रोखठोक – धर्मराजांना यक्षप्रश्न! 20 हजार कोटी कोणाचे?

राहुल गांधी व अरविंद केजरीवाल यांनी मोदी-अदानी संबंधांवर जोरदार हल्ला केला. अदानींची संपत्ती ही मोदींचीच आहे, खरे मालक मोदीच आहेत, असे श्री. केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत पुराव्यासह सांगितले! श्रीमंत मोदी यांच्या व्यापारावर प्रकाश टाकणारा हा लेख.

‘मोदी-अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके झाली आहेत, पण सरकारी भ्रष्टाचारास विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांकडे बोट दाखवून आपले प्रिय पंतप्रधान मोदी म्हणतात, “भ्रष्टाचारात सामील झालेले सर्व चेहरे एकाच मंचावर आले आहेत.” मोदी यांचे हे विधान बेताल आहे व मोदींच्या या विधानावर टाळ्या वाजवणारे बिनडोक आहेत. हे लोक देशाला रोज खड्ड्यात टाकत आहेत. श्री. राहुल गांधी यांनी चोरांना चोर म्हटले व त्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द केली, दिल्लीतील घर काढून घेतले. ज्या देशात चोरांना चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य नाही त्या देशाचे नेतृत्व हे चोर आणि दरोडेखोरांच्याच हाती असते. समाज माध्यमांवर या विषयावर आता अनेक विनोद प्रसिद्ध होत आहेत. एक तरुण घरातील चोरीची तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेला. “ चोरी कशी झाली?” पोलीस. “काय सांगू साहेब, रात्री जाग आली… पाहतो तर काय, चोर तिजोरी फोडत होता आणि त्याचा जोडीदार बाहेर उभ्या केलेल्या गाडीत चोरलेल्या सगळ्या वस्तू भरत होता…’ “

“अरे पण तू चोर चोर, मदत करा असे का ओरडला नाहीस.” पोलीस. “साहेब, चोर चोर ओरडल्यावर दोन वर्षांचा तुरुंगवास होतो व त्यानंतर राहते घरही जप्त होते हे मला माहीत आहे म्हणून गप्प बसलो!”

श्री. राहुल गांधी यांचे ‘मोदी- अदानी’ प्रकरण देशात कसे पसरले आहे ते यावरून दिसते. दिल्लीतील भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटनास मोदी गेले व त्यांनी आणखी एक विनोद केला, ‘आमचा पक्ष सोशल मीडियावर चालत नाही,” असे ते म्हणाले. 2014 पासून समाज माध्यमांचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम करणारा हा पक्ष. शेकडो कोटी रुपये खोटेपणाचा प्रचार करण्यासाठी या लोकांनी उडवले. भ्रष्टाचार आणि लुटीतून मिळालेला हा पैसा होता. आज तोच सोशल मीडिया मोदी व त्यांच्या पक्षाला रोज नागडा करीत आहे. 2014चे शस्त्र आता त्यांच्यावर उलटताना दिसत आहे.

नेमके नाते काय?

गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? असे प्रश्न श्री. गांधी यांनी विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे निदान ‘ईडी’ आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत. मात्र खऱ्या चोरांना संरक्षण व दरोडेखोरांना प्रतिष्ठा देण्याचे काम या दोन्ही संस्था आज करीत आहेत. मोदी म्हणतात, ‘सत्तर वर्षांत काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. फक्त सात वर्षांत भाजपने देश प्रगतीपथावर नेला.’

हे सगळ्यात मोठे असत्य आहे. देशात गरिबी व बेरोजगारांचा आकडा वाढत आहे. गरीबांना अधिक गरीब बनवून त्यांना रेशनवर फुकट 5-10 किलो धान्यांची भीक घालणे याला मोदींचे सरकार प्रगती आणि विकास मानत आहे. 67 वर्षांत देशातील सर्व सरकारांनी मिळून 55 लाख कोटींचे कर्ज घेतले होते, पण ‘मोदी’ सरकारने मागच्या फक्त सात वर्षांतच 85 लाख कोटींचे कर्ज घेतले. या 85 लाख कोटींचा हिशेब मागणाऱ्यांना भ्रष्टाचारी ठरवले जाते. या 85 लाख कोटींची मलई अदानी यांच्या खिशात मोठ्या प्रमाणावर गेली. “अदानी यांची सर्व संपत्ती ही श्री. मोदी यांचीच आहे. अदानी हा फक्त चेहरा आहे. त्यांच्या सर्व संपत्तीचे खरे मालक आपले ‘फकीर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत,” असा आरोप श्री. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. मोदी व त्यांच्या मंडळींचा पैसा अदानी ‘मॅनेज’ करतात व अदानी यांना फक्त 10-20 टक्के – कमिशन मिळते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यासह करतात व ईडी, सीबीआय त्यावर गप्प बसते. न्यायालये ‘स्युमोटो’ पद्धतीने पुढे जात नाहीत. अशा विकलांग अवस्थेत आज आपला देश आहे.

