रोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय?

rokhthokबलात्काराच्या घटनांनी देश हादरला आहे. प्रकरण फक्त उन्नाव आणि कठुआ बलात्कारांचे नाही. देशभरातच अबलांच्या आरोळ्या आणि किंकाळ्यांनी मन बधिर झाले. श्री. मोदी हे अवतारी पुरुष आहेत असे भासवले गेले, पण त्यांचेही पाय मातीचेच निघाले!

गेल्या काही दिवसांपासून आपला देश बलात्कारमय झाला आहे. बलात्काराने मोदी यांच्या ‘बुलेट ट्रेन’लाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान मोदी यांची बलात्कारासंदर्भात परस्परविरोधी विधाने पाहिली की धक्का बसतो.

बलात्काराचे राजकारण करू नका – मोदी
मु.पो. लंडन (१८-४-२०१८)

मतदान करताना निर्भयाला विसरू नका
– मोदी (२०१३)
मु.पो. हिंदुस्थान

सत्ता, पैसा व जुगार माणसाला या बोटावरील थुंकी त्या बोटावर करायला लावतो ती अशी. दारू चवचाल बनवते. सत्ता निर्दय आणि बेबंद बनवते व कालचा बलात्कार स्वतःच्या राजवटीत ‘किरकोळ’ वाटायला लागतो.

श्री. नरेंद्र मोदी यांनी आता असे जाहीर केले आहे की, “अन्यायपीडित मुलींना न्याय मिळेल!” काँग्रेस राजवटीत महिला सुरक्षित नव्हत्या, महिलांवर बलात्कार व खून होत असत. त्याविरोधात वातावरण तयार झाले. त्यातून सत्तापरिवर्तन झाले, पण महिलांवरील अत्याचार व बलात्काराची प्रकरणे थांबली नाहीत. सरकारे बदलली, पण महिलांच्या असहाय किंकाळय़ा व आक्रोश तसाच आहे. बलात्कार करून रस्त्यावर फेकलेल्या अल्पवयीन मुलींची कलेवरे देशाच्या इज्जतीच्या चिंधडय़ा उडवीत आहेत. राजशकट अपयशी ठरताना दिसत आहे काय? यावर दिल्लीतील एका नेत्याने दिलेले उत्तर ‘मार्मिक’ आहे. ते म्हणाले, “शर्यतीत एकदम सुरुवातीलाच जोराने धावणाऱ्यास लवकर दम लागतो व शर्यत अजून बरीच लांब पल्ल्याची आहे असे त्याच्या लक्षात येते. तसे सध्याच्या भाजप राज्यकर्त्यांचे झाले आहे. बंदुकीचा बार उडण्यापूर्वीच ते धावत सुटले. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे.”

आसाराम बापू व इतर
आसाराम बापू हे बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. एका अल्पवयीन मुलीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला व ते लगेच पकडले गेले. उत्तर प्रदेशातील ‘उन्नाव’ येथे भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर बलात्काराचा आरोप झाला. बलात्कारपीडित मुलीचा बाप कैफियत घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्या बापालाच निर्घृण मारहाण झाली व त्यात तो मरण पावला. देशभरात वादळ उठल्यावर बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदारास अटक झाली, पण त्याआधी आमदाराच्या बाजूने भाजपातील अनेक स्थानिक नेते उभे राहिले. जम्मू-कश्मीरमधील ‘कठुआ’ तही अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या झाली. या बलात्कारास हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न झाला व पाकिस्तानलाही या प्रकरणात घुसविण्याचा नीच प्रकार झाला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा हिंदू किंवा मुसलमान नसतो, तो नराधमच असतो. कायदे कितीही कठोर केले तरी असे नराधम समाजात निर्माण होत असतात.

