सवंग लोकप्रियतेची दारूबंदी, चंद्रपुरात काय सुरू आहे?

सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेणे आता थांबवायला हवे. राज्यकर्ते व न्यायालयांना हा छंद जडला आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था कोसळत आहे. पाचशे मीटरच्या आत ‘हाय वे’वरील दारूबंदीने बेरोजगारीत भर पडली आहे. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेतला असला तरी त्याचा पुरता फज्जा उडाला हे मी अनुभवले. दारूबंदी झाली तेथे गर्द, अफू, गांजा, ब्राऊन शूगरचा विळखा पडला. दारूबंदी म्हणजे संपूर्ण नशाबंदी नाही. बेरोजगारी वाढवणारे, महसूल बुडवणारे हे निर्णय आहेत.’

rokh-thokसवंग लोकप्रियतेसाठी राजकारण्यांनी घेतलेले निर्णय अनेकदा घातक ठरतात. आमची न्यायालये व राज्यकर्ते असे निर्णय आता रोजच घेऊ लागले आहेत. नोटाबंदी, जीएसटी आणि महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील दारूबंदीच्या निर्णयाचे परिणाम देशाला व लोकांना भोगावे लागत आहेत. चंद्रपूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी मागील शनिवारी नागपूरला पोहोचलो. तेथून चंद्रपूर दोन तासांवर. रस्ते उत्तम झाल्याने प्रवासात आता अडचणी नाहीत. पण नागपूर ते चंद्रपूर प्रवासात विदर्भातील कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे व बेरोजगारीचे दर्शन घडले. कालपर्यंत उत्तम चाललेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ते प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री. १ एप्रिल २०१५ रोजी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तडकाफडकी दारूबंदी केली. पण सरकारी दारूबंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी झाली आहे काय? याचे उत्तर नाही. एका उदात्त भावनेने मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय. पण दारूबंदीचा पुरता फज्जा चंद्रपूर व आसपासच्या भागात उडाला आहे.

संपूर्ण नशाबंदी
मी स्वतः दारूबंदीचा समर्थक आहे. दारू, तंबाखू, गुटख्यासारखे पदार्थ समूळ नष्ट व्हावेत असे वाटत असले तरी ते शक्य नाही. कारण अशा वेळी या सर्व बंदी घातलेल्या वस्तू काळ्या बाजारात दामदुपटीच्या भावाने मिळू लागतात व कायद्याचे रक्षकच या व्यवहारास प्रोत्साहन देतात. तंबाखूमुळे कॅन्सर होतो, पण सिगारेटच्या कोणत्याही कंपन्यांवर बंदी घातलेली नाही. सिगारेट पिणे आरोग्यास हानीकारक आहे असे सिगारेटच्या पाकिटांवर छापणे सरकारने बंधनकारक केले. पण सिगारेटचा धूर निघतच आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. महामार्गावर अपघात वाढले. त्याचे कारण महामार्गावर होणारी दारूविक्री. त्यामुळे महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील दारूविक्रीला सरसकट बंदी घातली. त्याचा मोठा फटका हॉटेल उद्योगास बसला. पंचतारांकित हॉटेल्सपासून धाब्यापर्यंत सर्व व्यवहार थंडावले. सरकारचा व उद्योगांचा महसूल बुडाला व मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारी वाढली व त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडले. पुन्हा महामार्गावरील दारूविक्रीमुळे अपघात वाढले हा दावा फोल ठरला. कारण दारूबंदीनंतर अपघातांचे प्रमाण वाढले. दारू पिणे हा कायद्याने गुन्हा नाही. दारू पिणाऱ्यांना व बाळगणाऱ्यांना पोलिसांचे परमिट मिळते. न्यायमूर्तींच्या क्लबमधून दारूविक्री होते व ‘प्रेस क्लब’लाही दारू मिळते. ज्याला दारू प्यायची आहे तो कुठेही व कशीही पितो. त्यावर सरकारचे नियंत्रण हवे.

