असे राज्य मराठ्यांचेच!

187


rokhthokब्रिटिश हिंदुस्थानात आले नसते तर देशावर ‘मराठा’ साम्राज्यच आले असते, पण आज दिल्लीचे चित्र तसे नाही. मराठा राज्य हे एका जातीचे नव्हते. छत्रपती शिवाजीराजांच्या नावाने ‘पेशवा’ माधवरावाने, राघोबाने, पहिल्या बाजीरावाने निर्माण केलेले मराठा राज्य. त्या राज्यात न्यायप्रिय रामशास्त्री होते व राजा त्यांचे ऐकत होता.

संसदेच्या पायरीवर अनेकदा सत्याचे प्रयोग घडत असतात. बुधवारी दुपारी डॉ. सुब्रमण्यम स्वामी संसदेच्या पायरीवर भेटले. मूळचे मुंबईकर असलेले व सध्या उत्तर प्रदेशातून निवडून आलेले एक खासदार पाठीमागेच होते. ‘‘हे मूळचे मुंबईचे, पण आता उत्तर प्रदेशातून निवडून आलेत.’’ यावर डॉ. स्वामी हसत म्हणाले, ‘‘त्यात काय विशेष! ब्रिटिश येथे आले नसते तर दिल्लीवर मराठ्यांचे राज्य जवळजवळ आलेच होते.’’ डॉ. स्वामी यांना ‘मराठे’ हेच खरे देशाचे राज्यकर्ते आहेत असे सुचवायचे होते व ते सत्य आहे. पण आज दिल्लीवर मराठ्यांचे राज्य नाही. मराठ्यांचे राज्य म्हणजे ‘जात’ म्हणून पाहता येणार नाही. ते पेशव्यांचे राज्य होते व छत्रपतींच्या नावाने त्यांनी दिल्लीत धडक मारली. पानिपतासारखे भयंकर अरिष्ट मराठ्यांवर कोसळले. राघोबाने घरगुती तंटे करण्यास सुरुवात केली. निजामअली व हैदर या महत्त्वाकांक्षी लोकांनी मराठी राज्याचे लचके तोडण्याचा उपक्रम केला. अशा बिकट परिस्थितीत तरुण पेशवा माधवरावाने मराठी राज्याचा जम बसवून निजाम व हैदर यांस मागे रेटले. आज एका बाजूने चीन व दुसऱ्या बाजूने पाकिस्तान आपल्यावर धडका मारीत असताना ‘मराठा’ राज्याची आठवण येते.

पहिले बाजीराव
पहिले बाजीराव

करबुडव्यांवर आफत!
सरकारी तिजोरीचे सर्वात जास्त नुकसान करबुडवेपणामुळे होत असते. लोक आणि व्यापारी कालपर्यंत आयकरापासून विक्रीकरापर्यंत आणि जकातीपासून इतर बरेच कर चुकवीत असल्याने नरेंद्र मोदी यांनी आता ‘जीएसटी’ नामक नवी करप्रणाली सुरू केली आहे. जीएसटीमुळे आता कुणालाही कर बुडवता येणार नाही. करसंपत्ती व कर चुकविण्याविरुद्धची कारवाई पेशव्यांच्या म्हणजे ‘मराठा’ राज्यातही होती. शके १६८७ व ८८ या दोन वर्षांतील पावसाळ्यात माधवराव पेशव्यांना काहीशी फुरसत सापडली. त्याचा उपयोग त्यांनी आपण नेमलेले अधिकारी करवसुलीच्या बाबतीत किती सक्त व प्रामाणिक आहेत हे तपासून पाहण्यासाठी केला. त्यांच्या दरबारात बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस, मोरोबा दादा फडणवीस, महादजीपंत गुरुजी, नारो, आप्पाजी तुळशीबागवाले, हरिपंत फडके, रामराव चिटणीस, माधवराव जाधवराव, गोविंद शिवराम खासगीवाले, कृष्णराव बल्लाळ, काळे वगैरे हुशार माणसे होती. त्यांच्या सहाय्याने राज्यातील आतली घडी सुधारून प्रजेस सुख, शांती लाभावी यासाठी माधवरावांनी खटपट केली. या दोन वर्षांत त्यांनी सर्व व्यवहार, आर्थिक उलाढाली सरदार, अधिकारी व सर्व महालांचे हिशेब तपासण्याचे काम जातीने केले व त्यांस कुंपणच शेत खात असल्याचे दिसून आले. आज ‘बोफोर्स’सारखी प्रकरणे व लष्कराच्या खरेदीविक्रीतील घोटाळे उघड होत असतात. ‘मराठा’ राज्यातही असे ‘बोफोर्स’ घडतच होते.

