रोखठोक – चंद्रावरचा खरा स्वर्ग! लेह-लडाखचा आत्मनिर्भर भारत!

आपला देश कसा आहे, हिमालय भव्य का आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने लेह-लडाखच्या भूमीवर एकदा तरी पाय ठेवलेच पाहिजेत. सीमेवर चीन आहे. चीन लडाखमध्ये घुसला, पण लडाखी जनतेने संयम सोडला नाही. लडाखी जनता पूर्णपणे हिंदुस्थानच्या बाजूने आहे. आत्मनिर्भर हिंदुस्थानचा आत्मा लडाखच्या भूमीवर हिमालयाच्या कड्या-कपाऱ्यांत वावरतो आहे. लडाखच्या प्रत्यक्ष दौऱ्यावर आधारित ‘रोखठोक’.

सोमवार ते गुरुवार लडाखच्या शांत आणि आध्यात्मिक भूमीवर होतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे, असे आपण सांगतो तेव्हा केव्हातरी भारतीय म्हणून आपली पावले लडाखच्या भूमीवर लागायलाच हवीत. कश्मीर हे भारताचे नंदनवन असेल तर लेह- लडाख हा चंद्रावरचा खरा स्वर्ग आहे. त्या स्वर्गात विहार करताना आपण काही काळासाठी चिंता व समस्या विसरतो. देशात काय, जगात इतकी शांतता कोठे नांदत नसेल. चीनच्या सीमेवरचा हा प्रदेश. चिनी ड्रगनची वाकडी नजर या प्रदेशावर सदैव आहे. तरीही येथे शांतता नांदते. आज केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचा 38 हजार वर्ग किलोमीटर भूभाग चीनने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला. चीनने तिबेट गिळले तसे लडाखही त्यांना गिळायचे आहे, पण लडाखच्या राष्ट्रभक्त जनतेमुळे चीनला ते शक्य होत नाही. चीनचे सैन्य गलवान खोऱ्यात घुसले, तेथे हिंदुस्थानी सैन्याशी त्यांची झडप झाली. कर्नल बाबूसह आमचे 40 सैनिक त्या झडपीत मारले गेले. गलवानच्या फिंगर पाच परिसरात चीनचे सैन्य आहे व तो भागही आता वादग्रस्त झाला. मार्ग निघावा म्हणून वाटाघाटी सुरू आहेत. चीन एकदा घुसला की तो बाहेर निघत नाही. लडाखमध्ये तो घुसलाच आहे. ज्या गलवान खोऱ्यात चीन आहे, तेथे लडाखमधील मेंढपाळ व भटके लोक नेहमी जा-ये करीत, मात्र आता त्यांना तेथे जाण्यापासून भारतीय सैन्याने रोखले आहे. ‘‘हे असे केल्याने आपण आपलाच प्रदेश सोडल्यासारखे होईल. आम्ही वर्षानुवर्षे या भागात वावरतो. चिनी घुसले म्हणून आम्हाला रोखू नका, ही जमीन आमची आहे. वहिवाट सुरूच ठेवा,’’ असे लडाखी जनतेचे म्हणणे आहे. यावर संरक्षण दलाचे म्हणणे असे की, ‘‘अशाने वाद वाढेल व शांतता चर्चेस खीळ बसेल!’’ ते काही असले तरी चीनचे सैन्य लडाखमध्ये आहे व पॅन्गाँग लेक परिसरात त्यांनी पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. चीनचा स्वभाव आक्रमक व घुसखोर. पुन्हा त्यांचे लोक फक्त भाषणे देत नाहीत, ते शांतपणे कृती करतात. चीन व भारतात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आजही नाही. त्यामुळे ते अरुणाचलपासून लडाखपर्यंत भूभागावर दावा करीत सुटले आहेत. लडाखची 38 हजार वर्ग किलोमीटर जमीन त्यांनी ताब्यात घेतली. शिवाय 1963 मध्ये ‘चीन-पाकिस्तान’ सीमा समझोत्यानुसार घटनेच्या सहाव्या शेड्यूलमध्ये त्यांना आणले नाही. तसे केले तर स्थानिकांना रोजगारात, जमीन व्यवहारात कायदेशीर संरक्षण मिळेल. आज लडाखला स्वतंत्र हिल कौन्सिल आहे. म्हणजे आपली महानगरपालिका. 60 सदस्य त्यात आहेत. त्यातील 10 जणांना मंत्र्यांचा दर्जा आहे. तरीही येथे केंद्रशासित राज्य म्हणून विधानसभा अस्तित्वात यावी ही येथील लोकांची मागणी आहे. राज्य झाले की, किमान 25 हजार सरकारी नोकऱ्या निर्माण होतील, लोकांचा सहभाग वाढेल. ही मागणी चुकीची नाही.

