रोखठोक – देश कसा चालला आहे?

राज्य कसे चालले आहे? याचे उत्तर आज कुणीच देऊ शकत नाही. मणिपूरची आग विझवता येत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला गेला. राज्यकर्त्यांच्या ‘आरामगिरी’वर कोटय़वधी उधळले जात आहेत. चीनने सीमेवर विमानतळ उभे केले, पण राज्य चालवणारे गप्प आहेत!

देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागातून रोजच्या रोज ज्या तणावाच्या आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत त्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मणिपूरसारखे राज्य पेटलेलेच आहे. आतापर्यंत शेकडो घरे, गाडय़ा, व्यवसाय भस्मसात झाले व पाचशेच्या आसपास लोक त्या हिंसेत मरण पावले. पंजाब आणि कश्मीरप्रमाणे मणिपूरचा प्रश्न चिघळत चालला आहे व गृहमंत्री अमित शहा निवडणुकांच्या राजकारणात स्वत:ला गुंतवून घेत आहेत. मणिपूरसारख्या लहान राज्यात गृहमंत्री शांतता प्रस्थापित करू शकले नाहीत. मणिपूरमध्ये वर्गकलहाने हिंसाचाराचा उद्रेक झाला व हे राज्य तुटेल असे चित्र आहे. पंतप्रधान मोदी ‘पोन-रशिया’च्या युद्धात मध्यस्थी करू शकतात (असे भक्त सांगतात), पण मणिपूरमधील दोन जमातींमधला कलह सोडवू शकत नाहीत. हे चित्र चांगले नाही.

राज्य कसे चालते?

मोदी-शहांचे राज्य नेमके कसे चालले आहे? याचा खुलासा ‘ट्विटर’चे माजी ‘सीईओ’ जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारविरोधी भूमिकांना ‘ट्विटर’वर स्थान देऊ नका, असा दबाव असल्याचा स्फोट डोर्सी यांनी केला.

“भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान दबाव आणला होता की, आंदोलनासंदर्भातल्या बातम्या व भूमिकांना स्थान देऊ नका. आमचे ऐकले नाहीत तर  भारतातील ‘ट्विटर’ कार्यालय बंद पाडू व तुमच्या कर्मचाऱ्यांवर धाडी घालू.” डोर्सी खोटे बोलत आहेत असा कांगावा आता केंद्राचे एक मंत्री चंद्रशेखर करीत आहेत. जॅक डोर्सी यांना खोटे बोलण्याचे तसे काहीच कारण नाही. पण खोटे बोलावे, सत्य दडपावे यासाठी मोदी सरकारकडे भरपूर कारणे आहेत. या देशाचे सध्याचे राज्यकर्ते किती डरपोक आहेत हे या प्रकरणातून स्पष्ट होते. हुकूमशहा हा डरपोकच असतो. चार गाढवे एकत्र चरत असली की हुकूमशहाला त्या चार गाढवांची भीती वाटू लागते.  ही चार गाढवे आपल्या विरोधात काही कारस्थाने तर करीत नसतील ना? या चिंतेने तो अस्वस्थ होतो. आपल्या देशात नेमके तेच सुरू आहे.

इराणी यांच्या धमक्या

‘ट्विटर’सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांवर हा इतका दबाव असेल तर आपल्या देशातील वृत्तसंस्था, वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या मालकांची काय हालत करून सोडली असेल? स्मृती इराणी या केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशातील त्यांच्या अमेठी मतदारसंघात गेल्या. तेथे एका पत्रकाराने विचारले, “आपण तर विरोधी पक्षात असताना महागाईविरोधात आंदोलन करीत होता. गॅस सिलिंडर घेऊन मोर्चे काढीत होता. आता तुम्ही गॅस सिलिंडरचा भाव कधी खाली आणणार ते सांगा!” या प्रश्नावर श्रीमती इराणी त्या पत्रकारावर भडकल्या. “तुझ्या मालकांशीच बोलते” असा दम भरला व त्या मालकाने त्या पत्रकारास नोकरीतून काढून टाकले. सरकार ‘मीडिया’च्या मालकांना धमकावत आहे व सत्य सांगणाऱ्या पत्रकारांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. याचा अर्थ असा की, जॅक डोर्सी बोलतोय ते खरेच आहे. खोटे बोलल्याबद्दल ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस

जॉनसन यांना संसदेतूनही राजीनामा द्यावा लागला आणि आमच्या देशात पंतप्रधान रोज खोटेपणाचा नवा कळस चढवीत आहेत. खाटेपणाचे नवनवे पाम प्रस्थापित करीत आहेत.

