गोव्यात राजकीय शिमगोत्सव, संघ विचारांचा भाजपकृत पराभव

40

गोव्यात सध्या शिमगोत्सव जोरात सुरू आहे, पण विधानसभा निवडणुकांच्या निकालाने सुरू झालेला राजकीय शिमगा अनेकांची सोंगे उघडी करणारा ठरला. फक्त १३ आमदारांच्या जोरावर भाजपने सरकार बनवले. भाजपचा पराभव करा असे निवडणुकीत सांगणारे लहान पक्ष भाजपच्या मंत्रिमंडळात सामील झाले. खऱ्या शिमग्याच्या सोंगांनाही लाज वाटावी असे हे राजकीय वर्तन. गोव्यातून हिंदूंचे राजकारण संपवणाऱ्या निवडणुकीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत!

गोव्यात सध्या शिमग्याचा उत्सव जोरात सुरू आहे. शिमग्याची सोंगे आणि चित्ररथांचे दर्शन गोव्यात घडत आहे; पण गोव्यातील राजकारण्यांनी घेतलेल्या सोंगांची चर्चा सध्या गोव्यात जास्त सुरू आहे. ‘होय, हे हिंदू राज्य आहे!’ असे विधानसभेत ठणकावून सांगणाऱ्या भाऊसाहेब बांदोडकरांचे गोवा आता राहिलेले नाही हे दोन दिवसांतील वास्तव्यात पुन्हा दिसून आले. गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव झाला; पण जे दारुणरीत्या पराभूत झाले त्यांचे राज्य पुन्हा गोव्यात अवतरले. त्या पराभुतांचे नेतृत्व करण्यासाठी देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना गोव्यात पाठवले व देशाच्या संरक्षण दलाचे नेतृत्व करणारे पर्रीकर हे विजयी मुद्रेने गोव्यातील पराभुतांचे नेतृत्व करतात हे लोकशाहीचे सगळ्यात मोठे विडंबन आहे. गोव्यातील वास्तव्यात एक संघ प्रचारक भेटले. त्यांनी फार कडवट विधान केले. ‘‘पर्रीकर यांनी आपलीच जुनी वक्तव्यं पुन्हा तपासायला हवीत,’’ असे या संघ नेत्याने सांगितले व खुलासा केला. ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी पर्रीकरांवर दिली त्यावेळी हीच व्यक्ती म्हणाली होती, ‘‘मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. देश म्हणजे माझी आई आहे आणि मी माझ्या आईचे पूर्ण जबाबदारीने संरक्षण करीन.’’ आज तेच पर्रीकर आईचे संरक्षण वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्रीपदासाठी गोव्यात परतले. ‘‘पर्रीकर यांचे मुख्यमंत्रीपद फार काळ टिकणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांतच असंतोष आहे,’’ असे तिथे बोलले जात आहे. गोव्यातील राजकारण्यांचा सध्या जो विचका झाला आहे त्याला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. भारतीय जनता पक्षाचे फक्त १३ आमदार विजयी होऊनही आज ते सत्तेवर आहेत; पण १७ आमदार विजयी होऊनही काँगेस पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही याचे खापर राहुल गांधींवर फोडता येणार नाही. गोव्यातील १७ आमदार शेवटपर्यंत त्यांचा नेता निवडू शकले नाहीत व भारतीय जनता पक्षाला जे सोयीचे आहे तसाच घोळ ते घालीत बसले. हातात आलेली सत्ता त्यांनी सोडून दिली.

सांस्कृतिक बदल

गोव्याचे सांस्कृतिक चित्र कालच्या निकालाने पूर्ण बदलले आहे. गोव्याच्या देवभूमीवर पाद्र्यांच्या राजकारणाने मात केली आहे. ‘‘पर्रीकर यांना स्वतःची प्रतिमा सेक्युलर अशी करायची आहे. त्यामुळे गोवा भाजपचे निकाल त्यांना हवे तसे त्यांनी आणले. हे सर्व पद्धतशीर नियोजन करून झाले,’’ असे सुभाष वेलिंगकर यांनी मला सांगितले. गोवा विधानसभेत आता हिंदू आमदारांचे प्राबल्य राहिले नाही. १७ ख्रिश्चन आमदार निवडून आले. भारतीय जनता पक्षाच्या १३ आमदारांपैकी सात आमदार ख्रिश्चन आहेत.

1) ग्लेन टिकलो, 2) मायकल लोबो, 3) अलिना साल्ढाणा, 4) नीलेश काबराल, 5) मॉविन गुदिन्हो, 6) फ्रान्सिस डिसोझा, 7) कार्ल्स अल्मेडा.

