राष्ट्रपतीपद, राजकारण आणि संघाचा ‘अजेंडा’ – आता माघार नको!

110

सरसंघचालक देशाचे राष्ट्रपती होतील काय? यावर अजून चर्चा सुरू आहे. सरसंघचालकांचे नाव या पदासाठी घेताच काँग्रेससह इतर बेगडी धर्मनिरपेक्ष नाराज होतील असे वाटले, पण थोडे उलटेच घडले. भाजप व संघ परिवाराचेच लोक नाराज झाले. सरसंघचालकांना राजकारणात का ओढता, हा त्यांचा सवाल. त्या सगळ्यांसाठी हे विवेचन!

श्री.मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवताच काँग्रेस व इतर बेगडी धर्मनिरपेक्ष नाराज होतील असे वाटले होते. प्रत्यक्षात उलटेच घडले आहे. सरसंघचालकांचे नाव रिंगणात आणल्याबद्दल भारतीय जनता पक्ष व संघपरिवाराचेच लोक नाराज झाले. जनता पक्षाच्या विजयानंतर एस. एम. जोशी यांना राष्ट्रपतीपदासाठी विचारणा करण्यात आली होतीच; पण एस. एम. जोशी यांनी त्यास नम्रपणे नकार दिला. जनता पक्षाचे सरकार आले ते जयप्रकाश नारायण यांच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याच्या घोषणेने. जनता सरकारचे पंतप्रधानपद जयप्रकाश नारायण यांनी स्वीकारावे असा आग्रह झाला, पण जयप्रकाशजींनी त्यास नकार दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचे कोणतेही पद कधीच स्वीकारले नाही; पण ‘‘एक दिवस माझ्या हातात देशाची सत्ता द्या. सगळ्यांना शिस्त लावतो व सरळ करतो,’’ असे त्यांनी अनेकदा सांगितले. शिवसेनाप्रमुख हे पद सर्व सत्तापदांपेक्षा वरचे अशी भावना होती. तसे सरसंघचालक पद सर्व राजकीय पदांच्या वर आहे ही संघाची भावना असेल तर त्यात चूक नाही; पण त्यांचे नाव सुचवणे हा गुन्हा नाही व हेतूबाबत शंका घेण्याचे कारण नाही!

rss-chief-pratinidhi-1

स्वयंसेवकांची वणवण
भारतीय जनता पक्षाचा विजय व्हावा म्हणून हजारो संघ स्वयंसेवक उन्हातान्हात राबत असतात. संघाचा राजकारणाशी संबंध नसेल तर सामाजिक कामातच रमावे; पण राजकीय प्रचार करतात, म्हणजे राजकारण त्यांना वर्ज्य नाही. लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. श्री. आडवाणी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार का होऊ शकत नाहीत, असे दिल्लीतील भाजप नेत्यांना सहज विचारले तर त्यांनीही तितक्याच सहजतेने सांगितले, ‘‘श्री. आडवाणी संघाला तितके प्रिय नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले आहे.’’ असे सांगणे हे संघास राजकारणाचे वावडे नाही हे दाखवण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षावर आज संपूर्ण नियंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहे व सर्व राजकीय आणि प्रशासकीय नेमणुकांत संघाची भूमिका आहे. देशातील सर्व सरकारी, शैक्षणिक संस्था व विद्यापीठांवर आता संघाचे थेट नियंत्रण आले आहे. देशावर आतापर्यंत बेगडी निधर्मीवादाच्या नावाखाली ज्या राजवटी आल्या त्यांनी मोठे नुकसान केले. २७ नोव्हेंबर १९५१ रोजी आग्रा येथे बोलताना गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, ‘‘काँग्रेसने देशाचे दोन तुकडे केले. कम्युनिस्ट दहा तुकडे करतील. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक देश संघटित करायचा हेच केवळ संघाचे ध्येय आहे. मुस्लिम दबा धरून बसलेले आहेत. ते या देशाशी एकनिष्ठ राहतील असे गृहीत धरून आपली धोरणे आखणे काही काळ तरी शक्य नाही. मला येशू ख्रिस्ताबद्दल आदर आहे. ती एक महान व्यक्ती होती, परंतु भारतीय ख्रिश्चनांना आपली विचारसरणी बदलावी लागेल. गरीब हिंदूंचा फायदा घेऊन त्यांना ख्रिश्चन बनविण्याचे त्यांचे प्रयत्न अश्लाघ्य आहेत.’’ प्रत्येक खरा भारतीय संघाच्या याच भूमिकेशी सहमत आहे. हा विचार मान्य केला तर संघाचा हिंदुत्ववाद आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट होते व हा विचार पुढे नेण्यासाठी संघाची प्रमुख व्यक्तीच राष्ट्रपती भवनात जाणे हा विचार अयोग्य नाही.