राजकारण
जम्मू-कश्मीरमधील ‘कठुआ’ येथे ज्या मुलीवर बलात्कार व खून झाला तिचे नाव असिफा आहे. असिफाच्या मृत्यूनंतर तिच्या समर्थनाच्या करुण किंकाळ्या घुमू लागल्या हे योग्यच आहे, पण त्यामागचे राजकारण कश्मीर खोऱयातील पाक समर्थकांना बळ देणारे आहे. “असिफावर बलात्कार मंदिरात झाला व बलात्कार झाला तेव्हा देव कुठे होता?” असे प्रश्न विचारले जात आहेत. या जगाचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेत असतो अशी एक श्रद्धा आहे. खुद्द भगवंतांनीच आपल्या गीतेमध्ये आम्हाला हे आश्वासन देऊन ठेवलेले आहे. हे खरे असेल तर या जगाचे वाटोळे करण्यासाठी प्रत्येक युगात कलिपुरुषही उत्पन्न होत असले पाहिजेत असे मानण्यावाचून गत्यंतर उरत नाही. सध्याचे पंतप्रधान मोदी हे अवतारी पुरुष आहेत व त्यांच्यात देवत्वाचा अंश असल्याचे ज्यांना वाटते त्यांनी देशात घडणाऱया घटनांची जबाबदारी देवावरच टाकायला हवी. जगात वारंवार थैमान घालणाऱया दुष्ट दानवांना जमीनदोस्त करण्यासाठीच परमेश्वराला वरचेवर नवा अवतार घ्यावा लागत असला पाहिजे. महाभारतात कौरवांनी या भूमीवर पापांचे डोंगर रचून ठेवले म्हणून त्यांच्या पापांचे निर्दालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला आमच्या या देशात अवतार घ्यावा लागला. इतिहासाची एकसारखी पुनरावृत्ती होत असते असे नेहमीच सांगितले जाते. म्हणून असिफाची करुण किंकाळी असा प्रश्न विचारीत आहे की, “इतिहासाची ही पुनरावृत्ती सध्या आजारी पडली आहे की काय? इतिहासातील व महाभारत, पुराणातील सर्व वाईट, भ्रष्ट गोष्टी तेवढय़ा पुनः पुन्हा घडून आलेल्या दिसतात आणि मंगलमय असे काहीच घडताना दिसत नाही.”

जागतिक समस्या
श्री. मोदी हे अवतारी पुरुष आहेत व ते सर्व काही घडवून आणू शकतात असे त्यांच्या भक्तांना वाटते, पण ते परदेशातील काळा पैसा हिंदुस्थानात परत आणू शकले नाहीत. राष्ट्राची तिजोरी लुटून पळून जाणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना ते रोखू शकले नाहीत. काँग्रेस काळातील निर्भयाची करुण किंकाळी अद्यापि विरली नाही तोच उन्नाव, कठुआ, कोठेवाडी व सुरतमधील निर्भयांच्या करुण किंकाळय़ांनी कानाचे पडदे फाटले आहेत व देवाचे अवतार हरवून गेले आहेत. देवांचे भक्त सांगतात, बलात्कार ही जागतिक समस्या आहे. त्यात हिंदुस्थानचा ९४ वा क्रमांक लागतो, अमेरिकेचा अकरावा. दक्षिण आफ्रिकेत सगळय़ात जास्त बलात्कार होतात, पण म्हणून असिफाच्या करुण किंकाळीकडे सनईवादन म्हणून पाहावे काय?

असिफा बलात्कार प्रकरणाची आता दुसरी बाजू समोर आली आहे. तिच्या बलात्कार प्रकरणात हिंदू तरुणांना नाहक गुंतवले गेले व त्यानिमित्ताने हिंदूंना बदनाम केले जात असल्याचे सांगण्यात आले. शेवटी सत्य काय ते ती बिचारी असिफाच जाणो. बलात्कार हा बलात्कार असतो. काँग्रेस राजवटीतला बलात्कार वेगळा व आजच्या राजवटीतील बलात्कार वेगळा असे घडू नये. स्त्रीची विटंबना ही मातृभूमीची विटंबना ठरू दे. मातृभूमीची विटंबना इतकी वर्षे १०० कोटी मुले डोळे उघडे ठेवून पाहात आहेत. निर्भया ते असिफा यांच्या किंकाळय़ा जगात पोहोचल्या, पण त्या दोघींची मातृभूमी मात्र बधिरच झालेली आहे!

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – rautsanjay61@gmail.com