रोखठोक – हिंडेनबर्ग रिपोर्ट ते टीम जॉर्ज, 2014 पासूनच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह!

देशातील निवडणुका म्हणजे फक्त एक देखावाच उरला आहे. ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकणाऱयांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे. त्यांना अडकवले जात आहे व त्यासाठी परदेशी कंपन्यांचा वापर होतो. ‘गार्डियन’ने अनेक स्फोट केले. 2023च्या मध्यास वॉशिंग्टनमधून आणखी स्फोट होतील व पंतप्रधान मोदींना जावे लागेल, असे भाकीत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे आज सर्वत्र बोलले जाते. वृत्तपत्रांनीच त्यांची प्रतिमा मोठी केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांना जगाचे सर्वोच्च नेते करून टाकले, पण जगातील प्रसिद्धी माध्यमांत अदानी प्रकरणानंतर मोदी यांची पत घसरली. त्यात ‘बीबीसी’वरील छाप्यानंतर चित्र बरेच बदलले आहे. मोदी यांची लोकप्रियता व एकंदरीत राज्यकारभार हा फुगा आहे. लोकशाहीच्या मुखवटय़ाआड ते हुकूमशाहीच चालवत आहेत यावर जगात चर्चा सुरू झाली. मोदी यांचे आतापर्यंतचे विजय व लोकप्रियता हा एक प्रकारचा दहशतवाद आणि हुकूमशाहीच होती. यावर जागतिक माध्यमांत चर्चा सुरू झाली आहे. ‘द गार्डियन’च्या खास वृत्तानुसार भारतातील अनेक प्रकरणांवरचा पडदा उघडताना दिसत आहे.

‘‘देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवून नामोहरम करण्यासाठी, विरोधकांना शरण आणण्यासाठी इस्रायलमधील एका कुख्यात डिटेक्टिव्ह कंपनीची भारतात मदत घेतली जात आहे. ही कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते. ही कंपनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेत ‘हेरफेर’ म्हणजे घोटाळे करीत आहे. ही कंपनी सोशल मीडियाचा वापर करून द्वेष, धर्मांधतेचे जहर पसरवीत आहे. विरोधकांच्या बाबतीत दुप्रचार करीत आहे. प्रमुख नेत्यांची बदनामी याच माध्यमांतून केली जात असून देशातील मोठय़ा वर्गाची ‘डोकी’ बधिर करून मोदी जे सांगतात त्यावर लोकांनी माना डोलवाव्यात यासाठी ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहे.’’ ‘द गार्डियन’ने अत्यंत परखडपणे हे सत्य मांडले. आता आपल्या देशातील अंध भक्त सांगतील ‘द गार्डियन’ने असे सत्य सांगणे हा देशावरील हल्ला आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, भारतात या कंपनीच्या ‘सेवा’ कोणता राजकीय पक्ष घेत आहे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.

इस्रायलची ही कंपनी भारतातील निवडणूक प्रक्रियेत ‘हेराफेरी’ करत आहे याचा अर्थ ‘ईव्हीएम’ हॅक करून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचे रूपांतर विजयात करण्यात आले.

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांनी आता मोदी यांचे 60 टक्के ट्विटर फॉलोअर्स बनावट आहेत आणि 18 हजारांवर ट्विटर अकाऊंट भाजपसाठी ‘फेक न्यूज’चा प्रसार करतात असा आरोप केला आहे.

मोदींची लोकप्रियता व त्यांना 2014 पासून मिळणारे विजय ही त्या इस्रायली कंपनीची आणि बोगस ट्विटर अकाऊंटची देणगी आहे काय?

पेगॅसस सुरूच आहे!

इस्रायलच्या कंपनीस ‘कंत्राट’ देणारे व त्यांना अर्थपुरवठा करणारे याच देशातले प्रमुख उद्योगपती आहेत. ‘पेगॅसस’ या हेरगिरी करणाऱ्या उपकरणाचा वापर आजही आपल्या देशात सुरू आहे व या पेगॅससचे जनक इस्रायल आहे. विरोधी पक्षाने ‘पेगॅसस’चा विषय अधांतरी सोडला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख राजकीय नेते व उद्योगपतींवर आजही ‘पेगॅसस’च्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. संघ परिवाराशी संबंधित भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मागणी पुन्हा केली. ते म्हणतात, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे. त्यांनी अनेकदा मूर्ख बनवले आहे. पेगॅसस टेलिफोन टॅपिंग हे त्याचे उत्तम उदाहरण. वॉशिंग्टनमधून डोवाल यांचे आणखी एक भयंकर प्रकरण लवकरच उघड होणार आहे. मोदी यांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर 2023 च्या मध्यास मोदी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल!’’

डॉ. स्वामी हे हवेत तीर मारणारे नेते नाहीत. जगभरातील यंत्रणांशी त्यांचा संवाद आहे व त्यातून ते महत्त्वाची माहिती समोर आणतात. आता ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केलेली हेरगिरी व निवडणूक हेराफेरीची माहिती व डॉ. स्वामी यांनी टाकलेला नवा बॉम्ब याची सांगड घालणे गरजेचे आहे. मोदी व भारतीय जनता पक्षाचे ‘अर्थमंत्री’ गौतम अदानी यांच्यावर हिंडेनबर्ग रिपोर्टचा फेकलेला बॉम्ब ही साधी गोष्टी नाही. तेव्हापासून अदानी समूह कोसळला तो उठला नाही व त्यातून मोदी यांचा चेहरा हा पाहण्यासारखा झाला. संसदेत ते जगाने पाहिले. निवडणूक प्रक्रियेत ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून हेराफेरी सुरू आहे हा विरोधकांचा आरोप कायम आहे. डॉ. स्वामी यांनी दावा केला की, ‘वॉशिंग्टन’मधून लवकरच नवा धमाका होईल. निवडणूक घोटाळय़ासंदर्भात हा धमाका असलाच तर आश्चर्य वाटू नये!

