रोखठोक – राहुल गांधींचे ‘भारत जोडो’, जम्मू-कश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय!

श्री. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पठाणकोट ते जम्मू असा चालत गेलो. कश्मीरच्या रक्त गोठवणाऱ्या थंडी-बर्फातही यात्रा थांबली नाही. 370 कलम हटले, पण कश्मीरचे प्रश्न तेच आहेत. कश्मिरी पंडितांच्या प्रश्नाचे राजकारण सदैव झाले. पंडित समुदाय आजही जम्मूच्या रस्त्यांवर मागण्यांसाठी बसला आहे!

श्री. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त पठाणकोट ते जम्मू असा प्रवास गांधींबरोबर करता आला. 4 हजार किलोमीटर हा तरुण नेता चालत आहे. पठाणकोटचे दृश्य मी पाहिले. हजारो तरुण हातात पेटत्या मशाली घेऊन जम्मूत प्रवेश करीत होते व त्या पेटत्या मशालींनी त्या वेळी सारे आसमंत उजळून निघाले होते. जम्मू-कश्मीर हा यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. जम्मूत पारा कमालीचा खाली घसरला. त्यात पाऊस. त्या परिस्थितीत राहुल व त्यांच्या पाठीमागे हजारो लोक चालत राहिले. मग जम्मूचा प्रवास संपवून प्रत्यक्ष खोऱ्याची, म्हणजे कश्मीरची सफर सुरू झाली. नगरोटापासून पुढे उधमपूर व नंतर पहाडी चढाई सुरू होईल. हा सर्व खडतर प्रवास राहुल गांधी करतील. जम्मू-श्रीनगर 300 किलोमीटरच्या हायवेवर चालत जाणे सोपे नाही. आतापर्यंत या रस्त्याने कधीच कोणी चालत गेले नाही. मुगल रोड हा जुना मार्ग होता. त्यावरून पायी प्रवास करता येत होता. पठाणकोट ही जम्मूची बॉर्डर. यात्रेचे स्वागत लखनपूरला डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केले. अब्दुल्ला म्हणाले, ‘आदिशंकराचार्यांनंतर राहुल गांधी ही दुसरी व्यक्ती आहे, जी चालत कश्मीरला पोहोचली आहे.’ शंकराचार्यांच्या काळात तर रस्तेही नव्हते. आज रस्ता आहे, पण त्यावर बर्फाचे डोंगर झाले. ते पार करून श्री. गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल.

कलम हटवल्यावर…

370 कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरमध्ये काय बदलले? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे व बंदुकांच्या जोरावर तात्पुरती शांतता नांदते आहे. श्री. राहुल गांधी यांनी त्यांच्या यात्रेदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा मांडला व जम्मूच्या लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. श्री. गांधी म्हणाले, ‘बाहेरचे लोक येऊन जम्मूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ जम्मूचा सर्व व्यापार, उद्योग आज बाहेरच्या लोकांच्या हाती गेला. त्यामुळे छोटे दुकानदार, व्यापारी यांचे नुकसान होत आहे. बाहेरचे लोक येतात व जम्मूचे आर्थिक नियंत्रण हातात घेतात. या विरोधात लोकांच्या मनात संताप आहे. हे बाहेरचे लोक भाजपच्या राजकारणास आर्थिक पाठबळ देतात. स्थानिक लोकांचे त्यामुळे मरण झाले आहे. आता हे बाहेरचे लोक म्हणजे नक्की कोण? कश्मीर खोऱ्यातली लढाई पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध, तर जम्मूतील लोकांची लढाई देशातील व्यापारी मंडळाविरोधात, असे चित्र आहे.

