
रायगडावरील शिवरायांची समाधी कोणी शोधून काढली यावर इतिहास चिवडण्याचे काम काहींनी सुरू केले आहे. ‘महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक’ असा हा वाद निरर्थक आहे. शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच महत्त्वाचे, पण लोकांची मती गुंग झाली आहे!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा गाडलेली मढी उकरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यालाच काही जण इतिहास संशोधन असे म्हणतात. आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या घटनेबद्दल चारजण वेगवेगळी माहिती देतात हे पाहून सर वोल्टर रॅलेने लिहिलेला इतिहास जाळून टाकला किंवा पाण्यात फेकून दिला, या घटनेचा उल्लेख इतिहास संशोधक नेहमीच करीत असतात. आपल्या नजरेसमोर घडलेल्या घटनांबद्दल इतके दुमत, तर इतिहासकाळातील घटनांबद्दल कसली शाश्वती देणार, असा प्रश्न रॅलेला पडला. रॅलेला पडलेला प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांना का पडू नये, असा प्रश्न मला आता पडला. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद आहेच. आता शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी कोणी शोधून काढली यावर ‘टिळक विरुद्ध फुले’ असा निरर्थक वाद राजकारण्यांनी सुरू केला. तो वाद कमी पडला म्हणून 1992 सालात अयोध्येतील बाबरी नक्की कोणी पाडली, असा वाद भारतीय जनता पक्षाने सुरू केला. इतक्या वर्षांनंतरही श्रेयवादाचे युद्ध संपले नाही व अयोध्येत राममंदिर उभे राहिले तरी युद्ध सुरू आहे. बाबरी हिंदुत्वाच्या लाटेत उद्ध्वस्त झाली, त्या लाटेच्या शिखरावर शिवसैनिक होते. बाबरी पडली हे महत्त्वाचे. शिवाजी महाराजांचा जन्म सन 1627 मध्ये झाला असे काही इतिहासकार मानतात, तर काही इतिहास संशोधक छत्रपतींचा जन्म 1630 मध्ये झाला असे मानतात. जन्म केव्हाही झाला तरी त्यामुळे काही किरकोळ तपशिलांपलीकडे मुख्य ऐतिहासिक चरित्रात फरक पडत नाही. मुळात शिवाजीराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला हे महत्त्वाचे. जन्म-तिथीचा अनिश्चितपणा अनाठायी आहे.
पंतप्रधानांचे दाखले
आपले पंतप्रधान श्री. मोदी हे त्यांच्या भाषणात ऐतिहासिक दाखले देत असतात. शिखांचे धर्मगुरू तेजबहादर सिंग यांच्या 300 व्या जन्मतिथीनिमित्त त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. औरंगजेब किती क्रूर व अत्याचारी होता याची आठवण त्यांनी करून दिली, पण एक गोष्ट इतिहास म्हणून सगळ्यांच्याच नजरेतून सटकते. शिवाजी महाराजांचा जन्म जसा महाराष्ट्रात झाला तसा औरंगजेबाचा जन्म गुजरातेत दाहोद येथे झाला. लहान असताना बापाबरोबर त्याच्या संपूर्ण हिंदुस्थानात दोन फेऱ्या झाल्या. बादशहा होण्यापूर्वी पंधरा वर्षे त्याने महाराष्ट्राचा कारभार केला आणि त्याच्या आयुष्याची अखेरची पंचवीस वर्षे ही महाराष्ट्रातच युद्ध करण्यात गेली. यावरून शिवाजी राजे व बादशहा औरंगजेब यांचा सामना किती अपूर्व व दीर्घद्वेषी होता हे लक्षात येईल.