केजरीवाल यांचा बॉम्ब

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना फक्त 20 हजार कोटींबाबत एक प्रश्न विचारला, पण मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 28 मार्च रोजी दिल्ली विधानसभेत केलेले भाषण पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंडळींचा मुखवटा ओरबाडून काढणारे आहे. केजरीवाल म्हणतात, “एक भाजपचे बडे नेते त्यांना भेटले. मोदी-अदानी नात्यावर दोघांत चर्चा केली. मोदीजी अदानी यांना इतकी मदत करतात त्याचे कारण काय?” असे त्या भाजप नेत्याने विचारले.

“अदानी मोदींचे मित्र आहेत.” केजरीवाल. “मित्र? आतापर्यंत मोदी यांनी कधीच कुणाला मदत केल्याचे उदाहरण नाही.” भाजपा नेता.

“मग?” केजरीवाल.

‘आपल्या पत्नीसाठी त्यांनी काहीच केले नाही. आपल्या आईसाठीही काही केले नाही. त्यांचे भाऊ, नातेवाईक गुजरातमध्ये राहतात. त्यांच्यासाठी काहीच केले नाही. राजकीय गुरूसाठी काही केले नाही. मग एका मित्रासाठी ते सर्वकाही करतील हे कसे शक्य आहे? मित्रावर ते इतके मेहेरबान का आहेत? ही अशी काय दोस्ती आहे?” भाजपा नेता.

“मग काय मामला आहे?” केजरीवाल. “विचार करा. इतका मोठा घोटाळा झाला.

हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला. चारही बाजूंनी छी थू झाली. अदानी समूह कोसळला. मोदी हे इतके स्वार्थी गृहस्थ आहेत की, मामला फक्त ‘दोस्ती’ पुरता मर्यादित असता तर दोन मिनिटांत त्यांनी अदानीला झटकून दूर केले असते. माझा त्याचा काही संबंध नाही सांगून मोकळे झाले असते, पण मोदी आजही अदानीला वाचविण्याच्या मागे लागले आहेत.’

“इतके होऊनही स्टेट बँक, प्रॉव्हिडंट फंडला त्यांनी सांगितले, अदानीला पैसे द्या. त्याला मदत करा. हे का?”

“मग मोदी स्वतःची बदनामी स्वीकारून अदानीला संरक्षण का देत आहेत?” केजरीवाल.

” अदानी हा फक्त मुखवटा आहे. अदानीमध्ये सर्व पैसे मोदींचे लागले आहेत. अदानी मोदींचे सर्व पैसे मॅनेज करतो. तो मोदींचा मॅनेजर आहे. उद्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘जेपीसी’ लागली तर अदानी बुडणार नाही, मोदी डुबतील.” भाजपा नेता. “मोदींना इतक्या पैशांची काय गरज आहे? त्यांच्या मागेपुढे कोणीच नाही.” केजरीवाल.

“साहेब, ही गरज नसून पैशांची हाव आहे. मोदींमध्ये ती हाव आहे!” ज्या दिवशी अदानी जगातील दुसरे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले ते अदानी नव्हते, तर आपले मोदी हेच जगातले सगळ्यात श्रीमंत दुसऱ्या क्रमाकांची व्यक्ती बनले होते.

“आता मोदींचे स्वप्न आहे, ते जगातले पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनू इच्छितात !”

