रोखठोक – विघ्नहर्त्या, तुझे नाव सार्थ कर!

rokhthokश्री गणेशाचे आगमन झाले आहे. आनंदाचा उत्सव या वेळी सार्वजनिक नाहीच, पण घरांतही निर्बंध आहेत. सार्वजनिक उत्सवांचे अर्थकारणही साफ कोलमडले आहे. विघ्नहर्ता श्री गणेश स्वतःच निर्बंधांच्या विघ्नात अडकले. देव आले आहेत. हाती धोक्याची घंटा घेऊन!

‘जगणे कठीण झाले आहे, विघ्ने टळता टळत नाहीत…’ अशा वातावरणात सगळय़ांचेच जगणे सुरू आहे. विघ्नहर्ता म्हणून श्रद्धा असलेल्या श्री गणेशाचे आगमन झालेच आहे, पण म्हणून कोरोनाचे विघ्न काही टळलेले नाही. उलट गणेशोत्सवावर निर्बंधच आहेत. उत्सवांचे मंडप आकाराने लहान झाले, गर्दीवर बंधने आली. उत्सवांच्या झगमगाटाचे तेज त्या कोरोनाने मारून टाकले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रतापराव गोडसे म्हणाले होते, ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव ही कार्यकर्त्यांची बालवाडी आहे.’’ या बालवाडीसही टाळेच लागले आहे. मनुष्य जीवन सर्वांगाने फुलावे, बहरावे अशी शिकवण गणेशाच्या अवतार कार्यामधून मिळत असते. ते बहरणे आणि फुलणे गेल्या दोनेक वर्षांपासून कोमेजून गेले आहे. याच गणेशोत्सवाच्या मंडपातून लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश पारतंत्र्याविरोधात क्षात्रतेजाची तलवार चालवली होती व याच उत्सवातून चापेकर बंधूंसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या वेदीवर चढले. स्वातंत्र्यसंग्रामधील हुतात्मे निर्माण झाले.

आदर्श देव

श्री गणपतीचे महत्त्व किती? तो आदर्श समाजाचा आदर्श देव आहे. तो आनंदाचा उपभोग घेणारा, जीवनाचा अर्थ जाणणारा, स्वतःबरोबर दुसऱयांचीही काळजी घेणारा देव आहे. स्त्रियांचे सैन्य सर्वप्रथम उभारणारा हाच गणपती! कोरोनामुळे आज ते सैन्यही बेजार झाले आहे. कोरोनाचा संसर्ग होईल, वाढेल म्हणून आज मंदिरेही बंद आहेत. प्रत्यक्ष विघ्नहर्ताच भक्तांपासून दूर आहे. मग हे विघ्न टाळायचे कोणी? अनेक भक्त ऑक्सिजन, औषधे, उपचार वेळीच मिळाले नाहीत म्हणून कायमचे सोडून गेले. गर्दी जमतेय म्हणून कोरोना वाढतोय, पण जे गर्दीत गेले नाहीत त्यांच्यावरील कोरोनाचे विघ्नही कोणी टाळू शकले नाही. देवाच्या दारात रांगा लावायलाही निर्बंध आहेत. ‘मंगलमूर्ती, मंगलाचा उदय कर!’ असे आवाहन प्रख्यात गणेशभक्त जयंत साळगावकरांनी केले होते, त्याचे आज स्मरण होते. जयंतराव म्हणतात, ‘‘गणराया, एक शतकाहून अधिक काळ ज्या महाराष्ट्राने तुझी सार्वजनिक स्थळी भक्तिभावाने पूजा केली, नित्य निरंतर पाचवीला पूजलेली दुःखे, विवंचना, संकटे सारेकाही विसरून चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत भाद्रपद शुक्ल पक्षातील दहा-अकरा दिवस तुझा महोत्सव थाटामाटात साजरा केला, त्या महाराष्ट्राला तुझ्या प्रेमाला वंचित राहावे लागत आहे की काय, अशी भीषण शंका मनात डोकावू लागली आहे. तू भक्तांच्या मनावर काबू ठेवतोस, तू ज्या उंदरावर आरूढ होतोस तो उंदीर हा चंचल मनाचेच एक स्वरूप आहे, अशीही श्रद्धा लोकमानस बाळगते. त्या चंचल मनात आम्ही तुझ्या प्रेमाशीर्वादाला पारखे झालो की काय, अशी काळीज पोखरणारी दुष्ट शंका येऊन गेली तर त्यात जगावेगळे काही नाही.’
‘‘एक गोष्ट मात्र खरी की, तू आमची अडीअडचणीतून तातडीने मुक्तता करण्याऐवजी त्या अडीअडचणी वाढत असताना नुसता पाहतच उभा आहेस की काय, असेही मनाला वाटून जाते. आम्ही तुझे भक्त आहोत. तुझे भक्त असल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. तुझ्या अंगी असलेल्या गुणांचीही आम्हाला जाणीव आहे. हे गणराया, ‘मंगलमूर्ती’ हे तुझे नाव सार्थ कर. अमंगलाचा नाश कर आणि मंगलाचा उदय कर!’’
अमंगल, विघ्नांचा नाश कर! हीच एक भावना आज महाराष्ट्राच्या मनात आहे. ती काय चुकीची आहे?

