मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर!

146

rokhthokमहाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती हवी, असे भाजप नेते आता बोलू लागले. राजकीय गरजेतून त्यांची ही वक्तव्ये येत आहेत. ‘स्युडो सेक्युलॅरिस्ट’ लोकांबरोबर शिवसेना जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे अनेक प्रश्नांची राजकीय उत्तरे नाहीत.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिन सोहळय़ात शिवसेनेला युती टिकवण्यासाठी आवाहन करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष श्री. अमित शहा यांनी ते केले. शिवसेना आमच्या बरोबर हवी आहे, असे श्री. शहा आता सांगतात व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून भाजपचे सगळेच नेते आता ‘युती’ची री ओढताना दिसतात. हा चमत्कार म्हणावा लागेल. ही जादूची कांडी अचानक कशी फिरली, हा प्रश्न सगळय़ांनाच पडला असला तरी २०१४ ची परिस्थिती आता राहिली नाही व २०१९ पर्यंत महाराष्ट्राची हवा पूर्णपणे बदललेली असेल. त्या बदलत्या हवेबरोबर जाण्याचा हा प्रयत्न असावा. भारतीय जनता पक्षाला आज शिवसेनेबरोबर युती हवी आहे. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्ववादी पक्षांबरोबर राहील. बेगडी निधर्मीवाद्यांच्या बरोबर शिवसेना जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सांगितले. आता हे बेगडी निधर्मीवादी कोण? व शिवसेना त्यांच्याबरोबर जाणार आहे असे भाजप नेत्यांना कोणी सांगितले?

मुख्यमंत्री काय म्हणाले?
‘लोकमत’ दैनिकाच्या एका सोहळय़ात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याशी जाहीर ‘वार्तालाप’ करण्याचा योग आला. मुख्यमंत्र्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. पण सरकारी भाषा व आकडेवारीच्या प्रेमात ते मोदींप्रमाणेच पडले आहेत. सरकारी भाषा ही सामान्य जनतेची भाषा नाही. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे, पण गृहमंत्री असल्याचे दिसत नाही. यावर महाराष्ट्राचा क्राइम रेट कसा कमी झालाय त्याची सरकारी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. पण चार दिवसांपूर्वी नगर येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यात भाजप व राष्ट्रवादीचे दोन मिळून तीन आमदारांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे व भीमा-कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र पेटला असताना सरकार कुठे हरवले होते या प्रश्नावर कुणाकडे उत्तर नाही. क्राइम रेट कमी झाला म्हणजे काय? नगरचे खून, भीमा-कोरेगावची दंगल व त्यानंतर जाती-पातीत फाटलेला महाराष्ट्र. हा सर्व प्रकार गुन्हेगारीत मोडत नसेल तर त्यावर न बोललेलेच बरे!

युती का तुटली?
शिवसेनेने २०१४ साली जास्त जागा मागितल्याने ‘युती’ तुटली असे आता श्री. फडणवीस सांगतात, पण २०१४ साली मोदींची हवा नसती तर भाजपने जास्त जागांची मागणी केली नसती. शिवसेना राज्याच्या राजकारणात मोठय़ा भावाच्या भूमिकेत वावरली. भाजपची महाराष्ट्रात ओळख नव्हती. ही ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून दिली, पण २०१४ साली मोदींचा उदय झाला व भाजप ही ओळख विसरला. शिवसेनेला १५१ जागा हव्या होत्या म्हणून युती फिस्कटली. पण शिवसेना १५१ पेक्षाही जास्त जागा महाराष्ट्रात लढतच होती व प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सेनेकडून जास्त जागा मागण्याचे काम भाजप करीत राहिला. लोकसभा निवडणुकीचा दोघांतील जागावाटपाचा आकडा कधी बदलला नाही, पण विधानसभेतील आकडा बदलत गेला. २०१४ साली शिवसेनेला १५०च्या खाली आणायचे व खिंडीत पकडायचे, असा सगळा मामला होता. हे असे भाजपने सर्वच मित्रांच्या बाबतीत केले. तेलगू देसम पक्षाने आता भाजपची साथ सोडली. ते सरकार व एनडीए दोन्हीतून बाहेर पडले. उत्तर प्रदेशातील काही पक्ष जे भाजपबरोबर आहेत ते दूर गेले. महाराष्ट्रात राजू शेट्टी व त्यांच्या शेतकरी संघटनेनेही भाजपची साथ सोडली. आज देशात भाजपला मित्र कोण उरले, हा पहिला प्रश्न व भाजप स्वबळावर २८० जागांचे बहुमत मिळविण्याच्या स्थितीत आहे काय, हा दुसरा प्रश्न. २८० जागा मिळविण्याची पाच टक्के खात्री असती तरी भाजपने शिवसेनेला चुचकारले नसते. कारण ज्यांनी मदत केली त्यांना संपवा व स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवा हा भाजपचा महत्त्वाचा अजेंडा. महाराष्ट्रात तो तडीस गेला नाही.

