रोखठोक – अशी ही रामकथा

नरेंद्र मोदी यांचे बोट धरून भगवान श्रीराम अयोध्येतील त्यांच्या निवासी निघाले आहेत. अयोध्येत आंदोलन झाले ते तंबूत विसावलेल्या श्रीरामास त्याचे निवास मिळावे म्हणून. आता मंदिर व राम दोघांवर मालकी सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. रामकथा ज्यांना समजलीच नाही ते राम-भजनात दंग झाल्याचे दिसत आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या राजकीय मुहूर्तावर प्रभू श्रीराम म्हणजे प्रिय राम लल्ला हे अयोध्येत मंदिर प्रवेश करीत आहेत. चार पीठांच्या शंकराचार्यांनी, धर्माचार्यांनी श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त योग्य नसल्याचे सांगूनही हा भव्य सोहळा होत आहे. शंकराचार्यांचे म्हणणे असे की, “मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे. धर्मग्रंथानुसार पूर्णपणे बांधलेल्या मंदिरातच प्राणप्रतिष्ठा करायला हवी.मंदिर हे देवाचे शरीर असते. मंदिराचे शिखर हे दैवतांच्या डोळय़ांचे प्रतीक व कळस म्हणजे डोके. मंदिरावरील ध्वजपताका हे देवतेचे केस असतात. यांपैकी काहीच पूर्णत्वास गेले नाही. अशा अपूर्ण वातावरणात रामांची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही.’’

शंकराचार्यांनी हे सांगितले तेव्हा शंकराचार्यांना मूर्ख ठरविण्याचा प्रकार भाजपकडून झाला. शंकराचार्यांचे हिंदू धर्मात योगदान काय? असा प्रश्न विचारला गेला. ज्या हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर रामजन्मभूमी लढा उभा राहिला, संघर्ष झाला. हजारो करसेवकांनी रक्त सांडले. हौतात्म्य पत्करले. शरयू नदी रामभक्तांच्या रक्ताने लाल झाली ती हिंदुत्वासाठी, पण त्याच राममंदिराच्या उद्घाटनावरून हिंदुत्वात एक प्रकारचा गोंधळ उडाला आहे. कारण राममंदिराच्या लढय़ात राजकारण नव्हते, पण मंदिराच्या उद्घाटनात फक्त राजकारण शिरले. लोकसभा निवडणुकांचा प्रचार कार्यक्रम म्हणून अपूर्ण मंदिरात प्रभू श्रीरामांना ढकलून पाठवले जात आहे.

प्रेरणादायी

हजारो वर्षांपासून रामकथा लोकमानसाला चेतना देत, प्रफुल्लित करीत आली आहे. नवरसांनी भरलेला हा प्रवाह कधीही संपणार नाही. तो अनंत आहे, तो अगाध आहे. रामकथा प्रेरणादायक आहे. श्रीराम हे राजपुत्र होते. बंधू होते, सखा होते, पती होते, युवराज होते. प्रत्येक नात्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले. पुत्राच्या नात्याने त्यांनी पित्याच्या आज्ञेचे पालन केले. त्यांची राजसिंहासनावर बसण्याची इच्छाच असती तर त्यांनी कोणताही बहाणा केला असता. अयोध्येची दोन राज्ये करा. त्यातले एक मला द्या, दुसरे भरताला द्या, असा प्रस्तावही ते ठेवू शकले असते. जनमत त्यांच्या बाजूने उभेच होते. त्यांना बंडही करता आले असते, पण त्यांनी तसे केले नाही. ते सरळ वनवासात गेले हे महत्त्वाचे.

रामाने संयम आणि त्यागाची महती गायली तो आदर्श! म्हणून राम कणाकणात व जगात आहे. जगात सर्वाधिक मंदिरे रामाची आहेत. महात्मा गांधींनी बिर्लांच्या मदतीने रामाची मंदिरे उभी केली. राम देशातील लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देईल असे त्यांना वाटले. ब्रम्हदेशात हिंदुत्व नाही. पण तेथील जनमानसावर रामायणाची छाप आहे. इंडोनेशियात एक महिनाभर रामायणावर आधारित कार्यक्रम चालतात. तेथेही रामकथा म्हणजे सांस्कृतिक प्रेरणेचा अंग बनले आहे. लावोस, थायलंड, कंबोडियातही रामायण आहे. रामायण म्हणजे महान भारताचे खरे चित्र आहे. हा भारत कसा? हिमालयासारखा उत्तुंग आणि समुद्रासारखा अथांग, तितकाच गंभीर. श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला, पण त्यांची कर्मभूमी होती महाराष्ट्र. वनवासात ते नाशिकच्या पंचवटीत स्थिरावले व त्यांची सर्व महान कार्ये पंचवटीतच पार पडली. श्रीराम विहारासाठी जनकपूरला गेले. जनकपूर मिथिलात होते.

