रोखठोक : उत्तरेतील नवे रामायण! ८० इंचाच्या छातीचे साहस!

103

rokhthokश्रीरामाची निंदा, नरेंद्र मोदी यांची बदनामी, कुलभूषण जाधव दहशतवादी, सैनिक देशद्रोही अशी मुक्ताफळे उधळणारे नरेश अग्रवाल हे भाजपवासी झाले. त्रिपुरात लेनिनच्या मूर्ती तोडणाऱ्यांनी आता नरेश महाराजांचे पुतळे उभारावेत. शिवसेनेची विधायक टीका ज्यांना बोचते त्यांनी नरेश अग्रवालसाठी पायघड्या घातल्या. हे साहस दाखवायला ८० इंचाची छाती लागते.

इतर पक्षांची तोडफोड करून, घाऊक पक्षांतरे करून, नवी तत्त्वशून्य ‘गठबंधने’ करून सत्ता मिळणार असेल तरीही मी अशा सत्तेच्या सावलीत जाणे पसंत करणार नाही– श्री. अटलबिहारी वाजपेयी

२८ मे १९९६ रोजी लोकसभेत सरकार स्थापन करण्याची पहिली संधी वाजपेयींना मिळाली. लोकसभेत ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. सरकार कोसळले फक्त १३ दिवसांत, पण त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेले हे वक्तव्य अनेकांना आजही आठवत आहे. १६१ जागा जिंकलेल्या भाजपास तेव्हा सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले होते. बहुमतासाठी आवश्यक जमवाजमव सुरू झाली. अपयश आले. वाजपेयींनी सरळ राजीनामा दिला. अनेक पक्षांचे ‘नरेश अग्रवाल’ तेव्हा पाठिंब्याच्या सौदेबाजीसाठी दारात उभे होते, पण पक्षाची व सरकारची प्रतिमा मलिन होईल अशा लोकांचा पाठिंबा घेऊन मला सत्ता स्थापन करायची नाही, ही भूमिका वाजपेयी यांनी घेतली. आता कालचक्र उलटे फिरले आहे. वाजपेयींबरोबरच त्यांचा तत्त्ववादी विचारही कोमात गेला आहे व श्रीमान नरेश अग्रवाल यांना पायघड्या घालून वाजतगाजत भाजपाने घरात घेतले आहे.

गंगा गढूळच राहील!
कालपर्यंत समाजवादी पार्टीतून भाजपा आणि हिंदुत्वावर भुंकणाऱ्या नरेश अग्रवाल यांना भारतीय जनता पक्षाने प्रवेश दिला आहे. अग्रवाल हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत व विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे फक्त ४५ सदस्य निवडून आल्याने त्यांचा फक्त एकच खासदार निवडून येऊ शकतो. नरेश अग्रवाल यांचा पत्ता कट झाला व जया बच्चन यांना ‘सपा’ने उमेदवारी देताच अग्रवाल यांचा पारा चढला. त्यांनी सांगितले, ‘एका नाचगाणे करणाऱ्या महिलेसाठी माझे तिकीट कापले व अग्रवाल यांनी तत्काळ भाजपात प्रवेश घेतला. एका महिला कलावंताचा अपमान करणाऱ्या अग्रवाल यांना प्रवेश देऊन भाजपाने संस्काराच्या चिंधड्या उडवल्या व सत्ता स्थापनेसाठी आयाराम गयाराम घाशीराम कोतवाल कोणीही चालतो, हे भाजपाने दाखवून दिले. स्वच्छ भारत, स्वच्छ गंगा योजनेचे पुरस्कर्ते मोदी यांच्या विचारांशी हे विसंगत आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी हे देशातून व्यभिचार, भ्रष्टाचाराचा चिखल दूर करायला निघाले आहेत. त्याचवेळी नरेश अग्रवाल यांना खांद्यावर उचलून पीयूष गोयल हे भाजपात घेऊन येतात. राजकारणाची गंगा स्वच्छ करणे सोपे नाही, हे आता मोदींना पटले असेल.

अभद्र वाणी
‘राममंदिर वही बनायेंगे’ या घोषणेच्या पायावर भाजपाचे हिंदुत्व व राजकारण तरले आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले ते श्रीराम कृपेने. रामाचे नाव नसते तर भाजपाचे आजचे अस्तित्व नसते. त्या ‘रामा’चे वस्त्रहरण करण्याचे जाहीर कार्यक्रम नरेश अग्रवाल यांनी संसदेत व बाहेर केले. हिंदू देवदेवतांची विटंबना केली. अग्रवाल म्हणतात,

व्हिस्की में विष्णू बसे,
रम में श्रीराम,
जिन में माता जानकी,
और ठर्रे में हनुमान
सियावर रामचंद्र की जय!

प्रभू श्रीराम व जानकीची इतकी निर्भर्त्सना बाबरीभक्तांनीसुद्धा केली नाही, करणारही नाहीत. या सगळ्या बाबरभक्तांनी श्रीरामांचा उल्लेख आदराने केला, पण रामापासून हनुमानापर्यंत ज्याने हिंदू देवदेवतांना दारूत बुडवले त्या नरेश अग्रवालला भारतीय जनता पक्षाने मस्तकीच लावले. देव मस्तकी लावून पालखी किंवा रथयात्रा काढावी तसे रामाची निंदा करताच संसदेत भाजपवाले अग्रवाल यांच्या अंगावर चालून गेले. त्याच भाजपाने राम निंदकास पालखीत बसवले. काय हे अधःपतन?