तेव्हाचे बोफोर्स
लक्ष्मण कान्हेरे म्हणून गंगाथडीचा मामलेदार होता. त्याने दरबारातील लोकांचे खिसे गरम करून खोटे हिशेब सरकारात जमा केले होते. माधवरावांना ही बातमी समजली. त्या मामलेदाराच्या घरावर अचानक जप्ती नेली. कच्चे कागद जप्त करून आणले. त्याने पावणेचार लक्ष रुपयांची अफरातफर केल्याचे सिद्ध झाले. आरमाराच्या हिशेबाची तपासणी केली. त्यात अधिकाऱ्यांनी पन्नास हजार खाल्ल्याचे समोर आले. तोफखान्यांच्या हिशेबातही लबाडी असल्याची खबर लागताच तेथे धाडी घालून अनेक नकली दस्तावेज जप्त केले. माधवरावांना लबाडी खपत नसे. एखाद्याने गुन्हा केला व सरकारचे नुकसान झाले तर तो नातेवाईक असो की मर्जीतला असो, त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहत नसे.

maharajकडक व शहाणे
मराठा साम्राज्य माधवरावांनी पुढे नेले. ते कडक होते, पण शहाणेही होते. शहाण्या लोकांचे ते ऐकतही होते. ते अहंकारी नसल्यामुळे उत्तम राज्यकर्ते झाले. त्यामुळे स्वाभिमानीही होतेच. राक्षसभुवनची लढाई झाल्यावर राघोबाने सर्व कारभार माधवरावांच्या स्वाधीन केला. तेव्हापासून माधवराव कारभार पाहू लागले. राघोबासारख्या भोळसटाच्या जागी माधवरावांसारखा तरबेज यजमान आलेला पाहताच काही कामचुकार लोकांवर आफत आली. फाजील शिष्टाई मिरवणाऱ्या जुन्या खोडांची बडेजावी कमी झाली. त्यामुळे राघोबांच्या जागी माधवराव आला हे अशा लोकांस आवडले नाही. गंगाधर यशवंत चंद्रचूड अशाच लोकांपैकी एक होता. एके दिवशी दरबार भरला होता. तेव्हा दरबारात गंगोबा म्हणाला, ‘‘हल्ली राज्यकारभारात दम नाही. राज्यकारभाराचा बोज काहीच नाही. एका लहान मुलाच्या हातात कारभार गेल्याने जिकडे तिकडे पोरखेळ माजला आहे.’’ ही त्या म्हाताऱ्याची वटवट ऐकून माधवराव संतापले. ते गादीवरून उठले. गंगाधर यशवंताच्या जवळ जाऊन सगळ्यांच्या समोर त्याच्या एक जोरात थोबाडीत लगावली. त्यानंतर सगळ्यांचीच थोबाडे बंद झाली.

ramshastri-prabhuneखरे रामशास्त्री!
माधवराव कर्तबगार होता; पण त्यास अध्यात्म व धार्मिक कार्याचे खूळ होते. रोज स्नानसंध्या, जपजाप्य यात त्याचा बराच वेळ जाऊ लागला. शास्त्रीबोवांची प्रवचने, कीर्तने, ज्योतिषी लोकांत तो वेळ घालवू लागला. रामशास्त्री प्रभुणे हा बाणेदार गृहस्थ त्यावेळी न्यायाधीश होता. तो माधवरावांस काही राजकीय कामानिमित्त भेटण्याकरिता आला असता त्यांना समजले की, ‘‘भेट होणार नाही. कारण पेशवे जपात गुंतले आहेत.’’ रामशास्त्री अस्वस्थ होऊन परत गेले. असे दोन-पाच वेळा झाले. तेव्हा रामशास्त्री निराळ्याच वेळी गेले व त्यांनी माधवरावास गाठले व म्हणाले, ‘‘मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मला काशीस जाऊन राहावे असे वाटू लागले आहे.’’ माधवरावाने रामशास्त्री यांच्या बोलण्यातली खोच ताडली व म्हणाला, ‘‘मी काल जपात गुंतल्यामुळे काल आपणास भेटू शकलो नाही. कृपया मला माफ करा.’’ यावर रामशास्त्री ताडकन म्हणाले, ‘‘माधवराव, तुम्ही आपणास राजे म्हणविता ना? पण प्रजेचे काम करण्यास तुम्हाला वेळ मिळत नाही. मला तर असे वाटते की, राजास जर मोक्ष पाहिजे तर त्याने प्रजेच्या हिताविषयी तत्पर राहायलाच हवे. याउपर जर तुम्हाला तीर्थयात्रा, जपजाप्य, प्रवचनांतच वेळ घालवायचा असेल तर मजबरोबर काशीस चला व मग खुशाल आपला वेळ स्नानसंध्येत घालवा. शत्रू सीमेवर उभा आहे व धडक मारीत आहे. त्यास तुमचे राज्य गिळू द्या!’’ माधवरावास रामशास्त्रीचा हा प्रखर उपदेश पटला. त्याने जपजाप्यात व तीर्थयात्रेत गुंतून राहण्याचे सोडून दिले. तो मराठा साम्राज्याचा धनी होता व एका दिलदारीने रामशास्त्र्यांचा उपदेश ऐकून राज्य चालवले. राज्यात रामशास्त्री हवेत व रामशास्त्रीचे ऐकणारे राजे हवेत. ‘मराठा’ साम्राज्य म्हणूनच नैतिक, शूर व न्यायाचे होते.

Twiter- @rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या