कोण म्हणतंय गांधी बनिया होते!

  • संजय राऊत

महात्मा गांधी हे चतुर बनिया होते, असे विधान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले. गांधीजी जन्माने बनिया, पण कृतीने वीर मराठा होते. ‘राष्ट्रीय’ होण्यासाठी त्यांनी गुजरात सोडले. ते पुन्हा तेथे परतलेच नाहीत. गांधीजी हे शूर, धाडसी होते. म्हणून व्यापारी मंडळात ते रमले नाहीत.

गांधी हा चेष्टेचा आणि टपल्या-टिचक्या मारण्याचा विषय नाही. गांधींना जे महात्मा किंवा राष्ट्रपिता मानू इच्छित नाहीत त्यांनीही स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या सर्वोच्च योगदानाबद्दल आदराची भूमिका ठेवायला हवी. पंडित नथुराम गोडसेने पिस्तूल हातात घेऊन रस्त्यावर गोळीबार केला असता व त्याबद्दल त्यास फासावर लटकवले असते तर गोडसे कोण, कुठला याचे नामोनिशाणही उरले नसते. गांधी मोठे होते म्हणून गोडसेने त्यांची हत्या करूनही तो एका विचाराचा प्रेरक ठरला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘‘गांधी बहोत चतुर बनिया’’ असे सांगून महात्म्यास टपली मारली. शहा यांचे विधान राजकीय संदर्भातले आहे. काँग्रेसच्या सध्याच्या दुरवस्थेसंदर्भात आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. ‘‘काँग्रेस कोणत्या एका सिद्धांतावर किंवा विचारधारेवर आधारित पक्ष नाही. ते फक्त स्वातंत्र्यप्राप्तीचे साधन होते. महात्मा गांधींकडे दूरदृष्टी होती. ते अत्यंत चतुर बनिया होते. त्यांना माहीत होते की, भविष्यात काँग्रेसचे काय होणार आहे. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्तीचा विचार मांडला होता. महात्मा गांधींना ते शक्य झाले नाही. पण आता काहीजण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करीत असून काँग्रेस बरखास्त करण्याचे काम करीत आहेत.’’ अमित शहा यांचे विधान तसे वादग्रस्त नाही. गांधी चतुर व बनिया होते असे विधान यापूर्वीही अनेकांनी केले. शेळीचे दूध व गांधी यांवरही चेष्टा झाली. शेळीचे दूध पिऊन स्वातंत्र्य मिळाले नसेलही, पण गांधींनी जे केले ते इतिहासात कुणालाच जमले नाही. गुजरातच्या भूमीतून गांधींनी देशाला लढण्याचा संदेश दिला.

rokhthok

बनियाचा मृत्यू…
पंतप्रधान मोदी हे गुजरातचे. पण देशाचे नेतृत्व करीत असतानाही मोदी यांनी स्वतःभोवती गुजराती शृंखला जखडून घेतल्या. मोदी पॅरिसमध्ये गेले व तेथील नवीन राष्ट्राध्यक्षांनी म्हणे त्यांच्याशी गुजरातीत संवाद साधला. ओबामाही त्यांना एका भेटीत ‘केम छो’ असे म्हणाले होते. मी गुजराती असल्याने ‘व्यापार’ माझ्या रक्तात असल्याचेही मोदी अभिमानाने सांगतात. देशाच्या प्रमुख प्रशासकीय पदांवर मोदी यांनी गुजराती माणसे आणली ही त्यांची मानसिकता. हिंदुस्थानच्या ऍटर्नी जनरलपदीही आता गुजरातच्याच त्रिवेदी यांना आणण्यात आले आहे, पण गांधींचे तसे नव्हते. जर कुणी गांधींना विचारले असते की, ‘महात्माजी, आपण कोणत्या देशातले आहात?’ तर त्यांनीही मी गुजरातेतला आहे, असे कधीच सांगितले नसते. सत्याचे कडकडीत विचार पटून त्यांचे निर्भयपणे आचरण करणारे लोक जेथे असतील त्या प्रांतातला मी आहे, असेच गांधीजींनी सांगितले असते. राष्ट्रीय बनण्यासाठी गांधींनी गुजरात सोडले व पुन्हा ते मागे परतले नाहीत. ते महा-राष्ट्रीय बनले. गांधींचे आगमन म्हणजे ख्रिस्ताचे, महंमदाचे किंवा जणू श्रीकृष्णाचेच आगमन वाटत होते. गांधी हे जन्माने बनिया असतील, पण वृत्तीने राष्ट्रीय होते. ते राष्ट्रीय एकदम बनले नाहीत. महापुरुष हा नेहमीच स्वयंसिद्ध असतो असे नाही. पुष्कळ वेळा तोही तावूनसुलाखून उक्रांतच होत असतो. गांधी हे जीवनाच्या सुरुवातीला सामान्य मनुष्यच होते. साहेबी थाटाचा पोषाख करावा, तोंडात झुरकेबाज चिरूट धरावा, लोकांकडे गर्वाने आणि श्रीमंतीचा रुबाब दाखवत पाहावे आणि संध्याकाळी बॅरिस्टरीच्या पैशांतून मिळालेल्या थैल्या घेऊन घरी यावे हेच जीवनाचे तत्त्व गांधींनी सुरुवातीला स्वीकारले होते. पण आपण हिंदू आणि हिंदुस्थानी लोक किती निकृष्ट दर्जाचे आहोत हे दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर त्यांना समजले. काळा वर्ण आहे म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या चालत्या ट्रेनमधून त्यांना फेकून देण्यात आले. हा प्रसंग म्हणजे गांधींचे डोळे प्रकाशमान करणारी विजेची बॅटरी झाला. तेथे गांधीजींचा उदय झाला व बनिया गांधी मरून शूर गांधीचा जन्म झाला.

