रोखठोक : 370 – नेहरू आणि पटेल, आता हा विषय संपवा!

1357

rokhthokकश्मीर आणि 370वर पुन्हा चर्चा सुरू झाली. 370 कलम हटविण्याचा शब्द भाजपने दिला आहे. एक मजबूत जनादेश त्यांच्या पाठीशी आहे; पण कश्मीर आणि 370चे खापर फक्त पंडित नेहरूंवर फोडणे हा इतिहासाशी द्रोह ठरतो. 370 कलम हे संविधानाशी जोडण्याचे श्रेय सरदार पटेल यांचेही आहे.

श्मीरचे काय होणार? या प्रश्नावर सत्तर वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बहुतेक निवडणुका कश्मीर प्रश्नावरच लढल्या गेल्या. कश्मीर प्रश्नावर जो सर्वात जास्त डायलॉगबाजी करील तो दोन्ही देशांत हीरो ठरतो. एक कश्मीरचा विषय सोडला तर या दोन्ही देशांत कोणताही झगडा असू नये. फाळणी धर्माच्या आधारावर झाली आहे. तरीही संपूर्ण पाकिस्तान पुन्हा हिंदुस्थानच्या अमलाखाली आणण्याचे स्वप्न बाळगून एक मोठा वर्ग जगतो आहे. अखंड हिंदुस्थान हे त्यांचे स्वप्न आहेच. संघ परिवाराचे राज्य देशावर आले तर पाकव्याप्त कश्मीर पुन्हा हिंदुस्थानात आणणारच असा विडा उचलणाऱयांवर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण तसे राज्य आले आहे. एक कश्मीरची डोकेदुखी सोडली तर बाकी सर्व दुखण्यांवर आपल्याकडे आता ‘मोदी रामबाण’ आला आहे. कश्मीरवर हिंदुस्थानचाच हक्क आहे. कश्मीर हिंदुस्थानचेच अविभिन्न अंग आहे हे आपण सत्तर वर्षे ऐकत असलो तरी कश्मीरातील छुपे युद्ध थांबलेले नाही. रक्तपात व जवानांची बलिदाने कमी झाली नाहीत. मुख्य म्हणजे हा सर्व रक्तपात आपल्याच भूमीवर झाला. आजही सुरूच आहे. कश्मीरप्रश्नी आरोप-प्रत्यारोप, इतिहासाची मढी उकरून काढण्याचे प्रकार ज्या दिवशी थांबतील तो दिवस ऐतिहासिक ठरेल.

चोथा कोणी केला?
पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे कश्मीर प्रश्नाचा चोथा झाला, हा कोळसा सतत उगाळला जात आहेच. सरदार पटेल हे पंतप्रधान असते तर ‘हैदराबाद’च्या निजामास वाकवले तसा कश्मीरचा प्रश्नही पटेलांनी सोडवला असता, असा दावाही केला जातो. यात काँग्रेस विरोध जास्त दिसतो. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, हैदराबादच्या सीमा पाकिस्तानशी जोडलेल्या नव्हत्या. हैदराबाद चारही बाजूंनी हिंदुस्थानी प्रदेशाने घेरलेला होता. त्यामुळे निजामाची फडफड मर्यादित होती. कश्मीरचे तसे नव्हते. म्हणून हैदराबादपेक्षा कश्मीरचे युद्ध वेगळे होते. कश्मीरच्या युद्धात काय झाले? त्या वेळी काय घडले हे सर्व ‘रेकॉर्ड’वर आहे.