पंडित जम्मूच्या रस्त्यावर

ज्या कश्मिरी पंडितांच्या हत्येचा व घरवापसीचा ‘प्रपोगंडा’ भाजपने राजकारणासाठी केला, ते कश्मिरी पंडित आज नेमक्या कोणत्या स्थितीत जगत आहेत? सत्य असे आहे की, पंडित आजही भीतीच्याच छायेखाली जगत आहेत. जम्मूत उतरताच मला सांगण्यात आले, कश्मिरी पंडित व त्यांची कुटुंबे मोठय़ा संख्येने जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर बसली आहेत. आंदोलन करीत आहेत. हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत व कश्मीर खोऱ्यात त्यांच्या नेमणुका आहेत. ‘टार्गेट कीलिंग’ पुन्हा सुरू झाल्याने हे सर्व कश्मिरी पंडित पुन्हा जम्मूत आले. ‘अतिरेकी ओळखपत्र पाहून गोळय़ा घालतात. शाळा, सरकारी कार्यालयांत घुसून पंडितांच्या हत्या करतात. आम्हाला कसलेच संरक्षण नाही. तेव्हा आमच्या बदल्या जम्मूत करा,’ असे ते सांगतात व सरकार त्यांचे ऐकायला तयार नाही. कश्मिरी पंडितांनी खोऱ्यात जाऊन नोकरीवर रुजू व्हावे असे सरकारचे फर्मान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार सरकारने बंद केल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मी जम्मूत त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या जयजयकाराच्या घोषणा तेथे गरजल्या. त्या आंदोलनात निवेदन करणारे अनेक तरुण मराठी बोलत होते. तुम्ही मराठी कसे बोलता? असे मी विचारले तेव्हा ते तरुण म्हणाले, ‘ही सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची कृपा. त्यांनी कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे उघडले. आमच्या मुलांना उच्च शिक्षणात राखीव जागा ठेवल्याने आम्ही मुंबई-पुण्यात येऊन शिकलो. डॉक्टर, इंजिनीयर्स झालो. बाळासाहेब आणि शिवसेनेने आमच्यासाठी जे केले ते कधीच विसरता येणार नाही!’ असे भारावलेले उद्गार त्यांनी काढले. ‘शिवसेनाने हमारे लिए दिल के दरवाजे खोले.’ असे तो शेवटी म्हणाला. पण 370 हटवल्यानंतरही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. आजही कश्मीर एक बंदिवान नंदनवन आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत व बेरोजगारीमुळे त्यांच्यात वैफल्य आहे. 370 कलम हटवल्यावर बाहेरचे उद्योग तेथे येतील हा भ्रम खोटा ठरला. पण एका विशिष्ट प्रांताचे लोक जम्मूत आले व त्यांनी व्यापार हाती घेतला हे स्पष्ट आहे.

लष्कर यात्रेत आले

‘कश्मिरी पंडितांना भीक नकोय. त्यांना त्यांचे हक्क हवेत,’ अशी भूमिका राहुल गांधी यांनी जम्मूत मांडली. कश्मिरी पंडितांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले त्याच वेळी निवृत्त लष्करी अधिकारी भेटले. परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन बानासिंह जम्मूच्या दिनानगरला यात्रेत सामील झाले. राहुल गांधी यांच्या बरोबर ते 40 मिनिटे चालले. ‘अग्निवीर’ योजना फसवी आणि दिशाभूल करणारी आहे. ही फक्त तात्पुरती, राजकीय खोगीर भरती आहे, असे सर्वच लष्करी अधिकाऱ्यांचे मत पडले. जम्मू-कश्मीरला पावलापावलावर सैन्य आणि सुरक्षा व्यवस्था आहे. कश्मीरची आजची शांतता वरवरची आहे. 20 तारखेला ‘भारत जोडो’ यात्रेच्या मार्गावरच तीन बॉम्बस्फोट झाले. त्यात सात लोक जखमी झाले. या स्फोटाने ‘भारत जोडो’ यात्रा थांबवली जाईल व गांधी परत फिरतील असे अंदाज बांधले, ते खोटे निघाले. पाऊस, बर्फवात, चिखल, स्फोट गांधी यांना थांबवू शकले नाहीत व ती यात्रा कश्मीरच्या अंतिम टप्प्यावर पोहोचली. 19 तारखेला राहुल गांधी 40 कि.मी. चालले व 20 तारखेला 30 कि.मी. चालत राहिले. रोज 4-5 तास चालायचे व जेथे यात्रा संपेल तेथेच कंटेनरमध्ये रात्र घालवून पुढे निघायचे. भारत एकत्र ठेवण्याच्या स्वप्नासाठी ही यात्रा आहे म्हणून त्यांचे स्वागत व्हायला हवे. ‘भारत जोडो’ यात्रेची चेष्टा व हेटाळणी करूनही काही परिणाम झाला नाही. प्रत्येक गावात व शहरात लोक यात्रेत येतच राहिले. काही ठिकाणी लोंढेच उसळले. त्या गर्दीच्या अग्निज्वाला बनतानाचे दृश्य मी पठाणकोटला पाहिले.

