रोखठोक – अंधश्रद्धा, बुवा, महाराज! देश पुन्हा गुलाम होईल!

हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला. कारण विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धा, भोंदुगिरी, जादुटोणा यामागे जनता लागली. भाजपने ’सावरकर गौरव यात्रा’ काढली. सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल.

हिंदुस्थान गुलाम का झाला? यावर आतापर्यंत अनेक चर्चा घडल्या असतील, पण हिंदुस्थानने गुलामी का पत्करली याचे उत्तर देशातील आजच्या भाजप राजवटीत आहे. विज्ञानाची, आधुनिकतेची कास सोडून देशाला भोंदू बाबागिरीच्या मार्गाने नेणे हाच गुलामीचा मार्ग आहे. देशी लोकांत कमालीची वाढलेली अंधश्रद्धा, धर्मांधता, बुवागिरी यामुळे जनतेला गुलाम करून देश ताब्यात घेणे इंग्रजांना शक्य झाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष देश ताब्यात ठेवण्यासाठी तोच ब्रिटिश मार्ग अंगीकारत आहे. लोकांना बुवा, महाराज, अंगारे-धुपारे, मंदिर, मशीद, कथा वाचक, धर्म मेळे यांत गुंग ठेवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करायचे व त्याच ‘धुंद’ वातावरणात निवडणुका जिंकायच्या. जाती व धर्मात भांडणे लावण्याचे काम इंग्रजांनी केले. लोकांना भांडत ठेवले व इंग्रज देश लुटत राहिले. आता वेगळे काय सुरू आहे? आसामच्या भाजप आमदार रूपज्योती कुर्मी यांनी आता एक मागणी लावून धरली. “ताजमहाल आणि कुतुबमिनार तोडा व तेथे मंदिर बनवा. मी त्याकामी एक वर्षाचा पगार देते!” आता ताजमहाल, कुतुबमिनार तोडण्यासाठी एखादी चळवळ उभी करून वातावरण तापवले जाईल. मूर्ख आणि बिनडोक लोक त्या चळवळीत सामील होतील, त्यावरून दंगली घडवल्या जातील. राजकारणी मजा पाहतील. ताजमहाल, कुतुबमिनार तोडा व मंदिर बांधा असे सांगणारे अरुणाचलमधील स्थितीवर गप्प आहेत. लडाख व अरुणाचल प्रदेशात चीन पूर्ण घुसले आहे. अरुणाचल प्रदेशातील 11 मोठ्या गावांवर चीनने पुन्हा दावा सांगितला व गावांची नावे बदलून ती चिनी भाषेत केली. त्या 11 गावांत घुसून भाजपने एखादे मंदिर बांधावे, अशी मागणी या भोंदू धर्मवीरांनी का करू नये?

अद्भुत सावरकर

वीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक होते. ते हिंदुत्ववादी होते, पण हिंदुत्वाच्या नावाखालची बुवाबाजी त्यांना मान्य नव्हती. त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता. त्यांना शस्त्रांचे सामर्थ्य मान्य होते. चीनपुढे नमते घेणारे लोक आज महाराष्ट्रात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढतात हे अजब आहे. सावरकर गौरव यात्रा काढणे ही एकप्रकारे भोंदुगिरीच आहे. नरहर कुरुंदकर सावरकरांविषयी म्हणतात, ”सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते. एकाही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता. माणूस म्हातारपणी धार्मिक होतो असे म्हणतात, पण सावरकरांच्या बाबतीत हे घडले नाही. जेव्हा स्वयंचलित साधने नव्हती, तेव्हा प्रेते खांद्यावरून वाहावी लागत आणि लाकडे रचून जाळावी लागत. आज मोटारी आहेत, विजेची दहनभूमी आहे. मग जुन्या कालबाह्य परंपरा कशाला, असे त्यांना वाटे. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे विजेच्या पेटीत त्यांचे दहन करण्यात आले. या विश्वाच्या अफाट पसाऱयात एक क्षुद्र सूर्यमाला आणि त्या सूर्यमालेत एक अतिक्षुद्र पृथ्वी. तिच्या अडीच अब्ज वर्षांच्या प्रदीर्घ कालाचा एक क्षुल्लक थेंब म्हणजे दहा हजार वर्षांची मानवी संस्कृती. विश्वाचा देव कुणी असेल वा नसेल, पण जरी तो असला तरी या क्षुद्र पृथ्वीवरील तुच्छ प्राण्यांच्या कल्याणाने तो सचिंत आहे असे मानणे म्हणजे सडकेवरच्या भिकार चोराने सम्राट माझा नातेवाईक आहे असे मानण्याइतके हास्यास्पद आहे असे त्यांना वाटे. या वाटण्यात स्वार्थी लोचटपणा असला तरी सत्य नाही, हे सावरकरांनी पुन: पुन्हा बजावले आहे. माणसाने कल्पिलेला देव काल्पनिक आणि मानवी आहे हे ते ठासून सांगत. गंगाजल कृपाळू आहे याचा अर्थ ते पापे धुऊन टाकते असा न करता ते जमीन सुपीक करते, असा होतो. याच गंगेला पूर आला, बोटी बुडाल्या म्हणजे लाखो गावे व माणसे नामशेष होतात. हे निसर्गाचे ाढाwर्य सावरकरांना माहीत होते. गाय ही माता असलीच तर बैलाची! माणसासाठी तो एक उपयुक्त पशू आहे आणि उपयोगी घोडा व इमानी कुत्रा या रांगेतच गाईला बसवावे लागेल, असे सावरकरांचे म्हणणे असे. ग्रहणाच्या वेळी दान करावे, या पुण्याने राहू-केतूच्या विळख्यातून सूर्य, चंद्र सुटतात व गोमूत्राच्या प्राशनाने माणसाची पापे जातात, हा खुळचटपणा सावरकरांना मान्य नव्हता. सावरकर समजून घ्यावयाचे तर हा कठोर बुद्धिवाद समजून घेतला पाहिजे. नसता सावरकर नुसताच वंदनीय होतो, हे कुणी विसरू नये. सावरकरांनी हिंदुस्थान हिंदूंचा आहे, इतर कुणाच्या बापाचा नाही ही घोषणा केली, इतकेच आपणाला माहीत आहे, पण या घोषणेचा अर्थ काय? सावरकर म्हणतात, ही भूमी ज्यांना पवित्र आणि पितृभूमी वाटते, या राष्ट्रावर ज्यांची श्रद्धा आहे ते सर्व हिंदूच होत. हिंदू होण्यासाठी पुराण मानावे हे सावरकरांनी सांगितले नाही. हिंदू असण्यासाठी मांडी घालून नाक दाबावे का गुडघे मोडून निजावे हे सावरकरांनी सांगितले नाही. हिंदू होण्यासाठी या राष्ट्रावर प्रेम करावे इतकेच सांगून ते थांबले.” हे सावरकर गौरव यात्रावाल्यांना मान्य आहे काय?

