रोखठोक : लोकांना शांत झोपू द्या!

rokhthokपाकिस्तानवरील हल्ल्याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. युद्ध नावाचा खेळ संपला तरी रोज तपशीलवार वर्णने येत आहेत. हल्ल्याचे पुरावे हवेत असे सांगणाऱ्यांनी शांत बसावे व उद्या पुन्हा हल्ले होतील, अशी भीती घालणाऱयांनीही लोकांना शांत झोपू द्यावे. भीती आणि बदनामी ही सध्याच्या राजकारणातील दोन अस्त्रे बनली आहेत. हिंदुस्थानात तर त्यांना ब्रह्मास्त्राचा दर्जा मिळाला आहे. आजही लोकांच्या मनात या ना त्या कारणाने भीती निर्माण करणारी यंत्रणा काम करीत आहे. पंतप्रधानपदी पुन्हा मोदी आले नाहीत तर देशाच्या संसदेवर हल्ला होईल, अशी भीती भाजपचे आसामचे एक मंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी घातली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ आमच्या हवाई दलाने उद्ध्वस्त केले व पाकिस्तानने शरणागती पत्करली. तरीही हिंदुस्थानवर समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता आपले नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी व्यक्त केली. यावर माझा त्यांना प्रश्न आहे की, ‘‘लोकांना का घाबरवत आहात?’’ जर असा हल्ला झालाच तर ते सरकारचेच किंवा नौदलाचेच अपयश ठरेल. मुंबईत 1993 साली बॉम्बस्फोटांची भीषण मालिका घडली. तोसुद्धा समुद्रमार्गे झालेला हल्ला होता. कारण बॉम्बस्फोटांत जे आरडीएक्स वापरले गेले ते समुद्रमार्गेच कोकणच्या किनाऱ्यावर उतरवले गेले होते. ‘26/11’ला कसाब आणि टोळी पाकिस्तानातून गेट वे ऑफ इंडियाला उतरली. त्यांचा सुखाचा प्रवास समुद्रमार्गेच झाला व आता पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊनही समुद्रमार्गे हल्ल्याची भीती आहेच! ही भीती असेल तर हवाई हल्ल्यांचा विजयोत्सव आपण खरोखरच साजरा करावा काय?

mumbai-attack-1

काय सुरू आहे?
युद्ध कमी आणि अफवा जास्त असा प्रकार देशात सुरू आहे. जगातील सर्वच युद्धांत हे घडते. युद्धाची जी तपशीलवार वर्णने येत असतात त्यात तथ्य नसते. युद्धाच्या वृत्तांताबद्दल फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जी एक म्हण प्रचारात आली तिच्यातील सत्य आजही तितकेच महत्त्वाचे आहे. As False as a bulletin अशी एक म्हण त्यावेळी रूढ होण्याचे कारण म्हणजे युद्धाचे सरकारी वृत्तांत खोटे असत. युद्ध चालू असताना खरा वृत्तांत दिला तर त्याचा शत्रूला फायदा होतो. म्हणून युद्धाचा खरा वृत्तांत कोणीच छापीत नाही, अशी सर्वसामान्य लोकांची समजूत असते. कोणत्याही युद्धाचा खरा वृत्तांत युद्ध संपून काही वर्षे झाल्याशिवाय बाहेर येत नाही. तेव्हा युद्धविषयक आलेली प्रत्येक बातमी तपशीलवार आहे आणि ती शंभर टक्के खरी आहे असे समजून त्याच्यावर आपले तर्कट मांडणे हा काळाचा अपव्यय आहे.

शरणागती?
पुलवामा हल्ल्यानंतर झालेला ‘एअर स्ट्राईक’ हा पाकिस्तानला धक्का देणारा होता. पाकिस्तान शरण आला व गुडघे टेकले असे त्यावर सगळ्यांचेच मत आहे. मग शरण आलेला पाकिस्तान हिंदुस्थानवर समुद्रमार्गे हल्ला करण्याची तयारी करीत असल्याचे विधान गडबडीचे आहे. पाकिस्तानने गुडघे टेकले असतील तर पुढची किमान पाच वर्षे ते आमच्यावरील हल्ल्याचा विचार करणार नाहीत. कश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर एकही गोळी चालवली जाणार नाही. कारण त्यांनी गुडघे टेकले आहेत. मुळात युद्ध झालेच नाही. ते व्हायला हवे होते व कश्मीरसह (पाकव्याप्त) भूभाग ताब्यात घेऊन हा विषय संपवायलाच हवा होता. उलट समुद्रमार्गे हल्ल्याची भीती आपण व्यक्त केली आहे. सेनापतींनी फार बोलू नये, शांत डोक्याने चढाईच्या योजना आखाव्यात. लोकांना विश्वास आणि सुरक्षेचे कवच द्यावे. भीतीच्या सावटाखाली ठेवू नये. 1971च्या युद्धात जैसलमेर हवाई तळावरून चार लढाऊ विमाने उडाली व ढाक्यातील गव्हर्नर हाऊसवर हल्ला करून परत आली. त्या वेळी तेथे गव्हर्नरसह पाकिस्तानचे बडे लष्करी अधिकारी हिंदुस्थानवरील हल्ल्याची मोठी तयारी करीत होते; पण आमच्या लढाऊ युद्ध पायलटांनी त्यांचे कारस्थान नष्ट केले. पाकिस्तानचा सेनापती जनरल नियाजी त्याच्या लाखभर सैन्यासह शरण आलेला प्रत्यक्ष देशाने पाहिले. युद्ध जोरात चालले आणि दीर्घकाळ चालले म्हणजे मग सेनापतीच्या लायकी-नालायकीची परीक्षा होऊ लागते. आज नेपोलियन एकाही बाजूला नाही. नेपोलियन ज्या बाजूला असेल त्या बाजूला लाखभर सैन्य जास्त आहे असे धरून चालण्याची प्रथा तेव्हा पडली होती.

