रोखठोक – हिंदुत्व उगाच बदनाम होत आहे! आमदार-खासदारांत मनी लॉण्डरिंगची दहशत

मनी लॉण्डरिंगच्या कायद्याला विरोध असण्याचे कारण नाही. ड्रग्ज, हवाला, स्मगलिंगमधून होणाऱया आर्थिक उलाढालीवर निर्बंध घालण्यासाठी हा कायदा प्रामुख्याने आहे, पण त्यांचे भय विरोधक व आमदार-खासदारांतच जास्त. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात हिंदुत्व उगाच बदनाम होत आहे!

हिंदुस्थानपुढे उभी असलेली सर्वात मोठी संकटे कोणती? या प्रश्नाचे माझे उत्तर लोकसंख्या आणि भ्रष्टाचार असे आहे. त्यात राज्यकर्त्यांची आसने अस्थिर असतील तर आणखी दोन गोष्टी घडतात. आपल्याला मिळालेली सत्ता अल्प काळापुरती आहे म्हणून राज्यकर्ते वेगाने पैसा खाऊ लागतात व राज्यकर्ता बदलतो आहे अशी भावना नोकरशहांची झाली की, तेही भ्रष्टाचार करताना कसलाही विधिनिषेध बाळगत नाहीत. तिसरा महत्त्वाचा भ्रष्टाचार म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात असे आरोप करणारेच त्या भ्रष्टाचाऱ्यांचे शुद्धीकरण करून देव्हाऱयात बसवतात. हा भ्रष्टाचार सगळ्यात धोकादायक. आपल्या देशात सध्या तेच सुरू आहे. महाराष्ट्रात तर यावर संशोधन व्हायला हवे. श्रीमती सोनिया गांधी मंगळवारी सकाळी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्या तेव्हा राहुल गांधींसह 55 खासदार व असंख्य नेते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. राहुल गांधी यांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले तेव्हा मी संसदेत होतो. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत, पण ते आज रस्त्यावर उतरले ते आपल्या आईसाठी. 75 वर्षांची त्यांची आई. गंभीर आजाराने जिचे शरीर पोखरले आहे, दोन वेळा कोविडचा हल्ला झाल्याने शरीर कमजोर झालेले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना घरी जाऊनही सोनियांचा जबाब नोंदवता आला असता, पण दिल्लीत सध्या माणुसकीशून्य राजकारणाचे दर्शन पावलोपावली घडत आहे.

पांघरुण कोण घालतेय?

भ्रष्टाचाराचे मूळ कशात आहे, याचे उत्तर सहज देता येईल. मर्जीतल्या लोकांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यातच भ्रष्टाचाराचे मूळ आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींपासून विरोधी पक्षांतील अनेक नेते पेंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. प्रफुल्ल पटेल यांचाही छळ सुरू झाला. राहत्या घरासह त्यांची मालमत्ता जप्त केली. उद्या ते सत्ताधारी पक्षात गेले व सत्ताधाऱ्यांना हवे ते केले तर श्री. पटेल हेसुद्धा ‘पुण्यवान’ ठरतील. जसे महाराष्ट्रातील 16 आमदार व 12 खासदार अचानक ‘पुण्यवंतां’च्या यादीत झळकले.