सुशिक्षितांची बुवाबाजी

आज देशातील शिकलेसवरलेले लोकही अंधश्रद्धाळू आणि बुवाबाज बनले. हे भाजपच्या ‘भारतीय’ राजकारणाचा अजेंडा आहे. नवे बाबा, कथा वाचक वगैरे उभे करून त्यांच्या नावाने गर्दी जमवायची व आपला अजेंडा पुढे न्यायचा. सावरकरांचा जपजाप करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रेडा बळी, मिरची यज्ञ व इतर विधी सत्ता मिळविण्यासाठी व विरोधकांना गारद करण्यासाठी करतात. त्यामुळे लोकांनी काय बोध घ्यायचा? आता स्वत:च बुवा, महाराज बनून गादीवर बसायचे तेवढेच बाकी आहे. हा एक रोग आहे व त्याच रोगातून बुवा, महाराजांच्या दारात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरबार भरत आहेत व भक्त गाऱहाणी मांडत आहेत. या रांगा आपल्या सत्ताधाऱयांना अस्वस्थ करीत नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य गरजाही पुऱया होत नाहीत. मग ते कोणत्या तरी शक्तीला किंवा अंधश्रद्धेला शरण जातात. त्या शक्तीचा वापर भाजप त्यांच्या राजकारणासाठी करीत आहे व लोक त्यातून गुलाम बनत आहेत. आसाराम बापूंचा भाजपने पुरेपूर वापर करून घेतला. त्यांच्या सत्संगात मोदींपासून सगळय़ांनी वारंवार हजेरी लावली. नाचले व गायले. रामदेव बाबालाही प्रचारात आणले. साधू परिषदांना हवा दिली. आता कुणी एक बागेश्वर बाबांना उभे करून त्यांच्या माध्यमांतून गर्दी गोळा केली जात आहे. हे बागेश्वर बाबा मुंबईत आले व त्यांनी शिर्डीच्या साईबाबांवर वादग्रस्त विधान के}s. साईबाबांना मी भगवान मानत नाही असे ते महाशय म्हणाले. ‘मला देव माना’ असे साईबाबा कधीच म्हणाले नाहीत, पण बागेश्वर बाबा लोकांना भूलथापा देऊन जी देवगिरी करू पाहत आहेत त्यामुळे अज्ञान, अंधश्रद्धेचाच ‘वात’ सुरू झाला. कोटय़वधींची उलाढाल या माध्यमांतून सुरू आहे व हे महाराज आज छुपे प्रचारक असले तरी उद्याचे भाजपचे मुख्य प्रचारक ठरू शकतात. अशा बुवा-महाराजांच्या खांबावर आजचा भाजप उभा आहे व त्यामुळे देशाचा प्रवास विज्ञानातून पुन्हा भूतप्रेत, जादूटोणा व अंधश्रद्धेकडे सुरू झाला आहे. ‘कथा वाचक’ मंडळींना हाताशी धरून लोकांना विज्ञान व आधुनिकतेपासून दूर न्यायचे असे हे डावपेच. इंग्रजांनी त्यांच्या काळात तेच केले. धर्म आणि अंधश्रद्धा हेच सर्वकाही. हे ऐकण्यासाठी हजारो लोक पैसे मोजतात. भाजपने महिना लाख रुपये मानधनावर पाचशे कथा वाचक नेमले आहेत, असे त्यांचेच लोक सांगतात तेव्हा माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटत नाही. कारण गुलामीचे सावट मी त्या योजनेत पाहतो. जया किशोरी या कथा वाचिकेचा सध्या बराच बोलबाला आहे. त्या सांगतात, “मोहमाया सोडून ईश्वराशी नाते जोडा. आपण रिकाम्या हाताने आलो व रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग मोहमाया कशाला?” पण जया किशोरी कथा सांगण्यासाठी 10 लाख रुपये फी आकारतात. या मोहमायेस काय म्हणावे? असे अनेक ‘महाराज’ जे कथा वाचक आहेत ते पाच ते दहा लाख रुपये त्या कथा कार्यक्रमासाठी घेतात. मी त्यांच्या विरोधात नाही व त्यांच्यावर टीका करू इच्छित नाही, पण सत्य हे असे आहे. पूज्य रामचंद्र डोंगरे महाराज हे असे एक कथा वाचक होते, त्यांनी खरोखरच तटस्थपणे कथा वाचक म्हणून कार्य केले. मोहमाया यापासून लांब राहिले. ते भागवताचार्य्य्य होते. प्रवचन, कथा वाचनासाठी ते एक रुपयाही घेत नव्हते. एक तुळशीपत्र मानधन म्हणून घेत व आशीर्वाद देत. ते जेथे भागवत कथा सांगण्यासाठी जात तेथून त्यांना अनेकदा दान-दक्षिणा मिळत असे. ते सर्व दान ते त्याच गावात किंवा शहरात गरीब आणि गरजूंना वाटत असत. कथा वाचन हा समाजकल्याणाचा मार्ग म्हणून ते पाहत. डोंगरे महाराजांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे ‘अंत्यसंस्कार’ व इतर विधींसाठी पैसे नव्हते. मृत पत्नीचे मंगळसूत्र विकून पैसे जमवू असे ते बोलू लागले तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. डोंगरे महाराज हे एक आदर्श कथा वाचक होते. त्यांच्या कथा वाचनात अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड होती. मी पूज्य डोंगरे महाराजांना मानतो, पण आताच्या राजकीय झुंबडवाद्यांना डोंगरे बालामृत पचणार नाही.