प्रतिष्ठेचा प्रश्न का?mahatma-gandhi
दारूबंदी हा कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नये. त्यातून काहीच साध्य होत नाही. विनोबा भावे यांचे वास्तव्य वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमात होते. गांधीही तेथे येऊन राहिले. धोम नदीच्या तीरावर विनोबा वावरले. वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून सरकारने जाहीर केला व त्या जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीची घोषणा केली. पण संपूर्ण विदर्भातील सर्वात जास्त देशी दारू वर्धा जिल्ह्यातच बनवली व विकली जात होती. आजही चित्र वेगळे नाही. धोम नदीच्या तीरावर महादेवीने आचार्य विनोबाजींच्या देहाला अग्नी दिला. त्या धोम नदीच्या पात्रावर दारूच्या शेकडो भट्ट्या लागलेल्या मी पाहिल्या व गांधींचा दारूबंदी जिल्हा शेवटी सरकारी कागदावरच राहिला. पोलीस व दारूवाल्यांची हातमिळवणी व राजकारण्यांचे कृपाछत्र याशिवाय ते कसे शक्य होईल? जे वर्ध्यात घडले तेच आता चंद्रपुरात घडत आहे व सरकारने ते डोळे उघडे ठेवून पाहायला हवे.

चंद्रपुरात काय घडले?
चंद्रपूरच्या मुक्कामात काही प्रतिष्ठत उद्योजक व हॉटेल व्यावसायिक भेटायला आले. ‘‘चंद्रपुरात दारू आजही मिळते. लोक दारू पितात. फक्त जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे सरकारी महसुलाचे नुकसान होते.’’ अशी माहिती त्यांनी दिली. मला त्यांनी जे लेखी निवेदन दिले त्यातील माहिती आश्चर्यकारक आहे.