शिवसेना सोडून भाजप समर्थक गटात पोहोचलेल्या आमदार व खासदारांवर कालपर्यंत ईडी व इन्कम टॅक्सची तलवार होती. किरीट सोमय्या यांनी तर या आमदार-खासदारांना तुरुंगात पाठवायचेच ठरवले होते. आता या सगळय़ांच्या चौकश्या बंद करून प्रकरणे थंड केली. हा खरा भ्रष्टाचार आहे. श्री. सोमय्या यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील किती राजकारण्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मोहिमा राबवल्या व भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या चौकश्यांचे पुढे काय झाले याची यादीच आता प्रसिद्ध केली पाहिजे. श्री. नारायण राणे हे तर आज केंद्रात मंत्रीच आहेत. भावना गवळी यांच्या मतदारसंघात जाऊन श्री. सोमय्या यांनी आंदोलनच केले. सोमय्यांच्या गाडीवर भावना गवळींच्या समर्थकांनी हल्ला केला. श्रीमती गवळी यांचे एक सहकारी रईस खान यांना ईडीने अटक केली, पण भावना गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडताच लगेच रईस खान यांची सुटका झाली व त्यांची जप्त केलेली मालमत्ताही मोकळी केली. याचे दोन अर्थ निघतात. पहिला अर्थ म्हणजे, भावना गवळींवर व त्यांच्यासारख्या इतर राजकीय लोकांवर केलेली कारवाई चुकीची किंवा बेकायदेशीर होती. दुसरा अर्थ म्हणजे, गवळी यांनी भाजपची वाट धरल्यामुळे आपोआपच त्यांचे शुद्धीकरण झाले. श्री. प्रताप सरनाईक, यशवंत जाधवांपासून अनेक आमदारांच्या बाबतीत भाजपने आरोप केले व त्यांच्यासाठी तुरुंगात जाण्याची व्यवस्था केली. जीव वाचविण्यासाठी हेच लोक भाजपपुरस्कृत कळपात शिरले. अर्जुन खोतकर यांनी सगळय़ांच्या वतीने तीच वेदना मांडली. खोतकर हे कडवट शिवसैनिक. मरेपर्यंत शिवसेनेबरोबर राहीन अशा आणाभाका त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतल्या व लगेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. श्री. अर्जुन खोतकर ही एकमेव प्रामाणिक व्यक्ती मला या काळात दिसली. त्यांना दिल्लीतील पत्रकारांनी विचारले, ‘‘तुम्ही शिंदे गटाला मिळालात काय?’’ यावर खोतकर म्हणाले, ‘‘अजून नाही. मी शिवसेनेत आहे, पण माझ्या चेहऱ्यावर तणाव आहे. तुम्ही तो पाहत आहात. कौटुंबिक तणाव आहे. संकटात सापडलेली कोणतीही व्यक्ती सुटकेचा मार्ग शोधतच असते!’’ श्री. खोतकर यांनी प्रामाणिकपणे सांगितले की, त्यांच्यावर ईडी कारवाईचा दबाव आहे व ते संकटात आहेत. खोतकर यांचा साखर कारखाना ईडीने जप्त केला व खोतकर यांच्यावर कारवाई सुरू केली. आता भाजप समर्थक गोटात जाऊन ते सुटकेचा मार्ग शोधत आहेत. त्यामुळे एक स्पष्ट झाले की, बरेचसे आमदार, खासदार शिंदे यांच्या कळपात का पळत आहेत त्याचा खुलासा खोतकरांमुळे झाला, पण खोतकर शिंदे कळपात गेल्यावर त्यांच्यावरील ईडीची कारवाई थांबेल, त्यांचा जप्त केलेला कारखाना मिळेल. ही त्यांच्यावर विशेष मेहरबानी होईल, पण खोतकरांप्रमाणेच राज्यातील 54 सहकारी साखर कारखाने राजकीय नेत्यांना कमी किमतीत मिळाले, त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका ईडीने ठेवला. त्यामुळे खोतकरांच्या कारखान्यांबरोबर या 54 कारखान्यांवरील कारवाईही थांबेल काय? हा प्रश्न आहे. की या 54 कारखान्यांच्या मालकांनाही सुटकेसाठी श्री. शिंदे यांच्या गटात सामील व्हावे लागेल? याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळायला हवे.

कळपात धावाधाव

भ्रष्टाचाराचे मूळ भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यात आहे हे अशा अनेक प्रकरणांतून दिसत आहे. ईडीसारख्या यंत्रणांना विरोध असण्याचे कारण नाही, पण अशा संस्थांचा राजकीय कारणांसाठी गैरवापर होत असेल तर ते गैर आहे. गेल्या पाच वर्षांत शेकडो उद्योजकांनी देश सोडला. परदेशात जाऊन त्यांनी गुंतवणूक केली. आर्थिक गैरव्यवहारावर कायद्याची बंधने हवीत, पण विरोधी पक्षाशी संबंध असलेल्यांचे व्यापार-उद्योग मोडायचे व तुरुंगात टाकायचे हा प्रकार सुरू आहे. भारतीय जनता पक्षात जशी चांगली माणसे आहेत तशी व्यापारी वृत्तीचीही आहेत. सर्वच राजकीय पक्षांत ती आहेत, पण पेंद्राच्या धाडी व कारवाई फक्त विरोधकांवरच सुरू आहेत. हे लोकशाहीला मारक आहे. खोतकरांप्रमाणे स्वस्तात साखर कारखाना घेणाऱयांत सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत. त्यांच्या चेहऱयावर खोतकरांप्रमाणे तणावाचे चिन्ह नाही. मनी लॉण्डरिंग कायदा हा गैरमार्गाने जमा केलेल्या पैशावर व त्यांच्या मालकांवर निर्बंध घालण्यासाठी आहे. ड्रग्ज, स्मगलिंग, हवाला यातील आर्थिक उलाढाली रोखण्यासाठी आहे, पण देशातले चित्र नेमके उलटे आहे.

मनी लॉण्डरिंग कायद्याचे भय राजकारण्यांत जास्त आहे. त्या भयाने आमदार-खासदार कळप सोडून पळत आहेत. हिंदुत्व मात्र उगाच बदनाम होत आहे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून आम्ही पक्षापासून दूर गेलो, असे बोलणे फुटीर गटाने बंद केले पाहिजे. ‘ईडी’पासून सुटका व्हावी म्हणून आम्ही सर्व पळून गेलो हे सांगण्याचा प्रामाणिकपणा या लोकांनी दाखवावा. उगाच हिंदुत्वाची बदनामी का करता?

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]