संसदेचे चित्र

भारतीय संसदेचे आजचे रूप-रंग आज पालटले आहे. संसदेतून आधुनिक आणि विज्ञान हद्दपार झाले असून तेथे अनेक बाकांवर आता जटाधारी, दाढीवाले बुवा-महाराज हे भगव्या वस्त्रांत बसलेले दिसतात. त्यातले काही महाराज लोक उघडय़ा अंगाने बसतात. हे पाहायला विचित्र वाटते. संसदेची प्रतिष्ठा त्यात कमी होते. नेहरूंचा विज्ञानवाद, वीर सावरकर व डॉ. आंबेडकरांच्या आधुनिक विचारांचा हा पराभव आपल्याच संसदेत झालेला दिसतो. विरोधी बाकांवरून ‘अदानीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा’ अशी मागणी होताच सत्ताधारी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात. जणू काही श्रीरामानेच भ्रष्टाचार व देश बुडवण्याचा मंत्र दिला. हा धर्माचा पराभव आहे, सत्याचा पराभव आहे आणि स्वातंत्र्याचा सगळय़ात मोठा पराभव आहे. लोकहितवादी देशमुखांनी आपल्या जुन्या काळात स्वतंत्र हिंदुस्थानच्या पार्लमेंटचे स्वप्न पाहिले होते. ‘एक दिवस सर्व हिंदुस्थानी हळूहळू शहाणे होऊ लागतील. स्वत:ची कामे स्वत: करू लागतील. मोठी अधिकारपदे त्यांच्या ताब्यात येतील आणि नंतर मग ते इंग्रजांना येथून निघून जा, असे हळूच सांगतील. इंग्रज निघून गेले तर ठीक, नाहीतर अमेरिकेप्रमाणे येथे सिव्हिल वॉर होईल आणि हिंदुस्थान स्वतंत्र होऊन येथे पार्लमेंट येईल. हे घडण्यास दोनशे वर्षे लागतील.’ असे लोकहितवादींनी सांगितले होते. देश स्वतंत्र व्हायचा असेल तर हिंदू धर्मातील दोष दूर करावे लागतील. भोंदुगिरी संपवावी लागेल, असे ते म्हणत. सावरकरही तेच कार्य करीत राहिले. आज देश पुन्हा गुलाम होतोय, कारण विज्ञानाची जागा पुन्हा अंधश्रद्धा व भोंदूबाबा घेत आहेत. देशाला गुलाम होण्यापासून कोणी वाचवायचे?

Twitter – @rautsanjay61

Email – [email protected]