रोखठोक – महाभारत घडले; पण धर्मराज, भीष्म कोठे आहेत?

महाराष्ट्रात सरळ सरळ महाभारत घडले. एकाच घरातील लोक एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत हे खरे, पण येथे कोणी भीष्म, कृपाचार्य व द्रोणाचार्य दिसत नाहीत. हरुन-अल-रशीद यांचे पात्र महाभारतात नव्याने उदयास आले इतकेच.

भारतासमोरचे यक्षप्रश्न कोणते व ते कसे सोडवायचे? यावर कोणीच बोलत नाही. चर्चा होत आहे ती महाराष्ट्रातील अनैसर्गिक सत्तांतराची. अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया ‘80’ इतका खाली कोसळला. एक डॉलर विकत घेण्यासाठी आपल्याला 80 रुपये मोजावे लागत आहेत. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे गटांगळय़ा खात आहे. गॅसचे सिलिंडर 50 रुपयांनी महागले. त्यामुळे मध्यमवर्गीय समाज खचला आहे. आणखी एक बातमी आली आहे. स्विस बँकेत भारतीयांचे काळे धन 20,700 कोटी इतके होते. त्यात वाढ झाली असून ते आता 39,468 कोटी इतके झाल्याची अधिकृत माहिती समोर आली. त्यामुळे आता नागरिकांच्या खात्यात 15-15 लाख नाही, तर 40 ते 45 लाख रुपये मोदी सरकारकडून जमा होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. काळ्या पैशांचा महापूर कसा आला ते महाराष्ट्रातील सत्तांतरात दिसून आले. गुवाहाटीच्या झाडाझुडपांचे वर्णन करणारे आमदार शहाजी पाटलांचा एक डायलॉग सध्या गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी मारलेला ‘पंच’ त्याहून जास्त चमकदार आहे.

‘काय झाडी,
काय डोंगार,
काय हाटील,
एकदम ओक्के!’

येथे थोडा स्वल्पविराम मारून आमदार गोरंट्याल पुढे म्हणतात,

‘पचास खोके… पक्के!’ एकदम ओक्के!’

या सगळ्यांची उघड चर्चा आता लोकांत सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आमचीच, असे सांगणाऱ्यांचे आत्मे या खोक्यांत बंदिस्त आहेत, असे श्री. गोरंट्याल सांगतात ते खोटे नाही.

वेषांतराचे नाट्य!

एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. श्री. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. ‘‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा. पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. श्री. मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा. श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार?

रेड्यांचे सत्य!

गुवाहाटीस गेलेल्या आमदारांची ‘रेडा’ अशी हेटाळणी केली म्हणून ते नाराज झाले व त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडल्याची बतावणी सुरू आहे हा गैरसमज आहे. ‘टोणगा’ हा वाप्रचार आपल्याकडे सर्रास वापरला जातो. अत्रे-ठाकरे यांनी ते जाहीर सभांतून वापरले आहे. रेडा हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे. इतर देवतांप्रमाणे मृत्युदेवता, यमदेवता आहे. त्या देवतेचे वाहन रेडा आहे. शंकराच्या नंदीइतकेच रेडय़ालाही हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे हे नवहिंदुत्ववादी विसरलेले दिसतात. ज्ञानेश्वरांनी ‘वेद’ म्हणवून घेण्यासाठी रेडय़ाचीच निवड केली. ‘यमा’स धर्मराज, सूर्यपुत्र अशा अन्य नावांनी ओळखले जाते. ‘यम’ हा ‘काळ’ म्हणून ओळखला जातो व रेड्याशिवाय त्या काळाचे महत्त्व नाही. हिंदुत्वाचा हा अध्याय आहे. शिवसेना सोडून वेगळय़ा गटात गेलेल्या आमदारांनी हा हिंदुत्वाचा अध्याय समजून घेतला पाहिजे. कौरव-पांडवांच्या युद्धाच्या आधी युधिष्ठर एकटाच पायी रणांगण पार करून समोरच्या शत्रुसेनेत उभ्या असलेल्या आपल्या सग्या-सोयऱयांना युद्ध करण्याविषयी आज्ञा विचारायला जातो. भीष्म पितामहांना प्रणाम करून तो विचारतो, ‘‘मला तुमच्याशी लढायचंय. युद्धाची आज्ञा व विजयाचा आशीर्वाद द्या.’’ भीष्म पितामह उत्तर देतात- ‘‘या युद्धात माझं शरीर दुर्योधनाकडे राहील. कारण मी त्याचं अन्न खाल्लंय, पण धर्माने युक्त असलेले माझे मन मात्र तुमच्याकडे असेल. ते तुमची मंगल कामना करेल. तुमच्या विजयाची आकांक्षा ठेवेल.’’ युधिष्ठराने अशाच प्रकारे गुरू द्रोणाचार्यांना व कृपाचार्यांनाही वंदन केले.

महाभारताचा हा भाग सर्वात श्रेष्ठ आहे!

आजच्या महाभारतात समोर कोणी भीष्म नाही, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य नाही! कौरवही नीतिमत्ता व अन्यायावर प्रवचने झोडत आहेत.

हेच नव्या महाभारताचे दुर्दैव! हाच देशासमोरचा खरा यक्षप्रश्न आहे!!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]