रोखठोक – चमचे, अंधभक्त आणि भेंड्याची भाजी!

rokhthok

काँग्रेसच्या काळात दिल्लीपासून सर्वत्र चमच्यांची चलती होती. मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली, पण काम तेच आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘‘मोदी 22 तास काम करतात. उरलेले दोन तास झोपही पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे.’’ चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल!

मालिक तो महान है,
बस चमचों से परेशान हैं
सध्या आपल्या देशात हेच वातावरण दिसत आहे. देशातील राजकारणात सरळ दोन गट पडले आहेत. भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत. भांड, भाट आणि चमचे ज्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सामील केले जातात ते राज्य रसातळाला जाते व राजा विश्वास गमावून बसतो. सध्या आपले पंतप्रधान श्री. मोदी अशाच चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेस काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झाले. काम तेच. देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. आज मोदी भक्तांनी ‘मोदी इज इंडिया’ असे जाहीर केले. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत असे टोक भक्तांनी गाठले, पण आता कडेलोट केलाय तो महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, ‘‘श्री. नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.’’ पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे.

नवाबाचे जेवण

भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय, याची चांगली कथा आचार्य रजनीश यांनी सांगितली. श्री. हर्ष गोयंका यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ती पुन्हा प्रसिद्ध केली. मुल्ला नसरुद्दीन हा नवाबाचा लाडका होता. अर्थात, सगळ्यात मोठा चमचा होता. चमच्यांवर कोण प्रेम करत नाही? सगळेच करतात. एकदा नवाब आणि नसरुद्दीन दोघेच जेवायला बसले. भेंडीची भाजी बनवली होती. भेंडीचे ताजे ताजे पीक बाजारात आले होते. नवाबाला भेंड्याची भाजी आवडली. नवाब म्हणाला, ‘‘भेंड्याची भाजी खरंच चविष्ट झालीय. चव जिभेवर रेंगाळतेय.’’ मग नसरुद्दीन कसा मागे राहील? चमचे तर अशा संधीच्याच शोधात असतात. नसरुद्दीन म्हणाला, ‘‘फक्त सुंदर आणि स्वादिष्ट? वनस्पती शास्त्रानुसार हे तर अमृत आहे. जे भेंड्याची भाजी खातात ते एक हजार वर्षे जगतात आणि त्यांचा एक एक दिवस हजार वर्षांचा असतो. भेंडी ही साधी गोष्ट नाही. जसे आपण सम्राटांचे सम्राट, तशी भेंडीसुद्धा भाज्यांची सम्राट.’’ आतमध्ये आचाऱ्याने हे ऐकले. त्याला प्रेरणा मिळाली. जर भेंडीत अमृताचे गुण आहेत तर त्याने दुसऱ्या दिवशीही भेंडी बनवली. तिसऱ्या दिवशीही भेंडीच भेंडीच बनवली. पुढे तो हे भेंडीचे अमृत रोजच नवाबाच्या चांदीच्या ताटात वाढू लागला. आठव्या दिवशी नवाबाने जेवणाची थाळी फेकली. नवाब संतापला, ‘‘भेंडी, भेंडी, भेंडी! काय चाललंय? मारणार आहात का तुम्ही मला?’’ त्यावर नसरुद्दीनने त्याची थाळी आणखी जोरात फेकली! आणि उठून एक जोरात थप्पड लगावली त्या आचाऱ्यास. ‘‘तू नवाबाला मारायला निघालास? दुष्ट कुठला! भेंडीसारखी बेचव, सडकी भाजी नवाबाला खायला घालताना लाज नाही वाटत? भिखारीसुद्धा भेंडी खात नाहीत. नाव फक्त भेंडी. हे विष आहे विष! तू दुश्मनांच्या हातातले बाहुले बनला आहेस. तू षड्यंत्राचा भागीदार आहेस. तू देशविरोधी कारस्थानाचा सूत्रधार आहेस. नवाबाला भेंडी खायला घालून तुम्ही नवाबाच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळ करीत आहात.’’ नसरुद्दीनचा हा अवतार बघून नवाबही आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, ‘‘नसरुद्दीन हे काय? आठ दिवसांपूर्वी तूच तर म्हणाला होतास भेंडी म्हणजे अमृत आहे. विसरलास तू?’’ नसरुद्दीन म्हणाला, ‘‘शेटजी, कसा विसरेन? मला आठवतंय सगळं.’’
नवाब म्हणाला, ‘‘आज अमृताचं जहर कसं काय झालं? भेंडी तर तीच आहे. तू का बदललास? आणि त्या बिचाऱ्या आचाऱ्यालाही तू मारलंस. आणि तू जेवणाची थाळी माझ्यापेक्षा जोरात फेकलीस.’’
नसरुद्दीन शांतपणे म्हणाला, ‘‘शेठजी, आम्ही काही त्या भेंडीचे नोकर नाहीत. आम्ही तर तुमचे नोकर आहोत. भेंडीची ऐशी की तैशी. भेंडी गेली भाड में! तुम्हाला भेंडी आवडली नाही, मग आम्हालाही आवडली नाही. तुम्ही थाळी फेकलीत, मग आम्हीही आमची थाळी जोरात फेकली. तुम्हाला भेंडी आवडली तेव्हा आम्हाला आवडली. आम्ही आपले नोकर आहोत शेठजी! समजून घ्या!’’
चमचे आणि भक्तांचे किती समर्पक वर्णन केले आहे पाहा. मोदींना खिचडी आवडते म्हणून भक्तांनाही खिचडी आवडू लागली. मोदींनी चहा विकला म्हणून भक्तांनी चहाची विक्री सुरू केली. या भक्तीस तोड नाही. आता तर कोथरुडचे पाटील मोदींच्या झोपेवर संशोधन करायला निघाले. मोदी यापुढे 24 तास जागे राहतील. म्हणजे त्यांचे भक्तही झोपणार नाहीत.

