रोखठोक – 2 मेनंतरच्या राजकीय घडामोडी; कोरोनातही ‘सत्तावाद’ कायम

rokhthok2 मे रोजी राजकारणात काय उलथापालथ होणार याची उत्सुकता सगळय़ांनाच आहे. कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली तरी देशातील सत्तावाद संपला नाही व राजकारण संपले नाही. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होतील असे जे म्हणतात त्यांनी दिल्ली स्थिर राहील काय? हेसुद्धा पाहायला हवे!

आज 2 मे!

हा दिवस देशाच्या राजकीय पटलावर धक्कादायक आणि खळबळजनक ठरेल काय? हा प्रश्न राजकीय वर्तुळात सगळय़ांना पडला आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आता सुरू झाली असेल, पण प. बंगालात काय होईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही निवडणुकांचे राजकारण थांबले नाही. पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह सगळेच जण कोरोनाचे नियम मोडून प. बंगालात गर्दी जमवत राहिले. निवडणुकांचा प्रचार आटोपल्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयास जाग आली व दिल्लीत पंतप्रधान मोदीही कोरोना कार्यात त्यानंतर सहभागी झाले. आज प. बंगालचे निकाल लागतील. तृणमूल काँग्रेसचे महत्त्वाचे नेते डेरेक ऑब्रॉन यांचे व माझे दोन दिवसांपूर्वीच बोलणे झाले. ‘‘ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा विजयी होत आहेत. खात्री बाळगा,’’ असे श्री. ऑब्रॉन यांनी सांगितले. देशाच्या लोकशाहीचा डोलारा आज संपूर्णपणे कलला आहे. तो पूर्ण खाली कोसळू द्यायचा नसेल तर प. बंगालात ममता बॅनर्जींचा विजय ही काळाची गरज आहे.

काय बदलेल?

प. बंगाल विधानसभा निवडणुकांमुळे देशाच्या राजकारणाचे चित्र थोडे तरी बदलेल काय? याआधी मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली. तेव्हा हे चित्र बदलून टाकणारे निकाल आहेत, असा डंका पिटला, पण पुढच्या लोकसभेत (2019) दोन्ही राज्यांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. राजस्थानात अशोक गेहलोत त्यांच्या पुत्रासही जोधपूरमधून निवडून आणू शकले नाहीत. मध्य प्रदेशातल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा गट भाजपने फोडून काँग्रेसची सत्ताच हिसकावून घेतली. याचे कारण मोदी यांची लोकप्रियता आता घसरत आहे खरे, पण त्यांच्यासमोर उभे राहील असे नेतृत्व आजही उभे नाही. प. बंगालच्या निकालानंतर श्रीमती ममता बॅनर्जी मोदीविरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील, तेव्हा काय चित्र होईल? यावर पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत.

बेभरवशाचे चित्र

दिल्लीसह देशाचे चित्र प्रथमच अस्थिर व बेभरवशाचे झाले आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळण्यास मोदींचे सरकार संपूर्ण अपयशी ठरले हे आता सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले. मोदी ज्या दिल्लीतून देशाचे राज्यशकट हाकत आहेत त्या दिल्लीतील स्मशानभूमीत प्रेतं जाळण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना 24 तास रांगेत उभे राहावे लागते. पंडित राजन मिश्रंसारखा महान गायक वेळीच ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही म्हणून स्वर्गवासी झाला. सामान्य माणसांचे हाल तर शब्दांत वर्णन करावे असे नाहीत. पानिपतावर सदाशिवभाऊ कोसळले व सैन्याची पळापळ झाली तसे चित्र दिसत आहे. परिस्थिती इतकी गंभीर होत चालली तरी सत्तावाद संपत नाही. आग्र्यामध्ये मृतदेह जाळण्यासाठी पाच दिवसांचे वेटिंग आहे. वाराणशीत मृतदेहांना खांदा द्यायला माणसे मिळत नाहीत. हे चित्र संपूर्ण देशाचेच आहे व त्याची जबाबदारी केंद्रातले मोदी सरकार घ्यायला तयार नसेल तर राजकारण्यांनी धोक्याची पातळी ओलांडली हे स्पष्ट होते. सध्याच्या संकटकाळातही सत्ताधाऱयांचे राजकारण थांबले नाही. जागोजागी चिता पेटत असताना प. बंगालातील भाषणबाजी, रोड शो शेवटपर्यंत संपले नाहीत. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ मात्र सोकावतो. प. बंगालचे निकाल अशारितीने काळ सोकावू देणार आहेत की बेबंद होऊ पाहणाऱया सत्तावादाला पायबंद घालणार आहेत? हा खरा सवाल आहे.

महाराष्ट्रावर लक्ष!

प. बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ सुरू केले जाईल, असे छातीठोकपणे सांगणारे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. ‘‘हिंदुस्थानच्या जनतेला मूर्ख बनवणे जमू शकले, पण एक विषाणू तुम्हाला सत्तेवरून घालविण्याच्या कामास लागला आहे. आधी त्या विषाणूचा पराभव करा,’’ असे मी त्या नेत्यांना सांगितले.

प. बंगालच्या निकालावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, असे जे सांगतात ते नक्की कोणत्या नंदनवनात वावरत आहेत?

प. बंगालच्या निकालानंतर श्री. अमित शहा हे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत लक्ष घालतील, असे जे सांगितले जाते ते कशाच्या आधारावर? एक तर पैशांचा व बळाचा वापर करून आमदार फोडाफोडी केली जाईल किंवा कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावली जाईल. कोरोना स्थितीचेच कारण असेल तर केंद्रातल्या सरकारलाही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे आधी प्रामाणिकपणे स्वीकारायला हवे. औषधे व ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे? महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फसले आहेत. या पुढेही ते यशस्वी होतील असे मला दिसत नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शहा यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा. एक राज्य जिंकण्यासाठी संपूर्ण देश कोरोना महामारीच्या खाईत ढकलण्याचे पाप यानिमित्ताने झाले हे आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगालाच आरोपी केले. महाराष्ट्र सरकारवरही उच्च न्यायालयाने प्रश्न उभे केले. हे सर्व राष्ट्रीय नियोजन व समन्वय कोसळल्यामुळेच झाले.

कोरोनामुळे देश आर्थिक डबघाईला आला असताना 1000 कोटी खर्चाचा नवा संसद भवन उभारणीचा प्रकल्प हाती घेणे व राबवणे हे कोणत्या माणुसकीच्या व्याख्येत बसते? यावर आवाज उठवेल तो पुन्हा राजद्रोही ठरतो. पाकिस्तान, बांगला देशसारखी राष्ट्रे हिंदुस्थानला मदतीचा हात पुढे करीत आहेत. इतकी देशाची परिस्थिती ढासळली आहे. प. बंगालच्या निकालानंतर या परिस्थितीत कशी सुधारणा होणार? कोरोना महामारीमुळे देशात प्रचंड पडझड झालीच आहे. ‘आत्मनिर्भर’ हिंदुस्थानास मदत करण्यासाठी रशिया, सिंगापूर, अमेरिका, फ्रान्सपासून पाकिस्तान, बांगला देशपर्यंतची कार्गो विमाने दिल्लीच्या विमानतळावर उतरत आहेत. प. बंगालचे निकाल काहीही लागले तरी देशाची ही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आज केंद्र सरकारात उरले आहे काय?

2 मेनंतर महाराष्ट्रात घडामोडी होतील असे जे म्हणतात त्यांना माझा एकच प्रश्न. महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लीसही बसू शकतील असे वातावरण आज देशात आहे. प. बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू असेल. आज काय होतंय ते पाहूया.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या