पंडित नेहरूंनी अचानक युद्ध रोखले. सैन्यास तेव्हा रोखले नसते तर कश्मीरचा प्रश्न तेव्हाच निकाली लागला असता, असे आज जे बोलत आहेत त्या सगळय़ांचा जन्म 1950 सालानंतरचा आहे. 1949ची स्थिती व आजच्या स्थितीत फरक आहे. कश्मीरच्या बाबतीत जे जे वाईट घडले ते सर्व फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंमुळेच घडले हे मान्य करूया. पण ज्या ‘370’वर आज सर्वांत जास्त आक्षेप घेतला जात आहे ते 370 कलम हिंदुस्थानी घटनेत जोडण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. पटेल हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या तोडीचा दुसरा प्रखर नेता मी काँग्रेस पक्षात पाहिला नाही. पण सरदारांनी आपल्या हाताने खास दर्जा कश्मीरला दिला, त्याअर्थी त्या वेळची स्थितीच तशी गंभीर असावी. पण आज 2019 सालात ती स्थिती नाही. हा विशेष दर्जा उखडून, 370 कलम फेकण्याची शक्ती मोदी सरकारमध्ये आहे. 370 कलम कायमस्वरूपी नाही हे सांगण्याची हिंमत गृहमंत्री अमित शहा आज दाखवत आहेत. हे बदललेल्या परिस्थितीचे चित्र आहे. कश्मीर हा आपल्या सगळय़ांसाठीच मेंदूत व मनात घुसून अडकलेला विषय आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सर्व चकमकी आणि युद्धे कश्मीर प्रश्नावरच झाली. गेल्या 25 वर्षांपासून कश्मीरमध्ये Proxy War म्हणजे ‘छुपे युद्ध’ सुरू आहे. त्यामागे पाकिस्तान आहेच. हत्या, हिंसाचारास तेथे अंत नाही. भारतीय जनता पक्षाने कश्मीरचा भावनिक मुद्दा योग्य रीतीने लोकांपर्यंत नेला. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत ‘56 इंचांची छाती’ हा शब्दप्रयोग कश्मीरसंदर्भातच प्रकट झाला. 2019 साली पुलवामात 47 सुरक्षा जवानांची हत्या झाली. त्यानंतर पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारण्याची भाषा हिंदुस्थानी जनतेच्या भावनांच्या मशाली पेटवू लागली व एके रात्री भारतीय वायुदलाने पाकव्याप्त कश्मीरातील दहशतवादी तळावर हल्ला केला. त्यानंतर देशभरातील वातावरण साफ बदलले. सर्व प्रश्न, आरोप मागे पडले. फक्त पाकवरील हल्ल्याच्या विजयी तुताऱयाच वाजू लागल्या. त्याच वादळाने भाजपसह एनडीएला भव्य विजय दिला. देशाच्या राजकारणात कश्मीरचे हे महत्त्व आहे.

इतिहासाची अशी पाने
इतिहासाची काही पाने आपण फाडून फेकून देऊ शकतो, पण म्हणून इतिहास बदलला जाईल काय? इतिहास हा इंद्रायणीत बुडवून पुन्हा वर आलेल्या तुकारामांच्या गाथेप्रमाणे आहे.
370 कलमाचा इतिहास फक्त नेहरूंच्या नावे नाही, तर सरदार पटेलांशीही जोडला आहे. ‘मिशन 370’ संविधानास जोडून कश्मीरला हिंदुस्थानात ठेवण्याचे श्रेयही सरदार पटेलांचेच आहे व हे श्रेय पंडित नेहरू यांनी जाहीरपणे सरदार पटेल यांना दिले. पटेल यांचे खासगी सचिव व पटेलांच्या पत्रव्यवहारांचे संकलन करणारे बी. शंकर यांनी त्यावर प्रकाश टाकला आहे.

बी. शंकर काय सांगतात पहा-

  • 370 संविधानास जोडून, कश्मीरला विशेष दर्जा देण्याचे ‘मिशन’ सरदार पटेल यांनी सुरू केले तेव्हा पंडित नेहरू अमेरिकेत होते. गोपालस्वामी अय्यंगार यांनी शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून मसुदा तयार केला व पंडित नेहरूंची संमती मिळवली.
  • काँग्रेस पक्षाने संविधान सभेत या मसुद्याचा जोरदार नव्हे, तर हिंसक पद्धतीने विरोध केला. हे कलम कश्मीर राज्याला एक विशेष दर्जा देणार होते.
  • काँग्रेस पक्षाचे असे म्हणणे होते, इतर राज्यांनी ज्या मूलभूत व्यवस्थेचा स्वीकार केला, ज्या शर्ती मान्य करून संविधान स्वीकारले, कश्मीरलाही त्याच आधारावर संविधान स्वीकारावे लागेल.
  • पंडित नेहरूंच्या गैरहजेरीत त्यांना कमीपणा येऊ नये, नेहरूंचा सन्मान राहावा यासाठी सरदार पटेल यांनी काँग्रेसचे मन वळविण्याचे काम सुरू केले.
  • सरदार पटेल काँग्रेस नेत्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे संविधान सभेत कलम ‘370’वर जास्त चर्चाही झाली नाही व विरोधही झाला नाही.
  • कलम 370 संविधानाशी जोडल्यानंतर सरदार पटेल यांनी 3 नोव्हेंबर 1949 रोजी नेहरूंना पत्र लिहून सर्व घडामोडींची सविस्तर माहिती दिली. ‘काफी लंबी चर्चा के बाद में पार्टी (काँग्रेस) को सारे परिवर्तन स्वीकार करने के लिए समझा सका।’ असे सरदार शेवटी नेहरूंना सांगतात.

