फक्त इंदिरा गांधी!

1203
  • संजय राऊत

इंदिरा गांधी या गरीबांत व सर्वसामान्य लोकांत प्रचंड लोकप्रिय होत्या. लोकांचे मन आणि भावना त्या अचूक ओळखत असत. त्यामुळेच श्री. चरणसिंग यांनी त्यांना अटक करण्याचा मूर्खपणाचा आदेश काढला, तेव्हा लोकक्षोभ झाला. दिल्लीतील राजशकट बदलताच इंदिराजींचे स्मरण हा गुन्हा ठरू लागला, पण हवा आता बदलत आहे!

इंदिरा गांधी यांना सहज विसरता येणार नाही. इंदिरा गांधींचे विस्मरण म्हणजे देशाच्या शौर्याचे व तेजाचे विस्मरण. केंद्रात व राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सूर्य झाकून त्यांना तेजाची किरणे अडवता येणार नाहीत. इंदिराजी जाऊन ३३ वर्षे झाली तरी त्यांचे स्मरण होते, होत राहील. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून इंदिरा गांधींचे स्मरण हा गुन्हा ठरू लागला. गेल्या तीन वर्षांत इंदिरा गांधींच्या जयंत्या व पुण्यतिथ्या सरकारने साजऱ्या केल्या नाहीत. इंदिरा गांधींच्या समाधी स्थळावर काँग्रेसचे व गांधी कुटुंबाचेच लोक फक्त जात राहिले. पंतप्रधान मोदी व त्यांचे केंद्रीय मंत्रीही फिरकले नाहीत. इंदिराजींचे स्मरण व त्यांच्या नावाने कार्यक्रम केले तर सरकार नाराज होईल. इंदिरा गांधींच्या सरकारी कार्यालयांतील तसबिरीही उतरवल्या. पण या वर्षी चित्र बदलताना दिसले. सोशल मीडियावर असंख्य लोकांनी इंदिरा गांधींचे स्मरण केले. त्यांच्या गौरवार्थ लिखाण केले. इंदिरा गांधी आज हव्या होत्या, अशा भावना कित्येकांनी व्यक्त केल्या. दिल्लीत राजशकट बदलल्यापासून इंदिराजींचे विस्मरण दूरदर्शन आणि वृत्तवाहिन्यांनाही झाले होते, पण ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पुण्यतिथीस अनेक वृत्तवाहिन्यांनी खास कार्यक्रम दाखवून इंदिराजींचे स्मरण केले. लोक दबाव झुगारत आहेत व मोकळा श्वास घेत आहेत. याचे हे उदाहरण…

