रोखठोक : कर्नाटक निकालानंतरचा धुरळा!

54
yediyurappa1

rokhthokकाँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे संपूर्ण बहुमत असतानाही कर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपास सत्ता स्थापनेसाठी बोलावले. ११६ विरुद्ध १०४ च्या लढाईत १०४ वाले राजभवनाच्या मदतीने जिंकले. गेली ६०-७० वर्षे लोकशाहीच्या नावाखाली आपल्या देशात हेच घडत आहे. लोकशाहीची हत्या झाली असे मानायला मी तयार नाही. लोकशाही केव्हाच मृत झाली आहे.

लोकशाही व घटना या शब्दांचे धिंडवडे आपल्या देशात जितके निघत असतील तेवढे इतरत्र निघत नसतील. हे सर्व पाहून हिटलरची हुकूमशाही परवडली असे एक दिवस जनतेला वाटू लागेल. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत कर्नाटकच्या विधानसभेत बहुमताचा फैसला लागलेला असेल व त्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला. १०४ जागा जिंकलेल्या भाजपच्या येडियुरप्पा यांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली व ‘बोनस’ म्हणून बहुमत सिद्ध करण्यासाठी सरळ पंधरा दिवस दिले. त्यामुळे आम्ही चोवीस तासांत बहुमत सिद्ध करतो, ११६ चे बहुमत दाखवतो असे पुराव्यानिशी सांगणारे काँग्रेस व जेडीएस मागे पडले. श्री. राहुल गांधी हे कधी कधी बरे बोलतात. जे पाकिस्तानात घडते ते आपल्या देशात घडू लागले आहे असे ते म्हणाले. पाकिस्तानात दहशतवाद आणि लष्करशाहीतून आलेली अराजकशाही सुरू आहे. आपल्या देशातही सध्या अशीच कुठलीतरी ‘शाही’ दिसून येत आहे.

भाजपास कानडी जनतेने १०४ जागांवर थांबवले, पण या १०४ चे १२४ कसे करावेत हे भाजपातील ‘व्यापारी’ मंडळास चांगलेच माहीत असावे. या कामात तरी भाजपने काँग्रेसवर मात केली. भविष्यात काँग्रेसचे किमान दहा आमदार ते विकत घेतील व देवेगौडांचा पक्ष त्यांच्या पुत्रांसह फोडतील. एकदा घोडेबाजार सुरू केला की, माणसांची माकडे होतात व नावाजलेले घोडेही गाढवांच्या बाजारात विक्रीसाठी उभे राहतात. देशाचे राजकारण आता अशा खालच्या पातळीवर घसरले. कोण कोणाचे आमदार पळवतोय यातच सगळे अडकले आहे. निवडणुका ही लोकशाही नसून त्यानंतरचा घोडेबाजार हेच लोकशाहीचे खरे दर्शन आहे. कर्नाटकात निकालानंतर अशा लोकशाहीचा खेळ सुरू झाला आहे.

काँग्रेस उलथवली!
कर्नाटकातून काँग्रेसची राजवट जनतेने उलथवून टाकली आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या व हा आकडा शंभरावर गेला, पण ११३ हा बहुमताचा आकडा त्यांना पार करता आला नाही. कर्नाटक भाजपने प्रथमच जिंकले नाही. श्री. नरेंद्र मोदी व श्री. अमित शहा हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते तेव्हाही येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात भाजपने राज्य आणले होते व दक्षिणेकडचे जिंकलेले पहिले राज्य म्हणून कर्नाटकचा गौरव झाला होता. त्यामुळे आताच मोदी लाटेमुळे भाजपचा विजय झाला असे मानायला मी तयार नाही. पंतप्रधानपदी असलेले मोदी हे विधानसभा निवडणुकांसाठी एका राज्यात २५-२६ सभा घेतात व अत्यंत खालच्या स्तरावरील भाषेत विरोधकांचा उद्धार करतात हेच योग्य नाही. मोदी हे प्रत्येक सभेत करतात. इतिहासाचे चुकीचे दाखले देतात व हे दाखले खासकरून नेहरू-गांधी परिवाराविषयी असतात. भगतसिंग व नेहरू यांच्याबाबत मोदी यांनी एक विधान केले ते चुकीचे होते, पण काँग्रेस पक्षात दणकून बोलणाऱ्यांची वानवा असल्याने भाजपकडून उडवलेला धुरळा व धुकं त्यांना दूर करता येत नाही.

सिद्धरामय्यांचा अहंकार
कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळेल असे दावे कुणीच केले नाहीत, पण काँग्रेस भाजपपेक्षा दोन-चार जागांनी पुढे राहील असे वातावरण सर्वत्र होते व ते खरे होते. श्री. राहुल गांधी यांनी मेहनत घेतली, पण निवडणुकीची सर्व सूत्रे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडेच होती व हे महाशय अति आत्मविश्वासाचे ‘धनी’ ठरले. त्यांनी टाकलेले धार्मिक फासे उलटे पडले. कर्नाटकातील जनमानस त्यांना समजले नाही व मुख्यमंत्री असूनही चामुंडेश्वरी मतदारसंघात ते मोठ्या फरकाने पराभूत झाले.

१) निवडणुकीच्या आधी सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाला ‘धर्मा’चा दर्जा देण्याचे जे राजकारण केले ते त्यांच्यावर उलटले. लिंगायत समाज हा सतत हिंदुत्ववादी पक्षाबरोबर राहिला. धर्माचा दर्जा दिल्याने लिंगायत समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळतील ही त्यांची खेळी कोसळली. लिंगायत समाजाचे अनेक नेते मला म्हणाले, या घोषणेचा काहीएक परिणाम होणार नाही. निवडणूक निकालात ते दिसून आले. जेथे लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे अशा ८० टक्के मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले. उलट सिद्धरामय्यांच्या ‘लिंगायत कार्ड’मुळे कुंपणावरची हिंदू मते सरळ भाजपकडे वळली. हे काँग्रेस नेत्यांचेही मत आहे.

२) राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱयाच्या वेळी सिद्धरामय्या व राहुल गांधी एका मठात गेले. त्यानंतर भाजपवाल्यांनी आरोप केले की, सिद्धरामय्या हे चिकन खाऊन मठात आले होते! यावर सिद्धरामय्या यांनी संयमाने उत्तर द्यायला हवे होते. तसे झाले नाही. ‘नुसते चिकन नाही, तर मी मटणही खाऊन आलोय,’ असे उर्मट उत्तर देऊन सिद्धरामय्या यांनी घाण केली व काठावर मिळू शकणारे बहुमत गमावून बसले. या सर्व वक्तव्यांचा प्रचार भाजपने जोरात केला. हे काँग्रेसला समजले नाही.

गुजरातच्या तुलनेत कर्नाटकातील काँग्रेसचा प्रचार विस्कळीत व ढिलाईचा होता हे मान्य करायला हवे. कर्नाटकात मंदिर व मठांचे राजकारण चालते व मठांतून आदेश दिले जातात. याआधी अनेकदा मठांचे आदेश काँग्रेसच्या बाजूने होत असत. केरळ, गोवा किंवा ईशान्येकडील राज्यात ‘चर्च’मधून राजकारण चालते असे ज्यांना वाटते त्यांनी गोवा व कर्नाटक राज्यातील मठातून चालणाऱया राजकारणाचा अभ्यास करायला हवा. सिद्धरामय्या या राजकारणात कमी पडले. त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला. शिवाय काँग्रेस पक्षातच असे मोठे नेते होते की त्यांना सिद्धरामय्यांचा पराभव व्हावा असे वाटत होते.

काळा पैसा
कर्नाटकात राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी बोलावले. राज्यपालांनी तसे केले नसते तर त्यांची नोकरी गेली असती. राज्यपाल काँग्रेस सरकारने नेमलेले असते तरी त्यांनी वेगळा निर्णय घेतला नसता. लोकशाही व घटनात्मक पदांचे अवमूल्यन आपल्या देशात वेगात सुरू आहे. कर्नाटकातील ‘येडियुरप्पा’ प्रकरणात लोकशाहीची हत्या झाली असे म्हणता येणार नाही. मुळात हत्या होण्यासाठी लोकशाही उरली आहे काय, हाच खरा प्रश्न आहे. इतिहासाचे व घटनात्मक पदांचे विडंबन सुरू आहे. कर्तबगार व स्वतःचे डोके चालवून काम करणाऱया व्यक्तींचे आव्हान उभे राहील म्हणून महत्त्वाच्या पदांवर मूक-बधिर बनलेली कळसूत्री बाहुली बसवण्याचे काम इंदिरा गांधींपासून सुरू झाले ते आजही थांबलेले नाही. भारतीय राजकारणाने भावनात्मक विषयांतच पाऊणशे वर्षे गमावली. तसे नसते तर सिद्धरामय्या यांनी मंदिरात जाण्याआधी चिकन खाल्ले की मटन खाल्ले हा प्रचाराचा मुद्दा झाला नसता, पण मंदिर भ्रष्ट झाल्याचा मुद्दा करणाऱयांनी गेल्या ३० वर्षांत श्रीरामाचे मंदिर उभारले नाही. ‘वर्ल्ड ऑफ यस्टरडे’ हा हिटलरशाहीविरुद्धचा ग्रंथ स्टिफन झ्वईगने लिहिला. लेखकाने त्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो, ‘‘सर्व नष्ट झाले तरी चालेल, परंतु माणसाचे व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचार नष्ट होता कामा नये.’’ तो आज नष्ट होत आहे. ज्या पक्षातून आमदार व खासदार निवडून येतात ते शपथ घेण्याआधीच शंभर शंभर कोटी रुपयांना कर्नाटकात सहज विकले गेले. हा सर्व भ्रष्टाचाराचा पैसा. या आमदारांना निवडणुका लढवण्यापासून कायमचे बाद केले पाहिजे.

काळय़ा पैशांविरुद्ध लढाईचा खणखणाट करीत ज्यांचे राज्य आले त्यांचे राजकारण काळय़ा पैशांवरच सुरू आहे. हे कर्नाटकात दिसले. उद्या पालघरमध्येही दिसेल!

कर्नाटक निकालाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होतील काय? मला असे अजिबात वाटत नाही. २०१९ वर त्याचा काहीएक परिणाम होणार नाही. उत्तर प्रदेशात मायावती व समाजवादी पार्टी एकत्र आले, तसे भविष्यात कर्नाटकात होऊ शकेल. काँग्रेस व देवेगौडा यांच्या पक्षाची लोकसभा युती आता अटळ दिसते. भाजपच्या दृष्टीने त्यांनी २१ वे राज्य जिंकले. सिकंदर, अॅलेक्झांडर, नेपोलियन यांनीही जग पादाक्रांत केलेच होते, पण त्यांना राज्याची घडी बसवता आली नाही. छत्रपती शिवाजी महाराज मोठे का? दिल्लीचे एक श्रेष्ठ नेते मला एकदा म्हणाले, ‘शिवाजीराजांचे मोठेपण हे त्यांनी केलेल्या कारभारात आहे.’ आज नेते मोठे, पण कारभार शून्य आहे.

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या