रोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…

3503

महाराष्ट्रातील पुराचे चित्र भयंकर आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापुराची दैना झाली. त्याआधी कोकणातील प्रलयात तिवरे धरण वाहून गेले. माणसांच्या आधी देव आणि देवळे वाहून गेली. संकट मोठे आहे. माणसे उभी राहत आहेत, पण देवांच्या मदतीसही जावे लागेल. कोणी कोणास वाचवायचे?

‘देवाच्या मदतीस चला तर…’ असे अजरामर वाक्य केशवसुतांनी लिहिले. त्याची प्रचीती महाराष्ट्रातील महापुरात आली. भीषण महापुराचे सत्य असे की, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच देव आणि देवस्थाने महापुराने वेढली. सांगलीतली नृसिंहाची वाडी, खिदरापूर येथील भगवान शंकराचे पुरातन मंदिर, वाई येथील गणपतीचे मंदिर, नाशिक येथील दुतोंडय़ा मारुती अशी दैवते पुराच्या पाण्यात गेली व संकटात सापडलेल्या देवांच्या मदतीस शेवटी माणसांना जावे लागले. कोकणातील रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले व त्यात संपूर्ण गाव वाहून गेले. पंचवीस लोकांनी प्राण गमावले. पाण्यापासून येणाऱया संकटाशी मुकाबला करता यावा म्हणून ‘तिवरे’च्या ग्रामस्थांनी धरणाच्या तोंडावर एक देऊळ बांधले व त्यात देवांची स्थापना केली. पण तिवरे धरणास भेगा पडून पाण्याचा लोंढा बाहेर पडला. त्याचा पहिला तडाखा या देवळास बसला. आधी देवळासह देव वाहून गेले व नंतर माणसे वाहून गेली. देवाचा धावा करण्याची संधीही त्यांना मिळाली नाही.

चिखल आणि माती
कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि काही प्रमाणात साताऱयाची दैना झाली आहे. जेथे वैभव आणि जिवंतपणा होता तेथे आता फक्त चिखल-मातीचे ढिगारे दिसत आहेत. कुणाचे पाप या लोकांच्या नशिबी आले? सांगलीतील बागेतला गणपतीही पुराच्या पाण्याखाली गेला. सांगलीच्या मारुती चौकातील छत्रपती शिवरायांचा पुतळा पाण्याच्या लाटांशी सामना करीत उभा राहिला. जणू त्या संकटाशी सामना करण्याची प्रेरणा लोकांना देण्यासाठीच ते उभे आहेत. शेवटी या संकटाशी ‘सामना’ करीत आहेत ते मावळेच. सांगली, कोल्हापुरात पाण्याचे लोट आले ते मुसळधार पावसामुळे, पण महाप्रलय आला तो ‘आलमट्टी’ धरणाचे दरवाजे न उघडल्याने व त्याचे खापर फोडले जात आहे कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर. कृष्णेचे पाणी वाढले तेव्हा नियमाप्रमाणे आलमट्टीचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होणे गरजेचे होते; पण सांगली, कोल्हापूरच्या पाण्याचा विसर्ग झाला तर कर्नाटकातील काही जिह्यांत पुराचे संकट येईल अशी भीती त्यांना वाटली असावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवे होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. प्रश्न इतकाच आहे की, येडुरप्पा हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत; पण त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलेले नाही. येडुरप्पा यांनी काँग्रेस-जनता दलाचे पळवलेले आमदार मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले. महाराष्ट्राने येडुरप्पांसाठी सर्व दरवाजे उघडले; पण येडुरप्पांनी ‘आलमट्टी’ धरणाचे दरवाजे महाराष्ट्रासाठी उघडले नाहीत व कोल्हापूर, सांगली, साताऱयात महाप्रलय आला. देवाने येथेही येडुरप्पांना सुबुद्धी दिली नाही!