पत्रास कारण की…
‘सरसंघचालक दरवाजे उघडा’ असे ‘रोखठोक’ मागच्या रविवारी लिहिले. त्यावर अनेक संघ स्वयंसेवकांनी नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी स्वागत केले. संभाजीनगर येथील स्वयंसेवकाने मला हे एक सविस्तर पत्र पाठवून भावना व्यक्त केल्या. भावना कडवट आहेत व शिवसेनेच्या हेतूंवर शंका घेणाऱ्या आहेत. तरीही त्यांचे हे पत्र मी जसेच्या तसे येथे प्रसिद्ध करीत आहे.

ज्येष्ठ बंधुवर खा. संजयजी,
प्रेमपूर्वक नमस्कार.
‘सरसंघचालक कृपया दरवाजे उघडा’ हे ‘रोखठोक’ आताच वाचले. मी एक सामान्य स्वयंसेवक आहे म्हणून प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वावर प्रेम करावे, हिंदू संघटित व्हावा, हिंदुत्वाचे शत्रूही हिंदुत्ववादी व्हावेत, होत नसतील तर नेस्तनाबूत व्हावेत, हिंदूंना त्यांच्या (५ हजार वर्षे) सनातन सर्व कल्याणकारी संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगत मानाने जगण्याचा अधिकार असावा. हिंदूंना त्यांची आरोग्य दैवते आणि मानबिंदूंची आराधना, संवर्धन, विकास, स्थापना, पुनर्स्थापना करण्याचे स्वातंत्र्य असावे असे प्रखरतेने वाटते. त्यासाठी सर्व हिंदुत्ववादी शक्ती एकसंध राहाव्यात असेही वाटते. आपण पूजनीय सरसंघचालकांनी दार उघडावे अशी साद घातली आहे, पण ज्या कारणांची यादी आपण दिली आहे ती सर्व कारणे ही हिंदू राष्ट्रनिर्मितीची साधने आहेत. हे सर्व म्हणजे हिंदू राष्ट्रनिर्मिती नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एका भव्यदिव्य जगत्कल्याणकारी व्यवस्थेचे निर्माण करण्यासाठी, सुष्टांचे कल्याण आणि दुष्टांचे निर्दालन होण्यासाठी, वसुधैव कुटुंबकम् संकल्पना साकार करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे केवळ साधनांतच अडकून साध्याचा घात करणे उचित कसे होऊ शकेल. आपण प्रामाणिकपणे हिंदुत्वाची काळजी वाहत हे आवाहन केले आहे. पूजनीय सरसंघचालक आणि संघ तुमची ही प्रामाणिक तळमळ नक्की समजून घेतील. नव्हे एक हिंदुत्व चळवळीतील कार्यकर्ता म्हणून तुमचा हा अधिकारपण मान्य करतील; परंतु माझ्या (सामान्य स्वयंसेवक म्हणून) मनात गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेले प्रश्न आज तुमच्यासमोर मांडावेत म्हणून हा लेखनप्रपंच करीत आहे. मी राजकारणी नाही. मी जसा भाजपचा समर्थक आहे तसाच मी शिवसेनेचा पण समर्थक आहे. युती असेल तर माझे मत मी शिवसेनेच्या धनुष्यालाच देत आलो आहे. खासदार खैरेजी, आमदार प्रदीपजी, आमदार संजयजी शिरसाठ हे आमचे राजकीय नेतृत्व माझ्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांच्या मतदानाच्या आधारे करीत आहेत. त्याचा आनंद आहेच, पण आजकाल शिवसेना घेत असलेली भूमिका पाहिली की दुःख होते.

आपण शिवसेनेचे अंतस्थ कार्यकर्ते आहात आणि आपण पूजनीय सरसंघचालकांना आर्त साद घातली आहे म्हणून आपणास ज्येष्ठ बंधू असे संबोधून मनातील प्रश्न उपस्थित करावेत असे वाटले.