लोकप्रियतेचे खरे सूत्र

पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचे ‘सूत्र’ ईव्हीएम व इस्रायली हेरगिरी कंपनीच्या कारवाईत दडले आहे. सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी या सूत्रांचा वापर झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्य दडपले गेले व खोटय़ास सुवर्ण मुलामा देऊन ते चमकवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. काँग्रेस पक्षाने 60 वर्षांत काहीच केले नाही व नवा भारत 2014 नंतर निर्माण झाला हा अपप्रचार याच काळात सुरू झाला. संपूर्ण दिल्लीवर बुलडोझर लावून नव्या संसद भवनासह इमारतींचे जंगल उभे केले. त्याची गरज खरंच होती काय? पण इस्रायली कंपनीच्या सल्ल्याने हे सर्व झाले. असेही म्हटले जाते की इस्त्रायलमधल्या एका कंपनीच्या माध्यमातून जगभरातील 30 निवडणुकांवर प्रभाव टाकण्यात आला आहे. या कंपनीचे नाव JORGE आहे. कंपनीच्या सॉफ्टवेअरचे नाव AIMS-Advance Impact Media Solution आहे. त्याची कार्यपद्धती बीजेपीच्या आयटीसेलच्या कामाशी मिळतीजुळती आहे.

देशातील बहुतेक निवडणुका गेल्या सात-आठ वर्षांपासून ‘निष्पक्ष’ वातावरणात होऊ शकल्या नाहीत. देशात महागाई, बेरोजगारी, असंतोषाचा भडका उडाला असताना ‘‘आम्ही लोकसभेच्या 400 जागा जिंकू,’’ असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते करतात, याचा अर्थ आता समजून घेतला पाहिजे. काँग्रेसच्या काळात मतदान केंद्रे ताब्यात घेतली जात होती असा आरोप करणारे आज मतदान प्रक्रिया ताब्यात घेण्यासाठी इस्रायली कंपन्यांचा वापर करीत असतील तर लोकशाही हा फक्त देखावाच आहे.

न्यायालयांचे प्रमाणपत्र!

अदानी प्रकरणामुळे देशात वादळ उठले आहे तसे वादळ ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणातही उठले व आता पुन्हा हेरगिरी व ईव्हीएममध्ये घोटाळे करून जिंकण्याचे नवे प्रकरण समोर आले. या सर्व प्रकरणांचा पुढे अंत काय? अशा सर्व प्रकरणांना न्यायालयांत ढकलून सरकारला चारित्र्याचे प्रमाणपत्र देणारे न्यायमूर्ती आधीच नेमले गेले आहेत व त्यांना निवृत्तीनंतर राज्यपाल वगैरे नेमून परतफेड केली जाते. देशात ‘बीबीसी’वर धाडी पडल्या. महाराष्ट्रातील उद्योगपतींवर धाडीवर धाडी पडत आहेत, पण खळबळ उडवून देणाऱया अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समिती नेमून चौकशी करायला मोदींचे सरकार तयार नाही. कोटय़वधीच्या काळय़ा पैशांच्या राशी उद्योगपती व व्यापाऱयांकडून गोळा केल्या व कोरोना काळात ‘पीएम केअर्स’ फंडात गुंतवल्या. पंतप्रधानांच्या नावे सुरू असलेला हा ‘फंड’ शेवटी ‘फ्रॉड’ निघाला, पण एकही केंद्रीय तपास यंत्रणा या पैशांचा हिशेब मागायला तयार नाही. एका छोटय़ा कारखानदाराच्या दारात इन्कम टॅक्सपासून जी.एस.टी., ईडीचे अधिकारी उभे असतात, पण अदानींच्या दारात अजून कोणीच पोहोचले नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांना दहशतवादी-गुंड ठरवून त्यांचे फोन चोरून ऐकणाऱया अधिकाऱयांना भाजपचे सरकार सरळ पोलीस महासंचालकपदी बढती देते व हे सरकार लोकशाही मार्गाने चालले असल्याचा दावा करते. हे ढोंग नाही तर काय?

इस्रायली डिटेक्टिव्ह कंपनी ‘टीम जॉर्ज’ हीच मोदी व भाजप सरकारची सूत्रधार आहे. ‘द गार्डियन’ने त्याची पोलखोल केली. हिंडेनबर्ग ते टीम जॉर्ज म्हणजेच ‘टीम मोदी’ आहे काय, हे आता उघड होऊ द्या.

देशातील सर्व निवडणूक मतदान पत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवरच व्हायला हव्यात, ही मागणी पुन्हा पुढे यायला हवी!
नागपूरसह पाच विधान परिषदांच्या निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या, त्याचा परिणाम सगळय़ांनी अनुभवला!

डॉ. स्वामी लवकरच एक नवा स्फोट घडवतील, तो वॉशिंग्टनमार्गे.

देश वाट पाहत आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]