airstrike

सेनापती कोण?
पहिल्या महायुद्धाबद्दल अमेरिकन जनरल शेरमन याने जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नावच मुळी दिले होते, “Lions Led by Donkeys” (गाढवांच्या नेतृत्वाखाली लढणारे सिंह). या मथळय़ावरूनच तेव्हाची परिस्थिती लक्षात येते. सेनापतींनीच राजकारण सुरू केले व ते सत्ताधारी पक्षाचे ‘पायदळ’ बनले की काय घडते ते पाकिस्तानात व जगात अनेकदा दिसले. सेनापती प्रत्यक्ष युद्धभूमीवर शौर्याने बोलतो याचा विसर पडू देणे घातक आहे. अफवांच्या कारखान्यांचे भागीदार कोणत्याही सैन्याने होऊ नये. घटनेपासून प्रशासनापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण जशाच्या तशा ब्रिटिशांकडूनच घेतल्या. संरक्षण व्यवहारात सौदेबाजी, दलाली, राजकारण या गोष्टी सत्तर वर्षांत अनेकदा घडल्या. आपण त्यातून काहीच धडा घ्यायला तयार नाही. सेनापतींच्या नेमणुकीमध्ये कसे राजकीय हस्तक्षेप होत असत आणि नादान सेनापती राजकीय उदोउदो सोहळय़ांचे कलाकार म्हणून कसे वावरत होते याची उदाहरणे ब्रिटनच्या युद्धकाळातील पंतप्रधानांनी त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात गमतीने लिहिली आहेत. पहिले महायुद्ध चालू असताना ब्रिटिश वर्तमानपत्रात अमूक एक सेनापतीने अमक्या लढाईत फार मोठा विजय संपादन केला अशी बातमी आली होती. त्या वर्तमानपत्राच्या अंकाचा फोटो त्याने आपल्या पुस्तकात छापला आणि त्याखाली एक टीप अशी दिली की, जी लढाई लढलीच गेली नाही त्या लढाईमध्ये मोठा विजय संपादन केल्याबद्दल राजकीय कारणासाठी सेनापतीची पाठ कशी थोपटली जाते पाहा! प्रत्यक्ष युद्धकाळात सेनापती व मीडियाचे संगनमत होते व त्यात पडद्यामागून राज्यकर्ते सामील होतात. प्रत्यक्ष युद्धकाळात सेनापती किती खोट्या बातम्या देतात आणि पंतप्रधानही कसे चकवितात याचे उदाहरण देऊन लॉइड जॉर्ज यांनी वैतागाने उद्गार काढले की, “I the prime minister of Great Britain was kept ignorant of these facts” पंतप्रधानांपासून सत्य दडवून ठेवण्यात येते व प्रत्यक्ष युद्धभूमीवर जे घडलेच नाही त्या शौर्यकथा प्रसिद्ध झाल्या. इंग्लंडसारख्या दर्जेदार लोकशाही असलेल्या राष्ट्रात हे घडले. लोकांना युद्धकथा आवडतात व त्या धुंद होऊन वाचतात, ऐकतात आणि पाहतात. हे जगभरात घडत असते. इराक, सीरियासाख्या राष्ट्रांत हे घडते. पाकिस्ताननेही मार खाऊन टांग उपर केल्याच्या युद्धकथा चर्चेत आहेत. ‘उरी : सर्जिकल स्ट्राईक’सारख्या सिनेमाने 200 कोटींवर गल्ला जमवला. त्याचे कारण युद्धकथा हेच आहे.

मच्छर मारले
जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांचे राजकीय कवित्व संपता संपत नाही. ‘‘किती अतिरेकी मारले ते सांगा’’ हे पालुपद सुरू आहे. हल्ला करणे हे आमचे काम. किती मेले ते मोजणे हे हवाई दलाचे काम नसल्याचा खुलासा हवाई दलप्रमुखांनी केला. घरात घुसून पुन्हा मारू, असे पंतप्रधान मोदी यांनी चिडून सांगितले. या सगळय़ांवर निवृत्त जनरल व्ही. के. सिंग यांनी दिलेला संदेश मला आवडला. जनरल साहेब म्हणतात, ‘‘रात्री 3.30 वाजता बरेच मच्छर होते. मी ‘हिट’ मारले. आता मच्छर किती मेले हे मोजत बसू की शांतपणे झोपू?’’ जनरल साहेब बरोबर बोलले. मोजण्यात अर्थ नाही, पण मेलेले मच्छर समुद्रमार्गे कसे निघू शकतात? कशाला घाबरवताय?

लोकांनाही शांत झोपू द्या!

Twitter : @rautsanjay61
Gmail : rautsanjay61@gmail.com