आर्थिक उलाढाल!

गणेशोत्सवासाठी सारा देश मुंबई-पुण्यात अवतरतो. त्यात श्रद्धा असते, तसे पर्यटनही असते. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेकडो कोटींचा व्यापार घडत असतो. जशी अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीची यात्रा यांतून त्या राज्यांत मोठी आर्थिक उलाढाल होते. लोकांच्या हाती पैसा खुळखुळू लागतो, तसेच गणेशोत्सवाचे आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून गणेशाचे सार्वजनिक उत्सव बंद झाल्याने मोठेच आर्थिक विघ्न आले आहे. मुंबईतील ‘लालबागचा राजा’ या प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचीच उलाढाल शेकडो कोटींत आहे व त्यातून अनेक सार्वजनिक उपक्रम चालविले जातात. कोरोना विघ्नाचा फटका या अशा सार्वजनिक मंडळांना बसला आहे. गणपतीनिमित्त एरवी बाजार व रस्ते गजबजून जातात. रस्त्यांवरील फेरीवाले फूल, मिठाई, डेकोरेशनवाले, चंदन, उदबत्तीवाले, कापड विक्रेते यांची आवक वाढते. ऋण काढून सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे, पण त्यातून अनेकांच्या अर्थचक्राला गती मिळते. मंगलमूर्तीचा व्यापार ही मोठी उलाढाल ठरते. तेथेही कोरोनामुळे बंधनेच आली आहेत. मंडपात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होतात. त्यांनाही आता काम नाही. रोषणाई, गाणे बजावणे, नाटक-सिनेमांचे, पूजे-अर्चेचे एक वेगळे अर्थकारण या उत्सवात होते. त्यातून अनेकांची घरे चालतात. हे सर्व बंद पडले आहे.

‘आनंद उत्सव’ म्हणजे श्री गणेशाचे आगमन. हा आनंद दोन वर्षांपासून कडक निर्बंधात गुदमरला आहे. गणेशोत्सव म्हणजे राष्ट्रीय ऐक्य, ते ऐक्यही लॉक डाऊनच्या कडक निर्बंधात जखडून पडले आहे.
हे निर्बंध कधी उठणार? ते गणरायासही माहीत नसावे. गर्दी टाळा. राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री वारंवार करीत आहेत. गेल्या एक महिन्यात राज्यातील सक्रिय रुग्ण वाढत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे. महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. श्री गणरायाच धोक्याची घंटा वाजवीत आले आहेत.
श्री गणरायांच्या सोंडेवरही ‘मास्क’ हवा. देव आणि माणसांनाही कोरोना संसर्गाचा सारखाच धोका आहे. विघ्न टाळायचे कसे? देवही सांगतील, गर्दी टाळा, मास्क लावा. हात धूत राहा! जगण्यासाठी हे एवढे करावेच लागेल. नाही तर विघ्नहर्ताही वाचवू शकणार नाही!

Twitte – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या