निसर्ग विरुद्ध माणूस
अभूतपूर्व पुरात सर्व उद्ध्वस्त झाले आहे. दिमाखदार गावांची रयाच गेली आहे. काही ठिकाणी गावांचे अवशेषही दिसत नाहीत. शाळा व घरे वाहून गेली. गुरे गेली. दुर्गंधी आणि रोगराईतून आधी लोकांना मुक्त करावे लागेल. निसर्गाविरुद्धची माणसांची लढाई ही युगानुयुगे चालू आहे. त्यामधून माणूस उठतो आणि पुढे जातो. त्यात सारासार विचारांची फक्त उणीव भासते. सरकारने मदत पोहोचवली. त्यापेक्षा शिवसेना, आर.एस.एस.सारख्या संघटना यात पुढे होत्या. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची मदत पथके सर्वप्रथम पोहोचली हे कुणालाच नाकारता येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीचे तेथील प्रमुख लोक चिखलात होते व लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत होती, पण ‘ईद’चा सण बाजूस ठेवून मराठी भाषिक मुसलमान मदतकार्यात पुढे होता व श्रावण असूनही मदरशांच्या आसपास असलेल्या मराठी कुटुंबांनी मदरशात भोजन घेतले. अशा वेळी जात-धर्माच्या भिंती तुटून पडतात. पण ज्यांच्या घरांच्या भिंतीच उन्मळून पडल्या त्यांचे पुनर्वसन सरकार कसे करणार? किमान चार लाख घरे बांधावी लागतील असे आजचे चित्र आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱयांतून मदतीचा ओघ सुरू आहे व लातूरच्या भूकंपात दिसला तसा मदतीचा महाप्रलय येथे आला. सरकारने आता या सगळय़ाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न न करता कार्य केले पाहिजे. उसाची वाट लागली व 1000 कोटींचे नुकसान झाले. मनमाड-लासलगावला कांदा गेला. शेवटी या सगळय़ात महत्त्वाचा प्रश्न आहे तो ‘निवाऱया’चा. तो कसा देणार? अनेक सधन व सुखवस्तू लोकांवर निर्धन, बेसहारा होण्याची वेळ आली. अशा वेळी सरकारचे एक वाक्य ठरलेले असते. ते म्हणजे, पैशाची चिंता करू नका. Money is no problem. पण तोच खरा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्राने केंद्राकडे 6,800 कोटी मागितले. ते मिळतील तेव्हा मिळतील, पण 2019 च्या विधानसभा जिंकण्यासाठी राखून ठेवलेला पैसा उद्ध्वस्त गावांच्या नवनिर्माणासाठी वापरला तरी मोठे पुण्य पदरी पडेल. शिवसेनेचे एक आमदार प्रताप सरनाईक यांनी पुरात बुडालेले एक गावच दत्तक घेण्याचे ठरवले आहे. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे 250 घरांचे गाव ते पुन्हा उभारतील. या महापुरात देव अडकले हे खरे, पण देवाच्या नावाने जी संस्थाने निर्माण झाली त्या संस्थानांनीदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोटय़वधी रुपये दिले. शिर्डीच्या साईसंस्थानापासून लालबागच्या राजापर्यंत अनेकांनी मोठी मदत केली. मुंबईचे सिद्धिविनायक देवस्थानदेखील त्यात आघाडीवर आहे. भक्तांचाच पैसा माणसाच्या कामी आला. देव निमित्त ठरले. मुंबई, महाराष्ट्राने आजवर देशाला भरपूर दिले आहे. आज देश महाराष्ट्राच्या या पूरग्रस्त गावांना काय देतो ते पाहायचे. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हाकेस प्रतिसाद देत कश्मीरात गुंतवणूक व विकास करायचे ठरवले आहे. सांगली, कोल्हापूरची काही गावे त्यांना उभारता येतील काय?