मराठी सूत्रधार

लडाखची प्रशासकीय सूत्रे संपूर्णपणे मराठी माणसाच्या हातात आहेत. लेह विमानतळावर उतरल्यापासून त्याची प्रचीती येते. लेह विमानतळाची सुरक्षा ज्यांच्या हाती आहे, ते सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर संकेत गायकवाड हे महाराष्ट्राचे. लेह-लडाखचे पोलीसप्रमुख डीआयजी सतीश खंदारे व लेहचे कलेक्टर श्री. ससे हे दोन्ही महाराष्ट्राचे सुपुत्र. लडाखच्या सीमेवरही आज राष्ट्रीय रायफल आहे. त्यात मराठा रेजिमेंटचे सैनिक जास्त आहेत. लेह-लडाखमध्ये पर्यटकांची गर्दी असते. त्यात सर्वाधिक पर्यटक हे महाराष्ट्राचे व नंतर गुजरातचे असतात. लडाखचे अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. महाराष्ट्राचे पर्यटक सगळ्यात जास्त येतात. ते सर्व प्रकारचे वैद्यकीय प्रोटोकॉल पाळतात व मुख्य म्हणजे सढळ हस्ते खर्च करतात. मराठी पर्यटकांविषयी लडाखच्या व्यावसायिकांना प्रचंड आदर आहे. लडाखचे लोक बुद्धाच्या विचारसरणीचे. ते शांतताप्रिय जीवन जगतात. त्यामुळे लडाखमध्ये पोलीस व्यवस्था आहे, पण पोलिसांना फारसे काम दिसत नाही. गुन्ह्याचे प्रमाण जवळ जवळ नाहीच, असा एक प्रदेश भारताच्या नकाशावर आहे व तो प्रदेश देशाच्या दृष्टीने उपेक्षित आहे हे दुर्दैव! लेह-लडाखमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर सैन्य छावण्या आहेत, पण कश्मीरच्या तुलनेत ते कमीच आहे. लडाखची जनता पूर्णपणे हिंदुस्थानच्या बाजूने आहे. हा फरक समजून घेतला पाहिजे. ज्या प्रदेशाची जनता राष्ट्रभक्त असते, तेथे शत्रूला पाय रोवणे सोपे नसते. लडाखच्या बाबतीत ते खरे ठरले. हिमालयीन प्रदेशाचा मुकुट म्हणून लडाखचा उल्लेख होतो. भव्य पहाड, त्यावर सदैव बर्फाची चादर, थंड बोचरी हवा, तरीही जमिनीत पाणी नाही व पाण्यासाठी जनतेला संघर्ष करावा लागतो हे चित्र आहे. बर्फाचे डोंगर दिसतात, पण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य हा विरोधाभास आहे. आज लेह-लडाखच्या भूमीवर ‘चहा’ सोडून सर्व काही पिकवले जाते व सैनिकी संस्थांची त्यांना मदत होते. चीनशी संघर्ष एका बाजूला, पण लडाखच्या जनतेने सैन्याला आपले मित्र मानले आहे.

