊन बसायचे आणि वरून बॉम्ब टाकायचा हे ठरले. मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी, बसंतकुमार बिस्वास आणि स्वत रासबिहारी यात सहभागी होते. हा बॉम्ब रासबिहारींनी स्वत निर्माण केला होता. त्याचे नाव होते लिबेर्टो. हा सुरक्षिततेसाठी दोन भागात बनवलेला बॉम्ब होता.
लॉर्ड हार्डिंग्ज पत्नीसह हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या हौद्यात बसला. त्याच्या मागे जमादार बसला आणि राजाच्या ऐटीत मिरवणूक सुरू झाली. क्रांतिकारकांनी ठरविलेल्या ठिकाणी हत्ती आला. वसंतकुमार बिस्वास बुरखाधारी स्त्रीचा वेष घालून वरच्या मजल्याच्या गच्चीत बसले होते. योग्य ठिकाणी हत्ती येताच त्यांनी बॉम्बचे दोन सुटे भाग जुळवले आणि नेम धरून बॉम्ब हौद्यावर फेकला. जमादार खलास झाला. पाठीकडच्या चांदीच्या जाड पत्र्यामुळे
हार्डिंग्ज वाचला, परंतु जखमी झाला. त्याचा अंगरखा फाटला. पुढच्या सत्कार कार्पामातून माघार घेण्याइतकी त्याची तब्येत बिघडली. मिरवणुकीचा त्याने इतका धसका घेतला की पुढे कपूरथळामध्ये अशी मिरवणूक निघाली तेव्हा त्याने तेथील राजाला स्वतच्या शेजारी बसवूनच मिरवणुकीत भाग घेतला!
बॉम्बस्फोट करून पाचही जण यशस्वीरीत्या गायब झाले. या स्फोटाच्या तपासात इंग्रजांना थेट यश कधीच मिळाले नाही. पण पुढे फितुरीमुळे रासबिहारी सोडून अन्य चौघे पकडले गेले. रासबिहारी जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिंद सेना उभारली.
मास्टर अमीरचंद न्यायालयात बेडरपणे उद्गारले, ‘’तुम्ही ब्रिटिश संख्येने आहात कितीसे? सर्व भारतीय तुमच्याकडे पाहून थुंकले तरी त्या लोटात तुम्ही वाहून जाल, दुर्दैवी आम्ही आहोत, आधी कोण थुंकणार यावर भांडत बसू.”
प्रत्यक्ष कोणताही पुरावा नसूनही इंग्रजांनी दिल्ली कारागृहात अवध बिहारी, भाई बालमुकुंद आणि मास्टर अमीरचंद यांना आजच्याच दिवशी फासावर चढवले, तर बसंतकुमार बिस्वास या तरुणाला अंबाला कारागृहात 11 मे दिनी फाशी देण्यात आले.
कोणता संस्कार?
यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे दाखले आजही दिले जातात. पण यशवंतराव हे राजकारणातील ‘जोकर’ असल्याची भाषा महाराष्ट्रातील साहित्यिक व राजकारण्यांतून केलीच गेली होती. यशवंतरावांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा त्यांच्या हयातीत कोणी जपला नव्हता. नारायण राणे व त्यांच्या मुलांची भाषा मर्यादेपलीकडे असंस्कृत आहे. शरद पवार यांना पाहिले की, त्या पोरांना औरंगजेबाची आठवण येते. ही असभ्य भाषा ऐकून जे संतप्त होत नाहीत त्यांना सुसंस्कृतपणाचा अर्थ नीट समजलेला नाही. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे तर श्री. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो कृतघ्नपणाचा कळस आहे. श्री. ठाकरे यांनी राजकारणाशी संबंध नसलेल्या या चिरंजीवांना दोन वेळा खासदार केले व त्यास मुलाप्रमाणे सांभाळले हे मी स्वत: पाहिले. तोच चिरंजीव अत्यंत असभ्य भाषेत उद्धव ठाकरेंविषयी बोलतो. या कृतघ्नपणावर थुंकणे हा कदाचित मार्ग नसेल. पण ती एखाद्याची लायकी असू शकते. सभ्यतेच्या सर्व मर्यादा या सगळय़ांनी सोडायच्या व त्यांना उत्तर दिले की थयथयाट करायचा. हा रडीचा डाव झाला.
संविधानाचे लाथाडणे
सध्या आपल्या देशात कायद्याचे व संविधानाचे राज्य राहिलेले नाही. संविधान लाथाडणे हे संविधानावर थुंकण्यासारखेच आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या बाजूने दिलेले निकाल फिरवून त्या विरोधात अध्यादेश काढणे हे संविधान लाथाडण्यासारखे आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार घटनाबाहय़ ठरवून ‘डिसमिस’ केले, पण संविधानाचा हा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष अमलात आणू इच्छित नाहीत. हे संविधानावर पिचकारी मारण्यासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पातळी सोडून बोलतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोनदा खासदार केले. ते व त्यांचे वडील आज ज्या पदास पोहोचले ते शेवटी शिवसेना व ठाकरे यांच्यामुळेच. राजकीय वाटा वेगळय़ा झाल्या, पण आपल्या वयाचा विचार करून महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत ‘कुंथणे’ कोणत्या संस्कृतीत बसते? त्या असभ्य कुंथण्याची प्रािढया निषेधाच्या थुंकण्यात होते. भाजपच्या एका कोकणातील आमदाराने भर पावसात रस्ते अभियंत्यास चिखलाने आंघोळ घातली. हे तर थुंकण्यापेक्षा भयंकर, पण शेवटी ही सर्व आंदोलनाची शस्त्र आहेत. पंतप्रधान मोदी व त्यांच्या केंद्रातील नेत्यांची भाषा वस्त्रगाळ केली तर शेवटी जो चोथा उरतो तो असभ्यच असतो. या सर्व मजकुराचा सारांश इतकाच की, संयम आणि मर्यादा पाळायलाच हव्यात, पण थुंकणे ही एक सूड कथा आहे, संताप कथा आहे. त्या संतापाचाही लोकशाहीत आदर व्हायला हवा.
Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]