हे सर्व पाहिले की, भारतीय जनता पक्ष गोव्यात कोणाचे नेतृत्व करतो ते सहज लक्षात येईल. जुन्या आणि अनुभवी हिंदू नेत्यांनी पुन्हा विधानसभेत निवडून येऊ नये अशीच पर्रीकर यांची इच्छा होती. विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्यासह भाजपचे मोठे नेते पराभूत झाले. मार्मागोवामधून मिलिंद नाईक हे मंत्री कसेबसे शंभर मतांनी जिंकले हे पर्रीकर यांचे दुर्दैव! पण गोव्यातील भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीने उभा राहिला व पर्रीकरांसारखे कार्यकर्ते त्यामुळे मोठे झाले. ख्रिस्ती धर्मांधतेचे आक्रमण रोखून गोव्यात हिंदूंचे राज्य निर्माण व्हावे ही त्यामागची जिद्द होती; पण संघाच्या पर्रीकर यांना गोवा राज्य व स्वतःची प्रतिमा सेक्युलर अशी करायची आहे. १३ पैकी ७ ख्रिश्चन आमदार निवडून आणले हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव आहे. संघाच्याच नेत्याने तो केला.

संरक्षणमंत्री गोव्यात

भारतीय जनता पक्षाने गोव्याची अस्मिता व स्वाभिमान यांचा खून केला आहे. फक्त १३ आमदारांचे नेतृत्व करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी गोव्यात येणे हे चूकच होते; पण संरक्षणमंत्री असतानाही पर्रीकर हे गोव्यातच जास्त होते व शॅडो मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते. ज्या लहान पक्षांच्या व अपक्षांच्या मदतीने पर्रीकर यांनी सरकार बनवले ते सर्व पक्ष भाजपविरोधात प्रचार करून निवडून आले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी पर्रीकर यांच्यावर सर्वाधिक टीका केली. ते व त्यांचे तीन आमदार आता मंत्री झाले याचा संताप गोवेकरांच्या मनात आहे. सरदेसाई यांना आता मंत्री असूनही गोव्यात उघडपणे फिरता येत नाही. त्यांच्या गाडीवर लोकांनी बांगडे फेकून मारले. सुदिन ढवळीकर व त्यांचे दोन आमदारही सत्तेसाठी तत्त्व गुंडाळून भाजपच्या गोटात शिरले. काँग्रेसच्या मदतीने निवडून आलेले रोहन कौंटे व गोविंद गावडेंसारखे आमदारही भाजपच्या गोटात मंत्रीपदासाठी शिरले. सत्तेचा आणि मंत्रीपदाचा ऑक्सिजन मिळाला नाही तर प्राण जातील या ईर्षेतूनच सर्व घडले. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेसचा नाकर्तेपणा. विधिमंडळ पक्षाचा नेता त्यांना निवडता आला नाही. कारण १७ पैकी १० आमदार हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार. त्यामुळे शेवटपर्यंत घोळ घालत राहिले. प्रतापसिंग राणे यांना मुख्यमंत्री करून काँग्रेसला सरकार स्थापन करता आले असते; पण भारतीय जनता पक्षाच्याच इशाऱ्यावर हा घोळ जणू सुरू राहिला. दिल्लीचा दबाव व पैशांची ताकद काँग्रेस आमदारांवर वापरली. १३ आमदारांनी सरकार स्थापन केले व १७ जणांना हात चोळत बसावे लागले. त्यातले एक आमदार विश्वजित राणे हे सरळ पर्रीकरांच्या हातचे बाहुले बनले व विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहिले. प्रतापसिंग राणे यांचे ते चिरंजीव. वाळपई मतदारसंघातून ते निवडून आले. आमदार हे असे वागले त्यात राहुल गांधी यांचा दोष काय?

खुर्ची स्थिर नाही

मनोहर पर्रीकर यांनी सरकार स्थापन केले, पण त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची स्थिर नाही. सार्वजनिक बांधकाम खाते हेच सुदिन ढवळीकरांचे सर्वस्व आहे. गोव्याची संस्कृती आणि लोककल्याणाशी त्यांचा संबंध नाही. सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना मिळाले. त्यातच ते खूश आहेत. पण विजय सरदेसाई व त्यांचे आमदार काय करतील ते सांगता येत नाही. कॅसिनोचे काय करणार व पेटलेल्या माध्यम प्रश्नांवर काय भूमिका घेणार हे पर्रीकर सांगायला तयार नाहीत. कूळ मुंडकार विधेयकाचे घोंगडे भिजत पडले आहे. कोंकणीबरोबर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी राजभाषा समितीने रणशिंग फुंकले आहे. गोयंकरपणाचा धोषा विजय सरदेसाई व मनोहर पर्रीकर लावत आहेत; पण गोयंकरपण म्हणजे फक्त कोंकणी नाही. भाजपचे १३ आमदार जिंकले. त्यातले सात ख्रिश्चन. मराठीला डावलल्याचा फटका भाजपला बसला. ‘‘गोयंकरपणाची व्याख्या स्पष्ट करा’’ असे आता सांगितले जात आहे. मराठीचा गळा घोटून गोयंकरपणाचा विजय कसा होणार? पर्रीकर यांची भूमिका दुतोंडीपणाची आहे. फक्त ख्रिश्चनांच्या बळावर त्यांना गोव्यात राज्य करायचे आहे. हा संस्कृतीशी द्रोह आहे. १३ आमदारांच्या जोरावर राज्य स्थापन करून गोव्यात द्रोहपर्वाची नवी सुरुवात झाली आहे. गोव्याच्या मंदिरातील देव झोपले नाहीत व जनता सुशेगात नाही हे दाखवायची वेळ आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या