बेगडी निधर्मीवाद!
शिवसेना हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे ती ‘स्युडो सेक्युलॅरिस्ट’ म्हणजे बेगडी निधर्मीवाद्यांबरोबर जाणार नाही असा विश्वास भाजपला वाटतो. पण एक शिवसेना सोडली तर भाजपच्या मित्र यादीत सगळेच ‘स्युडो सेक्युलॅरिस्ट’ आहेत. रामविलास पासवानांपासून रामदास आठवलेंपर्यंत आणि ईशान्येकडील मित्रांपासून जम्मू-कश्मीरच्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीपर्यंत हे सर्व आज भाजपचे ‘मित्र’ पक्ष आहेत, ते हे सर्व हिंदुत्ववादी आहेत काय? खरे म्हणजे, शिवसेना हाच हिंदुत्वाचा एकमेव राष्ट्रीय चेहरा आहे व शिवसेना अखेरचा हात झटकेल तेव्हा भाजपचे बेगडी हिंदुत्व उघडे पडेल. स्वतःची लक्तरे झाकण्यासाठी शिवसेनेची साथ हवी आहे व लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवता येणार नाही याची खात्री पटल्यानेच शिवसेनेला चुचकारले जात आहे.

…तेव्हा गप्प का राहिले?
सत्तेचा वापर करून शिवसेनेला अपमानित करण्याचा जो प्रकार गेल्या साडेतीन वर्षांत घडला तो मुख्यमंत्री व श्री. अमित शहादेखील रोखू शकले नाहीत. भाजपचे मुंबईतील एक खासदार व मुंबईचे अध्यक्ष शिवसेनेविषयी व शिवसेना पक्षप्रमुखांविषयी ज्या भाषेत गरळ ओकत राहिले तो सर्व प्रकार ‘वर’च्या संमतीशिवाय झाला असे मानायला मी तयार नाही. पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘सामना’तून टीका होते असे कुणाचे यावर म्हणणे असेल तर ते सर्वस्वी चूक आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणे हे वर्तमानपत्रांचं कर्तव्य आहे. कश्मीर प्रश्नापासून नोटाबंदीपर्यंत व महागाईपासून शेतकऱयांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख बोलतात. २०१९ साली भाजपचा संपूर्ण पराभव होईल व पंतप्रधान मोदी देशाला फसवत आहेत, असे श्री. चंद्राबाबू नायडू आता म्हणाले व त्यावर संपूर्ण भाजप गप्प आहे!

हरवलेली उत्तरे
२०१९ साली मित्रपक्षांशिवाय भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुका जिंकता येणार नाहीत आणि ताकदीचे मित्र आज त्यांच्याकडे नाहीत. आंध्रात चंद्राबाबू त्यांना सोडून गेले. जगनमोहन यांच्या वाय. एस. आर. काँग्रेसबरोबर भाजप हातमिळवणी करील व जगनमोहन हे भ्रष्टाचार व बेहिशेबी संपत्ती जमवल्याप्रकरणी तुरुंगवास भोगलेले आरोपी आहेत याचा त्यांना विसर पडेल. महाराष्ट्रातही वेगळे काही घडण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’च्या सोहळय़ातील मुलाखतीत सांगितले, २०१९ साली भाजपचाच विजय होईल! पण ते शक्य नाही. भाजप १७० चा आकडा पार करणार नाही व महाराष्ट्रात आता ६५ ते ७० जागांचा टप्पाही गाठणार नाही. मुख्यमंत्र्यांना ‘लोकमत’च्या मंचावर मी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अधांतरीच राहिली. त्यातले दोन प्रश्न महत्त्वाचे.

  • तुमच्या आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या बँक खात्यात मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे १५ लाख रुपये जमा झाले काय?
    मु. मंत्री. : पंतप्रधान अनेक देशांत फिरत आहेत व काळा पैसा बाहेर येत आहे. (मूळ प्रश्न तसाच राहिला.)
  • आपण शिवसेनेशी युती करायला हवी असे म्हणताय, पण ज्यांना तुम्ही वाजत गाजत पक्षात घेतले ते श्री. नारायण राणे हे शिवसेनेशी युती झाली तर भाजपचा राजीनामा देऊ म्हणतायेत.
    मु. मंत्री : तुम्ही आमच्याशी सवतीसारखे वागला नसता तर राणेंना घ्यायची गरज पडली नसती.

श्री. फडणवीस यांनी राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली. राणे हे मोठे नेते आहेत किंवा भाजपास विस्तारासाठी मदत होईल म्हणून त्यांना भाजपने राज्यसभा सदस्यत्व दिले नाही, तर शिवसेनेला डिवचण्यासाठी दिले. तरीही त्या सगळय़ांना शिवसेनेबरोबर युती हवी आहे व स्युडो सेक्युलर लोकांबरोबर शिवसेनेने जाऊ नये असे वाटते.

महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर उभे आहे. प्रत्येक वळणावर ते बदलते आहे. २०१४ साली भरधाव सुटलेल्या गाडय़ा वळणावर अडकल्या आहेत.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या