नेहरूंनी या ‘मिशन’ सफलतेचे श्रेय पटेलांना दिले. पटेल यांच्या मृत्यूनंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 370 खतम करण्यासाठी आंदोलन सुरू केले. तेव्हा पंडित नेहरू यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरदारांच्या कार्याचे स्मरण करून दिले (25 जुलै 1952). नेहरू म्हणतात, ‘हिंदुस्थानच्या घटनेस अंतिम स्वरूप दिले जात होते, तेव्हा 1949 साली हा विषय आमच्यासमोर आला. सरदार पटेलांनी हा विषय आपल्या हातात घेतला. त्यांनी आपल्या घटनेत जम्मू-कश्मीर राज्यास विशेष, पण ‘ट्रांझिशनल’ दर्जा दिला. तो घटनेत 370 कलमाच्या रूपाने सामील आहे.’
हा एक इतिहास आहे व यासाठी पंडित नेहरू किंवा सरदार पटेल यांना दोष देता येणार नाही. तो काळ, ती परिस्थिती व देशाची क्षमता वेगळी होती. देश निर्माण होत होता व संघर्षाचा मार्ग परवडणारा नव्हता. नेहरू-पटेल यांनी जे केले ते तेव्हा त्यांना योग्य वाटले. आज नेहरू-पटेलांची जागा मोदी-शहांनी घेतली. एक मजबूत देश त्यांच्या पाठीशी आहे. ‘ट्रांझिशनल’ 370 कलम हटवायला आता कोण रोखणार? जुना इतिहास बदलता येणार नाही, पण नवा इतिहास लिहिण्याचा ‘जनादेश’ 125 कोटी जनतेने दिला आहे, त्याचा आदर करा.

चुका सुधारण्याचे काम
देशाच्या नव्या गृहमंत्र्यांनी कश्मीर प्रश्नात लक्ष घातले आहे. अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू झाली आहे व त्यानंतर जम्मू-कश्मीरात विधानसभेची निवडणूक होईल. तरीही ‘370’चा चोथा उरतोच. 370 कलम म्हणजे देशाच्या घटनेतला एक अडथळा आहे. 370 कलमाने विशेष दर्जा देऊनही कश्मीरचा विषय संपणार नसेल तर ते आता उखडायला हवे. हिंदुस्थानच्या संविधानाचा प्रवाह जम्मू-कश्मीरच्या वेशीवर जाऊन थांबतो. संसदेने मंजूर केलेला प्रत्येक कायदा देशाच्या इंच इंच भूमीवर चालतो, पण जम्मू-कश्मीरात तो चालत नाही. मोदी व शहांनी हिंदुस्थानचा कायदा आता जम्मू-कश्मीरात चालवायला हवा. 370 हटवणे हाच त्याचा पर्याय.
राजकुमारने एका चित्रपटात ब्रिगेडियर सूर्यदेव सिंहची भूमिका केली होती. त्यात त्याचा एक डायलॉग गाजला तो
असा –
‘‘हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे! लेकिन वह वक्त भी हमारा होगा, बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी!’’
‘घूस कर मारेंगे!’ हा शब्दप्रयोग पुलवामानंतर गाजला.
पाकिस्तान आणि कश्मीरच्या बाबतीत तो ‘वक्त’ आता आला आहे.
नेहरू-पटेलांच्या चुका सुधारण्याचे काम मोदी-शहांनी सुरू केले आहे.
त्यांना पाठिंबा देऊया!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या