रोखठोक – बलवंतांना नियम नाहीत!

7847

rokhthokजगाच्या इतिहासात इतका वाईट काळ कधीच आला नव्हता. बडे बडे हुकूमशहादेखील विषाणूला घाबरून घरीच बसले आहेत. ‘कोरोना’ने डोळ्यावरचे पडदे दूर झाले आहेत्. बलवंतांना नियम नाहीत हे वाधवान प्रकरणी दिसले व महाराष्ट्रातील एक पत्रकार बातमीमुळे गर्दी जमली म्हणून तुरुंगात गेले. हिंदुस्थान हा गर्दीचा देश. पण ‘गर्दी’ जमवणे आता गुन्हा ठरला, परिवर्तन सुरू आहे.

आपल्या देशाला ‘कोरोना’ नक्षत्र लागून एक महिना होत आला. हे नक्षत्र असे विचित्र की लोकांनी घराबाहेर पडू नये. पडले तरी एकमेकांना भेटू नये. जगाच्या इतिहासात इतका वाईट काळ कधीच आला नव्हता. माणूस माणसाला घाबरत आहे. आपल्या मुलांना, मातापित्यांना स्पर्श करायला घाबरत आहे. स्वतःच्याच सावलीला घाबरणे म्हणजे काय याचा अनुभव या कोरोनाने दिला. भेदरलेल्या हुकूमशहांचे दर्शन या काळात होत आहे. ज्या हुकूमशहाने आपल्या स्वार्थासाठी लाखो लोकांना ठार केले ते हुकूमशहा एका विषाणूच्या भयाने दरवाजे बंद करून बसले आहेत. काही राज्यकर्त्यांचे फावले आहे. कोरोनामुळे काहीच करणे शक्य नाही असे सांगून जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने जग बदलायची प्रक्रिया सुरू झाली. कोरोनानंतर निर्माण होणारे जग वेगळे असेल. त्या जगात अहंकार, श्रीमंतीचा मस्तवालपणा नष्ट झालेला दिसावा. या काळात दोन प्रमुख प्रकरणे महाराष्ट्रात घडली. उद्योगपती वाधवान व त्यांचे 23 जणांचे कुटुंब ‘लॉकडाऊन’चे सर्व नियम मोडून खंडाळय़ावरून महाबळेश्वरला गेले. एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचे पत्र त्यांच्या दिमतीला होते. ‘बलवंतांना नियम नाहीत. नियम दुबळय़ांसाठी असतात’ असे महाभारतात सांगितले आहे. ते वाधवान प्रकरणात आज दिसले. हा एक गमतीदार विचार आहे. सारी बंधने दुबळय़ांनाच पाळावी लागतात. बलदंड लोक सारे नियम धाब्यावर बसवतात. त्यांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, पण वाधवानसारख्यांचे शेवटी वाकडे झाले. देशाच्या पत्रकारितेचा एखादा दिवा आजही मिणमिणता आहे आणि प्रशासनात आजही चार चांगल्या विचारांचे खांदेकरी आहेत. त्यांच्या खांद्यावर हे जग तरले आहे. वाधवान प्रकरण यापैकी काहींनी लावून धरले. त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. हे प्रश्न विचारणारे पत्रकारही शेवटी एका चुकीमुळे तुरुंगात गेल्याची घटना महाराष्ट्रात घडली. कोरोना आणखी काय काय पाहायला लावणार आहे?

bandra-crowd-resize

दिल्लीचा अदृश्य हात
वाधवान व त्यांचे कुटुंब खंडाळय़ाच्या एका बंगल्यात लपून बसले होते. त्यातील कपिल वाधवान हे ‘यस बँक’ प्रकरणातले आरोपी. आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात त्याला अटक झाली व नंतर तो जामिनावर सुटला. ‘ईडी’ला तो आणखी एका प्रकरणी चौकशीसाठी हवा होता. पण तो फरारी झाला. अशा आरोपीच्या नावाने शिफारसपत्र देण्याचा मूर्खपणा एक आयपीएस अधिकारी करतो. हा फाजिल आत्मविश्वास ठरला. हे पाप पचले नाही व एका रात्रीत पापाचे बुडबुडे फुटले. त्यानंतर वाधवान नक्की कोणाचे? असा राजकीय कलगीतुरा रंगला. वाधवान प्रकरण घडले खंडाळा ते महाबळेश्वर, पण वाधवान प्रकरणाची बातमी ‘ब्रेक’ झाली दिल्लीतून. त्यामागचे रहस्य राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे. दिल्लीच्या वर्तुळातले अदृश्य हात महाराष्ट्रात काम करीत आहेत व लहानसहान घडामोडीतून सरकारला अडचणीत आणावे असे त्यांचे प्रयोजन आहे काय?

