रोखठोक – पुलवामा, पालघर, खारघर! सदोष मनुष्यवधच!!

नवी मुंबईतील खारघर येथे 14 साधकांचे बळी गेले. सरकारने उकळत्या उन्हात घेतलेले हे बळी. ‘पुलवामा’ हल्ल्यात 2019 साली 40 जवानांचे बळी सरकारी कृपेने गेले याचा स्फोट आता जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. ‘पुलवामा’ बळी हेसुद्धा सदोष मनुष्यवध आणि पालघरच्या तीन साधूंची हत्या म्हणजेही सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का?

माणसांच्या जिवाची सध्या कोणालाही किंमत नाही व पातळी घसरलेल्या राजकारणाने तर सध्या मरण सगळय़ात स्वस्त केले. ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळा भरदुपारी रणरणत्या उन्हात पार पडला. राजकारणी, श्रीमंतांच्या खाशा स्वाऱ्यांसाठी थंड मंडप आणि सावलीतले व्यासपीठ उभे केले व लाखोंचा जनसागर उन्हात. त्यात मुले, महिला, वृद्ध वगैरे 42 डिग्री तापमानात उघडय़ावर होते. पुन्हा श्रीमंतांची भाषणे लांबत गेली आणि उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जिवांचे बळी गेले. हा आकडा खरा नाही. सरकारी बेफिकिरीचे हे बळी, पण सरकारला आता देवाचे स्थान. कारण गरीबांना सरकार देते. त्यामुळे मृत्यूही सरकारने दिला. मग 14 निरपराध्यांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर का दाखल होऊ नये? हा सरळ प्रश्न आहे. गेल्या पंधरा दिवसांत सरकारपुरस्कृत सदोष मनुष्यवधाची दोन प्रकरणे समोर आली. ‘पुलवामा’ येथे 2019 साली घडलेल्या 40 जवानांचे हत्याकांड हे मोदी सरकारच्या निपियतेचे बळी होते. राजकीय फायद्यासाठी ‘पुलवामा’ हत्याकांडाचा वापर भारतीय जनता पक्षाने केला हे पहिले. खारघर येथे ‘महाराष्ट्रभूषण’ सोहळय़ाच्या निमित्ताने लाखोंची गर्दी जमवून गृहमंत्री अमित शहांकडून पाठ थोपटून घ्यायची हा मुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय स्वार्थ होता, हे दुसरे. पुलवामा आणि खारघर या दोन्ही दुर्घटनांत निरपराध मारले गेले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दोन्ही बाबतीत सरकारकडून घडला. आता भारतीय जनता पक्षाचा दुटप्पीपणा कसा तो पहा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली अशी बोंब देशभरात मारून एक वातावरण निर्माण केले गेले. विरोधी पक्षनेते तेव्हा श्री. देवेंद्र फडणवीस होते व त्यांनी साधूंच्या हत्येबद्दल सरकारला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. डहाणूच्या गडचिंचले गावात जेथे साधू मारले गेले तेथे श्री. फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपची जत्राच उसळली होती, पण आता खारघरमध्ये जे 14 ‘श्री सेवक’ मारले गेले ते झुंडीचेच बळी होते. हे 14 जण हिंदुत्वाच्या कार्यासाठीच खारघरला आले होते व सरकारी बेफिकिरीचे बळी ठरले. मात्र या हत्याकांडावर श्री. फडणवीस आणि त्यांच्या भाजपची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प आहे.

14 हिंदू धार्मिक कार्पामात मारले गेले. हे सर्व प्रकरण पैसे वाटून मिटवण्यासाठी इस्पितळात व मृतांच्या घरी कोणाचे लोक पोहोचले? गृहमंत्री फडणवीस, कृपया चौकशी करा!