‘‘१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात तडकाफडकी दारूबंदी करण्यात आली. तेव्हा वर्धा आणि गडचिरोली येथील दारूबंदीचा कोणताही विचार न करता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. गेल्या २८ महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात एकही दिवस असा गेला नाही की, २५ ते ५० लाखांची दारू पकडली गेली नाही. माहितीच्या अधिकाराखाली पोलीस विभागाकडून माहिती मागितली असताना आतापर्यंत जिल्ह्यात ६० कोटी ९० लाख रुपयांच्या देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. दारूबंदीमुळे जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व बेरोजगार दारूच्या अवैध व्यवसायात अल्प व त्वरित मिळणाऱ्या मोबदल्याकरिता गुंतले गेलेले आहेत. तसेच दारूच्या नशेला पर्याय म्हणून सर्रास गांजा, अफीम, गर्द, हेरॉईन या अतिघातक द्रव्याचे सेवन शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी व बेरोजगारांकडून करण्यात येत आहे. याचप्रमाणे अलीकडे गांजा, अफीम, चरस, ब्राऊन शुगर व अमली पदार्थ यांचा १० लाख रुपयांचा साठा पकडण्यात आला. चंद्रपूर हा विदर्भात औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास २० कोळसा खाणी, ५ सिमेंट कारखाने, बल्लारशा पेपर मिल, वीजनिर्मिती केंद्र दुर्गापूर तसेच फेरो अलायन्स कारखाना, लॉयड मेटल व सागवान लाकडाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आणि पर्यटनस्थळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातला कामगार वर्ग २ ते ३ लाख संख्येने इथे आहे. ताडोबा क्षेत्रात ३० ते ४० रिसॉर्ट आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, त्याचप्रमाणे तेलंगणा, आंध्र प्रदेश, एम.पी. व राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू तस्करी होत आहे. यामध्ये फक्त फायदा पोलिसांचा आणि अवैध दारूची विक्री करणाऱ्यांचा आहे. चंद्रपूर जिल्ह्याला दारूपासून एक्साईज डय़ुटी, व्हॅट आणि इन्कम टॅक्स रूपाने प्रत्येक वर्षी ६५० ते ७०० कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. दारूबंदीमुळे अवैध व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तसेच या धंद्यात बेरोजगार युवक व महिला फार मोठ्या संख्येने दारू व गांजा, अफीम, चरस, हेरॉईन विकत आहेत. दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक व्यवसायामध्ये उदा. हॉटेल, इंडस्ट्रीज, बिल्डर लॉबी याचप्रमाणे प्लॉटचे रेट व सर्वच धंद्यांत मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे याचा परिणाम बँकांच्या व्यवसायावर झाला असून बरीचशी अकाऊंटस् एनपीएमध्ये गेलेली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या बनावट दारू, हातभट्टीची दारू त्याचप्रमाणे गुळअंबाची दारू सर्रासपणे विक्री होत आहे. मुंबईच्या मालवणीत ज्याप्रमाणे विषारी दारूने १०८ लोक मरण पावले तशी घटना चंद्रपुरात केव्हाही होऊ शकते. हे सर्व प्रकरण सरकारने विचार करावा असे आहे. दारू बंद झाल्यामुळे नशा करणारे लोक व तरुणवर्ग गर्द आणि ब्राऊन शुगरसारख्या भयंकर नशेकडे वळला. चंद्रपूरचे हे वास्तव आहे व सर्वत्र हेच घडत आहे. संपूर्ण नशाबंदी हा त्यावरचा मार्ग आहे. पण ते शक्य आहे? देशातील तंबाखूचे सर्व उत्पादन त्यासाठी बंद करावे लागेल. तंबाखू पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त होईल. देशभरातील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना टाळे लावावे लागेल व देशातील आर्थिक अराजकास तोंड द्यावे लागेल. गुजरात राज्यात संपूर्ण दारूबंदी आहे. पण तेथे आज देशातील सर्वांत जास्त चोरटय़ा दारूचा व्यापार होतो. गांधींच्या पोरबंदरमध्ये दारूभट्ट्यांचे थैमान आहे व हे सर्व ज्यांच्या हातात आहे तो पोरबंदरचा डॉन जाडेजा हा विधानसभा सदस्य आहे. कालच्या राज्यसभा निवडणुकीत त्याने भारतीय जनता पक्षाला उघडपणे मतदान केले. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीची घोषणा केली, पण तेथेही दारूबंदी फसली व नशेचे नवे मार्ग उघडले. मुंबईतील डान्स बार सवंग लोकप्रियतेसाठी बंद केले. त्याचा परिणाम वेश्या व्यवसाय वाढण्यावर झाला. हॉटेल उद्योग पूर्णपणे कोलमडला. रात्री ११ नंतर मुंबईत रेस्टॉरंट व बार चालवू नयेत असे न्यायालय म्हणते व मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात हे शक्य नाही. ‘नाईट लाइफ’ हा व्यापार आणि पर्यटनाचा गाभा आहे, असे परखडपणे बोलणारे समाजाचे शत्रू ठरतात. ५०० मीटरच्या आतील दारूबंदीमुळे पर्यटनांवर जगणाऱ्या राज्यांचे व पर्यटन स्थळांचे हाल झाले आहेत. दारूबंदीप्रमाणे महागाई, बेरोजगारी बंदीवर भर द्यायला हवा व भ्रष्टाचार बंदीत सगळ्यांनीच सामील व्हायला हवे. न्यायालये व सरकारातील लोक सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेणे थांबवतील तेव्हा बऱ्याच चांगल्या गोष्टी पुढे सरकतील.