रेगन व मोदी

पंतप्रधान मोदी हे शिकलेले नाहीत, पण त्यांच्याकडे ‘एन्टायर पॉलिटिक्स’ अशी  पदवी आहे. ‘चौथी पास राजा’ अशी त्यांची खिल्ली अरविंद केजरीवाल उडवतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रोनाल्ड रेगन आले व ते अर्धशिक्षित होते. त्यावेळी जाहीरपणे बोलले जात होते की, एक महासत्ता असलेल्या राष्ट्राच्या प्रमुखपदी असा अज्ञानी प्रमुख असणे हे त्या देशाच्याच दृष्टीने नव्हे, तर जगाच्या दृष्टीनेही अनिष्ट आहे. रेगन यांच्या काळात खासगी वाहिन्यांचे पेव फुटले नव्हते. त्यावेळी दूरचित्रवाणी होती. त्यामुळे रेगन यांना दूरचित्रवाणी प्रिय होती. सात वाजताच्या राष्ट्रीय कार्पामातील वार्तापत्रात आपलीच मथळय़ाची बातमी असावी हा रेगन यांचा हट्ट असे. त्यामुळे इतर महत्त्वाचे विषय मागे पडत असत. अज्ञानी राज्यकर्त्यांचा हा न्यूनगंडच असतो व त्याचा अनुभव आपण घेत आहोत.

लोकप्रियता ओसरली

पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट पुरती ओसरली आहे. मुळात ही लाट खरी नव्हती. राहुल गांधी यांच्यामुळे मोदींना निवडणुका जिंकणे सोपे जाते असे बोलले गेले. आता चित्र बदलले आहे. मोदी यांच्यामुळेच राहुल गांधी यांना भाजपचा पराभव करणे सोपे जाईल. मोदी व त्यांच्या पक्षाने जे वाजंत्री ठेवले आहेत त्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. मोदी परदेशात जातात व त्यांचा जयजयकार करणारी विकतची गर्दी जमवतात, पण आता कोणत्याही पदावर नसलेले राहुल गांधी अमेरिकेत गेले. तेथील प्रमुख विद्यापीठाने त्यांचा संवाद ठेवला व लोकांनी त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली. गांधी हे कोणताही बडेजाव करीत नाहीत हे महत्त्वाचे. मोदी हे आपण गरीब असल्याचा आव आणतात व स्वत:च्या शानशौकीवर जनतेचा पैसा उधळतात. वीस हजार कोटींचे खास विमान त्यांनी जनतेच्या पैशांतून विकत घेतले. ते त्यांच्या दिमतीला आहे. ज्या देशातील 85 कोटी लोक सरकारच्या रेशनवर जगतात त्या देशाचे पंतप्रधान स्वत:साठी वीस हजार कोटीच्या विमानाची तजवीज करतात. हे असे फक्त युगांडा, लिबिया वगैरे देशांतच घडू शकते. भारतीय जनता पक्षाने जॅक डोर्सीला धमक्या दिल्या. देशातील मीडियाला धमक्या दिल्या. हे हुकूमशाहीचे लक्षण नसून विकृती आहे. ओडिशातील ट्रेन दुर्घटनेत 300 च्यावर लोक मरण पावले. त्या प्रेतांना झाकण्यासाठी तेथे ‘कफन’ उपलब्ध नव्हते, पण त्याच देशाचा पंतप्रधान रोज दिवसभरात लाखो रुपयांचे ‘सूट’ बदलत असतो. हे चित्र काय सांगते?

पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता पूर्ण रसातळाला गेली आहे. लोकप्रियतेच्या कृत्रिम लाटा निर्माण करण्याचा प्रयत्न यापुढे केला जाईल. मोदी यांनी देश व जनतेसाठी काय केले? असा प्रश्न इतिहासात विचारला गेला तर धार्मिक तणाव, दंगलींचे राजकारण व खोटेपणाचे राजकारण हे त्याचे उत्तर आहे. विरोधकांच्या टीकेस उत्तर देण्याचे साहस त्यांच्यात नाही व पत्रकारांच्या समोर उभे राहून ‘फैरी’शी सामना करण्याचे बळ त्यांच्यात नाही. पाकिस्तानला ते धमक्या देतात, पण चीनने सीमेवर नवा रन वे, लष्करी इमारत, बंकर, हेलीपॅड, रस्ते, पूल, रेल्वे, मिसाईल स्थळे निर्माण करून भारतापुढे आव्हान उभे केले आहे.

पंतप्रधान मोदी, जरा त्या सीमेवरही फेरफटका मारून या व त्यावरही बोला!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]