अतुल तापकीर व इतर सर्व

240

स्त्रीशक्तीला आपल्या समाजाने नेहमीच मुजरा केला आहे. सर्व कायदे आज महिलांच्या बाजूने आहेत हे योग्यच आहे. पुण्यात अतुल तापकीर या मराठी चित्रपट निर्मात्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने जी वेदना मांडली त्यातून अनेक प्रश्नांना तोंड फुटले आहे!

त्महत्यांचे धक्के महाराष्ट्राला नवीन नाहीत. शेतकऱ्यांच्या शेकडो आत्महत्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा डागाळली आहे, पण शेतकऱ्यांशिवाय आपल्या सभोवती रोज वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या होत असतात व समाज त्याकडे आपला त्यांच्याशी काय संबंध या तटस्थ वृत्तीने पाहात असतो. रविवारी दुपारी पुण्यातील एका लॉजमध्ये अतुल बाजीराव तापकीर या तरुण चित्रपट निर्मात्याने आत्महत्या केrokhthokली. तो मोठा चित्रपट निर्माता नव्हता व त्याने जे चित्रपट निर्माण केले ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले नाहीत. ‘ढोल ताशे’ हा चित्रपट त्याने काढला व निर्माता तापकीर कर्जात बुडाला. यानंतर त्याच्या आयुष्याची जी घसरण सुरू झाली त्याचा शेवट आत्महत्येने झाला. काही महिन्यांपूर्वी पुण्यात हा तरुण निर्माता मला भेटला होता व त्याला त्याच्या क्षेत्रात नव्याने उभे राहायचे होते. अपयशातून उभे राहण्याची त्याची धडपड होती. आता अचानक त्याच्या आत्महत्येची बातमीच समोर आली. त्याच्या आत्महत्येने समाजासमोर काही प्रश्न उभे केले. फक्त शेतकरीच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतो असे नाही तर अतुल तापकीरसारखे होतकरू तरुणही आत्महत्येचे मार्ग स्वीकारतात व त्यांना वाचवणारी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही. चार दिवसांपूर्वी पत्नी व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून संतोष मच्छिंद्र पवार या तरुणानेही ओझर येथे आत्महत्या केली. हा तरुण सुशिक्षित व ओझर एचएल या कंपनीत काम करीत होता. अतुल तापकीर, मच्छिंद्र पवारप्रमाणे गेल्या आठ दिवसांत फक्त महाराष्ट्रातच नऊ प्रकरणे घडलीत हे समाज व्यवस्थेचे दुर्दैव आहे.

पुरुषांवरही अन्याय!
कायद्याने पुरुषांवर अन्याय केला आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अतुल तापकीरच्या आत्महत्येने दिले. स्त्रीयांवरील अन्यायाविरुद्ध देश व समाज उभा राहतो. संसद चालू दिली जात नाही. निर्भया बलात्कार प्रकरणात कायदाच बदलून तो कठोर केला गेला. एक स्त्री आत्महत्या करते किंवा तिचा खून होतो तेव्हा समाज ज्याप्रकारे संतापतो, तो संताप अतुल तापकीरसारख्या तरुणाच्या आत्महत्येमुळे दिसत नाही. जेसिका लालची हत्या दिल्लीत झाली तेव्हा त्या संघर्षात पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती व मारेकऱ्यांना सुटकेचे मार्ग बंद झाले. स्त्री मुक्तीची चळवळ ज्यांना महत्त्वाची वाटते त्यांनी अतुल तापकीरच्या हत्येमागची कारणे तपासायला हवीत. अतुल तापकीरने त्याच्या बायकोच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. हे सत्य असेल तर स्त्रीमुक्ती चळवळ चालवतात त्यांनी स्त्रीमुक्तीचा व संबंधित कायद्याचा गैरवापर करणाऱ्यां त्या महिलेविरोधातही उभे राहायला हवे. कायदा स्त्रीच्या बाजूने आहे व अनेकदा असत्य असले तरी स्त्री सांगेल त्यावर सरळ विश्वास ठेवतो. कारण स्त्री ही अबला आहे असे आपण मानून चाललो आहोत. हा अन्याय आहे असे कुणाला वाटत नाही तोपर्यंत अतुल तापकीरसारखे बळी जात राहतील.

