रोखठोक – शौर्य, धैर्य, आत्मविश्वास महत्त्वाचा!

 

27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा होतो. मराठीच्या बाबतीत सध्या नक्की काय चालले आहे हे तपासायला हवे. मराठीच नव्हे, जगभरातील भाषांपुढे नवे आव्हान उभे आहे. महाराष्ट्राची राजधानीही मराठीपण टिकविण्यासाठी झुंज देत आहे.

27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हल्ली भाषेचेही दिवस साजरे केले जातात. कारण जगभरातच मातृभाषा आणि बोलीभाषांचे मर्तिक घातले जात आहे. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला गेला. आज मराठी भाषा दिवस साजरा होत आहे. अनेक भाषा, विविध संस्कृती हे आपल्या देशाचे वैभव आहे, पण महाराष्ट्रात मराठी भाषेची नेमकी अवस्था काय आहे? राज्यभरात मराठी बोलली जाते म्हणून मराठी वैभवाच्या शिखरावर आहे असे नाही. ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा होतो त्याच कुसुमाग्रजांनी अत्यंत व्यथित अंतःकरणाने सांगितले होते, ‘‘मंत्रालयाच्या पायरीवर मराठी भिकारणीसारखी उभी आहे!’’ या परिस्थितीत बदल होणार नसेल तर मराठी भाषा दिवसाचे माहात्म्य ते काय? महाराष्ट्रात मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे व सुभाष देसाई त्या खात्याचे मंत्री आहेत. श्री. देसाई एका शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना भेटले. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. मंत्री यावर आश्वासनांची पाने पुसून गप्प बसले. कुसुमाग्रजांना मराठी भाषेचा ज्वलंत अभिमान. मराठी भाषेला वैभव प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. मराठी माणसाला त्यांचे न्याय्य हक्क मिळतील तेव्हा मराठी भाषेसाठी झगडा करण्याची वेळ येणार नाही, असे कुसुमाग्रज म्हणत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर बेळगावपासून मुंबईपर्यंत मराठी भाषा व मराठी माणूस यासाठी मोठाच संघर्ष केला, हे कसे विसरता येईल?

शत्रू कुठे?

मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे व त्यावर पहिला हक्क मराठी लोकांचा आहे हे मान्य करायला ते तयार नाहीत. मुंबई ही अमराठी व्यापारी मंडळाची आहे व राहणार यावर त्यांचा जोर वाढला आहे. मुंबईतला मराठी श्रमिक व कामगार हीच एकेकाळी मराठी बाण्याची ताकद होती. गिरण्या बंद पडल्याने व अनेक उद्योग राज्याबाहेर गेल्याने मराठीची कवचकुंडले नष्ट झाली आहेत. मंगळवारी एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठी लोकांना कळकळीचे आवाहन केले, ‘‘हक्काची घरे विकून मुंबई सोडून जाऊ नका.’’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा हेच सांगत राहिले व श्री. शरद पवार यांनीही बीडीडी चाळीच्या पुनर्वसन शुभारंभाच्या वेळी हाच मुद्दा मांडला होता. मुंबई-ठाण्यात मराठीचा टक्का घसरला आहे. हे घसरणे पुणे-नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडपर्यंत पोहोचले. नागपूरसारखी शहरे हिंदी भाषेची शाल पांघरून जगत आहेत. त्यामुळे शहरांमध्ये मराठी भाषेचे

भविष्य काय?

हा प्रश्न आहे. मराठी शाळा, मराठी वर्ग बंद पडत आहेत. नंदुरबारसारख्या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल उभे राहिलेले पाहिले तेव्हा मराठी शाळांचे काय होणार? हा प्रश्न मुंबईच्या सीमा पार करून खूपच पुढे गेलाय हे स्पष्ट दिसले. भारतीय जनता पक्षाचे लोक महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘मराठी कट्टा’सारखे उपक्रम राबवत आहेत, पण त्यांचेच व्यापारी मंडळ मुंबईतील दुकानांवरील मराठी पाट्यांना विरोध करीत आहे. गुजराती व इतर समाजाची मते भाजपला हवीत म्हणून हे लोक मराठी भाषा व मराठी माणसाचा कचरा करतात. मुंबईतील शाळांत मराठीची सक्ती नको म्हणून भाजपचे किरीट सोमय्यासारखे लोक न्यायालयात जातात, मराठीला विरोध करतात व तेच लोक ‘मराठी कट्टा’ चालवतात. हे ढोंग आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून इतका मोठा लढा सर्वांनी दिला. मुंबई ही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राची झाली, परंतु व्यवहारात ती सर्वांची राहिली. कोलकाता, चेन्नई ही शहरे मुंबईसारखीच मोठी असूनही तेथील सर्व व्यवहार हे स्थानिक भाषेतच चालतात. त्या राज्याची भाषा येत असल्याशिवाय तुम्हाला तेथे वास्तव्य करता येत नाही. महाराष्ट्राच्या मंत्रालयात धड मराठी नाही, न्यायालयात मराठी नाही. महाराष्ट्र सरकारचे गॅझेट मराठीत निघते का? मराठी शाळांचे वर्ग बंद पडत आहेत. मराठी ग्रंथालये बंद पडत आहेत. महाविद्यालयात पूर्वी मराठी वाङ्मय मंडळे उत्तम काम करीत. आज ते वैभव संपले. महाराष्ट्राचे अशा प्रकारे सांस्कृतिक मुंडन सुरू झाले आहे.

तेव्हा गप्प का?

महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मराठीधार्जिणे आहेत. भारतीय जनता पक्षाचे तसे नाही. त्यांचा विचार राष्ट्रव्यापी आणि व्यापारी प्रवृत्तीचा आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होताच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तीक्र प्रतिक्रिया व्यक्त करतील; पण भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसतील. हा त्यांचा वैचारिक गोंधळ आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगणे हे त्यांच्या विचार चौकटीत बसत नाही. एकदा मराठी भाषा अन्याय निर्मूलन परिषद मुंबईत भरली व त्यास पु. भा. भावे यांच्यासारख्या थोरांनी तेव्हा मार्गदर्शन केले. मराठी भाषेच्या संरक्षणाचा प्रश्न आज मुंबईपासून नागपूर, मराठवाड्यापर्यंत सर्वत्रच उभा आहे. बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर आपल्यातून गेल्या. मात्र त्यांनी आपले सर्वस्व मराठीसाठीच वेचले. बाबासाहेब पुरंदरेदेखील आज आपल्यात नाहीत, पण त्यांनीही मराठीचे वैभव पुढे नेले. आज महाराष्ट्रावर व मराठी माणसावर दिल्लीची आक्रमणे मोगलांच्या पद्धतीने सुरू आहेत. मराठी माणूस व्यापारी वृत्तीचा व कपटी मनोवृत्तीचा नाही, मराठी माणूस हा जगाच्या स्पर्धेत पुरेपूर उतरणारा आहे, तो सामान्य नाही हा आत्मविश्वास नव्या पिढीत निर्माण करणे आणि सर्व क्षेत्रांत पुढे येण्यासाठी त्यांना बळ देणे आवश्यक आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. देशाच्या राजकारणावर चर्चा करताना त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याचा, छत्रपती शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झुंजारपणाचा गौरव केला. मराठी अभिमान व शौर्य देशाला तारेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग यापुढे महाराष्ट्रातूनच जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठी भाषा दिवस साजरा करत असताना हे शौर्य व धैर्य विसरू नये.
महाराष्ट्राने दिशा द्यावी, मराठीने एल्गार करावा. देशाला तीच गरज आहे!

Twitter : @rautsanjay61
Email : [email protected]