उलथापालथ

जगाचा इतिहास चमचेगिरीच्या असंख्य कथा-दंतकथांनी भरला आहे. ‘जगातील उलथापालथीस महापुरुष नाही, तर चमचे जबाबदार आहेत,’ असे एका महान लेखकाने लिहून ठेवले आहे. हरिशंकर परसाई हे एक महान विनोदी लेखक. त्यांनी ‘चमच्यांची दिल्ली यात्रा’ असे एक बहारदार व्यंगलेखन केले होते. त्या काळातल्या दिल्लीचे योग्य वर्णन त्यांनी केले. ते म्हणाले, ‘‘माझा अंदाज आहे, या काळात देशाच्या राजकीय क्षेत्रात जवळ जवळ पाच हजार चमचे काम करीत आहेत. हे प्रमुख चमचे आहेत. मग स्थानिक चमचे, सहाय्यक चमचे, अतिरिक्त चमचे, खास चमचे अशा पदांवर हे लोक काम करीत आहेत. हे सर्व चमचे आपल्या नेत्याच्या अवतीभवती आशाळभूत नजरांनी लाभार्थी बनून वावरत आहेत. आपले इमान दाखविण्यासाठी ते चमचे कोणत्याही हीन पातळीवर जातील.’’ परसाई यांनी वर्णन केले तो काळ काँग्रेसचा दिल्लीतील सुवर्णकाळ होता. आज दिल्ली तीच आहे. चमच्यांची जागा भक्तांनी घेतली व त्यात ‘मीडिया’ नावाचा मोठा चमचाही सहभागी झाला.

युद्धभूमीवरील मोदी

प्रत्येक मोठ्या माणसाचा कमीत कमी एक चमचा असायलाच हवा. भाट, भांड, तोंडपुंजे त्यातूनच निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट आवडल्याचे जाहीर करताच देशभरातील भक्तांनी ‘द कश्मीर फाईल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी ठेवले. मोदींनी ‘द कश्मीर फाईल्स’चा प्रचार सुरू करताच देशभरातील त्यांचे भक्त या चित्रपटाचे पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले. ही चमचेगिरीच्या अधःपतनाची हद्द असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. अँथनी ईडन हा चर्चिलचा चमचा होता. बॉसवेल हा डॉ. जॉन्सनचा चमचा होता. गांधी आणि नेहरूंनाही चमचे होते. राजेश खन्ना त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर असतानाचा एक चमचेगिरीचा किस्सा. पोटात दुखू लागल्याने तो मुंबईतील एका इस्पितळात दाखल झाला. राजेश खन्नाची खुशमस्करी करणाऱ्यांची तेव्हा इस्पितळात रांग लागली होती. त्याचे अनेक निर्माते इस्पितळातील त्याच्या खोलीत घुसण्यासाठी शर्थ करीत होते. एक बडा निर्माता राजेश खन्नाच्या खोलीत घुसला व छताकडे पाहून म्हणाला, ‘‘उपर आका (ईश्वर) निचे काका!’’ राजेश खन्ना हे त्या काळात ‘काका’ या टोपण नावाने परिचित होते. चमचेगिरीचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून आहे. रशिया-युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान मोदी यांना कसे ओढायचे यावर भक्त मंडळीत प्रचंड खल झाला असावा. शेवटी एक दिवस भक्तांच्या वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर बातम्या झळकल्याच. मोदी यांनी पुतीन व बायडेनशी तब्बल एक तास चर्चा केली. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी फोन करून मोदींकडे मदत मागितली. मोदी यांनी म्हणे पुतीन व बायडेन यांना संयमाने घेण्याचा सल्ला दिला. मोदी यांचा सल्ला दोघांनी मानल्याचेही प्रसारित झाले, पण सत्य असे की, पुतीन यांनी युक्रेन पूर्ण बेचिराख केले आहे. पुतीन व बायडेन हे मोदींच्या ऐकण्यातले होते, मग दोघांत युद्ध का पेटले? यावर भक्त व चमच्यांचे म्हणणे असे की, ‘‘युद्धाला तोंड फुटले तेव्हा मोदी हे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारात दंग होते. त्यामुळे त्या दोघांचा मोदींशी संपर्क होऊ शकला नाही!’’ ही सरळ सरळ चमचेगिरी आहे. देवाच्या दरबारातही चमचे होतेच. हरिशंकर परसाई सांगतात, ‘‘सारे फरिश्ते भगवान के चमचे है, शैतानने भगवान का चमचा बनने से इनकार किया तो उसे स्वर्ग से निकाल दिया गया!’’

जे राज्य चमचे निर्माण करतात, ते राज्य चमच्यांचेच बनते. त्यातून अंधभक्तांची फौज निर्माण होते.
चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या झोपेचा विषय काढला. मोदी त्यांचे देवच आहेत. देवांनाही चमचे होते. पण देव झोपत नव्हते, असे चमचे म्हणाले नाहीत. साधू, संत, योगी, सिद्धपुरुष मानवी शरीराच्या गरजेनुसार झोपत होते, पण मोदी अखंड जागे राहतील असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल. देवांची झोप उडविण्याची ताकद चमच्यांत आणि भक्तांत आहे.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]