मिथिला बिहारात येते. भरत आपल्या आजोळी गेले होते ते कैकय देशात. कैकय म्हणजे आजचा अफगाणिस्तान. रामाची पत्नी सीता ही नेपाळची राजकन्या. रामायण हे फक्त उत्तरेत घडले नाही. ते जगाच्या विविध भागांत घडले, पण राम फक्त उत्तरेचे, या भ्रमात आपण राहिलो. राममंदिराच्या लढय़ासाठी सारा भारत उत्तरेत एकवटला व त्यातून आजचे भव्य मंदिर उभे राहिले. रामाने भारतभ्रमण केले. ते गुजरातच्या भूमीवर गेल्याचा पुरावा नाही. रामांना वनवासात जावे लागले. ते हिमालयातील थंडगार जंगलातही जाऊ शकले असते. कश्मीरातही त्यांना बस्तान बसवता आले असते. निसर्गाच्या सान्निध्यात एखादे राजभवन उभे करून त्यांना चौदा वर्षांचा निर्वासित काळ व्यतीत करता आला असता. ते शेवटी राजपुत्र होते. त्यांना केदार, बद्रीनाथ, द्वारकेची वाटही धरता आली असती, पण वनात जाण्यासाठी त्यांनी वेगळीच वाट धरली. चित्रकूट, पंचवटी, किष्किंधा, पंपा सरोवर ते थेट रामेश्वरपर्यंतचा सारा भारत त्यांनी जणू आपल्या बाहूमध्ये समाविष्ट केला. ते जेथे गेले तो भाग राममय केला हे महत्त्वाचे.

एकवचनी, सत्यवचनी

राम सत्यवचनी होते हे रामांची आज प्राणप्रतिष्ठा करणाऱयांनी समजून घेतले पाहिजे. सत्यवचनी म्हणून रामास पुजले जाते. रामाने ढोंगाला थारा दिला नाही. रामाने रावणाच्या विद्वत्तेचा आदर केला, पण अन्याय करणारा राजा म्हणून त्याचा पराभव करून मृत्युदंड दिला.

रामकथेवर अनेक आक्षेप आहेत. त्यातला एक, वालीला लपून मारणारा देव कसा असू शकतो? हा आहे. युद्ध नियमांचे पालन न करता वालीचा वध करणारा राम सत्यवचनी कसा? वालीशी मैत्री न करता रामाने सुग्रीवाशी हातमिळवणी केली. कारण वालीने सुग्रीवाच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केले होते. सुग्रीवास राज्यातून काढले. सुग्रीव हा त्या अर्थाने वंचित होता. त्याने वंचिताची बाजू घेतली. रावणाने सीतेचे हरण केले. रामाने रावणवध केला, पण केवळ सीतेला परत आणणे एवढाच प्रश्न नव्हता. वाली आणि रावण यांची राजसत्ता बदलून जीवनमूल्यांशी प्रतारणा न करणारी सत्ता रामाला आणायची होती. वालीला मारल्यानंतर ते राज्य सुग्रीवाला दिले. तेथे आपल्या सुभेदारांना आणि चमच्यांना बसवले नाही. रामराज्य ही एक व्यवस्था होती. या काळात सगळे सुखी व कर्तव्यपरायण होते. दीर्घायू, संस्कारी, कुटुंबवत्सल होते. उदार होते. नैतिकतेचा उत्कर्ष रामराज्यात होता. लोक प्रसन्न आणि समाधानी होते. अत्यंत कमजोर लोकांनाही न्याय मिळत होता. रामाने विरोधकांचा आदर केला. रामराज्यात कोणी ‘अदानी’ नव्हता की भांडवलदार नव्हता. रामराज्यात सत्याची पताका फडकत होती. सत्यवचनी रामाचा सोहळा साजरा करणारे मात्र आज असत्याचा आधार घेत आहेत!

1934 साली ‘अमृत बाजार’ पत्रिकेत लिहिताना महात्मा गांधी म्हणतात, “माझ्या स्वप्नातील रामराज्यात व रामायणात ‘राजा आणि प्रजे’ला समान अधिकार आहेत.’’

आज हे चित्र आहे काय?

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]