ज्या देशाच्या पंतप्रधानाला सर्वाधिक श्रीमंत होण्याचा छंद जडला आहे तो स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेतो व विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणतो. हे सरळ सरळ ढोंग आहे. श्री. केजरीवाल यांनी अदानी यांनी गिळंकृत केलेल्या सर्व कंपन्यांची यादीच जाहीर केली. मुंबईसह सहा विमानतळांचा कारभार अदानी यांना देता यावा यासाठी नियम बदलण्यात आले. सीबीआय आणि ईडीने धाडी घातल्यावर कृष्णापटनम पोर्ट अदानीच्या ताब्यात आले. मुंबईचा विमानतळ ‘जीव्हीके’ कंपनीच्या ताब्यात होता. जीव्हीकेवर ईडी- सीबीआयचा वापर केला व मुंबई विमानतळ अदानीच्या ताब्यात आले. अंबुजा सिमेंटचेही तेच झाले. जगभरातील अनेक सौदे व प्रकल्प मोदी यांनी फक्त अदानीच्या खिशात घातले. एका उद्योगपतीच्या घशात देशाची सर्व संपत्ती घालण्याचे कारण काय ? हा केजरीवाल यांचा प्रश्न. त्या प्रश्नाचे उत्तरही केजरीवाल यांनी दिले. “अदानी फक्त ‘फ्रण्टमॅन’ आहेत. त्यांच्या संपत्तीचे खरे मालक मोदी हेच आहेत. भारतीय जनता पक्षाने या भ्रष्टाचाराला व देश लुटण्याच्या पद्धतीला सरळ पाठिंबा दिला. हे देशविघातक आहे. “

जगात काय सुरू आहे?

कोळशापासून विमानतळापर्यंत, रस्त्यांपासून बंदरांपर्यंत सर्वकाही आज अदानींच्या मालकीचे. मग देशाचे असे काय उरले हा प्रश्न भाजपातील किती देशभक्तांना पडला? इंग्रजांनी तरी यापेक्षा वेगळा लुटीचा मार्ग काय स्वीकारला होता? भ्रष्ट राज्यव्यवस्थेविरोधात आज जगातील अनेक भागांत लोक रस्त्यांवर उतरले आहेत. फ्रेंचांनी जगाला लोकशाही व स्वातंत्र्याचे मूल्य काय ते समजावले. त्या फ्रान्समधले राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभाराविरोधात तेथील जनता रस्त्यावर आली. इस्रायलचे संरक्षणमंत्री, पोलीसदेखील जनतेच्या आंदोलनात सहभागी झाले. न्यायिक सुधारणांच्या नावाखाली बेंजामिन नेत्यानाहू देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था खिशात ठेवू इच्छित होते. आता जनतेच्या आंदोलनामुळे नेत्यानाहू यांनी माघार घेतली आहे.

इस्रायलमधील जनतेच्या आंदोलनास नेता नाही. फ्रान्समधेही नेत्याशिवाय लोक रस्त्यावर उतरले. श्रीमंत मोदी यांनी जगातील या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. दडपशाही व हुकूमशाहीचा अंत जनता करते.

श्री. गांधी यांनी मोदींकडे फक्त 20 हजार कोटींचे रहस्य विचारले. केजरीवाल म्हणतात, ‘अदानी म्हणजेच मोदी आहेत. हेच सत्य आहे. ‘ ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या प्रश्नाप्रमाणे अदानींच्या कंपनीत गुंतवलेले 20 हजार कोटी कोणाचे? हा प्रश्न महत्त्वाचा. सर्वत्र हाच ‘यक्ष’ प्रश्न विचारला जात आहे. मोदींच्या 20 हजार कोटींनी समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला आहे.

धर्मराज म्हणजे युधिष्ठिर तहानेने व्याकूळ झाला होता. चारही पांडव भाऊ जंगलात पाण्याचा शोध घेण्यासाठी गेले, ते अद्यापि परत का आले नाहीत या चिंतेने धर्मराज ग्रासला होता. भाऊ परतले नाहीत तेव्हा धर्मराज स्वतःच त्या अरण्यात भावांचा शोध घेण्यासाठी निघाला व एका तळ्याजवळ जाऊन पोहोचला. पाहतो तर काय? त्याचे चारही ‘पांडव’ भाऊ तेथे जणू गतप्राण होऊनच पडले होते, पण घशाला कोरड पडली होती, जीव कासावीस झाला होता म्हणून ओंजळभर पाण्यासाठी त्याने तलावात हात घालताच सारस पक्ष्याच्या स्वरूपातील एका यक्षाने त्याला थांबवले.

“थांब! तुझ्या भावांनीही माझे ऐकले नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्राशन केलंस तर पाण्याचे विष होईल.” यक्ष.

धर्मराज म्हणाला, “विचार प्रश्न!” यक्षाने प्रश्न केला, “धर्मराज सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले?”

– पहिल्याच प्रश्नाने धर्मराज गोंधळला. यक्षाकडे त्याने हतबलतेने पाहिले. कोपरापासून नमस्कार केला. “येतो मी” सांगून मागे फिरला व तहानेने व्याकूळ होऊन आपल्या भावांच्या जवळ कोसळला! आता मोदी, अदानी यांनीच उत्तर देऊन यक्षप्रश्न सोडवावा व पाच भावांचे प्राण वाचवावे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]