रोखठोक – आमचा देश ‘आनंदी’ का नाही?

rokhthok

आनंदी देशाच्या बाबतीत हिंदुस्थान 136 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान, बांगलादेश आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. पंतप्रधान मोदी हे निवडणुकांमागून निवडणुका जिंकतात, त्यांचा पक्ष विजयाचा आनंद साजरा करतो, पण तरीही देश आनंदी का नाही? ‘फिनलॅण्ड’ पहिल्या क्रमांकाचा आनंदी देश ठरला. त्यांचे राज्यकर्ते जनतेशी इमान राखतात, खोटे बोलत नाहीत. त्यामुळे राजा व प्रजा, दोघेही आनंदी आहेत!

देशाचे मोठेपण नेमके कशात असते आणि देशाचा आनंद कशात असतो, यावर एकदा संसदेत चर्चा व्हायला हवी. संसदेतील सर्वच चर्चा आता रटाळ होत आहेत. मोदी भक्तांची संख्या संसदेच्या सभागृहात वाढली आहे. त्यातील अनेकांना विनोदाचे, खिलाडूपणाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेतील ‘आनंद’ संपला आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला. त्याचा आनंद सोहळा साजरा झाला; पण जागतिक आनंदी देशांच्या यादीत हिंदुस्थान 136 व्या स्थानावर घसरला. पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर म्हणजे 121 व्या क्रमांकावर आहे. भाजप जिंकला म्हणजे देश जिंकला, मोदी जिंकले म्हणजे देश आनंदी झाला, असे जग मान्य करायला तयार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक ‘हॅपिनेस इंडेक्स’मध्ये फिनलँड हा देश सलग पाचव्या वर्षी आनंदी देश ठरला. डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे आनंदी देशांच्या ‘टॉप 5’मध्ये आहेत. अमेरिका 16 व्या आणि ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. आमच्या देशात आनंदाच्या नावाने फक्त बोंब आहे. जगात सर्वात सुखी कोण याचा शोध कोणीच लावू शकलेला नाही. जगात अनेक श्रीमंत देश आहेत. ते आनंदी देशांच्या यादीत दिसत नाहीत. आनंदी राजकीय पक्ष व नेत्यांची यादी तयार केली तर त्यात भाजप व त्यांचे पक्ष तरी असतील काय? कारण सत्ता आणि हव्यास यावरच सुख आणि आनंदाची व्याख्या ठरत नाही.

सुखी माणूस कोण?

जगातला सर्वात सुखी माणूस कोण? एका शिष्याने गुरूला प्रश्न केला. गुरू म्हणाला, ‘‘चिंतन करावं लागेल, शोध घ्यावा लागेल, भटकंती करावी लागेल. लोकांच्या मनात काय आहे ते समजून घ्यावं लागेल. पहा, तुला शोधता येतंय का?’’

शिष्य सुखी माणसाच्या शोधात निघाला, पण त्याला दुःख आणि व्यथा असलेली माणसंच भेटत गेली. सुखाच्या बाबतीत ती एकमेकांकडे बोट दाखवू लागली. आम्ही सुखी आहोत, पण आमच्यापेक्षा कुणीतरी जास्त सुखी आहेत (म्हणून आम्ही दुःखी आहोत). मग शिष्य त्या सगळय़ाच सुखी माणसांना भेटत राहिला. त्या शोधात त्याची 12 वर्षे निघून गेली. एखाद्याला ज्याच्यात सुख सापडतं, त्यातच दुसऱ्याला दुःख सापडतं. अखेर तो एका साधूच्या झोपडीत पोहोचला. एका सुखी माणसाने त्याला या साधूकडे पाठवलं.

साधू म्हणाला, ‘‘बाबा रे, इतरांच्या तुलनेत मी सुखी आहे, पण माझ्याहीपेक्षा एक सुखी माणूस आहे, तो समोरच्या उंच डोंगरावर राहतो. माझ्या अंदाजाने जगातला सगळय़ात सुखी माणूस तोच असेल.’’

