रोखठोक – कोतवाल, इसाप आणि नवा राजा!

आपण नक्की कोठे चाललो आहोत? असा प्रश्न तेव्हा इसापला पडला होता. तो प्रश्न मोदी काळातही कायम आहे. सध्याचा काळ हा अमृतकाळ असल्याचा ढोल वाजवला जातो, पण देश कसा बुडत आहे, देश कसा जळत आहे ते रोज दिसते. महाराष्ट्रातील लेखक-कवींनी 40-50 वर्षांपूर्वीच आजच्या स्थितीचे वर्णन करून ठेवले होते.

आजची भारताची परिस्थिती अगदीच विचित्र आहे. कुणीच सांगू शकत नाही की आपण कुठे जात आहोत? इसापची एक कथा मला आठवते. इसाप हा गुलाम होता. गुलाम असल्यामुळे तो उघडपणे बोलू शकत नव्हता. एकदा इसाप गावातून खाली मान घालून जात असताना कोतवालाने त्याला हटकून विचारले, ‘तू कोठे चालला आहेस?’ इसापने उत्तर दिले, ‘मला माहीत नाही!’ त्यावर कोतवाल भडकला व इसापची गचांडी पकडून म्हणाला, ‘अच्छा, चल तुला तुरुंगात नेऊनच डांबून टाकतो!’ तुरुंगाच्या वाटेवरच इसाप कोतवालाकडे पाहत म्हणाला, ‘कोतवालसाहेब, मी कुठे जाणार ते मलाच माहीत नव्हते हे पटले ना! मी खरेच बोलत होतो ना? पण गुलामाचं कोण ऐकतंय?’ इसापच्या या बोलण्यावर कोतवाल निरुत्तर झाला.

देशाची अशीच परिस्थिती आहे.

न्यायपत्रे कोण लिहिणार!

आजच्या परिस्थितीचे यथार्थ चित्रण मराठी लेखक व कवींनी फार पूर्वीच करून ठेवले. तेव्हा त्यांना हेदेखील माहीत नसावे की, भविष्यात एक ‘मोदी युग’ अवतरणार आहे. नंतरच्या काळात कवितेत रमलेले कथालेखक सदानंद रेगे यांच्या कवितेचे प्रतिभा विश्व हे जबरदस्त होते. श्री. रेगे यांनी न्यायव्यवस्थेच्या घरासमोर घातलेली ही रांगोळी पहा –

“यापुढे आम्हीच तुमची

न्यायपत्रे लिहीत जाऊ

तुम्ही फक्त तुमचा अंगठा

तेवढा मुकाट पुढे करावयाचा

नि आमच्या हातावरचं रक्त

लावून राजस मुद्रा ठोकायची

एवढं कबूल करा न्यायमूर्ती

तुमच्या दारापुढे रोज रामप्रहरी

आम्ही राखेची रांगोळी काढू…

राखेला इथे काय तोटा?”

आजचे चित्र या कवितेपेक्षा अजिबात वेगळे नाही. न्यायपत्रे सत्ताधारी लिहितात व त्यावर फक्त मोहोर उठवली जाते. पैसा आणि सत्ता हाच काही लोकांच्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला.

असा हा राजा

मंगेश पाडगावकर यांनी ‘राजा’ ही कविता 1990 साली प्रसिद्ध केली. त्यावेळी देशात लोकशाहीचा बोलबाला होता व मोदी-शहा हे भविष्यात सत्ताधारी होतील याची सुतराम शक्यता नव्हती, पण ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हे सदानंद रेगे व मंगेश पाडगावकर यांनी सिद्ध केले. पाडगावकर यांची ‘राजा’ ही कविता मी त्यांच्या तोंडून अनेकदा ऐकली, पण 30 वर्षांनंतर असा एखादा राजा देशाच्या नशिबी येईल असे तेव्हा वाटले नव्हते. ही कविता एकदा वाचा-

‘राजा’

सभेत भाषण करताना

राजा हुकमी रडायचा,

प्रजेच्या चिंतेमधे

बघता बघता बुडायचा!

राजा मोठा शूर होता,

राजा होता शिकारी,

वैभव मोठं असूनसुद्धा,

राजा होता भिकारी!

गरीबांची कणव येऊन

त्याचा आवाज पडत असे,

कधी ध्येयवादी होऊन

उंच उंच चढत असे!

राजा मोठा नट होता,

राजा होता शिकारी,

इतकं वैभव असूनसुद्धा

राजा होता भिकारी!

अनेक मूर्ख माकडांच्या

टोप्या त्याने घेतल्या होत्या,

आणि ज्यांना घालायच्या

त्यांना टोप्या घातल्या होत्या!

