कोण हे चिंतामणराव देशमुख?

329

चिंतामणराव देशमुखांचे ‘रोहा’ आजही रखरखीत आहे.ज्यांनी महाराष्ट्रावर त्यागाचे छत्र धरले, स्वाभिमानाचे दीप लावले त्या देशमुखांचे उचित स्मारक महाराष्ट्राने उभारले नाही. ज्या मुंबईची लढाई आपण आजही लढत आहोत त्या लढाईची मशाल चिंतामणराव देशमुखांनी पेटवली. नव्या पिढीस चिंतामणराव देशमुख माहीत नाहीत. कोण हे देशमुख? असे विचारणाऱ्यांसाठी हा प्रपंच.

Kindliness and grace
Excellent courtesy
A brightness in the face,
Airs of high memory
whence came all these to such as he?

हे ज्यांच्याविषयी म्हणता येईल त्या चिंतामणराव देशमुख यांच्या ‘रोहा’ गावात शनिवारी होतो. महाराष्ट्रासाठी ते चिंतामणराव देशमुख. इतरांसाठी सी.डी. देशमुख. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सध्या कुरूपता, असंस्कृतता, ओबडधोबडपणा वाढला आहे. अशा या काळात श्री. देशमुख यांच्यासारख्या सुसंस्कृत, खानदानी व्यक्ती या अपवादभूत होत्या. देशमुख कोण? हे आजच्या पिढीला माहीत नसावेत. पण रोह्याच्या ‘नाते’ गावात जन्मास आलेली ही व्यक्ती स्वतंत्र हिंदुस्थानच्या रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर झाले, देशाचे अर्थमंत्री झाले. ज्या मुंबईची लढाई आपण आजही लढत आहोत व महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबईच्या लढाईस पुन्हा तोंड फुटले आहे त्या मुंबईचा लढा जिंकला तो फक्त चिंतामणराव देशमुखांच्या राजकीय हौतात्म्याने हे आपण सगळे विसरलो. ‘रोहा’ तालुक्याने देशाला सर्वात काबील अर्थमंत्री दिला, महाराष्ट्राच्या लढ्याचा जिवंत हुतात्मा दिला ते देशमुखांचे ‘रोहे’ आजही मागे आहे. रखरखीत व उपेक्षित आहे. चिंतामणराव देशमुखांच्या जीवनातही शेवटी हीच उपेक्षा आली.

नाव घेण्याची लायकी नाही

रोहय़ाचा पत्रकार संघ १४ जानेवारीस एक सोहळा आयोजित करतो व चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने पत्रकारांना पुरस्कार देतो. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रोह्यात गेलो तेव्हा सांगितले, ”चिंतामणराव देशमुखांचे नाव घेण्याची लायकी आज कुणाचीही नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार घेण्याच्या लायकीची माणसे नाहीत. ज्या देशमुखांनी महाराष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग केला त्या देशमुखांचे विस्मरण महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना झाले. मंत्रिमंडळात काम केलेल्या नेत्यांची व जातीय पुढाऱ्यांची स्मारके सरकारी खर्चाने व सरकारी जमिनीवर आजही होत आहेत. पण ज्यांच्यामुळे मुंबईचा लढा यशस्वी झाला त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी तुम्ही आम्ही काय केले? २ ऑक्टोबर १९८२ रोजी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचा हा वीरपुरुष आंध्रात वृद्धापकाळाने मरण पावला. महाराष्ट्राने त्यांचे सूतकही पाळले नाही.