संपूर्ण देशाच्या
इंदिरा गांधी या एका राज्याच्या नव्हत्या. त्या संपूर्ण देशाच्या होत्या, पण अस्सल मऱ्हाटी नऊवारी भरजरी साडीतले त्यांचे एक छायाचित्र तेव्हा खूप गाजले. दिल्लीतील एका समारंभात त्या भरजरी नऊवारी साडी नेसून आल्या होत्या तेव्हाचे हे छायाचित्र. इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राचा द्वेष केला नाही. राजकारणात त्यांनी महाराष्ट्रातील अनेकांचे पंख छाटले असतील, पण महाराष्ट्र अखंड राहावा व मुंबईचे महत्त्व कमी होऊ नये ही त्यांची भूमिका होतीच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ अखेर आला तो संयुक्त महाराष्ट्राच्या प्रखर आंदोलनामुळेच. १०५ हुतात्म्यांचे बलिदान व मराठी संतापाच्या स्फोटातून महाराष्ट्रास मुंबई मिळाली. मुंबईच्या बाबतीत पंडित नेहरूंची भूमिका वेगळी होती. पण शेवटी मुंबईवर महाराष्ट्राचाच अधिकार आहे अशा पद्धतीने नेहरूंचेही मन वळविण्यासाठी इंदिराजी व महाराष्ट्राचे ऋणानुबंध कामास आले. इंदिराजींचे भरजरी नऊवारी साडीतील चित्र बघून हे सर्व आठवले. इंदिराजींचे शिक्षण पुण्याच्या हुजूर पागेत झाले. हे आज सांगितले तर कुणाला खरेही वाटणार नाही. लहानगी इंदिरा पुण्यात राहात होती, त्या वेळी नेहरू नैनीच्या तुरुंगात प्रदीर्घ शिक्षा भोगत होते. परंतु तिथे बसून पुण्यात राहणाऱ्या आपल्या कन्येला सबंध जगाच्याच इतिहासाचे ओझरते दर्शन पत्ररूपाने घडविण्याचा उपक्रम पिता जवाहरलाल नेहरूंनी आरंभला. ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या पत्रग्रंथात नेहरू आपल्या या लाडक्या कन्येस – इंदूला छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय करून देताना लिहितात, ‘‘अलीकडे तू तर कित्येक दिवस मराठ्यांच्या देशाच्या अगदी ऐन अंतरंगात पुणे शहरात राहते आहेस. त्यामुळे शिवाजी राजांविषयी तेथील लोकांत केवढा आदर, केवढी भक्ती आहे हे तुला समजून चुकले असलेच पाहिजे. मी तुला धर्मनिष्ठ राष्ट्रवादाच्या प्रवृत्तीबद्दल सांगितले ना, तशा प्रवृत्तीचा शिवाजी राजा होता. विस्कळीत झालेली आर्थिक घडी आणि सामान्य लोकांच्या हालअपेष्टा यांच्यामुळे मूळ भूमी तयार झालेली होतीच. त्यात रामदास व तुकाराम या दोन श्रेष्ठ मराठी कवींनी आपल्या काव्यांनी व अभंगांनी या भूमीची चांगलीच मशागत केली. त्यामुळे मराठे लोकांत स्वसामर्थ्याबद्दल जागृती उत्पन्न झाली, ऐक्यभावना निर्माण झाली आणि अगदी अशा ऐन मोक्याला त्यांना विजयमार्गावर नेणारा हा तेजस्वी नायक मिळाला.’’

indira-gandhi-2

१५ वर्षांच्या इंदूला १२ सप्टेंबर १९३२ रोजी तुरुंगातून नेहरूंनी लिहिलेले हे पत्र. ‘‘राजा शिवाजी हेच खरे मराठ्यांचे वैभव वाढविणारे व मोगल साम्राज्याचा कर्दनकाळ होऊन गेले,’’ असे नेहरूंनी या वेळी या पत्रात लिहिले. परंतु आपल्या कन्येस धडे देणारा हा पिता शेवटपर्यंत स्वतःला विद्यार्थीच समजत असावा. १९५६ साली नेहरूंना प्रतापगडावरील छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलाविले त्या वेळची एक आठवण आज आवर्जून सांगावीशी वाटते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्या वेळी ऐन भरात होती. निदर्शनांनीच नेहरूंचे स्वागत करायचे असा निर्धार लोकांनी व्यक्त केला होता. नेहरूंवर महाराष्ट्राचा त्या वेळी रोष होता. तरीही नेहरू आले आणि चळवळीच्या या धामधुमीतही ‘विद्यार्थी’ जवाहरलाल शांतच राहिला. प्रतापगडावर येण्यापूर्वी ‘‘शिवाजी महाराजांवरील उत्कृष्ट इंग्रजी पुस्तक मला वाचावयास द्या,’’ अशी त्यांनी त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे मागणी केली. गांधीजींचे चरित्रकार डी. जी. तेंडुलकर यांनी न्यायमूर्ती रानडे यांचे ‘राइज ऑफ मऱ्हाटा पॉवर’ हे पुस्तक नेहरूंना सुचवले होते, ते त्यांच्याकडे पाठविण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना तुमच्या प्रिय राजाचे हे उत्कृष्ट चरित्र तुम्ही वाचले आहे काय, असे विचारून नेहरूंनी अगदी पेचात टाकले. कारण त्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेले नव्हते. समारंभ झाला. प्रतापगडावर श्री शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा झाला; परंतु जाता जाता नेहरूंनी दोन सूचना केल्या. न्या. रानडे यांचा हा इंग्रजी ग्रंथ हिंदुस्थान सरकारतर्फे प्रकाशित करण्याची व्यवस्था मी करतो असे सांगितलेच, पण मुंबई सरकारनेही हे कार्य हाती घ्यावे असे सुचविले.

