रोखठोक : जिब्रानचे अच्छे दिन!

71

rokhthokस्वर्गाच्या कल्पना राजकारणी पृथ्वीवर आणतात व साक्षात्कार झाल्याप्रमाणे सगळेच स्वर्ग मिळवण्याच्या रोजगार हमी योजनेवर जातात. ट्रम्प काय किंवा आपले मोदी काय, स्वर्गाचे स्वप्न सगळ्यांनीच दाखवले, पण खलील जिब्रान याने स्वर्गाचे दार ठोठावले.

सध्या देशात काहीच विशेष घडताना दिसत नाही. दिल्लीतही तोच तोच धुरळा पुन्हा उडत आहे. संसदेतील चित्र हे डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे दिसत आहे. निराशा वाढत आहे. निराशा झटकण्यासाठी संसदेच्या ग्रंथालयात गेलो. तेथील पुस्तकांवरील धूळही कोणी झटकायला तयार नाही. खलील जिब्रानचा ‘पैगंबराचा बगिचा’ सहज चाळत असताना हिंदीतले महाकवी केदारनाथ सिंह यांच्या निधनाची बातमी आली. काही प्रसंगाने दिल्लीतील कार्यक्रमांत मी त्यांना चार-पाच वेळा भेटलो. त्यांना भेटलो तेव्हा कुसुमाग्रजांची आठवण मात्र येत असे. तोच साधेपणा, तीच सात्त्विकता. शब्दांच्या करंगळीवर पृथ्वी तोलण्याचे त्यांचे सामर्थ्य. खलील जिब्रानमध्येही मला तेच सामर्थ्य दिसते. जिब्रानने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘‘सॉक्रेटीस, येशू, जन्दार्क (जोन ऑफ आर्क) आणि लिंकन या जगाला माहीत असलेल्या चार सुंदर विभूती आणि त्यांचाच वध करण्यात आला. त्या वेळी अंतरिक्षाच्या ओठांवर हास्य तरळले.’’ सामान्य जनतेच्या श्रद्धेवर ज्या तत्त्वांची मदार असते त्या तत्त्वांच्या प्रवर्तकांना करुण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. महात्मा गांधींच्या बाबतीत तेच घडले व खलील जिब्रानलाही त्याच प्रसंगांना सामोरे जावे लागले.

गूढवादी म्हणजे काय?
जिब्रानचा धर्म कोणता? तो मुसलमान होता, ख्रिश्चन की यहुदी? हे प्रश्न निरर्थक ठरतात. तो जीवनवादी (Life-List) होता. ‘मी एक जीवनवादी’ असे तो म्हणत असे. माणसाने जगावे. आनंदात जगावे हेच त्याचे तत्त्व. त्याची मैत्रीण बार्बारा यंग हिने ‘धिस मॅन फ्रॉम लेबेनॉन’ या सुंदर ग्रंथात याविषयी लिहिताना जिब्रानची आठवण लिहिली आहे-

‘‘कुणीतरी जिब्रानला एकदा विचारले, गूढवादी म्हणजे काय? तेव्हा तो हसला आणि म्हणाला, ‘फार गुप्त, रहस्यमय किंवा अचाट असे काही नाही. केवळ असा की जो आणखी एक पडदा दूर करतो.’

जिब्रानला साक्षात्कार होत असे व त्याच भारलेल्या अवस्थेत तो जगत असे. त्याला येशू दिसत असे. मग तो येशू म्हणून जगत असे. त्याच्या डोळ्यांत अनेकदा विलक्षण तेजस्वी चमक दिसत असे. यावरून त्याला काहीतरी विलक्षण आध्यात्मिक अनुभव येत असले पाहिजेत. त्याचे शब्द मोती होते, बकुळीची फुले की ठिणग्या होत्या? पण जे होते ते आजही ओंजळीत घेऊन पुढे जावे असेच आहेत. त्याने एकदा सांगितले, उत्तम नागरिक होणे म्हणजे काय? उत्तम नागरिक होणे म्हणजे आपले हक्क बजावण्यापूर्वी दुसऱ्या माणसाचे हक्क मान्य करणे. पण आपल्या हक्कांची जाणीव मात्र नेहमी ठेवणे होय. आता आपले हक्क म्हणजे काय? तर उच्चार आणि आचार यांबाबत स्वतंत्र असणे, पण त्याच वेळी हेदेखील समजून घेतले पाहिजे की आपले स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अवलंबून आहे.’’

