रोखठोक – कर्नाटकात आता ‘बजरंगबली’ अवतरले! विकास पुरुष मोदींचे अपयश!!

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत आज प्रत्यक्ष श्री बजरंगबलींना पाचारण केले. पंतप्रधानांकडे मुद्दे नसल्याचे हे उदाहरण. कर्नाटकात भाजप व काँग्रेस पक्षांत तुंबळ युद्ध आहे. पंतप्रधानांनी प्रचारात धर्म आणला, शासकीय यंत्रणा वापरली. भाजपने देशभरचे कॅबिनेट कर्नाटकात उतरवले, पण त्यांचा मुख्य भर ‘हिंदू- मुसलमान’ यावरच आहे.

10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होत आहे. दक्षिणेतल्या या एकमेव राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता आता डळमळीत होताना दिसत आहे. बुधवारी मी बेळगावात होतो. विमानतळावर उतरलो तेव्हा भारतीय वायु दलाचे विमान उभे होते. ‘पंतप्रधान मोदी येथे प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळे विमानतळच ‘एस.पी.जी.’च्या ताब्यात आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान पदावरील व्यक्ती सर्व सरकारी लवाजमा घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी उतरली. पंतप्रधान म्हणून त्यांना राजकीय प्रचारासाठी सर्व सरकारी सुविधा मिळतात. तो कोट्यवधींचा खर्च पक्षाच्या व उमेदवारांच्या खर्चात धरला जात नाही. मात्र विरोधकांना पै पैचा हिशेब द्यावा लागतो. पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या प्रचारात यावेळी बजरंगबलीस उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या व भाजपसाठी मतदानाचे बटन दाबा. हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली. इथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण कॅबिनेट सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहे. पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले. श्री. अमित शहा म्हणाले, ‘कर्नाटकात भाजप जिंकला नाहीतर दंगली होतील.’ देशात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे व ती तशीच ठेवली जाईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘शुद्ध’ हिंदुहृदयसम्राट होते. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारात भेसळ नव्हती. त्यावेळी धर्मांध खोमेनी याने लोकशाहीवादी राजवट हटवून इराणची सूत्रे हाती घेतली व आधुनिकतेकडे निघालेल्या इराणच्या विकासात खीळ घातली. धर्माच्या बेड्यांत इराणला पुन्हा जखडले. बाळासाहेब ठाकरे यांना मी तेव्हा खोमेनीबद्दल मत विचारले. बाळासाहेब ताडकन म्हणाले, “मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही. अजिबात नाही, पण आज देशात जे नव हिंदुत्वाचे (उद्धव ठाकरे यांच्या भाषेत गोमूत्रधारी हिंदुत्व) वातावरण निर्माण केले आहे, त्यामधून देशात दोन खोमेनी निर्माण झालेच आहेत व त्यातून असंख्य खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया, अफगणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल.