”वंश जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्र भाषा
आजपासूनी सर्वांनाही तुझी फार आशा.”
या शब्दांत गोविंदाग्रजांनी मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आल्याबरोबर चिंतामणराव देशमुखांवर स्मृतिसुमने उधळली होती. त्या महाराष्ट्र भाषेसाठीच शेवटी त्यांनी हौतात्म्य पत्करले. मॅट्रिकला ते पहिले आले. जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. मराठीइतकेच संस्कृतचे ते परमभक्त. पुढे आयसीएस होऊन इंग्लंडहून परत आले. येताना इंग्रजपत्नी घेऊन आले.
केंब्रिजमध्ये अपूर्व यश व आयसीएस परीक्षेतही सर्वप्रथम येणारे देशमुख सपत्नीक हिंदुस्थानात आले व त्यांनी एकामागून एक उच्च पदे भूषविली. १९४० च्या सुमारास ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले तर १९४३ मध्ये जेम्स टेलर यांच्या जागी ते पहिले हिंदुस्थानी गव्हर्नर म्हणून नेमले गेले. आपल्या नोटांवर देशमुखांची असलेली सही ही पहिल्या हिंदुस्थानी गव्हर्नरांची होती. त्या वेळेपासून एकीकडे चलनफुगवटा रोखण्याचा आणि दुसरीकडे बँकांच्या व्यवहार पद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व्हाईसरॉय व्हॅवेल यांनी त्यांची गुणवत्ता ओळखून १९४६ सालीच कौन्सिलमध्ये अर्थखाते सांभाळण्यास त्यांना बोलावले होते. परंतु असे राजकीय पद सांभाळण्यासाठी लागणारी मनोवृत्ती आपली नाही, हे खरे कारण देऊन त्यांनी ती विनंती अव्हेरली. स्वातंत्र्य आले तेव्हा निवृत्त होऊन आपल्या ब्रिटिश पत्नीबरोबर साहेबांच्या देशात राहण्याची योजना त्यांनी आखली होती. परंतु देशमुखांचे उभे आयुष्य हे देश व परदेश किंवा राज्य व परप्रांत यांच्या संघर्षांनी इतके वेढलेले होते की, त्यांना हवे ते नियती पुरे करू देत नव्हती. त्या ब्रिटिश पत्नीचे १९४९ मध्ये निधन झाले व पूर्णपणे पाश्चिमात्य जीवनपद्धती अंगिकारलेल्या देशमुखांना स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानने आपल्याकडेच ओढून घेतले. १९५० मध्ये नेहरूंनी त्यांना अर्थमंत्रीपद दिले व खासदार म्हणून ते रायगड जिल्ह्यातून निवडून आले.

आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण

देशाच्या अर्थव्यवस्थेचा आज पूर्ण बोजवारा उडाला व रिझर्व्ह बँकेचे पूर्ण अधपतन झाले. पंतप्रधान मोदी यांनी ‘नोटाबंदी’ करण्याचा निर्णय घेतला व रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर पटेल हे शेवटपर्यंत अंधारात राहिले. पण ‘नोटाबंदी’ होणार हा निर्णय काही उद्योगपतींना आधीच समजला. चिंतामणराव देशमुखांच्या काळात आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण झाले.
अर्थमंत्री या नात्याने त्यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय. शेवटपर्यंत गुप्त राहिलेला केंद्रीय अर्थखात्याचा हा पहिला व शेवटचा निर्णय असावा. आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण करून विमाधारकांना मोठय़ा प्रमाणावर त्यांनी संरक्षण दिले. बचत केल्याशिवाय विकासकार्याला पैसा मिळणार नाही हे लोकांच्या मनावर बिंबविले आणि एक फार मोठा निधी सरकारी नियंत्रणाखाली आणला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवहाराची उत्तम माहिती असल्याने हिंदुस्थानच्या अर्थखात्याचे त्या संस्थेशी चांगले दळणवळण त्यांनी निर्माण केले. ते अर्थशास्त्रज्ञ नव्हते, परंतु रिझर्व्ह बँकेपासून स्टेट बँकेपर्यंत आज सुरळीतपणे चालताना दिसणाऱ्या या बँक व्यवहाराचे संघटन त्यांनी केले. राजकीय उद्दिष्टांसाठी निर्णय घेण्याची आजची पद्धती तेव्हा नसल्यामुळे पहिल्या कालखंडात देशमुखांना आपल्या विचाराने काम करता आले व नेहरूंनी त्यांना मानाने वागवले. अशा स्थितीत संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. मराठी भाषिकांचे एकसंध राज्य मुंबईसह निर्माण व्हावे म्हणून तो लढा पेटला. पण त्यात देशमुखांच्या राजीनाम्याची समिधा पडल्यावरच तो खऱ्या अर्थाने भडकला.