नक्की किती मेले?
या संपूर्ण महाप्रलयात प्राणहानी किती झाली? माझ्या माहितीप्रमाणे खरा आकडा सरकारी आकडय़ापेक्षा जास्त आहे. परंतु हा काही वादाचा विषय नाही. नंदुरबार, धुळे येथेही पूर आला व नुकसान झाले, पण महाप्रलयाशी झुंजणारा तेथील आदिवासी आज आपल्या खिजगणतीतही नाही. मदतीचा ओघ त्या दिशेनेही वळावा. कोकणाला पूर नवीन नाही. कोकणातील पूरग्रस्तांसाठी सरकारने सुरुवातीला फक्त 2 कोटी जाहीर केले. Money is no problem असे सांगणाऱयांनी कोकणचा problem समजून घेतला नाही. देव आणि माणसे तेथेही वाहून ग्sाली आहेत. सरकार म्हणून जे मंत्री पुरात उभे आहेत त्यांचे अभिनंदन! लोकप्रतिनिधी दिवसरात्र जनतेबरोबर पाण्यात दिसले ते दृश्य महत्त्वाचे. सरकारने मदत म्हणून काय करावे?

1) नियम आणि कायदे जरा बाजूला ठेवून सर्वप्रथम पूरग्रस्तांना रोखीत मदत करा.
2) नुकसानभरपाईची चौकट नक्की करा.
3) पूरग्रस्त भागातील शेतकऱयांचे विम्याचे दावे महिनाभरात निकाली काढा!
4) पूरग्रस्तांचे कर्ज संपूर्ण माफ होईल काय, यावर निर्णय घ्या.
5) सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत प्रत्येक घरातील चूल पेटेल याची काळजी घ्या.

6) सरकारने मदतीचे राजकारण केले नाही व सर्वच विरोधकांना विश्वासात घेतले तर संकटाची दाहकता कमी होईल.

पण हे शक्य आहे का? लातूर भूकंपाच्या वेळी राजकीय भिंती सहज पडल्या, पण येथे भिंती पुरात वाहून गेल्या तरी राजकीय विरोधाची तटबंदी कायम दिसत आहे. कारण उद्या निवडणुका येत आहेत. अर्थात ज्यांना ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावयाची असते, त्यांनी विसंगतीचा गुंतावळा सोडविण्यात फारसा वेळ घालवू नये. गोविंदाग्रजांनी लिहिले आहे, ‘‘जे ध्येय तुझ्या अंतरी। निशाणावरी।’’ कुसुमाग्रजांनी लिहिले आहे, ‘‘तुमचा आत्मविश्वास हीच तुमची शक्ती असते. परिश्रमाची साथ त्यास द्यावी आणि सारी वृत्ती सप्रवृत्त असावी।’’

जे घडले आहे ते भयंकर आहे. पानशेत प्रलयापेक्षा भयंकर आहे. कोकणातील संकटातून आम्ही डोके वर काढीत होतो तोच पश्चिम महाराष्ट्रावर हा आघात झाला. ही परमेश्वरी करणी नाही. यात परमेश्वराचा काय संबंध? ही ‘ऍक्ट ऑफ गॉड’ नाही. कारण माणसांच्या आधी देव वाहून गेले. घरांबरोबर देवळेही बांधावी लागतील. देव वाहून गेले तेव्हा माणसांच्या मदतीस लष्कर धावले. त्यांनी पुरात उडय़ा घेतल्या. त्यामुळे वाचलेल्या लोकांनी देव म्हणून सैनिकांच्या पायास हात लावला. त्यांची ओवाळणी केली.

‘मंदिर, मस्जिद सब डूब गए।।
भगवान वर्दी में घूम रहे।।’

असे त्यावर कुणी तरी लिहिले ते खरे आहे. हीसुद्धा परमेश्वराचीच करणी असे ज्यांना आजही वाटते त्यांनी देवांच्या मदतीस जायला हवे. देवाच्या साक्षीने आयुष्ये बुडाली. हा अनर्थ आहे!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या