रोखठोक- कश्मीर अशांत, पंजाबात खदखद! अंधभक्तांनो, हे कधी थांबणार?

पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत, पण देशात सुरू असलेल्या आंतरिक सुरक्षेच्या मामल्यावर डोळे झाकता येणार नाहीत. कश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहे. अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत!

आमच्यासारखे देशभक्त दुसरे कोणीच नाहीत, असे ढोल रोज पिटणाऱ्यांच्या राज्यात आपण जगत आहोत.

पण देशात काय सुरू आहे?

हा मजकूर लिहीत असताना पुलवामातून आणखी एका कश्मिरी पंडिताची दिवसाढवळय़ा हत्या झाल्याची बातमी आली आहे. या घटनेनंतर कश्मिरी पंडितांचे आक्रोश व संतापाचे चित्र जम्मूपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र दिसले. पण भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेचे नाटय़ दोन दिवस रंगवून कश्मिरी पंडितांच्या आक्रोशावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. हे असे करणे म्हणजे आपल्याच विचारांशी बेइमानी आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान जम्मूत सहा महिन्यांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या कश्मिरी पंडितांना भेटलो. ‘‘मोदी-शहांचे सरकार जबरदस्तीने आम्हाला कश्मीर खोऱ्यात पाठवीत आहे, पण आमच्या जीविताचे रक्षण करण्याची हमी घ्यायला ते तयार नाही. यांच्या राजकारणासाठी आम्ही किती वेळा रक्त सांडायचे?’’ असा सवाल त्यातील महिलांनी केला, तो खरा आहे.

दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी पुलवामा जिल्हय़ात पत्नीसह बाजारात गेलेल्या संजय शर्मा या पंडिताची हत्या झाली. आपल्या पतीला दहशतवाद्यांनी गोळय़ा घालताना पत्नीने पाहिले. त्यानंतर आकांत करतानाचे तिचे छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले. 370 कलम हटवले गेले ते फक्त कागदोपत्री व भाजपच्या राजकीय सोयीसाठी. कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग होता व आहेच. 370 कलमाने कश्मीरला विशेष अधिकार मिळाले होते. ते काढून घेतले, पण 370 कलम हटवल्यावर कश्मिरी पंडितांना त्यांचे अधिकार मिळाले काय? याचे उत्तर भाजपचा एकही बडा नेता देऊ शकलेला नाही. 370 कलम हटवूनही मोदी-शहा पंडितांचे रक्षण करू शकले नाहीत. मेहबुबा मुफ्ती त्यावर म्हणाल्या, ‘‘कश्मिरी पंडितांच्या हत्या व्हाव्यात व ते असुरक्षित असावेत हीच भाजपची इच्छा आहे, कारण पंडितांच्या बलिदानावरच त्यांचे राजकारण सुरू आहे.’’

मेहबुबा मुफ्ती यांच्याशी मतभेद असणाऱ्यांनाही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल.

पुलवामात बळी पडलेल्या संजय शर्मांच्या पत्नीचा आक्रोश तोच प्रश्न विचारीत असावा.

पंडितांच्या हत्येचे राजकारण

मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपने सत्तेचा खेळ जम्मू-कश्मीरात मांडला तेव्हा त्यांची देशभक्ती उसळून वर आली नव्हती. आज त्याच मेहबुबा म्हणतात, ‘‘कश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायाचे संरक्षण करण्यास भाजप सपशेल अपयशी ठरला आहे. पुलवामामध्ये पंडितांची हत्या झाली. मात्र अशा घटना घडतात तेव्हा मुस्लिमांना लक्ष्य केले जाते आणि त्याचा फायदा भाजपला संपूर्ण देशात होतो.’’ कश्मीरमधील अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आणल्याचा आरोप मुफ्ती करतात तेव्हा हे अल्पसंख्याक म्हणजे हिंदू पंडित आहेत व जम्मूतील हिंदूंनी भाजपच्या पारडय़ात भरभरून मते टाकली, पण कश्मीरातील हिंदूंविषयी कोणीच बोलत नाही व जम्मूत सहा महिन्यांपासून धरणे धरून बसलेल्या पंडितांचे हाल विचारायला भाजपचा एकही नेता गेला नाही. उलट झाले असे की, केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या जम्मूतील नेत्यास भेटण्यासाठी कश्मिरी पंडितांचे शिष्टमंडळ गेले. ते म्हणाले, ‘‘साहेब, आम्ही पंडितांनी तुम्हाला भरभरून मतदान केले आणि तुम्ही आमच्यासाठी काहीच करायला तयार नाही. आम्ही आमच्या पोराबाळांसह जम्मूच्या रस्त्यावर आहोत. तुम्हाला मते देऊन आम्ही चूक केली असेच आता वाटते.’’ यावर ते मंत्रीमहोदय उर्मट व तितक्याच थंडपणे म्हणाले, ‘‘तसे असेल तर पुन्हा ती चूक करू नका!’’