संस्कार म्हणजे काय?
भारतीय जनता पक्षाला नीतिमत्ता व संस्काराचं महत्त्व वाटत आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे संस्कार आहेत. राष्ट्रभक्त व हिंदुत्व त्या संस्काराचा पाया आहे, पण त्यावर ‘कळस’ चढविण्यासाठी नरेश अग्रवाल यांना मस्तकी लावले काय? असा एकही विषय नाही जेथे नरेश अग्रवाल यांनी देशाच्या भावना पायदळी तुडवल्या नाहीत. (म्हणजे शेण खाल्ले नाही.) नरेश अग्रवाल हे विचार घेऊन जन्माला आलेले नेते कधीच नव्हते. त्यांचा संबंध विचारांपेक्षा विकृतीशी जास्त आला. हे महाशय काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस सोडून ते स्वतःच स्थापन केलेल्या ‘लोकतांत्रिक काँग्रेस’चे नेते झाले. ते मायावतींच्या ‘बसपा’त गेले, मग ‘सपा’त व ‘सपा’त सर्व भोगून झाल्यावर भाजपात पोहोचले व भाजपाने त्यांना स्वीकारले. पाकिस्तानशी लढण्यासाठी ५६ इंचांची छाती लागते साहेब; पण राम जानकी, हनुमानास गावठी दारूत बुडवून पिणाऱ्या नरेश अग्रवालसाठी पायघड्या घालण्यासाठी ही ८० इंचांची छाती लागते.

नरेश अग्रवाल यांची मुक्ताफळे काय वर्णावीत!
– पाकिस्तानच्या कैदेत असलेले नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सारा देश अस्वस्थ असताना नरेश अग्रवाल म्हणाले, कुलभूषण हे अतिरेकी आहेत. त्यामुळेच पाकिस्तान कुलभूषण जाधवांशी अतिरेक्यांप्रमाणे व्यवहार करीत आहे. हे वक्तव्य करताच भारतीय जनता पक्षाने नरेश अग्रवाल हे देशद्रोही असल्याचे जाहीर केले.

– पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख ‘जातिवाचक’ करण्यात अग्रवाल सर्वात पुढे होते. मोदी यांनी त्यांच्या पत्नीस नांदवले नाही. त्यामुळे कौटुंबिक आनंदाचे महत्त्व त्यांना समजत नसल्याचे ‘क्रांती’भाष्य याच महाशयांनी केले.

– वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्त, बबिता फोगट या खेळाडूंबद्दल अत्यंत घाणेरडी विधाने नरेश अग्रवाल यांनी केली. हे खेळाडू ‘चाटू’ आहेत असे त्यांनी वक्तव्य केले.

– मुंबई-दिल्लीतील ‘गँगरेप’ प्रकरणानंतरही याच नरेश अग्रवाल यांनी महिलांवर घाणेरड्या ‘कॉमेण्टस्’ केल्या. तेव्हाही भाजपाने त्यांची सालटी सोलून काढली होती.

– नरेश अग्रवाल यांनी गोमातेची व गोरक्षेची अनेकदा खिल्ली उडवून भाजपास मूर्ख ठरवले. ‘गाय हमारी माता है तो बैल क्या हुआ? बछडा हमारा क्या हुआ?’ असे सांगणारे नरेश अग्रवाल हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जणू प्रचारकच झाले.

पंडित दीनदयाळ व भाजप
भारतीय जनता पक्षाचे राज्य दिल्लीत येताच पंतप्रधान मोदी यांनी पहिले काम केले ते म्हणजे राष्ट्रपुरुषांच्या पंक्तीत दीनदयाळ उपाध्याय यांना नेऊन बसवले. सर्वच सरकारी कचेऱ्यांतील भिंतीवर आता दीनदयाळजींच्या तसबिरी लटकल्या आहेत. पण उपाध्याय यांनी जो विचार संघपरिवाराला दिला त्याचे काय? संधिसाधू राजकारण देशाला विनाशाकडे नेईल व जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असे त्यांचे सांगणे होते. त्या विचारांचे आता श्राद्धच घातले गेले. असंख्य साधूंच्या बलिदानांतून अयोध्येत राम मंदिराचा लढा उभा राहिला. तो साधूवाद वनवासात गेला व नरेश अग्रवालच्या रूपाने संधीवाद निर्माण झाला. हे विचारांचे गडगडणे आहे. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहिले नाही, पण रामाचा अपमान करणाऱ्या नरेश अग्रवाल यांचा राजकीय शिलान्यास करून बेगडी रामभक्त मोकळे झाले. पुन्हा एका स्त्रीरूपी जानकीचा अपमान झाला तो वेगळाच. हे आधुनिक रामायण लिहिले जात आहे व रामाची निंदा करणारे नव्या रामायणाचे नायक आहेत.

सरकारच्या धोरणांवर शिवसेना टीका करते. टीकेचे विषय हिंदुत्व व राष्ट्रवादाशी सबंधित असतात. पण शिवसेनेची टीका ज्यांना झोंबते त्यांनी रामनिंदक व मोदीनिंदक नरेश अग्रवाल यांच्या स्वागताच्या तुताऱ्या फुंकल्या. हे ढोंग आहे. असे ढोंग करायलाही हिंमत लागते. त्यांच्या हिंमतबाज ८० इंचाच्या छातीचे स्वागत!

भाजपने रामनिंदेस प्रतिष्ठा दिली. मोदीनिंदेस मान्यता दिली. नारीनिंदेस मुजरा केला. हे खरे नसेल तर सत्य काय ते लोकांना सांगावे!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या