दिनांक २५ जुलै १९५६ रोजी चिंतामणराव देशमुखांनी जे भाषण लोकसभेत केले ते ‘माझा जीवनप्रवाह’ या त्यांच्या आत्मचरित्रात परिशिष्ट म्हणून छापलेले आहे. ”ज्या प्रांतातील लोकांनी मला निवडून दिले, ज्या मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले त्यांच्या भावनांची कदर करणे आपले कर्तव्य आहे म्हणून मी मंत्रीपद सोडतो,” असे म्हणणारा मंत्री या देशात स्वातंत्र्योत्तर काळात देशमुखांनंतर झाला नाही. त्यांच्या या भाषणाने संसदीय कार्यपद्धतीशी निगडित काही नवे मुद्देही निर्माण झाले. नेहरूंनी महाराष्ट्राबद्दलचा निर्णय कॅबिनेटच्या सल्ल्याने घेतला नाही, या आक्षेपाने कॅबिनेट पद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांच्या निर्णय अधिकारावर त्यांनी टीका केल्यावर पंतप्रधान हा सरकारचा केंद्रबिंदू आहे, त्याने असे निर्णय घेणे अपरिहार्य आहे, असा खुलासा नेहरूंना करावा लागला. नेहरूंना चिंतामणरावांनी केलेला प्रहार बराच झोंबला. मुंबईतील गोळीबारात १०५ हुतात्मे झाले, त्याची चौकशी करण्यास मोरारजी देसाई यांनी नकार दिला हे कारणही त्यांनी राजीनाम्यासाठी दिले होते. ‘अरेरावी व बेसनदशीर पद्धतीने निर्णय घेतले जातात,’ असा स्पष्ट आरोप या निवेदनात देशमुखांनी नेहरू व गृहमंत्री पंतांवर केला. होशियारपूरच्या लाठीहल्ल्याची चौकशी करता व मुंबईतील इतक्या मोठय़ा गोळीबाराची चौकशी होत नाही, याबद्दल कडक निषेध नोंदवून, ”सत्तारूढ पक्षाच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध आकस आहे!” असे देशमुख यांनी लोकसभेत नेहरूंच्या तोंडावर ठणकावून सांगितले. ज्या नेहरूंनी त्यांना देशाचे अर्थमंत्री केले त्याची पर्वा त्यांनी केली नाही व महाराष्ट्राशी इमान राखले. हा अपूर्व त्याग होता. दिल्लीच्या मनात आजही असलेल्या महाराष्ट्राविरुद्धच्या आकसाचा उच्चार करणारे देशमुख हे पहिले व एकमेव मराठी खासदार झाले. आज बेळगावात रोज मराठी माणसांना मारले जाते. पण एकही मंत्री दिल्लीत ‘मराठी’ म्हणून त्याची बाजू घ्यायला तयार नाही. तेथे देशमुखांनी महाराष्ट्रासाठी अर्थमंत्रीपदावर गंगोदक सोडले. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. यात १०५ हुतात्म्यांचे बलिदान जसे महत्त्वाचे तितकाच देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर फेकलेला राजीनामा महत्त्वाचा ठरला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ देशमुखांच्या राजीनाम्याने शिगेला पोहोचली. पण ज्यांनी हा अपूर्व त्याग केला त्या देशमुखांना महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर कधी बोलावले गेले नाही, सन्मानित केले गेले नाही. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल आस्था दाखवली नाही व त्यांचा उल्लेख केला नाही. केवढी ही कृतघ्नता!