कसदार आणि पल्लेदार
खलील जिब्रानची काही कसदार, पल्लेदार वाक्ये वाचताना मला राम गणेश गडकरींची आठवण झाली.
– कष्ट, गुंतागुंत आणि सुखसंवेदक वेदना यातूनच कवितेची निर्मिती होते नि तिच्यायोगेच हृदयाला शांतता लाभते.
– वस्तू जशा आहेत असे वाटते त्याविरुद्ध पुकार म्हणजेच प्रतिभा होय.
– ‘काल’ ही ‘आज’ची स्मृती होय नि ‘उद्या’ हे ‘आज’चे स्वप्न होय.
– मौन हे प्रेमाच्या रहस्यांपैकी एक रहस्य आहे.
– स्वतंत्रता अशी आहे की जिच्या चरणांपाशी मानवांनी सदासर्वदा युद्धेच केली आहेत. आणि सुंदरता अशी आहे की, जिच्यासमोर माणसे सगळ्यांबरोबर बंधुत्वाच्या भावनेने हस्तांदोलन करीत आली आहेत.
– तुम्ही-आम्ही पाच मिनिटे खरे तेच बोलावयाचे ठरवले तर आपले इष्ट मित्र आपणास सोडून जातील. दहा मिनिटे हे बोललो तर आपण हद्दपार केले जाऊ आणि पंधरा मिनिटे बोललो तर आपणाला फासावरच लटकावे लागेल.

स्वर्गाचे दार
जिब्रान हा सरळसोट होता. तो निराश नव्हता. त्याची कविताही निराश नव्हती. तो म्हणाला, ‘जर आकाशात एकच तारका असती, जर बगिचात उमललेले एकच पांढरे फूल असते आणि मोठ्या माळरानावर एकच झाड उगवले असते आणि केवळ एकदाच बर्फ पडला असता तर आपल्याला अनंताच्या उदारतेची ओळख पटली असती.’ त्याच्या कविता माणसांबरोबर ईश्वरालाही मार्ग देतात. ईश्वरासही ‘शहाण’पण शिकवणारा जिब्रान आज आपण विसरत चाललो आहोत. मोदी, ट्रम्प, नेतान्याहू वगैरे वगैरे ज्यांना ‘शहाणे’ वाटतात त्यांनी जिब्रानची खालील कविता मनापासून वाचायला हवी. ज्यांनी ‘अच्छे दिन’ म्हणजे स्वर्गाचे स्वप्न जमिनीवर दाखवले त्यांनी तर याची पारायणेच केली पाहिजेत. कविता प्रदीर्घ आहे. पण जिब्रानची ‘मन की बात’ म्हणून ती समजून घेतलीच पाहिजे.

“स्वर्गाचे दार ठोठावीत असतांना…’’

बाप्पा, माझ्या बाप्पा, आपले दार उघडा!
मी बरोबर उत्तम सोबत आणली आहे.
दार उघडा म्हणजे आम्हाला आत येता येईल.
आम्ही एकूण एक तुमच्या हृदयातील संतती आहोत.
उघडा, माझ्या बाप्पा, आपला दरवाजा उघडा.

बाप्पा, हो बाप्पा, मी तुमचा दरवाजा ठोठावीत आहे.
आजच माझ्यासमवेत क्रुसावर चढविलेला एक चोर
मी बरोबर आणला आहे.

असे असले तरी तो सौजन्यशील जीव आहे आणि तो तुमचा पाहुणा म्हणून राहील.
आपल्या लेकरांच्या भुकेसाठी त्याने एक भाकर चोरली.
पण मला माहीत आहे की त्याच्या डोळ्यांतील प्रकाश तुम्हाला आनंदित करील.

बाप्पा, अहो बाप्पा, आपले दार उघडा.
मी बरोबर एक स्त्री आणली आहे, जी प्रणयाने बेहोश झाली होती,
आणि लोक तिला दगडधोंडे मारू लागले,
तेव्हा तुमच्या महान हृदयाची जाणीव असल्यामुळे मी त्यांना रोखले.
तिच्या नेत्रांतील नीलकमले अजून कोमेजली नाहीत,
नि वसंत अजून तिच्या ओठांवर रेंगाळत आहे.
तिच्या ओंजळीत अजून तुमच्या ऋतूतील समृद्धी आहे,
आणि आता ती मजबरोबर तुमच्या घरी येत आहे.