समाधीचा शोध
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध श्री. राज ठाकरे यांनी संभाजीनगरातील सभेत लावला. त्यात तितकेसे तथ्य नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजीराजांच्या समाधीचा रायगडावरून शोध लावला याबाबत एकमत आहे, पण त्याबाबत दोन भिन्न प्रवाह आहेत व दोन्ही प्रवाहांचा आदर करणे हेच योग्य आहे. 1869 साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ल्यावरील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. शिवरायांची समाधी तेव्हा भग्नावस्थेत होती. शिवराय नावाचे तुफान त्या भग्न समाधीत शांतपणे पहुडले होते. ते तुफान पुन्हा उठल्याशिवाय गुलामगिरीत खितपत पडलेल्या तरुणांना प्रेरणा मिळणार नाही हे फुले यांनी ओळखले व त्यांनी शिवरायांची समाधी जगासमोर आणली. धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिले. त्यात ते सांगतात, ‘‘महात्मा फुले हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे पितामहच होते. फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडचा दौरा केला. त्यांच्या मनात शिवाजीराजांच्या कार्याविषयी व संघर्षाविषयी सन्मान होता. रायगडावर जाऊन ते या महान राजांची समाधी शोधू लागले. सुकलेली पाने व दगडांच्या ढिगाखाली गाडलेली ही समाधी त्यांनी शोधून काढली.’’ त्यानंतर शिवरायांच्या शौर्यावर पोवाडा लिहिला, इतकेच नव्हे तर, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज जोतिबांनी केला होता.
टिळकांचेही काम मोठे
फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावला. पालापाचोळ्यात दडलेला महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास जगासमोर आणला. लोकमान्य टिळकांनीही सार्वजनिक शिवजयंतीच्या माध्यमातून शिवरायांच्या समाधीचा एकप्रकारे जीर्णोद्धारच केला. 1883 मध्ये जेम्स डग्लस नावाच्या एका इतिहासप्रेमी इंग्रजाने शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्यावेळी मराठी माणसाच्या मनात असलेली अस्वस्थता जाणून लोकमान्य टिळकांनी श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला. शिवाजी महाराजांच्या बाबतीत महात्मा फुले यांच्याइतकेच लोकमान्य टिळकांचेही काम मोठे आहे. समाधी प्रकरणात उगाच इतिहास चिवडत बसण्यात काय अर्थ व ‘टिळक विरुद्ध फुले’ असा जातीय रंग तरी का द्यायचा?
नक्की खरे काय?
बाजीप्रभू देशपांडे यांच्या खऱ्या-खोट्या चित्रावरून इतिहासकारांनी वाद घातला. पावनखिंडीत हौतात्म्य पत्करणाऱ्या बाजीप्रभूंचे महत्त्व एका चित्रपटात कसे मारून टाकले हे मी पाहिले. शिवाजी महाराजांसाठी पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या बाजीप्रभूंचे शौर्य नाकारणे हा कोणता इतिहास? मराठ्यांच्या इतिहासातील गोंधळ इतिहास संशोधकांनीच किती निर्माण केला याचेच संशोधन आता झाले पाहिजे. सूर्याजी पिसाळाचे रंगविलेले व्यक्तिचित्र चुकीचे आहे, असे सेतुमाधवराव पगडी म्हणतात. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांपुढे आलीच नव्हती असेही ते म्हणतात. पुण्याच्या केळकरांनी आपल्या संग्रहालयात मस्तानी महाल उचलून आणला हे प्रसिद्ध झाले तेव्हा तो महाल मस्तानीचा असूच शकत नाही असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, पण जेम्स लेनने शिवाजी महाराज व त्यांच्या मातेविषयी तद्दन खोटा इतिहास लिहिला व जगात महाराष्ट्राच्या इतिहासाची बदनामी केली तेव्हा त्यांचा धिक्कार करण्यासाठी किती इतिहासकार व त्यांचे राजकीय समर्थक पुढे आले?
इतिहास किती चिवडत बसाल? ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास चिवडत बसतात किंवा इतिहास उद्ध्वस्त करतात. दिल्लीत व महाराष्ट्रात तेच घडत आहे.
Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]