रोखठोक – देशात बदल होत आहे!

5605
uddhav-thackeray

rokhthokजुने वर्ष आता सरेल. जुन्यांचे ओझे घेऊनच नववर्षाला झेप घ्यावी लागेल. मावळत्या वर्षात जे घडले ते महत्त्वाचे. लोकसभेत जिंकलेले मोदी-शहा विधानसभेच्या आखाडय़ात हरले. मुख्य म्हणजे, महाराष्ट्रासारखे मोठे राज्य त्यांनी गमावले. टोप्या फिरवणारे व दिलेला शब्द मोडणारे मोडून पडले ते मावळत्या वर्षातच.

नवीन वर्ष कसे असेल यावर कुंडल्या मांडल्या जात आहेत. 2018 मावळताना आणि 2019 उगवताना अशाच कुंडल्या मांडल्या गेल्या व एकाही भविष्यवेत्त्याने हे सांगितले नव्हते की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल किंवा राज्यात सत्तापरिवर्तन घडेल. पुन्हा श्री. फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील व त्यांच्याशिवाय पर्याय नाही, शिवसेनेला महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचीच चाकरी करावी लागेल असे वातावरण 2019 चे होते. फडणवीसांचे फक्त 80 तासांचे सरकार आले व गेले. जाताना अजित पवारांना जास्त प्रगल्भ बनवून गेले. 2019 दोन दिवसांत मावळेल. 2020 च्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. संपूर्ण सरकार अधिकारावर येईल व राज्य गतिमान होईल असे मानूया. देशात राजकीय स्थिरता आहे, पण कमालीची अस्वस्थता, अशांतता जणू समाजात खदखदत आहे. निम्म्या देशात आगी लागल्या आहेत, पण सर्वकाही आलबेल आहे असे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांचे मत आहे. 288 चे बहुमत असूनही देश जेव्हा अशांत असतो तेव्हा राज्य करणाऱयांनी आत्मचिंतन करायला हवे. महाराष्ट्रात सत्तेचा ‘अबाऊट टर्न’ होईल हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. मावळत्या वर्षात महाराष्ट्राचा राजकीय चेहरामोहरा संपूर्ण बदलला.

sharad-pawar-sonia-gandhi

जिंकले आणि गमावले
मावळत्या वर्षाने काय पेरले आणि नवीन वर्ष काय देईल, यावर चर्चा करणे आता थांबवायला हवे. राज्यकर्ते खोटे बोलतात. जनतेला सरळ फसवतात व स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जातात. मावळत्या वर्षात लोकसभा निवडणुका झाल्या. त्यात मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, पण त्याच वर्षात झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांत हरयाणा वगळता भाजपने महाराष्ट्र आणि झारखंड ही दोन राज्ये गमावली. विधानसभा निवडणुकांत लोकांनी प्रादेशिक पक्षांना मतदान केले व राष्ट्रीय पक्ष दुय्यम स्थानावर गेले. तरीही काँग्रेससारख्या पक्षाला या तिन्ही राज्यांत यश मिळाले. राष्ट्रीय स्तरावर आज मोदी यांच्या नेतृत्वास पर्याय नाही. 2019 मध्ये राहुल गांधींना पर्याय म्हणून जनतेने स्वीकारले नाही. त्यामुळे मोदी यांना पुन्हा भरभरून मते दिली. विरोधकांत एकमत नाही व सर्वमान्य नेता नाही. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेसला लोकसभेत 60 चा टप्पाही गाठता आला नाही. तरीही विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला मतदारांनी संपूर्ण झिडकारले नाही. लोकांना मजबूत विरोधी पक्ष हवा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात तो भाजपच्या स्वरूपात आहे. आज मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे, तर झारखंड व महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेतला महत्त्वाचा भागीदार आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जे सरकार आले त्यात काँग्रेस आहे. हा बदल मावळत्या वर्षात दिसला.

