सरसंघचालक, कृपया दरवाजे उघडा!

114

राष्ट्रपती भवनात सरसंघचालकांनीच जावे व देशाची सूत्रे हाती घ्यावीत असा विचार जोर धरत आहे. पंतप्रधानांपासून राज्यपालांपर्यंतच्या पदांवर संघप्रचारकांना मानाने विराजमान केले जात आहे. हिंदुत्वाचा हा सन्मान आहे. सरसंघचालकांना राष्ट्रपती केले तर हिंदू राष्ट्राची गुढी उभारता येईल. त्यासाठी सरसंघचालकांचे मन वळवायला हवे!

हिंदुस्थानचे राष्ट्रपतीपद हे शोभेचे आहे व सरकारच्या निर्णयांवर रबरी शिक्के मारणे इतकेच आमच्या राष्ट्रपती महोदयांचे काम आहे, अशी टीका नेहमीच होत असली तरी राष्ट्रपती भवनात आपलाच माणूस बसायला हवा, असे सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांना वाटत असते. सध्याचे आपले राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी हे जुलै महिन्यात निवृत्त होतील व त्याआधी नव्या राष्ट्रपतींची निवडणूक पार पडून सस्पेन्स संपलेला असेल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभांचे निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपचे ३२५ आमदार निवडून आले. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पारडे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सरळ झुकले आहे. पाच-पंचवीस हजार मतांचा फरक ते सहज भरून काढतील. उत्तर प्रदेशात ३२५ जागा जिंकणाऱ्या पक्षाला ते अशक्य नाही. देशातले आमदार आणि खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात. राज्यांनुसार मतांचे मूल्य ठरले आहे. त्या आकडेमोडीत जाण्याची आता गरज नाही. राष्ट्रपती भवनातील भव्य प्रासादात कोण जाणार, हाच आता प्रश्न आहे.

rss-nagpur-copy

शंभर इंगळ्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या नावाची चर्चा राष्ट्रपतीपदासाठी सुरू झाली तेव्हा बेगडी धर्ननिरपेक्षवाद्यांना जणू एकाच वेळी शंभर इंगळ्या डसल्या. डॉ. मोहनराव भागवत हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असावेत असे जगभरातील हिंदुत्ववाद्यांना वाटते. त्यात शिवसेनेचा आवाज प्रामुख्याने आहे. हिंदू राष्ट्र व अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार व्हायचे असेल तर सरसंघचालकांनी राष्ट्रपती भवनात जावे, असे शिवसेनेला वाटत असेल तर त्यात काही चुकीचे नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशावर बनावट निधर्मीवाद्यांचेच राज्य होते व या काळात हिंदुस्थानच्या पोटात अनेक पाकिस्ताने निर्माण झाली. देश धार्मिक फाळणीच्या कड्यावर आजही उभा आहे. हिंदुत्ववाद म्हणजे धर्मांधता नाही. हिंदुत्व देशाची संस्कृती आहे व देशाचे नागरिक असलेल्या प्रत्येकाने आपापल्या धार्मिक श्रद्धा सांभाळून या संस्कृतीचे नेतृत्व स्वीकारायला हवे. गरीब आदिवासींचे हिंदू धर्मातून मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मात सरळ धर्मांतर केले जाते. पण हिंदूंनी कधीच हे असले प्रयोग करून उन्माद दाखवला नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीचा माणूस राष्ट्रपती भवनात बसला तर कुणाला घाबरायचे कारण नाही.

का? कशासाठी?
श्री. मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत. ते देशाच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावेत ही भावना आज बळावली आहे. त्यामागे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
१) राष्ट्रपती भवनात एकदा तरी प्रखर हिंदुत्ववादी नेता बसायलाच हवा.
२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वतःचा एक ‘अजेंडा’ आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे असे त्यांना वाटते. श्री. भागवत हे राष्ट्रपती होतील     तेव्हा या कल्पनेस चालना मिळेल.
३) समान नागरी कायदा लागू करणे सोपे होईल.
४) मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येस पायबंद घालता येईल.
५) कश्मीरसंदर्भातील ३७० कलम नष्ट करता येईल.
६) अयोध्येतील राममंदिराचा मार्ग मोकळा होईल.
७) धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली दबलेल्या मोठ्या हिंदू समाजाला मोकळा श्वास घेता येईल.
या सर्व भावनांचा विचार केला तर सरसंघचालकांचे नाव पुढे आले तर ती सध्याची देशभावनाच आहे. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रासाठी गेल्या ५०-६० वर्षांत असंख्य कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदाने दिली. त्यांच्या लढ्याचे यश म्हणजे राष्ट्रपती भवनात सरसंघचालकांचे जाणे; पण सरसंघचालकांनी आता जाहीर केले की, ते राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत. राजकारणाचे दरवाजे त्यांनी बंद केले, हा राष्ट्रीय भावनेवर सरळ सरळ अन्याय आहे.