जिथे घाली हात तिथे

खाणं चापून घेत असे,

हवं असेल राजाला

तेच छापून येत असे!

भिकारी का होता?

राजालाच ठाऊक होतं!

(तसं त्याचं मन म्हणे

आतून फार भावुक होतं!)

चिंतेमधे चूर होऊन

येरझारा घालत असे,

बागेमध्ये तासन् तास

एकटा एकटा चालत असे!

राजा रोज मुकुट घालून

आरशापुढे राहत असे,

स्वत:वर प्रेम करीत

स्वत:कडे पाहत असे!

प्रजा सगळी मुठीत होती,

जयजयकार करायची,

आश्वासनं खात खात

आपली पोटं भरायची!

विनोबांचे बोलणे

राज्यकर्ते किती बेजबाबदार आणि बेफिकीर पद्धतीने वागतात ते देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दाखवले. देशातील महागाईस सरकार जबाबदार नसून ‘निसर्ग’ जबाबदार असल्याचे बाईंनी जाहीर केले. महागाईसाठी सूर्य, चंद्र, ढग, हवा, पाणी, थंडी, बर्फ, गर्मी जबाबदार आहे. मोदीजी सोडून सगळे जबाबदार. मग ‘मोदी युगा’चा सत्तेवर बसण्याचा अर्थ तरी काय? राज्यकर्त्याचे चारित्र्य धुळीस मिळाले व नैतिकतेचे धिंडवडे रोजच निघत आहेत. विनोबा भावे यांना मी कॉलेज जीवनात भेटलो. 1982 साली मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन माहितीमंत्री श्री. त्र्यं. गो. देशमुख हे विनोबाजींना भेटायला आले होते. दोघांत पत्रकारितेवर चर्चा झाली. “पत्रकारांना शिस्त हवी” असं विनोबा बोलल्याचे मी ऐकले. “वर्तमान बरे असो वा बुरे असो, जसेच्या तसे दिले पाहिजे…” असे विनोबाजी म्हणाले. “भडक, अपप्रचार, चारित्र्यहनन व बीभत्स लिखाण असेल तर त्यावर अनुशासन हवे,” असेही विनोबा म्हणाले. “जसा राजा तशी प्रजा होते. राजा सुधारला, नीट वागला तर प्रजा चांगली राहते. पैसे खाणे हे सत्कर्म ठरले तर सामान्य माणूस तेच करेल व देश बुडेल,” असा विनोबांच्या बोलण्याचा सूर होता. 1982 सालचे हे संभाषण 2024 साली खरे ठरत आहे. देश बुडत आहे, देश जळत आहे.

म्हाताऱयांचे ऐकू नका

आचार्य विनोबांचे शिष्य, त्यांच्या कार्याचे वारसदार म्हणजे आचार्य दादा धर्माधिकारी. विनोबांच्या मृत्यूनंतर दादा पवनारला गेले. पत्रकारांना ते म्हणाले, “मी काहीच सांगू इच्छित नाही. म्हाताऱयांचे ऐकू नका हाच माझा संदेश आहे. जुने रस्ते जुन्याच ठिकाणी घेऊन जातात. ब्राह्मणाला ते ब्राह्मण आळीत नेतात, तेल्याला तेल आळीत, गांधी-टिळक आपल्या वडिलांसारखे झटले असते तर काय झाले असते, याचा विचार करा. ईश्वराची मोठी देणगी अशी की, माणसाची कार्बन कॉपी बनत नाही. आता देशातील सुबत्तेचे संयोजन करण्याची वेळ आली आहे. माणसे बेकार होणार नाहीत, इतके यांत्रिकीकरण स्वीकारावे लागेल. मतदार आपल्या मताचा लिलाव करतात व तेच मतदार आमचे राज्यकर्ते पैसे खातात म्हणून पार करतात. हा दुटप्पीपणा आहे.”

जुन्या म्हाताऱयांचे हे बोलणे आजही नवे वाटते. कारण सगळे तसेच घडते आहे. आपले पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेत आहेत. ते अमेरिकेत का गेलेत, यावर लोकांच्या मनात शंका आहेत. आपल्या उद्योगपती मित्रांचा कोसळलेला इमला स्थिरस्थावर करण्यासाठी ते अमेरिका दौऱयाचा वापर करतील. राज्यकर्त्यांविषयी प्रजेच्या मनातील अशा शंका मन विषण्ण करतात. नदी जशी उताराकडे धावत सुटते तसे आपले चालले आहे.

आपण नक्की कुठे चाललो आहोत? इसापला पडलेला प्रश्न कायम आहे!

सध्याचे दिल्लीचे कोतवाल याचे उत्तर देतील काय?

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]