atul-tapkir_facebook

सुसाईड नोट!
अतुल तापकीरने आत्महत्येपूर्वी ‘सोशल मीडिया’ म्हणजे फेसबुकवर एक सुसाईड नोट टाकली ती अस्वस्थ करणारी आहे. नमस्कार मित्रांनो नक्की वाचा असे तो त्यात सांगतोय.
‘‘मी अतुल तापकीर आज तुमच्या बरोबर माझ्या आयुष्यातील एक गोष्ट facebook द्वारे share करत आहे.
मी ढोल ताशे हा चित्रपट काढला. मी चित्रपट काढून व्यवसाय म्हणून हा चित्रपट केला. त्यात मला ‘लॉस’ आला, मी निराश झालो, पण या चित्रपटाने मला खूप मानसन्मान मिळवून दिला. चित्रपट लॉसला जाऊनही मला माझ्या वडिलांनी, बहिणींनी खचून नाही दिले. मला हिम्मत दिली. मीही हिंमतीने जगू लागलो. चित्रपट लॉसला गेला मी थोडा कर्जबाजारी झालो म्हणून प्रियंकाने मला त्रास द्यायला चालू केला, व्यवसायात होतो कधी कधी लॉस, मलाही झाला. कोणाच्या घरात वादविवाद होत नाहीत माझ्याही घरात झाले, पण प्रियंकाने हे समजून न घेता मला घरातून बाहेर काढले. मी आजच्या दिवसापर्यंत ६ महिने झाले घरातून बाहेर राहतो आहे. मला माझ्या मुलांपासून दूर केले आणि माझ्यावर नाही तसले आरोप करून माझ्याबद्दल आमच्या परिसरातील लोकांना जाऊन, घरोघरी जाऊन बदनामी करू लागली आणि या गोष्टीचा गैरफायदा माझ्या काही मित्रांनीही घ्यायला चालू केला. मी रस्त्याने जात असताना मला थांबवून किंवा फोन करून छेडायला चालू केले. जे आता मला सहन नाही होतेय. एवढ्यावरच न थांबता प्रियंकाने तिच्या मानलेल्या भावांना मला मारायला लावले व त्यांना नंतर जेवणाची पार्टी दिली. यात यांना साथ तिचा मावस भावाने दिली व मला फोन करून वेळोवेळी धमकी द्यायला चालू केले.यातून प्रियंकाला हिम्मत मिळाली आणि ती माझ्या वडिलांना, बहिणीला शिवीगाळ करू लागली. पण तरीही मी सर्व विसरून काहीतरी चांगले व्हावे यासाठी घरगुती एक मिटिंग घेतली ज्यात हे ठरले की, प्रियंकाचा राग शांत होईपर्यंत ती वरच्या घरात राहील आणि तिला दर महिना १० हजार द्यायचे ठरले. ज्यासाठी मी वोडाफोन स्टोरचे ५ हजार आणि पप्पा ५ हजार असे एकूण १० हजार द्यायला लागलो. ज्यातून तिचा आणि मुलांचा खर्च भागेल, पण प्रियंकाने या पैशातून नवीन गाडी घेतली, एकवेळचे जेवण नसले तरी चालेल पण टेन्शन नसावे. प्रियंका सारखा संशय घेत माझ्यावर आणि शिवीगाळ करू लागली, माझे जगणे मुश्किल करून टाकले. यातून मी दारूच्या आहारी गेलो. जी दारू मी सोडली होती ती पुन्हा कधीतरी घेऊ लागलो. माझा संसार ज्या तिच्या भावांनी उद्ध्वस्त केला आहे त्यांनाही मुलं-मुली आहेत, पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की जे माझ्याबरोबर घडले ते दिवस त्यांना त्यांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कधीच येऊ नयेत. माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की, जसे पोलीस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच बाजू पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे. त्यावेळी मला आणि वडिलांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांनी १० हजार मागितले आणि मी माझी बाजू स्पष्ट केल्यावर मला म्हणाले की, कळते आहे आम्हाला सर्व की तू बरोबर आहेस पण पहिली complaint तिने केली आहे म्हणजे तुम्हाला अटक करावी लागेल आणि अटक होऊ नये म्हणून आम्ही १० हजार देऊन शांत बसलो. १० हजार घेऊद्या, पण त्यानंतर पोलिसांनी तिलाही रागावले पाहिजे होते. मी असे नाही म्हणत की, सगळे पोलीस असे असतात. बरेच पोलीस माझे मित्र आहेत ते खूप चांगले आहेत, पण मला जो अनुभव आला मी त्या पोलिसांबद्दलची माझी भूमिका मांडतो आहे. पण पोलिसांनी तिला काहीच न बोलल्यामुळे तिला जास्त बळ मिळाले की कायदा हा हिच्या बाजूने आहे, पण तरीही मी, वडील शांत राहिलो. कारण मुलांना भेटता येत नसले तरी कमीत कमी मुलं दारासमोर खेळतांना पाहून आम्ही समाधानी राहायचो, पण जर कधी मुलं घरात आलीच तर ही माझ्या मुलांना धमकी भरायची, मारायची आणि खाली जाऊ नका असे सांगायची. त्यामुळे मुलं ही घाबरत तिला आणि खाली येत नसत. मी नाही म्हणत की, सर्वच महिला या कायदाचा गैरवापर करतात पण प्रियंकासारख्या महिला या कायद्यांचा गैरवापर करून मानसिक छळ करतात सर्वच कुटुंबाचा.किती ही माझी आणि माझ्या घरच्यांची इज्जत घालवणार त्यापेक्षा मेलेले बरे.प्रियंकाच्या तीन-चार मैत्रिणी आहेत. गणेश नगरमध्ये ज्या तिला साथ देतात, कारण त्यांना एखाद्याच्या घराचा तमाशा कसा होतो ते पाहायला मज्जा वाटते, पण हे प्रियंकाला कधीच नाही समजले.. खूप त्रास सहन केला पण आता नाही सहन होत. या त्रासामुळे माझी मानसिकता सारखे जीवन संपवण्याकडे जाऊ लागली.. म्हणून मी आज माझा जीवन प्रवास विष पिऊन संपवत आहे. विष प्यायची माझी हिम्मत नाही होत म्हणून आज परत मी drink करतो आहे.माझ्यामुळे ज्या कोणाला त्रास झाला असेल त्या सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करावे..
तुमचा सर्वांचा लाडका, पण तुम्हाला सर्वांना अर्ध्यातून सोडून तुमच्याबरोबर बेइमान झालेला तरीही तुमचाच असलेला..
पण एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की मी आता माझ्या आईबरोबर राहणार.. – अतुल बाजीराव तापकीर…