शिष्याने उंच डोंगरावर जाण्यासाठी काटेकुटे, कच्चे रस्ते पार केले. एका महिन्याने तो उंच डोंगरावर पोहोचला. एक साधू तिथे पाठमोरे ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या मागे जाऊन शिष्य उभा राहिला. डोंगर चढल्यामुळे त्याला धाप लागली होती. त्याची चाहूल जाणवताच साधूची समाधी भंगली. त्याने विचारले, ‘‘कोण आहे?’’ शिष्य म्हणाला, ‘‘जगातील सर्वात सुखी माणूस तुम्ही आहात असं कळलं म्हणून तुम्हाला भेटायला आलोय.’’ तो साधू वळला आणि शिष्य आश्चर्यचकित झाला. ते त्याचेच गुरू होते. त्यांच्या सूचनेनुसारच तो सुखी माणसाच्या शोधार्थ निघाला होता. त्याने गुरूंना विचारले, ‘‘हे काय? तुम्ही मला तेव्हाच का नाही सांगितलं? मला इतका शोध घ्यावा लागला नसता. पायपीट घडली नसती.’’

गुरुदेव हसून म्हणाले, ‘‘खरंच आहे, पण तुला बोधही झाला नसता. सुख आहेच, पण माणूस वेगवेगळय़ा प्रकारे दुःख निर्माण करून घेतो. दुसऱ्याचे सुख बघून दुःखी होतो. एका सुखाची तुलना दुसऱ्या सुखाशी करता येत नाही. त्यामुळे जो सुखी, तोच सर्वात सुखी. आता सांग, जगातला सर्वात सुखी माणूस कोण आहे?’’

शिष्य आनंदाने म्हणाला, ‘‘मी!’’

फिनलँड अशा सुखी आणि आनंदी माणसांचाच देश असावा.

अच्छे दिन कोठे गेले?

हिंदुस्थानातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ‘अच्छे दिन’ म्हणजे लोकांना आनंदी ठेवण्याचा वायदा. भाजप व मोदी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत गेले, पण देश आनंदयात्री बनला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, पण आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तान आपल्या वर आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने तुम्हाला मतदान केले, पण सर्वाधिक बेरोजगारी, गरिबी त्याच राज्यात आहे. कोविड काळात तर गंगेत प्रेतेच वाहत होती, पण आता योगींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तरीही त्यांचे मन दुःखी आहे. कारण मंत्रिमंडळातील यादी त्यांच्या मर्जीने बनली नाही. मग राज्य आनंदी कसे होणार?

आनंद संपला!

देशाच्या राजकारणातला आनंद संपला आहे. सूडाचे, द्वेषाचे प्रवाह वाहत आहेत. एकदुसऱयांना संपवून टाकायचे या आनंदात जगणाऱयांच्या हाती राजकारणाची सूत्रे आहेत. त्यांनी लोकांना अंध भक्त आणि गुलाम केले. नोटाबंदीच्या काळात लोकांना बँकांच्या रांगेत उभे केले. लोक नोकरीसाठी आणि रेशनसाठी वर्षानुवर्षे रांगेत आहेत. काम करून घेण्यासाठी लाच द्यावीच लागते. पंजाब आणि दिल्लीत ‘आप’चे सरकार आले. त्यांनी ठरवले, लोकांना रेशनसाठी यापुढे रांगेत उभे राहावे लागणार नाही, लोकांना घरपोच रेशन मिळेल. या निर्णयाची विरोधकांनी खिल्ली उडविली. हे कसे शक्य आहे? त्यावर अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘‘का शक्य नाही? घरपोच पिझ्झा मिळतो, मग गरीबांना रेशन का नाही?’’ हा आनंदच आहे. असे अनेक आनंद आपण गमावून बसलो आहोत.