दुर्मिळ झालेला हा एका महाराष्ट्रीय विद्वानाचा, महाराष्ट्राच्याच थोर पुरुषाबद्दलचा ग्रंथ हिंदुस्थानी जनतेसमोर आणला तो अखेर नेहरूंनीच. १९६१ मध्ये हिंदुस्थान सरकारच्या प्रकाशन विभागाने अल्प किमतीत तो प्रसिद्ध केला. महाराष्ट्र सरकारने या ग्रंथाचा मराठी अनुवादही आता प्रसिद्ध केला आहे. प्रतापगडावर नेहरूंना आणले त्याची ही कमाई काही थोडी नाही.

इंदिराजींचे पती फिरोझ गांधी हे मुंबईचे पारशी. नेहरूंच्या भगिनी व इंदिराजींच्या आत्या विजयालक्ष्मी पंडित यांचे यजमान रणजीत पंडित यांचे मूळ आणि कूळ कोकणातील सावंतवाडीतील. हे सर्व ऋणानुबंध पाहिले की इंदिराजींचे मन महाराष्ट्राकडे का ओढ घेत होते ते कळते.

वादग्रस्त
कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीचे व्यक्तित्व, कार्य हे वादातीत नसते तर वादग्रस्त असते. श्रीमती गांधींचे तसेच होते. त्यांच्या पित्यापेक्षा हे व्यक्तित्व वेगळे होते. संघर्ष, वाद हे टाळण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांच्याकडे त्यांच्या आजोबांपासून राजकारणाचा वारसा आला होता. देशातील व परदेशातील महत्त्वाच्या सर्व व्यक्तींना त्या अधिकारावर येण्यापूर्वीच ओळखत होत्या, पण पंडितजींचे छत्र गेल्यावर श्रीमती गांधी या राजकीयदृष्ट्या परावलंबी ठरतील अशी अनेकांनी कल्पना करून घेतली, ती पंतप्रधानपदावर येताच अडीचएक वर्षांत त्यांनी खोटी ठरविली. त्यांनी पक्षातील जे बुजुर्ग होते त्यांना नामोहरम केले आणि पक्षाबाहेरील अनेक अनुभवी राजकारण्यांना दुर्बल बनविले. राज्य हिकमतीने करावयाचे असते तसे ते हिमतीनेही करावयाचे असते. इंदिरा गांधींपाशी हिकमत व हिंमत दोन्ही होती. पक्षातील व पक्षाबाहेरच्या अनेक पुढाऱ्यांपाशी हिकमतीपणा बराच असला तरी फारच थोड्यांपाशी हिंमत होती. या थोड्यांतही इंदिरा गांधी पुढे होत्या. त्यांनी विविध राज्यांतील स्वपक्षीय पुढाऱ्यांची आसने खिळखिळी केली. जात, धर्म, भाषा यांच्या आधारावर राज्य करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांचे त्यांनी पानिपत करून टाकले. पक्षाची बांधणी यामुळे झाली की नाही हा वादाचा विषय आहे, पण पक्षाच्या डोक्यावरून त्या प्रत्यक्ष जनतेलाच आवाहन करीत होत्या व त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पक्षयंत्रणा ताब्यात ठेवणारेही निप्रभ ठरले. शिवाय साक्षात लोकांना आवाहन करण्याची ताकद असल्याने मर्यादित प्रभाव क्षेत्रात वावरणाऱ्या विरोधी नेत्यांनाही त्या हतबल करू शकल्या. १९६९ साली राष्ट्रपती निवडणुकीच्या संबंधातील पक्षशिस्त इत्यादी मुद्यांचा विचार सोडला तर स्वपक्षातील प्रमुख पुढाऱ्यांना आव्हान देणे हे मोठे धाडस होते. ते इंदिरा गांधींनी करून स्वतःच्या कर्तृत्वावर आपले नेतृत्व प्रस्थापित केले. त्यांचे हेच धाडस १९८० साली विरोधात राहूनही निवडणूक जिंकून त्यांनी दाखवून दिले. लोक पक्षाला नव्हे तर आपल्याला मते देतात हे त्यांनी दाखवून दिले होते आणि म्हणून त्यांचे पक्षीय सहकारी व अनुयायी त्यांच्यापुढे सदैव नतमस्तकच असत. ‘स्वयमेव मृगेन्द्रता’ अशा स्वरूपाचे हे नेतृत्व व कर्तृत्व होते.