शरद पवार उसळले
मावळत्या वर्षात शरद पवार यांचे नेतृत्व उसळून वर आले. 80 वर्षांच्या या राजकीय योद्धय़ाने महाराष्ट्रासारखे राज्य भाजपच्या हाती जाऊ दिले नाही व शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी ‘आघाडी’चे सरकार स्थापन केले. श्री. पवार यांची प्रकृती उत्तम आहे व महाराष्ट्रातील घडामोडींनी पवारांकडे देशातील विरोधी पक्षाचे नेतृत्व आपसूकच आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आता राज्याच्या सीमा पार केल्या तर दिल्लीवर महाराष्ट्राचे राजकारण भारी पडेल. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हे एकत्र आले असते तर चमत्कार घडला असता. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे एक आहेत व दोघांनी भाजपच्या विरोधात उभे राहण्याचे ठरवले तर संपूर्ण देशातून त्यांना मोठा पाठिंबा मिळेल असे वातावरण आहे!

कश्मीरात काय?
मावळत्या वर्षाने देशात अराजकाच्या ठिणग्या पेरल्या. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशात दंगली झाल्या. हिंदू आणि मुसलमानांत नवी दरी पाडून राजकीय लाभ उठवण्यात दिल्लीचे सत्ताधारी यशस्वी झाले. हे सत्य असले तरी देशात दुसऱया फुटीची बिजे त्यातून रोवली गेली. गृहमंत्री अमित शहा यांनी 370 कलम कश्मीरातून हटवले त्याचे स्वागत, पण 370 हटवूनही एकही कश्मिरी पंडित स्वगृही परतू शकलेला नाही व उर्वरित हिंदुस्थानातील लोकांनी कश्मीरात जाऊन एक इंचही जमीन खरेदी केलेली नाही. यावर कुणी फारसे बोलत नाही. कश्मीरात सैनिकांची बलिदाने सुरूच आहेत. तेथील बातम्या देण्यावर बंधने आहेत. साडेतीन कोटी बेरोजगारांचे ओझे मावळत्या वर्षातून नव्या वर्षाच्या खांद्यावर आले. महागाई आहेच. अर्थव्यवस्था कोलमडली त्यावर कोणी बोलत नाही व देशात देशभक्त कोण, देशद्रोही कोण यावरच चर्चा घडवून मूळ प्रश्नावरचे लक्ष हटवले गेले. भावनिक मुद्यांवर लोक मतदान करतात, सरकार आणतात. आपल्या भवितव्याचे काय? असा चेहरा करून सामान्य हिंदुस्थानी माणूस ‘महागाईचे ओझे’ खांद्यावर घेऊन आपली वाटचाल नवीन वर्षातही कशीबशी चालू ठेवील. रामजन्मभूमी हा मुद्दा आता संपला आहे व तो सर्वोच्च न्यायालयाने संपवला. कोणत्याही सरकारने त्याचे श्रेय घेऊ नये. लोक बेरोजगारी व महागाईने भरडून निघाले आहेत. जरा त्यांच्याकडे लक्ष द्या.

नवे अराजक
‘राफेल’चे प्रकरणही निकाली निघाले व राहुल गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. थकलेल्या व आजारी सोनिया गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे लागले. सोनिया गांधी यांनी वेगळा दृष्टिकोन ठेवला नसता तर महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन घडले नसते. धार्मिक उन्माद घडवून देशात अराजक व अराजकातून विघटन होईल. धर्म आणि राजकारणाची गल्लत थांबवायला हवी. धर्म आहेच. जातीही पुसल्या जाणार नाहीत, पण धर्मातीत लोकशाही की धर्मप्रधान हुकूमशाही, या पेचातून देशाला बाहेर काढावे लागेल. चमचे व राजकीय भजनीबुवांच्या गराडय़ात आज सत्ता आहे. जुन्या वर्षात एक चांगले झाले, ज्यांनी ज्यांनी टोप्या फिरवल्या ते पराभूत झाले. ज्यांनी शब्द फिरवले ते सत्तेपासून दूर राहिले. भाजपास साम, दाम, दंडाचा वापर करून विरोधकांचा एकही आमदार फोडता आला नाही. ही आशेची किरणे नवे वर्ष उजळून टाकतील. नव्या वर्षासाठी याच शुभेच्छा!

Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या