शौर्य पचेल काय?

सध्याच्या काही मतलबी सामाजिक नेत्यांना चिंतामणरावांचे मोठेपण आणि शौर्य कदाचित मान्य होणार नाही, पण त्यांचे काळीज वाघाचे होते. त्यांचे शौर्य हे महान योध्याच्या तोडीचे होते. देशमुखांसारख्या लढवय्यांना जातीच्या तागडीत तोलता येणार नाही. पण ते बाजीप्रभू देशपांड्यांच्या जातीचे होते व शिवभक्त होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान हीच त्यांची जात होती. ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असे सांगणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे अर्थमंत्री झाले. पण तुम्ही महाराष्ट्रावर अन्याय करता असे नेहरूंना सांगून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे चिंतामणराव राजकारणातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून फेकले गेले. दुर्दैव असे की, महाराष्ट्राची शकले पाडण्याचे स्वप्न जे पाहतात त्यांच्या हातात आज महाराष्ट्राची सत्ता आहे पण देशमुखांच्या नावाने कुठे चिरा, पणतीही लावलेली दिसत नाही. ठाण्यात महानगरपालिकेतर्फे चिंतामणराव देशमुख आय.ए.एस. अकादमी शिवसेनेने उभी केली. पण देशमुखांचे कर्तृत्व त्यापेक्षा मोठे आहे. १०५ हुतात्म्यांच्या तोडीचाच त्यांचा त्याग व बलिदान आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी चार गोष्टी त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी कराव्यात –
१) हुतात्मा स्मारकाच्या आवारात व नागपूर, मुंबईच्या विधानसभा प्रांगणात चिंतामणराव देशमुखांचा पुतळा उभा करावा.
२) शालेय पुस्तकांत चिंतामणराव देशमुखांवर धडा असावा.
३) दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या दालनात चिंतामणराव देशमुखांच्या जीवनाची गाथा सांगणारे स्मारक असावे.
४) महाराष्ट्र भूषण पुरस्कारास चिंतामणराव देशमुखांचे नाव द्यावे.
चिंतामणरावांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची मुहूर्तमेढ दिल्लीत रोवली. त्याचे थडगे नंतरच्या राजकारण्यांनी बांधले. रोहय़ाच्या ‘नाते’ गावात जन्मलेल्या देशमुखांची कर्तबगारी मोठी. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिल्लीचे सिंहासन सोडले. पण ज्यांच्यासाठी त्यांनी हा त्याग केला त्या महाराष्ट्राने त्यांचे नावच टाकले. रोहय़ाच्या कुंडलिनी नदीच्या पुलाखालून गेल्या साठ वर्षांत बरेच पाणी वाहून गेले. याच नदीच्या तीरावर महाराष्ट्राचा खरा रामशास्त्री जन्मास आला होता. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर म्हणून दोन रुपयांच्या नोटेवर प्रथम सही आली. ती नोट घेऊन देशमुख ‘नाते’ गावी आईला दाखवायला आले, अशी माहिती रोह्याचे पत्रकार अप्पा देसाई यांनी दिली. शेवटी मातीची आणि आईची ओढ कुणाला नसते, चिंतामणराव देशमुखांनाही ती असणारच. पण ज्या महाराष्ट्राच्या मातीशी इमान त्यांनी राखले त्याच मातीपासून ते दूर गेले. त्यांनी दिल्ली सोडली. महाराष्ट्र सोडला. आंध्रातील हैदराबादेत ते कायमचे विसावले. महाराष्ट्रासाठी जो मोहरा पडला त्याला चिरविश्रांतीही महाराष्ट्राच्या भूमीत मिळाली नाही. महाराष्ट्रात नेत्यांची आणि समाजसुधारक साधूसंतांची लाख स्मारके होतील, पण चिंतामणराव देशमुखांचे स्मारक उभारले नाही तर त्या सर्व स्मारकांचे मोल राहणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या