गोव्यातले बाखिया प्रकरण
वाधवान प्रकरण हे देशातले पहिले प्रकरण नाही. मोठय़ांसाठी राजशकट अनेकदा हलताना दिसला आहे. 1982 साली गोव्याच्या अग्वाद तुरुंगातून स्मगलर सुकूर नारायण बाखिया सदेह दुबईस पळाला होता व त्याला घेऊन जाण्यासाठी एक खास हॅलिकॉप्टर अग्वाद किल्ल्यावर उतरले व त्या ‘पुष्पक’ विमानात बसून ‘महात्मा’ बाखिया सरळ पळून गेले व दुबईत पोहोचले. हे बाखियासुद्धा तेव्हा सर्वच राजकीय पक्षांना निधी देत. बाखिया तेव्हा हजार किंवा लाखांत देत असतील. वाधवान यांनी कोटय़वधी दिले व ते सर्व रेकॉर्डवर आहे. पैशाने काहीही विकत घेता येते या भ्रमाचा भोपळा शेवटी मात्र फुटलाच. कोरोनाच्याच भीतीने हे वाधवान खंडाळय़ातून महाबळेश्वरला पोहोचले व तेथे एका साध्या नायब तहसीलदाराने त्याची मस्ती उतरवली. देशाला दुर्बल करणाऱया शक्तींपासून लोकांनी दूर राहिले पाहिजे! असे उपदेश राजकारणी करतात तो लोकांसाठी, प्रजेसाठी. त्याप्रमाणे सामान्य माणसाने वाधवानसारख्यांपासून दूर राहायचे व राज्यकर्त्यांनी मात्र त्यांच्या पाठिशी राहायचे. सद्गुणांनांही दुर्गुण मानणारे आजचे जग आहे. याचे असे अनेक पुरावे आहेत. पुन्हा जे अशा गुन्हेगारांचे आश्रयदाते कालपर्यंत होते तेच अशा गुन्हय़ांवर जोरात बोलतात तेव्हा गंमत ठरते!

rahul-kulkarni-new

पत्रकारास अटक
महाराष्ट्रात वाधवान प्रकरण घडले तसे एबीपी वृत्त वाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या अटकेचे प्रकरण घडले. पत्रकारांना सरसकट अटक करण्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही. पुरोगामी महाराष्ट्राने सदैव टीकेचा आदर केला. सगळय़ांत जास्त टीकेचे घाव श्री. शरद पवार यांनी झेलले. अनेक निराधार आरोपांच्या चिखलफेकीतही पवारांचा संयम ढळला नाही व राज्यकर्ते असतानाही पत्रकारांवर कारवाई होऊ दिली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सतत टीकेला तोंड दिले. याउलट प. बंगाल, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत मुख्यमंत्र्यावर टीका करणारे, सरकारविरोधी लिखाण करणारे पत्रकार तुरुंगात गेले. मोदींवर टीकात्मक लिहिलं म्हणून आधीच्या सत्ताकाळात लोकांवर कारवाया झाल्याची उदाहरणे देता येतील. पण राज्य सरकारचे म्हणणे असे की, पत्रकार कुलकर्णींवर कारवाई करण्यात आली ती टीका झाली नाही म्हणून नाही तर ‘युद्ध’सदृश स्थितीत चुकीची बातमी देऊन गोंधळ उडवला म्हणून केली. ही सरळ सरळ पोलिसांची कारवाई आहे. परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे गाड्या सोडणार अशी बातमी रेल्वेच्याच एका पत्रकाचा आधार घेऊन देण्यात आली. ती बातमी दिल्यानंतर सात तासांनी फक्त वांद्रे स्थानकावर लोक जमले. आपापल्या गावी जायला निघालेले लोक रिकाम्या हातानेच आले हे विशेष. ते मुख्य रस्त्याने पोहोचले नाहीत तर रेल्वे रुळावरून नियोजनबद्ध रितीने चालत पोहोचले. म्हणजे या गर्दी जमवण्यामागे एक सूत्र होते व त्यामागे कोणीतरी नियंत्रण करीत होते. ज्या रेल्वेच्या पत्रकावरून वृत्तवाहिनीने बातमी केली त्याच पत्रकावरून दिल्ली व इतर राज्यांतील सर्वच वर्तमानपत्रांनी बातम्या दिल्या व तेथील रेल्वे स्थानकांवर त्यामुळे गर्दी जमा झाली नाही. त्यामुळे राहुल कुलकर्णी यांच्यामुळे गर्दी जमली असे ज्यांना वाटते त्यांनी या प्रकरणी आरोपी क्रमांक एक देशाच्या रेल्वे मंत्रालयास केले पाहिजे. पुन्हा या निमित्ताने भाजपला मानणाऱ्या पत्रकारांनी हिंदू-मुसलमान आग लावण्याचा खेळ दिल्लीत बसून केला. धार्मिक भावना बिथरवून महाराष्ट्रास आग लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या दोन्ही दिल्लीकरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवायला हवी.

राहुल कुलकर्णी यांना अटक झाली व दुसऱ्या दिवशी ते सुटले. न्यायालयाने त्यांना सरळ जामीन दिला. या निमित्ताने पत्रकारांतील दुफळी समोर आली. त्यापेक्षा वृत्तवाहिन्यांच्या आपापसातील संघर्षाचे दर्शन घडले. इलेक्ट्रॉनिक मीडियाने अलीकडच्या काळात प्रतिष्ठा गमावली आहे. सध्या जे सुरू आहे ते फक्त खालच्या पातळीवरचे मनोरंजन. याउलट वृत्तपत्रावर आजही लोकांचा भरवसा आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने आत्मपरिक्षण करावे असा धडा राहुल कुलकर्णी प्रकरणाने दिला आहे. टिळक, आगरकर, अत्रे, ठाकरे हे पत्रकार होते. त्यांच्या महाराष्ट्रात पत्रकारांनी विश्वासार्हता गमावली म्हणून अटकेच्या घटना पुन्हा पुनः घडू नयेत. वाधवान प्रकरणाने पोखरलेल्या प्रशासनाची बाजू समोर आली. पत्रकार अटकेने महाराष्ट्राच्या महान परंपरेवर धुरळा उडाला. धुळफेकीतून हे घडले. राज्यात ‘ठाकरे सरकार’ आहे म्हणून बोटावर निभावले इतकेच!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या