सत्यपाल मलिक

देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत श्री. सत्यपाल मलिक यांची भेट 27 तारखेस घेतली. दिल्लीतील आर. के. पुरम भागातील एका हाऊसिंग सोसायटीत भाड्याच्या घरात ते राहतात. एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे त्यांचे जगणे आहे. जम्मू-कश्मीरसह चार राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले. मोदी सरकारने त्यांना जम्मू-कश्मीरला नेमले व आता ‘पुलवामा’ जवान हत्याकांडाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित करताच, “श्री. मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत.” असे भाजपचे लोक बोलू लागले. हे गैर आहे. श्री. अमित शहा यांनी 370 कलम हटवले तेव्हा मलिक हेच राज्यपाल होते. म्हणजे मोदी यांचे ते विश्वासू होते. श्री. मलिक यांची प्रकृती त्या दिवशी बरी नव्हती व पायाच्या दुखापतीमुळे ते व्हीलचेअरवर होते. त्याच अवस्थेत ते काही तासांपूर्वी जंतरमंतर रोडवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटून आले. सत्यपाल मलिक यांचे म्हणणे असे की, “देशात हुकूमशाही सुरू झाली आहे व सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे.”
“तुमच्या मागे तपास यंत्रणा लावू शकतात.” मी.
“मी घाबरत नाही. मी समाजवादी विचारांचा कडवट लोहियावादी आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही.” श्री. मलिक.
“2024 ला काय होईल?”
“एकासमोर एक उमेदवार हे सूत्र मान्य झाले तर मोदींचा दारुण पराभव होईल.” मलिक.
“आपण फक्त दिल्ली आणि हरयाणाच्या परिसरातच फिरताय.”
“नाही. मी संपूर्ण देशात जाणार आहे. मला फिरण्यापासून आणि बोलण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. संविधानाच्या रक्षणासाठी बाहेर पडावे लागेल.” मालिक.
श्री. मलिक यांच्याशी इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. लवकरच महाराष्ट्रात येऊ, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली ती महत्त्वाची. सत्यपाल मलिक यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका पार पाडावी, असे काही जणांना वाटते. पण देशातल्या विरोधी पक्षांना कुणाचेही एकछत्री नेतृत्व नको. सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारला सरळ अंगावरच घेतले आहे. ते हिमतीचे आहेत. शेतकरी व जाट समाजाचे ते नेते आहेत. जाट हा लढवय्या समाज आहे. “मला काही केले तर माझा समाज स्वस्थ बसणार नाही हे केंद्र सरकारला माहीत आहे,” असे श्री. मलिक म्हणाले. मलिक यांना जम्मू-कश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांना सरकारने सुरक्षा देणे गरजेचे होते. मात्र एक साधा फौजदार त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. पण सत्यपाल मलिक लढत आहेत, संविधान वाचविण्यासाठी.

पक्ष फोडणे सोपे!

आज पक्ष फोडणे व त्यातून सत्ता आणणे हे मोदी-राज्यात सोपे झाले. कारण निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था त्यांच्या दिमतीला आहेत. “निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर अन्याय केला,” असे श्री. सत्यपाल मलिक म्हणाले. राजकीय पक्षांना टिकू द्यायचे नाही व सर्व सत्ता एका दोघांकडे असावी हा विचार म्हणजेच घोटाळा आहे. देशात गवतासारख्या वाढणाऱ्या आणि फुटणाऱ्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तावडीतून देशाला सोडविण्याची गरज असताना पंतप्रधान मोदी या फोडाफोडीस उत्तेजन देत आहेत. डॉ. आंबेडकर यांनी भारतीय घटनेबद्दल सांगितले होते, “घटना दुटप्पीपणा करणार नाही. Politicians can be wild! राजकारणी बिघडतील व त्यातून सगळे बिघडेल. डॉ. आंबेडकरांचे हे म्हणणे मोदी व शहा यांनी सत्य ठरवले आहे. धर्माचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे. सरकारला अडचणीचे ठरणारे निर्णय सुप्रीम कोर्ट घेत नाही व तारखांची शर्यत सुरूच ठेवते. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका रोखण्याचे कारण नव्हते व कोर्ट निवडणुका घेऊ देत नाही. हे सरकारला व भाजपला हवेच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर गेली 15 वर्षें तारखांशिवाय काहीच घडत नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निर्णय अधांतरी आहे. सर्व काही घटनेनुसार होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. श्री. राहुल गांधी यांनी मोदींची बदनामी केली या सबबीखाली त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द केली. त्यांचे घर रिकामे केले. त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला. फाशीची शिक्षा स्थगित होते. गौतम अदानीवरील आरोपांची चौकशी होत नाही. खुनी-दरोडेखोर लोकशाहीच्या मंदिरात उजळ माथ्याने वावरत आहेत. पण राहुल गांधींना एका क्षुल्लक प्रकरणात दिलासा द्यायला गुजरातचे न्यायालय तयार नाही. ही एक प्रकारची दहशत आहे. घटना नव्हे तर man can be wild! डॉ. आंबेडकरांचे सांगणे अशा वेळेला सत्य ठरते. संसदीय लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही चालते आणि हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड चालवले जाते. सामान्य मतदारांनी विचार करण्याचा हा काळ आहे. आपण सार्वभौम आहोत. इतका गैरसमज जरी सध्या दूर झाला तरी पुरे आहे!

नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. या एकाच विचाराने लोकांनी आता एकवटायला हवे. निर्भय व्हायला हवे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]