रोखठोक – काँग्रेसला सक्रिय कोणी करायचे? 23 ज्येष्ठांचे पत्रलेखन

rokhthokकाँग्रेसमधील 23 ज्येष्ठांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राने फक्त धुरळा उडाला इतकेच झाले. राजकारणात असे पत्रव्यवहार नेहमीच होत असतात. काँग्रेसला सक्रिय, पूर्णवेळ अध्यक्ष नेमा ही ज्येष्ठांची मागणी योग्यच आहे, पण अध्यक्ष करायचे कोणाला? सक्रिय होण्यास कोणी कोणास थांबवले आहे? राहुल गांधींना रोखायचे ही सक्रियता मात्र काँग्रेसचे अस्तित्वच नष्ट करणारी ठरेल! 

देशाच्या राजकारणात सध्या फार काही घडत नाही. तरीही राजकीयदृष्ट्या क्षीण झालेल्या काँग्रेसमध्ये एक वादळ आले आणि गेले. अशा अनेक वादळांतून आणि पडझडीतून काँग्रेस पुन्हा उभी राहिली. आज राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची स्थिती अशी आहे की, वादळ आले तर पडझड होईल इतकीही काँग्रेस कुठे दिसत नाही. काँग्रेस पक्षातील 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या नाजूक अवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. काँग्रेस पक्षाविषयी अस्थिरता, शंका यांना पूर्णविराम देण्यासाठी पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय नेतृत्व मिळावे, अशी मागणी या 23 नेत्यांनी केली. गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण,  मनीष तिवारी असे हे सर्व नेते. यापैकी अनेकांना मोठा जनाधार नाही. पण काँग्रेस पक्षात व सत्तेत त्यांनी अनेक वर्षे मोठी पदे भोगली आहेत. आज देश पातळीवर विचार केला तर अनेक राज्यांत काँग्रेस संपलीच आहे. काँग्रेसचा जनाधार रसातळाला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ताकदीने उभे राहील असे नेतृत्व काँग्रेस पक्षात दूरदूरपर्यंत दिसत नाही. स्वतः राहुल गांधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची धुळधाण उडाली व सलग दोन निवडणुकांत लोकसभा विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकाही खासदारांचा आकडा काँग्रेस गाठू शकली नाही. 2019 च्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.

नेत्यांचे काय चुकले?

काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी करण्यात चुकीचे काय, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण ही मागणी सहज नव्हती व त्यामागे भाजप पुरस्कृत राजकारण होते, असा आरोप काँग्रेस कार्यकारिणीतच करण्यात आला. राहुल गांधी यांनी कुणाचेही व्यक्तिगत नाव बैठकीत घेतले नाही. पण त्यांनी तळमळीने मुद्दे मांडले. सोनिया गांधी आजारी असताना, इस्पितळात असतानाच नेतृत्वाबाबत पत्र लिहायची घाई नेत्यांनी का करावी, हा त्यांचा सवाल आहे. यावर एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचे म्हणणे असे की, ज्यांनी पत्रावर सहय़ा केल्या त्यापैकी बहुतेकांनी सोनियांबरोबर काम केले आहे व त्यांच्या कामाची पद्धत त्यांना माहिती आहे. सोनिया गांधी इस्पितळात असताना फक्त पत्र पाठवूनच हे ‘23’ जण थांबले नाहीत, तर त्यानंतर आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली अशी विचारणा करणारी दोन ‘रिमाइंडर्स’ म्हणजे स्मरणपत्रे पाठवली. हे जरा अतिच झाले. या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. पंतप्रधान मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करीत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार नियमबाहय़ पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते  करीत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका, राहुल यांनी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व ‘मार्गदर्शक’ मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे आहे.