दरवाजे उघडा!
संघात मोठे पद स्वीकारल्यानंतर आमच्यासाठी बाकीची दारे बंद असतात, असे सरसंघचालकांनी आता सांगितले. देश त्यांच्या मताशी सहमत नाही. श्री. भागवत हे स्वतः राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरले नाहीत; पण ही त्यांची इच्छा नसून लोकेच्छा आहे, हे त्यांनी आता समजून घेतले पाहिजे. श्री. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, ‘‘मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि या पुढेही राहणारच!’’ श्री. भागवत यांच्या अढळ निष्ठा आणि त्यागास सलाम करावाच लागेल. पण राष्ट्रपतीपद हे राजकीय पद नाही व राष्ट्रपती भवन हा राजकीय अड्डा नाही. मोहनराव भागवत हे प्रखर राष्ट्रवादी विचारांचे मार्गदर्शक आहेत व राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांनी प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यांसाठीच उघडे करायचे आहेत. नरेंद्र मोदी हे संघ प्रचारक होते. ते आधीही स्वयंसेवक होते व पंतप्रधान झाल्यावरही ते स्वयंसेवक आहेत. त्यांचे राजकारण हे राष्ट्रकारण आहे व संघ प्रचारक म्हणून ते ज्या कार्यासाठी चपला झिजवत होते त्याच कार्याचा द्रोणागिरी पर्वत त्यांनी पंतप्रधान म्हणून उचलला आहे व हे सर्व करीत असताना त्यांच्यातील संघविचार मारला गेला नाही हे उत्तर प्रदेशातील जिंकलेल्या निवडणूक मोहिमेवरून त्यांनी दाखवून दिले. पंतप्रधानपदाची शपथ घेताच मोदी हे वाराणशीला पोहोचले व मोठ्या झोकात त्यांनी गंगा आरती केली. गंगा साफ करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली, हे संघाचेच कार्य आहे. उत्तर प्रदेश विधानसभा प्रचारात त्यांनी हिंदू मतांसाठी आवाहन केले. ‘उत्तर प्रदेशात ईदला वीज मिळते, हिंदू सणांना का नाही?’ असा प्रश्न निर्माण केला. मुसलमानांची लोकसंख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेशात कब्रस्ताने वाढली आहेत, मग स्मशाने का नकोत? असे आवाहन करताच हिंदू समाज जात-पात विसरून एक झाला व त्यांनी भाजपला तुफानी बहुमताने विजयी केले. योगी आदित्यनाथसारखा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा उत्तर प्रदेशसारख्या बलाढय़ राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमून मोदी यांनी संघ स्वयंसेवकाचाच विचार अमलात आणला. स्वयंसेवक म्हणून पंतप्रधानांना अडचणी येत नाहीत, तेथे राष्ट्रपतींना कशा येतील?

स्वप्न देशाचे!
पाकिस्तानसह अखंड हिंदुस्थान हे स्वप्न आहे. राष्ट्रपती भवनात सरसंघचालकांसारखा योद्धा बसल्याशिवाय ते स्वप्न पूर्ण होणार नाही. कश्मिरी पंडितांची घरवापसी होणार नाही व हिंदुत्वाच्या तलवारीस धार चढणार नाही. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांचे मन भाजप नेत्यांनी वळवायला हवे. संघ स्वयंसेवकांसाठी राजकारणाची दारे बंद आहेत, असे सांगून मोठे पद नाकारणे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण अलीकडच्या काळात नियमाला केलेल्या अपवादांची मालिकाच गेल्या अडीच वर्षांत समोर आली. संघाचे प्रचारक व स्वयंसेवक मोठ्या राजकीय पदांवर हे असे बसले आहेत-
– नरेंद्र मोदी : पंतप्रधान
– मनोहरलाल खट्टर : मुख्यमंत्री, हरयाणा
– त्रिवेंद्र सिंह : मुख्यमंत्री, उत्तराखंड
– वीरेन सिंह : मुख्यमंत्री, मणिपूर
– देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री, महाराष्ट्र
– शिवराजसिंह चौहान : मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
– रमण सिंह : मुख्यमंत्री, छत्तीसगढ
– मनोहर पर्रीकर : मुख्यमंत्री, गोवा
– योगी आदित्यनाथ : मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
– रघुबर दास : मुख्यमंत्री, झारखंड

देशभरातील राजभवनात नेमलेले सर्व नवे राज्यपाल हे संघप्रचारक आहेत व राज्यपाल म्हणून त्यांनी संघ स्वयंसेवकाचा बाणा जपला आहे. केंद्रातील अनेक महत्त्वाचे मंत्री हे संघप्रचारक किंवा स्वयंसेवक होते व ते उत्तम राजकारण करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती भवनातील सरसंघचालकांचे आगमन हे देशाला प्रेरणादायी ठरेल तसे हिंदू राष्ट्र संकल्पनेची गुढीच ठरेल. श्री. मोहन भागवत हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत, पण त्यांच्या उमेदवारीने शर्यत संपेल. हिंदुत्वाचा विजय एकतर्फी होईल.

संघाने आतापर्यंत त्यागच त्याग केला आहे. सरसंघचालकांचा होकार हे त्यागाचे शिखर ठरेल.
सरसंघचालक आदरणीय आहेत. राजकारणाचे दरवाजे त्यांनी बंद केले आहेत.
हिंदू राष्ट्रासाठी त्यांना दरवाजे उघडावेच लागतील!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या