दुःखी देश हे…

अफगाणिस्तान, लेबनॉन दुःखी देश आहेत. कालपर्यंत सुखी-आनंदी असलेला युक्रेन आता दुःखात बुडाला आहे. सगळय़ांनाच ‘फिनलँड’प्रमाणे सुखी होता येणार नाही. फिनलँडमध्ये जन्म घेणे जॅकपॉट जिंकण्यासारखेच आहे. जगातील सर्वात आनंदी देश असलेल्या फिनलँडमध्ये ही म्हण प्रसिद्ध आहे. हा देश आनंदी आहे, कारण या देशाचे नेतृत्व, राज्यव्यवस्थाच वेगळी आहे. शिक्षण, आरोग्य व्यवस्थेवर सरकारचे सर्वाधिक बजेट खर्च होते. देश सुरक्षित आहे. पोलीस व्यवस्था उत्तम, मानवाधिकारांवर विशेष लक्ष. दारिद्रय़ रेषा वगैरे नाहीच. उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक योजना आहेत. भ्रष्टाचार नाहीच. त्यासाठी कठोर कायदे. 99 टक्के लोकांचे मानसिक आरोग्य अत्यंत संतुलित. फिनलँडमध्ये महिलेची प्रसूती होताच तिला सरकारतर्फे एक ‘न्यू बेबी बॉक्स’ गिफ्ट केला जातो. त्यात बाळाला एक वर्षाचे होईपर्यंत लागणारी 63 उत्पादने असतात. या गिफ्ट बॉक्सविषयी तेथील लोक सांगतात की, तुम्हाला तुमच्या बाळासाठी ‘डायपर’शिवाय पहिल्या पाच महिन्यांसाठी दुसरे काहीच विकत घेण्याची गरज पडत नाही. या देशात 10 महिन्यांची ‘मॅटर्निटी’ आणि पॅटर्निटी लिव्ह आहे. मूल जन्माला येताच माता-पित्यांना चार आठवडय़ांची रजा मिळते. मूल तीन वर्षांचे होईपर्यंत ‘आई-बाप’ नोकरी न गमावता ‘स्टे होम’ योजनेचा लाभ घेऊ शकतात. सामाजिक सुरक्षा योजनेचा हा हिस्सा आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना महिन्याला 1500 डॉलर्सचा भत्ता मिळतो. त्यामुळे फिनलँड देश आणि त्यांची जनता सदैव आनंदीच राहते. या देशाचे आनंदाचे रहस्य त्यांच्या नेतृत्वाच्या खरेपणात आहे. येथे पूर्ण स्वातंत्र्य आहे. राजकीय विरोधकांचा पूर्ण सन्मान केला जातो आणि राज्यकर्ते देशाशी व प्रजेशी खोटे बोलत नसल्याने संपूर्ण देश तणावमुक्त आहे!

मोठेपणा कशात?

भरमसाट पैसे खर्च करून राज्यकर्त्यांनी जाहिराती केल्याने जनता आनंदी होत नाही. फिनलँडप्रमाणे ब्रिटनही तसा आनंदीच देश आहे, पण हा आनंद आणि मोठेपण कशात आहे? ब्रिटनचे मोठेपण हे मुकुट घालणाऱ्या त्यांच्या सम्राज्ञीत नाही, राजपुत्र चार्ल्समध्ये नाही, त्यांच्या भव्य महालात नाही, तर त्यांच्या स्वतंत्र बाण्याच्या संसदेत, जिवापाड जपलेल्या लोकशाहीत व घटनेत आहे. जगावरचे साम्राज्य गमावूनही ब्रिटन आनंदी आहे व युक्रेन बेचिराख करूनही पुतीन व त्यांचा रशिया दुःखी आहे. चार राज्यांत विजय पताका फडकवूनही भाजपच्या चेहऱ्यावर आनंद नाही व जनता, देश सुखी नाही. निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही.

देश जिंकूनही राजा आनंदी नाही. मग प्रजा कशी आनंदी राहणार?

@rautsanjay61

[email protected]