विचार चांगला

गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी यावी हा विचार चांगला आहे. पण त्या लायकीची आणि ताकदीची व्यक्ती काँग्रेस पक्षात आज उरली आहे? ज्या 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यातील एकही नेता काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकेल अशा कुवतीचा नाही. अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार होतील काय? याचे उत्तर ‘अजिबात नाही’ असेच आहे. प्रत्येकाला स्वतःची खुर्ची हवी आहे. पक्षासाठी त्याग करायला कोणीच तयार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक सर्व काँग्रेस अध्यक्ष हे ‘नेहरू परिवारा’बाहेरचेच होते. जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठेच होते. त्या योगदानामुळेच नेहरू पिता-पुत्रांना तेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवता आले. स्वातंत्र्यानंतरही नेहरू परिवाराबाहेरचेच लोक अध्यक्षपदी होते. कामराज हे अध्यक्ष असताना सर्वप्रथम काँग्रेस फुटली व पुढे आणीबाणीनंतर इंदिरा गांधी फुटून बाहेर पडल्या. तीच इंदिरा काँग्रेस आज आहे. या काँग्रेससाठी गांधी परिवाराने रक्ताचे सिंचन केलेच आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव हे पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्षही झाले. सीताराम केसरी हेसुद्धा गांधी परिवाराबाहेरचेच अध्यक्ष होते. संघटना त्यांच्या काळात रसातळाला गेली. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यावर पुन्हा काँग्रेसने उभारी घेतली. मनमोहन सिंग यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले ते त्यामुळेच. परदेशी सोनिया गांधींना काय कळते? त्या काय करू शकतील? असे प्रश्न तेव्हा सगळय़ांनाच पडले होते. ते सर्व प्रश्न नंतर निकाली निघाले.

दिशाहीन का?

काँग्रेस पक्ष आज दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाला. त्यास जबाबदार कोणी असले तरी ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर केलेली मात हेच त्यामागचे खरे कारण आहे. देशातील बहुसंख्य समाजाच्या भावना सतत डावलून, अल्पसंख्याक म्हणून फक्त मुसलमानांचेच लांगूलचालन  करणे हे धोरण काँग्रेसच्या मुळावर आले. पुन्हा उत्तरेतील मुसलमान आणि दलितही काँग्रेसकडे राहिले नाहीत. ते मुलायमसिंग यादव आणि मायावतांच्या मागेमागे गेले. हैदराबादचे ‘ओवेसी’ हेसुद्धा मुसलमानांची मते खेचत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांना दलितांचे मतदान मोठ्या प्रमाणात होत असते. एकेकाळी दलित, मुस्लिमांची एकगठ्ठा 22 टक्के मते काँग्रेसला पडत होती. काँग्रेस उमेदवारांची मते मोजणे 22  टक्क्यांपासून सुरू होत असे. तो काळ आता निघून गेला. भाजप, मुलायम, मायावती, शिवसेना यांनी जशी स्वतःची व्होट बँक निर्माण केली आहे तशी ती आज काँग्रेसकडे राहिलेली नाही व फक्त नरेंद्र मोदी, संघ परिवार यावर हल्ले करूनही मतांचा टक्का वाढणार नाही. राजकारणातून धर्मनिरपेक्षतेचे त्रांगडे संपले आहे व भाजप-शिवसेनेसारख्या पक्षांना मुसलमान मतदान करत आहेत हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांना आज सगळय़ाच जातीधर्मांचे मतदान होते. महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी आहे याची खदखद काही काँग्रेसजनांच्या मनात आहे. शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसच्या ‘आयडॉलॉजी’चे काय, असा प्रश्न जे आजही उपस्थित करतात त्यांना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही व नवे नेतृत्व निर्माण होऊ द्यायचे नाही. काँग्रेस पक्ष आजही संपूर्ण देशाला माहीत असलेला व प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला पक्ष आहे. ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, शरद पवार, नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव हे सर्व मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसवाले आहेत व त्या त्या राज्यांतील काँग्रेसचाच जनाधार त्यांनी लुटला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ काँग्रेसचेच अपत्य आहे. राज्याराज्यांत काँग्रेस आहे, फक्त मूळ चेहऱ्य़ावरचे मुखवटे बदलले आहेत. या सगळय़ांनी मुखवटे काढून फेकले तरी देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष म्हणून उभारी घेईल. तरुण वर्गाला आज काँग्रेसचे आकर्षण का वाटत नाही याचे मंथन सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्य़ा 23 नेत्यांनी करायलाच हवे. काँग्रेस पक्ष ही कधीही न मरणारी म्हातारी आहे, असे वर्णन एकदा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केले होते. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनीच ठरवायला हवे!

@rautsanjay61

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या