गुजरातचा त्याग
गांधींनी ‘बनिया’गिरी झुगारून देण्यासाठीच गुजरातचा त्याग केला. न्या. गोपाळ कृष्ण गोखले व टिळक यांनाच गांधींनी गुरुस्थानी मानले. विनोबा भावे हेच त्यांच्या अहिंसक आंदोलनाचे पहिले सत्याग्रही म्हणून गांधींनी निवडले. गांधीजींचा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर खूप विश्वास होता. गुजरातेतून त्यांना बाहेर यायचे होते. आपण त्या प्रांताचेच नेते राहता कामा नये. त्या व्यापारी वृत्तीच्या मंडळींची त्यांना आधी खात्री नव्हती. म्हणून त्यांनी महाराष्ट्रात वर्ध्याची वाट धरली. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून टिळकांनी ‘स्वराज्य’ शब्द उच्चारला. त्या शब्दाने गांधी मोहरून गेले. हाच स्वराज्याचा मंत्र गुजरातच्या गांधीने पुढे नेला. तोपर्यंत ते महाराष्ट्रीय झाले होते. टिळक ब्रिटिशांशी चातुर्य, बुद्धी व शौर्याने लढत राहिले. गांधीजी ब्रिटिशांना थेट भिडत राहिले. टिळकांवर राजद्रोहाचा खटला ब्रिटिशांनी भरला तेव्हा त्यांनी आपण राजद्रोह कसा केलेला नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. कायद्याची चौकट पाळून ‘केसरी’चे लेखन आपण केले असल्याचा दावा त्यांनी केला. याउलट गांधीजींवर जेव्हा ब्रिटिशांनी खटला भरला तेव्हा ते म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळकांना जशी व जितकी शिक्षा दिली तितकी मला द्या’’ व ते पुढे म्हणाले, ‘‘मी देशद्रोह केलेला आहे. कारण मला तुमची आमच्या देशावरील सत्ताच मान्य नाही!’’

गांधीजींच्या या भूमिकेने देश हादरला! निर्भयतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून गांधीजी लोकांना प्रिय झाले. लोकमान्य टिळकांनी एकदा लिहिले होते की, ब्रिटिशांनी दळणवळण वाढवून या देशाचे शरीर एकत्र आणले, परंतु काँग्रेसने मन एकत्र आणले. त्या मनात चैतन्याचा स्फुल्लिंग फुलविला तो गांधीजींनी. गांधींच्या असे लक्षात आले की, या देशातील सर्वांना निर्भय बनविण्याची गरज आहे. गरीबांना आपण त्यांचे कुणीतरी आहोत असे वाटले पाहिजे. म्हणून त्यांनी डोक्यावरचे पागोटे काढले. दादाभाई व टिळक यांनी जे केले नाही ते गांधींनी केले. ब्रिटिश ज्यांची पिळवणूक करतात त्या गरीबांचा मी प्रतिनिधी आहे हे स्पष्ट दिसले पाहिजे, म्हणून त्यांनी पागोट्याबरोबरच लांबलचक धोतर सोडले व पंचा नेसावयास सुरुवात केली. तर्कतीर्थाचे गुरू स्वामी केवलानंद यांचा हा पंचा. वाईला विनोबा आले. त्यांनी जाताना तो पंचा नेला. गांधीजींनी तो घेतला व तो नेसून ते लंडनला गेले. नंगा फकीर स्वराज्याच्या मागणीसाठी आला आहे, असे एक अद्भुत चित्र जगासमोर उभे झाले व त्यामधून स्वराज्य आले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री म्हणाले की, गांधीजींचा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर खूप विश्वास होता. गुजरातेतून त्यांना बाहेर यायचे होते. आपण त्या प्रांताचे नेते राहता कामा नये व त्या व्यापारी मंडळींची त्यांना आधी खात्री नव्हती, म्हणून ते वर्ध्याला आले.