बाप्पा, हो बाप्पा, आपले दार उघडा.
मी तुमच्याकडे एक खुनी इसम आणला आहे.
संध्येची छटा मुद्रेवर असलेला एक माणूस आहे तो.
त्याने आपल्या कच्च्याबच्च्यांसाठी पारध केली.
पण वेडेपणाने पारध केली.
सूर्यनारायणाचा ऊबदार प्रकार त्याच्या बाहूंवर होता,
तुमच्या वसुंधरेतील रस त्याच्या नसांतून वाहत होता.
आपल्या पोटच्या गोळ्यासाठी मांसाची इच्छा झाली त्याला,
जिथे मांस निषिद्ध होते तिथे.
पण त्याचे धनुष्य अन् बाण आकर्ण ओढलेली होती आणि त्याने नरहत्या केली.
नि त्यासाठीच त्याला माझ्यासह यावे लागले.

बाप्पा, हो बाप्पा, आपले दार उघडा.
मी बरोबर एक दारूबाज आणला आहे;
या जगाहून वेगळ्या जगासाठी तहानलेला तो माणूस आहे.
तुमच्या भोजनपंगतीत प्याला घेऊन तो बसे,
त्याच्या उजव्या बाजूला असे एकलेपणाची आग,
नि डाव्या बाजूला असे उजाडपणा.
त्याने एकाग्रतेने त्या प्यालात पाहिले.
तो त्यात त्याला मदिरेमध्ये तुमच्या तारका प्रतिबिंबित झालेल्या दिसल्या.
आणि त्याने खूप मद्य झोकले, कारण त्याला तुमच्या स्वर्गात यावयाचे होते.
आपल्या पवित्र आत्म्याची त्याला प्राप्ती झाली असती,
पण चालताना तो वाट चुकला नि खाली पडला.
बाप्पा, मी त्याला गुत्त्याच्या पुढे पडलेला उठवला आणि अर्धा मार्ग संपेपर्यंत हसत-हसत तो मजबरोबर आला.
आता माझ्या संगतीत असूनही तो अश्रू ढाळीत आहे.
कारण कृपेमुळे त्याला वेदना होत आहेत.
आणि म्हणूनच मी त्याला तुमच्या दाराशी आणला आहे.

बाप्पा, हो माझ्या बाप्पा, दार उघडा.
मी बरोबर एक जुगारी आणला आहे.
आपल्या रुपेरी चमच्याचा सोनेरी सूर्य करू पाहणारा माणूस आहे तो.
आणि तुमच्याच कोणा कीटक-कोळ्याप्रमाणे
तो जाळे विणी नि वाट पाही
की स्वतःहून लहान अशा माशीची शिकार करू पाहणारी कोणी माशी येते की काय.
पण सर्वच जुगाऱयांप्रमाणे यानेही सर्व गमावले,
आणि शहरातील रस्त्यांवरून भटकताना त्याला पाहिले
तेव्हा मी त्याच्या डोळ्यात निरखिले,
नि मला समजले की याच्या रुप्याचे सोने झालेले नाही,
आणि याच्या स्वप्नांचा धागा तुटून गेला आहे.
तेव्हा मी त्याला माझ्यासोबत बोलावले.
मी त्याला म्हटले, “आपल्या भाईबन्दांचे चेहरे पाहा नि माझा पाहा.
“चल आमच्याबरोबर, आम्ही जीवनशैलीपलीकडील सुजला, सुफला भूमीकडे जात आहोत.
“चल आमच्याबरोबर.’’
आणि तो आला.

बाप्पा, माझ्या बाप्पा, तुम्ही दार उघडले आहे!
हे माझे सोबती पाहा.
मी त्यांना दुरून आणि जवळून जमवून आणले आहेत;
पण ते भयभीत झाले होते नि माझ्याबरोबर यायला तयार नव्हते.
शेवटी मी त्यांना तुमच्या प्रतिज्ञेचा नि तुमच्या प्रसादाचा बोध दिला.
आता तुम्ही आपला दरवाजा उघडला आहे
आणि माझ्या सोबत्यांना आत घेतले आहे नि त्यांचे स्वागत केले आहे,
तेव्हा आता पृथ्वीवर असे पातकी उरलेच नाहीत
की ज्यांना तुमच्यापासून आणि तुमच्या अनुग्रहापासूनही दूर ठेवले असेल.
आता नरक राहिला नाही की रसातळही उरले नाही;
केवळ तुम्ही नि स्वर्ग उरला आहां नि पृथ्वीवर आहे

‘मानव’ – तुमच्या पुरातन हृदयांतील ती संतती.

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल-  [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या