सामना रोखठोक – तोकड्या तलवारीची लढाई!

rokhthokमहाराष्ट्रातील सरकार स्थापनेची लढाई झाली. त्यास 28 नोव्हेंबरला एक वर्ष झाले. हे सरकार टिकणार नाही असे पहिल्याच दिवशी ज्यांना वाटले ते वर्षपूर्तीनंतरही सरकार पाडायचे प्रयोग करीत आहेत. सरकार तीन पक्षांचे आहे. त्यात नाराजी आहे, पण तरीही ते टिकेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकडय़ा तलवारीची लढाई होती.

महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ म्हणजे महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. 28 नोव्हेंबरला (2019) श्री. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. संपूर्ण शिवतीर्थ त्या वेळी माणसांनी भरगच्च झाले. त्या गर्दीत शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थकही मोठय़ा प्रमाणात होते. लाखो लोक शपथविधीचा सोहळा वृत्तवाहिन्यांवर पाहत होते व जनतेत आनंदाचेच वातावरण होते. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची निवडणूकपूर्व युती असूनही आणि दोघांचे मिळून 170 ‘पार’ची बेरीज होऊनही सरकार वेगळय़ाच तिघांचे बनले, जे तिघे निकालाआधी एकमेकांचे राजकीय वैरीच होते. तरीही त्या तिघांचे सरकार बनले. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर टिकले हे महत्त्वाचे. भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे व इतर मिळून 112 आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सरकार अनैसर्गिक आहे. अनैसर्गिक सरकार लवकरच पडेल असे त्यांचे भाकीत आहे, पण ते कसे पडेल, कोण पाडेल हे सर्व गुप्त कारवाया व राष्ट्रीय तपास यंत्रणांवर अवलंबून आहे. ‘ईडी’सारख्या संस्थांनी स्वतःचे सत्त्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी महाराष्ट्राचे सरकार टिपून राहील हे मी जबाबदारीने सांगतो.

अनैसर्गिक म्हणजे काय?

महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे श्री. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. जोपर्यंत एखादे सरकार टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचेच असते. सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱयांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहेच. या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील मी एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यामुळे सुरुवातीला अनैसर्गिक वाटणारे सरकार आज पूर्ण नैसर्गिक झाले आहे हे मी प्रत्यक्ष पाहतोय. महाराष्ट्रावर कोविड, पूर, निसर्ग वादळासारखी व लॉक डाऊनसारखी संकटे नसती तर वर्षभरात राज्याचे चित्र बदलताना दिसले असते. अटल बिहारी वाजपेयी यांनी 33 भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’ सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे, हा साधा प्रश्न आहे. निवडणुकांचे निकाल ते शपथविधी हा 37 दिवसांचा रोमांचक प्रवास होता. या सर्व दिवसांतील बहुतेक सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राबरोबर यात दिल्लीच्याही घडामोडी आहेत. सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, सोनिया गांधी या प्रमुख पात्रांनी वठवलेल्या भूमिका महत्त्वाच्या. या सगळय़ात पंतप्रधान मोदी यांची भूमिका मूक चित्रपटातील नायकाची होती व भाजपचे सरकार यावे म्हणून श्री. अमित शहा दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते.

23 नोव्हेंबरला पहाटे राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाला. हा रोमांचक, थरारक, तितकाच रहस्यमय चित्रपट ‘गोल्डन ज्युबिली’ चालेल असे दुपारी बारा वाजेपर्यंत अनेकांना वाटत होते, पण पहिल्याच शोला हा चित्रपट कोसळला व त्यानंतर खेळ जास्तच रंगला. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार व अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता.

नेहरू सेंटरमधील ठिणगी

असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार व माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ‘‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?’’ तेव्हा ‘‘आमचा आकडा 170 आहे’’ असे मी सांगितले. त्या 170 आकडय़ाची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे श्री. पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला. यानंतर श्री. अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱया दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळय़ात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ‘‘तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.’’ मी त्याक्षणीही सांगितले, ‘‘चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.’’ हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाटय़’ तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. श्री. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला श्री. पवार दिसले नाहीत. ‘‘भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत’’ हे त्यांचे सांगणे होते. ‘‘लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे’’ हे त्यांनी मला सांगितले. याच काळात शेतकऱयांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे. मोठे अपघात दुर्दैवाने पहाटे चालक साखरझोपेत असतानाच होतात!