हिमालयाची भव्यता

हिमालयास आपण भव्यतेची उपमा का देतो हे त्याच्या अजस्र पर्वतरांगांतून प्रवास करताना स्पष्ट होते. हिमालयीन पर्वतांच्या रांगा कापत होणारा प्रवास रोमांचक आहे. लडाखच्या उत्तरेस चीन, तर पूर्वेस तिबेटच्या सीमा आहेत. लेहकडून लडाखकडे जाताना समुद्रसपाटीपासून 18 हजार फुटांवरचा प्रवास छाती दडपून टाकतो, ऑक्सिजनची पातळी कमी होते व अनेकदा त्रास सुरू होतो. या दुर्गम पहाडात आपल्या सैनिकांच्या चौक्या जागोजागी दिसतात. हिमालय पर्वतास फोडून ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ने रस्ते केले, पूल बांधले. जागोजागी हे अवघड काम दिसते. तेथे आपले सैनिक उभे आहेत. रस्त्यांचे निर्माण सुरू आहे व म्हणून आपला देश सुरक्षित आहे. लडाखच्या टोकाला पँगॉन्गचा प्रसिद्ध तलाव. लेहमधून तेथे पोहोचण्यासाठी पाच तास लागतात. शुभ्र निळे पाणी कमालीचे पारदर्शक. संध्याकाळी ते पाणी फक्त पाणी राहत नाही, चंद्रप्रकाशात जणू चांदण्यांचा प्रवाह वाहतो. त्याचा आस्वाद घेण्यासाठी हजारो पर्यटक तळ्याकिनाऱ्यावरील तंबूत राहतात. आपला देश किती नयनरम्य व सुखावह आहे हे पँगॉन्ग लेकवर उभे राहिल्यावर लक्षात येते. ‘हनुमान चालिसा’पासून ज्ञानवापी मशिदीपर्यंतचे सगळे वाद विसरून जावे असे हे नयनहारी दृश्य असते. अशा सुंदर देशाला आपण विनाशाकडे ढकलत आहोत हे लडाखच्या भूमीवर पाय ठेवताच जाणवते. सिंधू नदी लडाखमधून वाहते. 1947 साली भारत-पाक युद्धानंतर सिंधू नदीचा हा एकमेव हिस्सा लडाखमधून वाहतो. तेथे एक सिंधू घाट निर्माण केला व सिंधू परिक्रमेचे आयोजन नियमित केले जाते. हे सर्व त्या बुद्धभूमीत घडताना मी पाहिले. बुद्धाचा हा प्रदेश, पण तेथे सगळ्यांना धर्मस्वातंत्र्य आहे. हिमालयाच्या कुशीत बुद्धाची शांतता नांदते आहे, पण सीमेवरील दुसरा बौद्ध देश चीन हातात बंदुका व बॉम्ब घेऊन आपल्याविरुद्ध उभा ठाकला आहे. त्यामुळे बुद्धाच्या भूमीवर शांतता नांदावी म्हणून हिंदुस्थानची सशस्त्र सेना उभीच आहे.

वांगचूकची शाळा!

सोनम वांगचूक या तरुणाने लडाखच्या भूमीवर एक शैक्षणिक मॉडेल निर्माण केले. त्या शाळेस मला भेट देता आली. त्या शाळेचा बोलबाला आज जगभर आहे. सोनम वांगचूक ही आज लडाखची ओळख आहे. देशभरात अनेक शिक्षणसम्राटांनी आपली साम्राज्ये उभी केली, पण लडाखच्या एका दुर्गम भागात वांगचूकने उभ्या केलेल्या SECMOL (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) ने या सगळ्या साम्राज्यांवर मात केली. या शाळेचा पसिर आता एक ‘इको’ गावाच्या स्वरूपात विकसित झाला आहे. येथे शिक्षण व्यवस्थेने नाकारलेल्या, दहावीत नापास झालेल्यांनाच प्रवेश दिला जातो व या नाकारलेल्या विद्यार्थ्यांना घडवले जाते. ही पारंपरिक शाळा नाही. राजकीय, सामाजिक व्यवहार, पर्यावरण, संस्कृती, कौशल्य विकास, नीतिमूल्य, माणुसकी आणि उपजत प्रतिभेस पुढे नेणारे शिक्षण दिले जाते. संपूर्ण शैक्षणिक गाव सौर ऊर्जेवर चालवले जाते. सोनम वांगचूकने पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारे अनेक शोध लावले व त्याचे विद्यार्थी ते कार्य पुढे नेत आहेत. सोनम व त्याच्या विद्यार्थ्यांनी बर्फ व थंडीपासून संरक्षण करणाऱ्या ‘सोलर हिटेड’ (Solar Heated) तंबूंचा विकास केला व लडाखच्या सीमेवर ‘उणे 20’ तापमानात देशाचे रक्षण करणारे सैन्य याच तंबूंचा वापर करीत आहेत. लडाखची ही शाळा आत्मनिर्भर पिढी घडविण्याचे काम करीत आहे. हे शाळेचे संकुल म्हणजे एक स्वतंत्र देश आहे. येथे स्वतःची संसद आहे, मंत्री आहे. एका आत्मनिर्भर देशाला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे उत्पादन हा विद्यार्थ्यांचा देश करतो. या देशाची स्वतंत्र वेळ आहे. स्वतःच्या ‘Time Zone’ वर हा देश चालतो. भविष्यात राष्ट्राचे नेतृत्व करणारे तरुण या शाळेतून बाहेर पडतील. हिमालयातील बर्फ, त्या बर्फात जगणारी माणसे व त्या माणसांत भरलेली माणुसकी व राष्ट्रभक्ती हाच देशाचा आत्मा आहे. लेह-लडाखच्या भूमीत मला हिंदुस्थानचा खरा आत्मा दिसला!

एकदा तरी प्रत्येकाने जावे व भव्य हिमालयात शांतता अनुभवणारा हा आत्मा पहावा!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]