खारघरचे हत्याकांड

पालघरचे साधू हत्याकांड व खारघरचे श्री सेवकांचे हत्याकांड यात फरक करता येणार नाही. पुलवामाचे हत्याकांड हे त्या सगळय़ांच्या वर आहे. पुलवामा प्रकरणात सत्यपाल मलिक हे नाव एव्हाना घराघरांत पोहोचले आहे. जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल असलेल्या सत्यपाल मलिक यांची एक सनसनाटी मुलाखत प्रसिद्ध झाली. तेव्हापासून टीव्ही, वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांना घाम फुटला आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत मलिक यांनी केलेल्या विधानांना ठळक प्रसिद्धी देण्यापेक्षा त्यांची बातमी दाबता कशी येईल यावरच त्यांची कसरत सुरू आहे. गुलाम नबी आझादांपासून ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्रात शिंदे-अजित पवारांचे राजकीय बंड अशा बातम्यांवर दिवसभर चर्चासत्रे घडवणाऱ्या माध्यमांनी मलिक यांनी पुलवामा हत्याकांडाबाबत केलेल्या खुलाशावर ‘बंदी’च घातली. उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमदचे हत्याकांड त्याच वेळी घडवून मलिक यांनी 40 जवानांच्या हत्याकांडावर केलेला स्फोट दडपण्याचा प्रयत्न झाला. श्री. मलिक यांनी काय स्फोट केला? 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे 40 जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. आरडीएक्स स्फोटकांचा वापर करून जवानांना घेऊन जाणारी वाहने उडविण्यात आली. त्यात 40 जवानांचे बलिदान झाले. जवानांच्या देहाच्या अक्षरश: चिंधडय़ाच झाल्या. सत्यपाल मलिक यांनी आता करण थापर यांना एक मुलाखत दिली व सांगितले की, जवानांचे हे बळी सरकारच्या चुकीमुळे गेले. मलिक यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हे वृत्त लगेच कळवले, पण आधी पंतप्रधान मोदी व नंतर श्री. अजित डोवाल यांनी राज्यपाल मलिक यांना या विषयावर गप्प राहण्यास सांगितले. या हल्ल्याचे खापर पाकिस्तानवर फोडून लोकसभा निवडणुकांना सामोरे जायचा ‘प्लान’ त्यांच्या मनात असावा असे श्री. मलिक यांना तेव्हा वाटले व तेच घडले. “40 जवानांच्या हत्येचा बदला घेऊ, पाकिस्तानला धडा शिकवू” असा प्रचार भाजपकडून सुरू झाला. मतदारांना भावनिक आवाहन करण्यात आले. सत्यपाल मलिक हे तेव्हा जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते व त्यांची नियुक्ती मोदी व डोवाल या दोघांनी केली होती. त्यामुळे मलिक यांच्या आताच्या गौप्यस्फोटाने ‘माध्यमां’त खळबळ माजायला हवी होती, पण माध्यमांत एक प्रकारे सन्नाटा पसरला. सरकार प्रायोजितच ही शांतता असावी हे नक्की होते.

पुलवामाचे कारस्थान 

पुलवामा हल्ला हा सरकार प्रायोजित होता काय? 2019 च्या निवडणुका जिंकता याव्यात यासाठी सुनियोजित पद्धतीने रचलेले हे राजकीय षङयंत्र होते काय? अशा शंका आता उघड झाल्या आहेत. सत्यपाल मलिक यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले गेले, पण ‘पुलवामा’ पद्धतीचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज गुप्तचर खात्याने दिला होता. ‘फ्रंटलाइन’ नियतकालिकाच्या फेब्रुवारी 2021 च्या अंकात झालेला खुलासा भाजपच्या अंध भक्तांनी चष्मा लावून पाहायला हवा. सरकारी गुप्तचर खात्याने स्पष्ट संदेश दिला होता की, स्फोटकांचा वापर करून जवानांच्या वाहनांवर हल्ला केला जाईल ही माहिती गुप्तचरांनी किमान बारा वेळा केंद्रीय गृहखात्याकडे पाठवली. ‘फ्रंटलाइन’ने पुराव्यासह प्रसिद्ध केलेल्या या स्फोटक माहितीच्या खोलात जाऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने तपास करायला हवा होता. तसे का झाले नाही? 9 फेब्रुवारीला पक्की खबर होती की, जैश-ए-मोहम्मद मोठय़ा हल्ल्याची तयारी करत आहे. अवंतीपोरा आणि पांपोरा भागात हल्ल्याचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण सुरू आहे.

पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवस आधी गुप्तचरांनी हल्ल्याचा संपूर्ण ‘प्लान’ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला. 12 फेब्रुवारीला ‘आयबी’च्या (केंद्रीय गुप्तचर एजन्सी) मल्टी एजन्सी सेंटरला गुप्त अहवाल आला की, जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी हँडलरने हल्ल्याची तयारी पूर्ण केली असून कश्मीर खोऱ्यात सुरक्षा बल ज्या ज्या सडक मार्गांचा वापर करतात त्या रस्त्यांवर ‘आयईडी’ स्फोटके पेरण्याची तयारी सुरू आहे आणि पुन्हा हल्ल्याच्या 24 तास आधी म्हणजे शेवटी अकरावा ‘इशारा’ मिळाला की, जैश-ए-मोहम्मद सुरक्षा दलांच्या रस्त्यांत ‘आयईडी’ स्फोट घडवून जवानांची वाहने उडवू शकते. सावधान रहा! या सगळय़ा सूचना, धोक्याचे इशारे मिळूनही दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला अडीच हजारांपेक्षा जास्त सीआरपीएफ जवानांना त्याच धोकादायक रस्त्यावरून पाठविण्यात आले. याच रस्त्यावर स्फोटके पेरल्याची सूचना आधीच मिळाली होती. सीआरपीएफच्या ‘कमांड’लाही धोक्याची सूचना होती. त्यामुळे जवानांना रस्त्यावरून नेणे धोक्याचे असल्याचे कळवून विमानाने पाठविण्याची मागणी केली. विमानांची मागणी गृह मंत्रालयाने फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर त्या मार्गावरील सर्व सुरक्षा नाक्यांचीही काळजी घेतली नाही. सर्व नाके मोकळेच ठेवले. त्यामुळे ज्याची भीती होती तेच घडले. गुप्तचरांनी सरकारला दिलेली माहिती खरी ठरली. तेच जैश-ए-मोहम्मदबद्दल. त्यांच्याद्वारे त्याच मुदस्सीर खानच्या नेतृत्वाखाली त्याच पुलवामा, अवंतीपोरा भागात आयईडी स्फोट घडवून 40 जवानांची हत्या केली. हे असेच घडेल याची खबर जशीच्या तशी ‘आयबी’ने गृह मंत्रालयास कळवली होती. सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले व 40 जवान प्राणास मुकले. राष्ट्रद्रोह आणि सदोष मनुष्यवध यालाच म्हणतात.

‘चूप बसा’ धोरण! 

‘आयबी’ म्हणजे केंद्रीय गुप्तचर खात्याने पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती आधीच पोहोचवली. सरकारने त्याकडे डोळेझाक केली व जवान मारले गेले. त्यामुळे सत्यपाल मलिक यांनी आता केलेल्या स्फोटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यावर चूप आहेत. एरवी लांबलचक ‘फेकू’ भाषणे ठोकणारे भाजपवाले गप्प आहेत. अतिक अहमदच्या हत्येचे श्रेय घेणारे, माफिया राज संपवले, साफ धुळीस मिळवले असे सांगणारे भाजपवाले व त्यांचे सरकार सत्यपाल मलिक यांच्या खुलाशावर एक शब्द बोलत नाहीत. कदाचित मलिक यांना ठार वेडे, भ्रष्टाचारी किंवा देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकण्याचे कारस्थान रचण्यात हे सगळे दंग असावेत. पंतप्रधान व त्यांचे सहकारी गौतम अदानींच्या लुटमारीवर गप्प बसले व आता 40 जवानांच्या हत्याकांडावर सत्यपाल मलिक यांनी केलेल्या खुलाशावर गप्प बसले. पालघरच्या तीन साधू हत्याकांडावर जो ‘भाजप’ व त्यांचे मंत्री उसळून उठले ते खारघरच्या ‘साधक’ बळांवर गप्प आहेत. पुलवामा खुलाशावर तर त्यांची दातखिळीच बसली आहे. आपले पंतप्रधान मोदी नोटाबंदीच्या अपयशावर आणि रांगेतल्या शेकडो बळींवर बोलत नाहीत, मोदी अदानींच्या घोटाळय़ावर बोलत नाहीत व जे मोदी सर्जिकल स्ट्राइकच्या फटाकेबाजीवर जाहीर सभांतून बोलत राहिले, ते मोदी पुलवामाच्या निर्घृण हत्याकांडावर सत्यपाल मलिक यांनी जो स्फोट केला, त्यावरही बोलत नाहीत!

मोदी यांचा मौनी बाबा नक्की का झाला? त्यांच्या जिभेला असा मौनाचा आजार का जडला? लोक मरोत, जगोत, सैनिक

बॉम्बस्फोटांत मरोत, लोक चिरडून मरोत, आम्हाला काय त्याचे?

सरकार त्याच भूमिकेत आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]