पाकची शरणागती
मृत्यूनंतर ३३ वर्षांनी श्रीमती गांधींच्या टोलेजंग व्यक्तिमत्त्वाचा विचार आपण करतो तेव्हा त्यांच्या आयुष्यभरातील अनंत घटनांचा व चढउतारांचा आलेख डोळ्यांसमोर उभा राहतो. श्रीमती गांधींच्या लोकप्रियतेने व कर्तृत्वाने शिखर गाठले तो दिवस कोणता? असा प्रश्न कोणी केला तर दि. १६ डिसेंबर १९७१ हे त्याचे उत्तर आहे. ढाक्का शहरात हिंदुस्थानी सैन्यासमोर जनरल नियाझी त्या दिवशी गुडघे टेकून शरण आला. बांगलादेशचा विजय व त्या देशाला मिळालेला पुनर्जन्म ही श्रीमती गांधींच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट घटना. त्या दिवशी त्यांनी केवळ नियाझीवर विजय मिळविला नाही, पाकिस्तानवर विजय मिळविला नाही, तर अमेरिकेचे घमेंडखोर अध्यक्ष निक्सन यांच्यावरही विजय मिळविला. त्यांचे सातवे आरमार बोटे मोडीत पॅसिफिक समुद्रात तसेच उभे राहिले. श्रीमती गांधींच्या आयुष्यातील ही सर्वश्रेष्ठ घटना ठरते. त्याचे दुसरे कारण असे की, विजय मिळताच हिंदुस्थानी सैन्य त्यांनी परत आणले. आज अफगाणिस्तान, इराक नव्हे तर जगात अनेक ठिकाणी घुसलेल्या परराष्ट्रांच्या सेना तिथेच ठाण मांडून आहेत. तसे न करणारा हिंदुस्थान हा एकमेव देश आहे हे जगाला त्या वेळी दाखवून दिले ते श्रीमती इंदिरा गांधी यांनी. देशाचे सर्वश्रेष्ठ असे पंतप्रधानपद त्यांनी १५ वर्षे भूषविले. १९५९ मध्ये नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या त्या अध्यक्षा झाल्या. तेव्हापासून त्यांचे राजकीय जीवन सुरू झाले. आणीबाणीनंतर काँग्रेसचा झालेला दारुण पराभव म्हणजे त्यांच्या कारकीर्दीने गाठलेला पायथा होता. पूर्णपणे राजकारणी बनलेल्या श्रीमती गांधींच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना या १० वर्षांचा विचार प्रकर्षाने पुढे येतो. बांगलादेशची लढाई जिंकल्याने १९७२ मध्ये त्या पाक अध्यक्ष भुट्टो यांच्याशी सिमला करार करू शकल्या. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांचे स्थान अतिशय उंचावले. स्त्री ही निसर्गतःच मनाने पुरुषापेक्षा कणखर असते. त्यात नेहरूंचा वारसा व पुण्याई पाठीशी असल्यामुळे १९७२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रात श्रीमती गांधींचे स्वतंत्र स्थान निर्माण झाले. त्याला पहिला धक्का मिळाला तो दि. २६ जून १९७५ रोजी जाहीर झालेल्या आणीबाणीने. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्याला स्थानबद्ध करून, संसद सदस्य या नात्याने बैठकींना गेलेल्या खासदारांना अटक करून संसदीय लोकशाहीचा प्राणच घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात वाईट घटना. अलाहाबाद हायकोर्ट निर्णयामुळे ते घडले, परंतु १९७५ चा कालखंडच असा आहे की, त्या वेळी श्रीमती गांधींच्या भोवती जे लोक जमले त्यांनी त्यांना सर्व तऱ्हेचा बदसल्ला दिला आणि त्याचे परिणाम श्रीमती गांधींना भोगावे लागले.