देशाचे प्रश्न घेऊन पुढे

संपूर्ण देशाचे प्रश्न घेऊन गांधी कश्मीरला पोहोचले. तर तेथेही प्रश्नांचा डोंगर उभाच होता. कश्मिरी पंडिताप्रमाणे पाकव्याप्त कश्मीरमधून शरणार्थी विस्थापित म्हणून आलेल्या 5300 कुटुंबांचा प्रश्न आजही केंद्र सरकार सोडवू शकलेले नाही. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे या लाखो शरणार्थींना न्याय मिळाला नाही. पाकिस्तानी टोळय़ांनी कश्मीरचा एक भाग दहशत, हिंसाचार करून बळकावला तेव्हा तेथील शीख व हिंदूंना आपल्या सरकारने येथे बोलावले. ते आपली घरे, जमीनजुमला, उद्योग तेथेचे ठेवून येथे आले. सर्व शांत झाल्यावर तुम्हाला पुन्हा पाठवू असे आश्वासन दिले. त्यास 75 वर्षं झाली. हे सर्व लोक आजही निर्वासितांच्या छावण्यांत राहात आहेत व कश्मिरी पंडितांप्रमाणेच हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांचेही ऐकणारे कोणी नाही. सरकारे आली व गेली. हे सर्व निर्वासित त्याच छावण्यांत आहेत. पंडित रस्त्यावर आहेत. राहुल गांधी चालत आज कश्मीरला पोहोचले. राहुल गांधींच्या यात्रेने राजकारणाचे ‘नरेटिव्ह’ (कथानक) बदलले आहे. कश्मीरचे सत्य समोर आले. हिंदू-मुसलमानांना विचार करायला भाग पाडले. देशाच्या विषयांवर चर्चा सुरू झाली. देश जोडण्यासाठी मातीवर चालावे लागते. राहुल गांधी चालत आहेत. 1947 चा भारत-पाक झगडा जमिनीवरून झाला व शेवटी देश तुटण्यापर्यंत गेला. हे विभाजन आणि फाळणीच्या जखमाही कशा ते जम्मूत पाहिले. श्रीनगरपासून पाकिस्तानची सीमा 310 किलोमीटर; पण जम्मूच्या विमानतळापासून भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा फक्त 20 मिनिटांवर. 21 तारखेच्या संध्याकाळी मी तेथे पोहोचलो तेव्हा सैनिकांची परेड सुरू होती. उत्साहाचे वातावरण होते. पर्यटकांची गर्दी होती. तेथे ‘नो मॅन्स लॅण्ड’ आहे. त्यावरून पुढे गेलो. तेव्हा तेथील आपल्या अधिकाऱ्यांनी तेथील शेती व जमिनीचे वाटप कसे झाले ते सांगितले. तेथे सीमेवर एक विशाल पिंपळाचा वृक्ष आहे.
‘या झाडाचीही वाटणी झालीय.’
‘कशी?’
‘हा इकडला भाग आपला. पलीकडच्या फांद्या त्यांच्या.’
हे ऐकून अस्वस्थ झालो. या गावातल्या गायी, बैल चरायला पाकिस्तानच्या हद्दीत जातात व संध्याकाळी पुन्हा घरी परत येतात. त्यांच्यासाठी दोन्ही देश सारखेच!
माणूसच भांडत बसलाय. राहुल गांधींना ते भांडण मिटवायचेय.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]