अशक्य नाहीच!
गांधीजींना अशक्य असे कधीच काही वाटले नाही. दक्षिण आफ्रिकेत गुन्हेगारांप्रमाणे सही घेतात, चालेल. खुशाल घेऊ द्यात. चंपारण्यात योग्य कायदे नाहीत. नसू द्यात! खेडा जिल्ह्यातील स्थिती ठीक नाही, नसू द्यात! इतकेच काय, पण सरकारने रॉलेट कायदा आणला – ठीक आहे, हाही कायदा रद्द होईल, अशी गांधीजींच्या मनाची विलक्षण उमेद होती. या उमेदीस योग्य असे त्यांचे शरीर नव्हते. त्यांचे वैद्यक सिद्धांत व शरीरशास्त्र नियमनही अगदी विचित्र व विलक्षण होते. गांधी वारंवार आजारी पडत असत. शरीरकाठी इतकी दुबळी असूनही त्यांच्या मनाची उमेद विलक्षण होती. गांधी हे मृत्यूला जिवंत करणारे होते व अपयशालाही यशाची विद्या शिकविणारे होते. गांधींच्या हातात शस्त्र नव्हते. सभोवती अंगरक्षक नव्हते. गांधींच्या शौर्याची आणि यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मबल! गांधींजींचा आत्मविश्वास इतका भयंकर की, त्यांना कधी जीनांकडे जावे लागले नाही, त्यांना कधी लेबर पार्टीची आराधना करावी लागली नाही, कधी शिष्टमंडळात जावे लागले नाही, कधी काँग्रेसमध्ये शिरकाव करून घ्यावा लागला नाही. त्यांना गुरूचीही गरज लागली नाही व शिष्याचीही गरज लागली नाही. ते असेही म्हणत असत की, ‘‘माझ्या भोवती एकही अनुयायी नाही जमला तरी हरकत नाही. माझ्या कार्याला मी एकटा पुरे आहे. मी आहे, तेव्हा मी आपल्या आत्मिक बळावर वाटेल ते सत्कार्य घडवून आणेन! हे त्यांचे शौर्य नैतिक सामर्थ्यातून निर्माण झाले.

उद्योगपती हवेत!
गांधी हे चतुर ‘बनिया’ होते काय? हा वादाचा विषय आहे. गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे ज्यांना वाटते त्यांच्या विचारांचे राज्य आज आहे. त्यांनी निदान हिंदुस्थानच्या ताब्यातील कश्मीरचे तरी रक्षण करावे इतकीच आज अपेक्षा आहे. ८ ऑगस्ट १९४२च्या ऐतिहासिक भाषणात गांधीजी म्हणाले, ‘‘स्वतंत्र भारताची जी योजना नेहरूंनी केली आहे त्यात कुणाला खास हक्क अगर असे हक्क असलेला समाज यांना स्थान नाही. जवाहरलाल कन्सिडर्स ऑल प्रॉपर्टी टू बी स्टेट ओन्ड…’’ हे गांधीजींचे पुढील वाक्य आहे. गांधीजी पुढे म्हणतात, ‘‘नेहरूंना उडायला आवडते, मला नाही. संस्थानिक आणि जमीनदार यांना माझ्या विचारसरणीत स्थान आहे.’’ नेहरू एकदा जे.आर.डी. टाटांना म्हणाले, ‘‘तुमचा नफा हा शब्दच मला आवडत नाही. नफ्यासाठी कुणी काही करता कामा नये.’’ परंतु गांधींमध्ये हे स्वप्नरंजन नव्हते. वल्लभभाई पटेलांत तर मुळीच नव्हते. ‘‘देशाला स्वातंत्र्यवीरांप्रमाणे उद्योगपतींची गरज आहे’’ असे गांधीजी म्हणत. अर्थात त्यांनी विश्वस्तांची भूमिका घ्यावी हा त्यांचा विचार होता. एक ‘बनिया’ असा विचार करू शकत नव्हता. आज उद्योगपती देशाचे मालक झाले आहेत. त्यांच्या पैशांवर निवडणुका लढवल्या जातात व पक्ष चालवले जातात. हे पाहिले की गांधी खरंच बनिया नव्हते याची खात्री पटते.

शरणागती नाही
१९६२मध्ये चीनने हिंदुस्थानवर आक्रमण केले तेव्हा आपली दैना उडाली होती. गांधीजी तर नव्हते. हिंदुस्थान-चीन वाटाघाटी सुरू व्हाव्यात तसा प्रयत्न बडी राष्ट्रे करीत होती. अशा वेळी ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि शांततावादी बर्ट्रांड रसेल यांनी चौ एन लाय आणि नेहरू यांना पत्र पाठविले. चौ एन लाय यांनी लगेच उत्तर पाठविले आणि आम्ही वाटाघाटी करण्यास कसे उत्सुक आहोत ते कळविले. नेहरूंना थोडा वेळ लागला. बर्ट्रांड रसेल यांनी आपल्या आत्मचरित्रात ही दोन्ही पत्रे दिली आहेत. त्यात चौ एन लायचे पत्र मुद्देसूद आणि नेहरूंचे भाबडे वाटते. तो विषय बाजूला ठेवला तरी नेहरू या पत्रात गांधीजींचा आधार घेतात. ‘‘जे आपल्याला दुष्टतेचे वाटते त्याच्यापुढे शरणागती स्वीकारावयाची नाही, हा धडा मी गांधीजींकडून शिकलो,’’ असे नेहरू रसेल यांना पत्रोत्तरात लिहितात.
गांधी शूर होते. ते चतुरही होतेच.

tweet @rautsanjay61
rautsanjay61@gmail.com