१) शिवसेनेची महाराष्ट्रात सरकारमध्ये असूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही प्रखर सरकारविरोधी भूमिका का?
२) संभाजीनगर हे नाव उच्चारण्याने ज्यांचे मुख मलीन होते अशा औरंग्याचे कायम समर्थक असलेले काँग्रेसवाले जि.प.मध्ये सेनेस कसे चालले? संभाजीनगरचा आग्रह सेनेने सोडला का? हिंदुत्वाचा मतलबी उपयोग हे आता सेनेचे अधिकृत धोरण आहे का?
३) मुंबईत केवळ ६५ जागा मान्य करणे, आरोप-प्रत्यारोपानंतरचे निकाल आणि त्या निकालानंतर हिंदुत्वाची राजकीय शक्ती अखंड राहावी म्हणून भाजपने सत्ता स्पर्धेपासून दूर राहून सेनेस सत्तासोपान प्रशस्त करून दिलेला असतानाही सेनेची विरोधी भूमिका का? (हे अनाकलनीय आहे)
४) पंतप्रधान मोदीजी संपूर्ण देशभर आणि अखिल विश्वात भारत आणि पर्यायाने हिंदुत्वाचा डंका गाजवीत असताना आपण सेना म्हणून वारंवार कारण नसताना नाक खाजवून अपशकून करण्याची भूमिका का घेता?
५) प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर रामजन्मभूमीत व्हावे यासाठी सर्व हिंदुत्ववादी ताकद लागावी असे अपेक्षित असताना विरोधी ताकद बळकट होईल, भाजपला त्रास होईल, अशी भूमिका उ. प्र., दिल्लीत काहीही शक्ती नसताना शिवसेना का घेते?
६) छोटी राज्ये ही लोकाभिमुख राज्यकारभार होण्यासाठी, राज्याचा विकास होण्यासाठी उपयुक्त असताना उगाच भावनेच्या आधाराने लोकांमध्ये खोटी अस्मिता पेटवून सेना अशांतता का निर्माण करते?
७) संघाला सेना काय किंवा भाजप काय, दोघेही वाढले तर पाहिजे आहेतच. तरीही सेना हिंदुत्ववादी शक्ती दुभंगेल अशी भूमिका वारंवार का घेते? वाद असतील तर ते मिटविण्यासाठी योग्य पावले भाजपने उचलली तर प्रतिसाद विरोधी का?
८) अनेक वेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपपेक्षा वेगळी भूमिका मराठी अस्मितेच्या नावाखाली घेऊन सेनेने कोणत्या हिंदुत्वाचे रक्षण केले आहे?
९) शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आजपर्यंत लाभ झालेला नाही. काँग्रेसप्रणीत भ्रष्ट सरकारी यंत्रणेनेच या कर्जमाफीचा लाभ घेत स्वतःचे उखळ पांढरे केले आहे. तरीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रह का? मुख्यमंत्री देवेंद्रजी काही वेगळी उपाययोजना सुचवीत आहेत त्यात सामील होऊन शेतकरी दुरवस्थेचे राजकारण न करता सेना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न न करता विरोधकांना मदत होईल असे का करीत आहे?

माझे सगळेच प्रश्न योग्य असतील असा माझा दावा नाही, परंतु सामान्य मतदार गोंधळात आहे. त्याला एकच भगवा, एकच शक्ती, एकच हिंदुत्वाचा अभंग, अभेद्य गडकोट उभारलेला पाहायचा आहे. ते होताना दिसत नाही. म्हणून या दुफळीचा लाभ ‘एमआयएम’सारखी विषारी पिलावळ घेते आहे. आपण पूजनीय सरसंघचालकांना आवाहन केले आहे. संघाचा इतिहास, संघाने ९२ वर्षांत केलेले अफाट कार्य, निर्माण केलेली विश्वासार्हता, आसेतुहिमाचल उभी केलेली संघटित शक्ती अशा एका पदासाठी नाही. निर्दोष हिंदू समाजनिर्मिती आणि अखंड भारत निर्माण आणि सरतेशेवटी जगत्कल्याण, विश्वबंधुत्व निर्माण हेच संघाचे ध्येय आहे. म्हणूनच परम पूजनीय सरसंघचालकांनी राष्ट्रपतीपदासंदर्भातील बातम्या या करमणुकीच्या बातम्या आहेत अशी योग्य भलामण करीत ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्याल अशी माझी अपेक्षा नाही. तथापि सामान्य स्वयंसेवकाच्या मनातील आणि बहुतांश हिंदुत्ववादी मतदारांच्या मनातील या भावना आपल्यापर्यंत मी पोहोचविल्या आहेत. हे प्रसिद्धीसाठी नाही, तर हा कनिष्ठ भावाने ज्येष्ठ भावाशी साधलेला संवाद आहे. स्नेह वृद्धिंगत होईल या अपेक्षेसह…धन्यवाद!

आपला,
– डॉ. कुलकर्णी
एक सामान्य स्वयंसेवक

माझ्या पत्रास प्रसिद्धी देऊ नका असे त्यांचे सांगणे. तरीही त्यांच्या भावनांची दखल मी घेतली. त्यांचे नाव प्रसिद्ध केले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या