मोरारजींचे काय झाले?
मोरारजी देसाई हे दारूबंदीचे समर्थक होते. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यात संपूर्ण दारूबंदी केली. त्याचा साफ फजितवाडा कसा झाला त्याचा एक किस्सा सांगतो व हा विषय थांबवतो. आचार्य अत्रे यांनी जुलै १९६२ मध्ये विधिमंडळात दारूबंदीच्या फजितवाड्यावर केलेले हे भाषण पहा-
‘‘या सरकारची जितकी फजिती इतर कोणत्याही कायद्याने केली नसेल तितकी फजिती या दारूबंदी कायद्याने केली आहे आणि पुढे एक दिवस असा येईल की, आपण होऊन या सरकारला कबूल करावे लागेल की, आमची दारूबंदी अयशस्वी झाली आहे… तेव्हा आम्ही दारूबंदी उठवतो! ही दारूबंदी कशी यशस्वी झाली आहे याचे एक गमतीदार उदाहरण मी सभागृहाला सांगणार आहे. एकदा या राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री श्री. मुरारजीभाई देसाई कामगार विभागामध्ये दारूबंदीचा उत्सव साजरा करण्यासाठी गेले. तेथे लोक तर जमलेले नव्हते, परंतु हातभट्टीवाले, हप्ता घेणारे पोलीस मात्र होते. तेव्हा कामगार वस्तीमध्ये जाऊन तेथील कामगारांच्या बायकांना त्यांनी विचारले की, ‘बायांनो, तुम्ही दारूबंदीमुळे अतिशय सुखी झालेल्या आहात काय?’ त्यांनी उत्तर दिले की, ‘आम्ही अतिशय सुखी झालो.’ नंतर त्यांनी दुसरा असा प्रश्न विचारला की, ‘गिरणी सुटल्यावर तुमचे नवरे लवकर घरी येतात काय?’ त्यांनी उत्तर दिले, ‘होय, गिरणी सुटल्यावर आमचे नवरे प्रथम घरी येतात.’ त्यांनी नंतर असा प्रश्न विचारला की, ‘ते दारू वगैरे प्यायला जात नाहीत काय?’ त्या बायांनी उत्तर दिले की, ‘आम्ही हल्ली घरीच दारू करतो!’ ही झाली त्यांच्या दारूबंदी उत्सवाची फजिती! अध्यक्ष महाराज, असा कोणताही देश नाही की जेथे दारूबंदी आहे. अमेरिकेमध्ये दारूबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यांनी त्याप्रमाणे १६ जानेवारी १९२० रोजी आपल्या घटनेला अठरावी अमेन्डमेंट आणली. सतत बारा वर्षे प्रयोग करून त्यांना या प्रयोगात यश मिळाले नाही असे दिसून आल्यावर त्यांनी १२ फेबुवारी १९३२ रोजी दारूबंदी रद्द करण्यासाठी घटनेला २१ वी अमेन्डमेंट आणली. त्यांच्याजवळ सर्व प्रकारची साधने आणि संपत्ती असताना काही करता आले नाही, तर या ठिकाणी हे काँग्रेस सरकार काय करणार? अध्यक्ष महाराज, काय ताकद आहे त्यांची? कोठे अमेरिका…कोठे रशिया! ते चंद्रावर जाऊन आले आहेत आणि आमच्या सरकारला धड मातीचे धरण बांधता येत नाही… आणि म्हणतात की आम्ही दारूबंदी करू! जगातील कोणत्याही धर्मामध्ये दारू निषिद्ध मानली नाही. फक्त इस्लामी धर्मात दारू निषिद्ध मानली आहे… तरीसुद्धा जगातील कोणत्याही इस्लामी राष्ट्रांत दारूबंदी झालेली आपल्याला दिसून येणार नाही. त्यांचा धर्म संस्थापक महंमद पैगंबर हा दारूचा कट्टर शत्रू होता.
He was the greatest enemy of this evil of drink, but inspite of this no Islamic country has yet introduced prohibition.’’

हे बंद करा!
हा मजकूर लिहीत असताना चंद्रपुरात १ कोटी रुपयांची दारू पकडण्यात आली. नागालॅण्डमधून आलेल्या ट्रकमधून ही दारू आली. चंद्रपुरातील दारूबंदीचा सर्वांत जास्त फायदा इतर राज्यांना होत आहे. चंद्रपुरातील विशिष्ट पोलीस ठाण्यांत बदली आणि नेमणूक मिळावी यासाठी आता उलाढाली होत असल्याचे मला सांगितले. पूर्वी गडचिरोली व चंद्रपूरची बदली व नेमणूक म्हणजे शिक्षा समजली जात असे. आज चित्र वेगळे आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयानंतर देशातील रोजगारावर मोठे संकट आलेच आहे. त्यात दारूबंदीसारख्या कधीही यशस्वी न होणाऱ्या निर्णयाची भर पडली. न्यायालये कोणताही सामाजिक विचार न करता निर्णय घेतात व राज्यकर्त्यांची पंचाईत होते. न्यायमूर्तींच्या क्लबमध्ये मिळणाऱ्या दारूवर बंदी येईल, प्रेस क्लबमधील दारू बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने दारूबंदीची सुरुवात होईल.

twitt – @rautsanjay61
email – rautsanjay61@gmail.com