सत्य काय आहे?

‘झी 24 तास’ वृत्तवाहिनीचे संपादक आशीष जाधव यांनी मुलाखतीत मला प्रश्न विचारला, ‘‘सत्तांतरास एक वर्ष झाले. 36 दिवसांच्या सत्तांतर नाटय़ावर अनेकांनी पुस्तके लिहिली. तुम्ही सगळय़ा घटनांचे साक्षीदार आहात. तुम्ही पुस्तक कधी लिहिणार?’’ यावर मी सांगितले की, ‘‘आतापर्यंत 36 दिवसांच्या सत्तानाटय़ावर चार पुस्तके आली आहेत. मी यावर पुस्तक लिहिले तर आधीच्या चार पुस्तकांत जे ‘सत्य’ सांगितले त्यावर पाणी पडेल.’’ यापैकी एका पुस्तकात असे लिहिले की, संजय राऊत व शरद पवार यांची गुप्त भेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झाली. मी पवारांची वाट पाहत ‘मॅकडोनाल्डस्’समोर गाडीत बसून होतो. नंतर पवारांची गाडी आली. मी त्यात बसलो व सरकार स्थापनेबाबतची चर्चा करत पवारांच्या गाडीतून पुण्यापर्यंत गेलो. हे कसे शक्य आहे? श्री. पवार यांना मी अनेक वर्षे उघडपणेच भेटतो आहे. निकाल लागत होते त्या दिवशीही मी त्यांच्या निवासस्थानी उघडपणे भेटलो. संपूर्ण मीडियाने ते दाखवले. अमित शहांच्या घरातील मध्यरात्रीची बैठक आणि पवार व माझी एक्सप्रेस वेवरील चर्चा हे व अशा अनेक घटना म्हणजे सरकार स्थापनेच्या नाटय़ाची पटकथा नव्हे. खरी पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहील!

सरकार पाडण्याचे प्रयोग

हे सरकार किती टिकेल यावर आजही प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्यांनी अमित शहा यांचे एक प्रगल्भ विधान समजून घेतले पाहिजे. ‘आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही.’ हेच सत्य आहे. यापैकी एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मध्य प्रदेश पिंवा राजस्थान पॅटर्न वापरायचा हे ठरवले, पण राजस्थान पॅटर्न फसला व मध्य प्रदेशात ‘सिंधिया’ पॅटर्न यशस्वी झाला. अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळय़ात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल. एखाद्या नटीचे बेकायदेशीर बांधकाम पाडणे हे सध्याच्या काळात बेकायदेशीर ठरत आहे, तेथे बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे असे बोलणे गुन्हा ठरू शकतो. अशा प्रवृत्तीविरोधात महाराष्ट्र म्हणून लढावे लागेल. सरकार स्थापन होत असताना शिवसेनेचा एक आमदार भेटायला आला. फक्त 55 आमदार असताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे वारंवार सांगणे हास्यास्पद ठरेल. तुम्ही अडचणीत याल, असे त्याने कळकळीने सांगितले. त्याला उठताना एक लहानशी गोष्ट सांगितली ती शेवटी देतो व विषय संपवतो. स्पार्टन इतिहासात अशी एक गोष्ट आहे की, एकदा रणांगणावर निघताना सेनापतीने सैनिकांना जवळ बोलावून त्यांना आपल्या हाताने तलवारींचे वाटप केले. त्यातील एका सैनिकाच्या हाती तलवार गेली. ती दोन बोटे तोकडी होती. हे पाहून सैनिक निराश झाला. सेनापतीकडे जाऊन त्याने तक्रार केली. ‘‘इतरांपेक्षा मला तलवार आखूड मिळाली आहे.’’ तेव्हा सेनापती हसून म्हणाला, ‘‘गडय़ा, तलवार दोन बोटे आखूड, तोकडी असली म्हणून काय बिघडले? तू इतरांपेक्षा फक्त एकच पाऊल पुढे अधिक उचलून टाक म्हणजे पहा, तुझी हीच तलवार इतरांच्या बरोबरीची, किंबहुना त्यांच्याहून थोडी लांबच होईल.’’

आजपासून वर्षभरापूर्वी सरकार स्थापनेच्या रणांगणावर माझ्या हातची तलवार तोकडीच होती.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या