त्यागाची सुरुवात
महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, डॉ. आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. संघर्ष, लढे यातून निर्माण झालेली ही पिढी होती. आताच्या राज्यकर्त्यांना त्याचा गंध नाही. आमच्या पिढीने इंदिरा गांधींना जवळून पाहिले. इंदिराजींचे मोठेपण हे विरोधकांना बदनाम करून निर्माण झाले नव्हते व त्यांच्या मोठेपणास सोशल मीडियाचा आधार नव्हता. त्यामुळे त्यांना जाऊन ३३ वर्षे झाली तरी देश त्यांचे स्मरण करतो. देश म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांचा राजकीय पक्ष नाही. श्रीमती गांधी अमेरिकेसमोर ज्या कणखरपणे उभ्या राहिल्या तितके नेहरूही उभे राहिले नव्हते. सामान्यांसाठी श्रीमती गांधी ज्या पद्धतीने उभ्या राहिल्या ते अभूतपूर्व होते. सध्याचे पंतप्रधान मोदी यांनी तरुणपणी चहा विकला याचे कौतुक होते, पण नेहरू व त्यांच्या कुटुंबाने श्रीमंतीची सर्व सुखे व पदव्या स्वातंत्र्याच्या होमात फेकून दिल्या आणि शेवटी घर चालविण्यासाठी त्यांना घरातील चांदीची भांडी विकावी लागली, हे गांधी-नेहरू परिवारास शिव्या देणारे विसरत आहेत. १९६१ च्या युद्धात चीनबरोबर पराभवाची हाय खाऊन पंडित नेहरूंनी अंथरुण धरले व मरण पत्करले. चीनच्या युद्धात मारले गेले नाहीत त्यापेक्षा जास्त सैनिक गेल्या चार वर्षांत शहीद होऊनही राज्यकर्ते मजेत आहेत. शेवटी स्वातंत्र्य व स्वाभिमानाने प्रेरित झालेली ती पिढी. इंदिराजी त्या पिढीतील अखेरच्या मर्दानी. श्रीमती गांधी पंतप्रधान होत्या त्या काळात कोणत्याही देशाची हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नव्हती. पाकिस्तानचा दोनदा केलेला पराभव हे जसे त्याचे कारण होते, तसे त्यांचे पोलादी मन व बोलणे बड्या राष्ट्रांवर परिणाम करी.

लोकांचा राग व लोभ दोन्ही त्यांनी सहन केले. रागावलेल्या जनतेने दिलेली सत्तात्यागाची शिक्षा शांतपणे सहन करायची; पण जनतेची, गरीब, दलित लोकांची साथ सोडायची नाही. शत्रुत्वाच्या भावनेने आपल्याला नष्ट करण्यासाठी तुटून पडणाऱ्या विरोधकांशी धैर्याने प्रखर झुंज द्यायची, तरीही त्यांच्याबद्दल वैयक्तिक शत्रुत्व बाळगायचे नाही, असे इंदिरा गांधींच्या अग्निदिव्याचे स्वरूप होते. दिव्य केवळ सत्याच्या बळावरच पार पडत असते. अशा इंदिरा गांधींना आमच्या पिढीने पाहिले आहे. मृत्यू कुणाला चुकला आहे? तरीही इंदिराजी आज हव्या होत्या असे वाटत राहणे, हेच त्यांचे अमरत्व आहे!

twitter – @rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या