पापण्यांची उघडझाप
अतुल तापकीरच्या जागी एखादी तरुण विवाहित महिला असती व तिची सुसाईड नोट अशाप्रकारे समोर आली असती तर महाराष्ट्रात वादळ उठले असते. तिच्यासाठी मोर्चे निघाले असते व मेणबत्त्या पेटवून तिच्या घरासमोर फुले ठेवली गेली असती, पण अतुलच्या आत्महत्येने समाजाने पापण्यांची उघडझापही केली नाही. असे अनेक अतुल तापकीर व त्यांचे पीडित कुटुंबीय मला अधूनमधून भेटतात तेव्हा कायद्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सुनेचा छळ होतो व तशा तक्रारी दाखल करून नवऱ्याचे संपूर्ण कुटुंब तुरुंगात जाते. हुंडाबळीच्या किती घटना खऱ्या आहेत व प्रत्यक्षात न्यायालयात किती जणांना शिक्षा होते हा शोधाचा विषय आहे. कायद्याने स्त्रीला सर्वाधिक रक्षण द्यायलाच हवे, पण त्याच कायद्याचा गैरवापर झाला तर अतुल तापकीरसारखे तरुण जीवन यात्रा संपवतात. त्याच्या पत्नीने खोटी तक्रार केली व तरीही अटक टाळण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात दहा हजार रुपयांची लाच द्यावी लागली हे विदारक आहे. स्त्रीयांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी सारा समाज लढत आहे. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात आपण सगळे लढत आहोत. बलात्काऱ्यांना फासावर लटकवणारे न्यायमूर्ती पुरुष आहेत. तरीही अतुल तापकीर आत्महत्या करतोय, तोही बायकोच्या छळामुळे!

कायद्याची कवचकुंडले
कायद्याने व न्यायालयाने महिलांना जी कवचकुंडले दिली आहेत ती योग्यच आहेत, पण त्या कवचकुंडलांचा कुणी गैरवापर करीत असेल तर काय करायचे? महिला सांगेल तशी तक्रार दाखल करून एफआयआर नोंदवा हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने पोलिसांचा नाइलाज होतो व अनेक खोट्या तक्रारींवरून निरपराध पती व सासरच्या मंडळींवर कारवाई करावी लागते. हा कायद्याचा गैरवापर आहे. पती, सासू, सासरे यांना धडा शिकविण्यासाठी कायद्यातील ४९८ व ३५४ या कलमांचा गैरवापर होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या तपशिलानुसार मागील दोन दशकांत आपल्या देशात सुमारे १० लाख ३३ हजार विवाहित पुरुषांनी पत्नीच्या अत्याचाराला कंटाळून स्वतःचे जीवन संपवले आहे. २०१५ मध्ये तब्बल ६४ हजार ५३४ विवाहित पुरुषांनी आपल्या देशात आत्महत्या केली. २०१३ आणि २०१४ या वर्षी हीच संख्या अनुक्रमे ६४ हजार ९८ आणि ५९ हजार ७४४ एवढी होती. म्हणजे विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढतच चालले आहे. अनेकदा अॅट्रॉसिटीच्या बाबतीत खोट्या तक्रारी होत असतात. तसे बलात्कार आणि विनयभंगाच्या तक्रारींबाबतदेखील होत असल्याचे दुर्दैवाने समोर आले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात आपण वावरत आहोत. तिहेरी तलाक पद्धतीच्या जाचातून मुसलमान महिलांची सुटका व्हावी असे आज पुरुष वर्गालाच जास्त वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाक विरोधात मोहीम उघडलीच आहे, पण त्याच समाजात बायकांच्या अत्याचारास कंटाळून अतुल बाजीराव तापकीर आत्महत्या करतो. माणूस मरताना खोटे बोलत नाही. एरव्ही तो रोजच खोटेपणास कवटाळून जगत असतो. अतुल तापकीरने मरताना एक वेदना समाजासमोर मांडली. महिलांच्या हक्काची व सुरक्षेची काळजी सगळ्यांनाच आहे, पण म्हणून अतुल तापकीरला रोज मरू द्यायचे काय?

twitter @rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या