भारतीय जनता पक्ष अहंकार व उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे व त्या टोकावरून आता त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. अदानी यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालून त्यांना वाचविणारे सरकार कश्मिरी पंडितांना वाचवत नाही हे नोंद करण्यासारखे आहे. महाराष्ट्रासह सर्वत्र भाजपपुरस्कृत सकल हिंदू आक्रोश मोर्चे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात काढले जात आहेत. असे सकल हिंदूंचे आक्रोश मोर्चे कश्मिरी पंडितांच्या हत्येविरोधात का निघू नयेत? या सकल मोर्चावाल्यांनी जम्मू-कश्मीरातील हिंदूंचे हाल काय ते समजून घेतले नाहीत. पुलवामाच्या बाजारात संजय शर्मांची हत्या त्यांच्या पत्नीसमोर झाली. तेथे हिंदू मोर्चा निघाला असता तर बरे झाले असते, पण तेथे शेपटय़ा घालायच्या व महाराष्ट्रात ‘हिंदू खतरे में’ म्हणून छाती पिटायची. हे राजकारण समाज बिघडवत आहे.

कोंडवाडाच झाला

कश्मीर आजही अशांत आहे. लष्कराच्या बंदुकांमुळे तेथे वरवरची शांतता दिसत आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या शेवटी राहुल गांधी श्रीनगरला पोहोचले व तिरंगा फडकवला तेव्हा बऱ्याच महिन्यांनी सर्व बंधने झुगारून कश्मिरी जनता एकत्र आली व कोणताही घातपात घडला नाही. राहुल गांधी हे नंतर त्यांच्या सहकाऱ्यांसह बर्फात खेळताना देशाने पाहिले. कश्मीरचा पैदखाना करून लोकांना जणू कोंडून ठेवले आहे असे आता वाटते. लष्कराच्या बंदुकांची पर्वा न करता कश्मिरी पंडितांवर हल्ले होतात तसे मुसलमान, पोलीस व सुरक्षा रक्षकांनाही मारले जाते. कश्मीरात हे वातावरण असताना  बाजूच्या पंजाबात पुन्हा एकदा खलिस्तानचा झेंडा फडकावा हे धक्कादायक आहे. एका आरोपीस सोडविण्यासाठी ‘खलिस्तान’चे नारे देत मोठा जमाव पोलीस स्टेशनवर चाल करून जातो ही केंद्रीय सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. खलिस्तानचे गाडलेले भूत तेथे पुन्हा जिवंत होताना दिसत आहे. अमृतपाल सिंह हा खलिस्तानी चळवळीचे नेतृत्व करतोय व हिंसा घडवून आणतोय. त्याच्या चळवळीस पैसा कोठून येतोय याचा तपास करण्याची हिंमत मोदी-शहांच्या प्रिय ‘ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स’ने दाखवायला हवी. अशी हिंमत ते अदानींच्या बाबतीत दाखवू शकले नाहीत व पंजाबातील खलिस्तानवाद्यांच्या बाबतीतही दाखवणार नाहीत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सीबीआयने अटक केली. तसा फास पंजाबात खलिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांच्या बाबतीत का आवळला नाही? सरळ सरळ परदेशी पैसा या चळवळीत पुन्हा येऊ लागला व मोदी-शहा त्यावर गप्प आहेत. पंजाबातील ‘मोगा’ येथील सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तान समर्थनार्थ घोषणा रंगवण्यात आल्या. हा विषय देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आहे. त्यामुळे राज्य सरकारवर हे सर्व ढकलून चालणार नाही. तुम्ही देशाचे राज्यकर्ते आहात व सध्या ‘बादशाही’ पद्धतीने राज्य करत आहात. कश्मीर व पंजाबातील घटनांपासून तुम्हाला पळ काढता येणार नाही. दोन्ही सीमावर्ती राज्ये आता स्पह्टक स्थितीतून जात आहेत. कधीही आग लागेल अशी स्थिती असताना दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवीत आहेत.

जाता जाता एका ताज्या बातमीचा संदर्भ देतो व विषय संपवतो. एन.आय.ए. म्हणजे राष्ट्रीय तपास एजन्सीने मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या एका ‘अदृश्य’, पण संशयित अतिरेक्याची माहिती दिली आहे. हा अतिरेकी पाकिस्तान व चीनमध्ये आतंकवादाचे प्रशिक्षण घेऊन आल्याची माहिती एनआयए देत आहे. या संशयित आरोपीची इत्थंभूत माहिती त्यांनी पोलिसांना कळवली. प्रश्न इतकाच आहे की, कश्मीरातील पंडितांवर हल्ला करू पाहणाऱ्या अतिरेक्यांची माहिती या यंत्रणांना का मिळत नाही आणि पंजाबातील नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानी चळवळीची खरी माहिती समोर का आली नाही?

एक संशयित आतंकी ‘अदृश्य’ स्वरूपात मुंबईत वावरतो आहे.

त्याला अटक का केली नाही?

पण अंधभक्तांच्या देशभक्तीवर संशय निर्माण करणे हा देशद्रोहासारखा गुन्हा ठरत आहे. देशातील गोंधळ भयंकर आहे. हे सर्व कधी थांबणार?

Twitter – @rautsanjay61

Email – [email protected]