रोखठोक : ‘कॉफी किंग’ची जलसमाधी

2586

rokhthokसिद्धार्थ या ‘कॉफी किंग’ने आत्महत्या केल्याचे प्रकरण साधे नाही. देशात उद्योग-व्यवसायासाठी मोकळे वातावरण नसल्याचे हे उदाहरण. उद्योगपती पळून जाणे किंवा मरण पत्करणे हे मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. अशाने देश आर्थिक महासत्ता कसा होणार?

देशातील वातावरण उद्योग आणि व्यापारास पोषक नाही. आश्वासने व भावनिक शब्दफेकीच्या टोपीखाली आता बेरोजगारीचा भस्मासुर लपवता येणार नाही. दुसरे म्हणजे देशात हजारोंच्या संख्येने रोजगार निर्माण करणारे उद्योगपती आता आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. कोणत्याही सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट ठरू शकते. ‘कॉफी किंग’ म्हणून ओळखले गेलेले व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उभे राहिले. श्रीमंत आणि उद्योगपती यांच्याविषयी गेल्या पाच वर्षांत घृणा व तिरस्काराचे वातावरण पद्धतशीर निर्माण केले गेले. सिद्धार्थ हे त्या वातावरणाचे बळी आहेत. व्यापार आणि उद्योगांविषयी असे निराशाजनक वातावरण निर्माण होणे कोणत्याही देशाला परवडणारे नाही. पैसे कमवणारे उद्योगपती आणि भांडवलदार हे चोर किंवा लुटारू आहेत, किंबहुना ते देशाचे गुन्हेगार आहेत, असे बोलणारे राज्यकर्ते देशाची आर्थिक कोंडी करतात. श्रीमंतांना शिव्या देऊन गरीबांच्या टाळ्या आणि मते मिळवायची हे धोरण कम्युनिस्टांचे होते. त्यामुळे प. बंगाल, त्रिपुरा, मणिपूरसारखी राज्ये कम्युनिस्ट राजवटीत मागास राहिली. शेवटी त्या राज्यातून कम्युनिझम कायमचा उखडला गेला. ज्यांना ‘भांडवलदार’ किंवा ‘मालक’ ही शिवी वाटते त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य मंत्र म्हणून कायमचे स्मरणात ठेवले पाहिजे – ‘मालक व कामगार ही रथाची दोन चाके आहेत. मालक जगला तर कामगार जगेल!’ आज कामगार आधीच मारला गेला आहे. आता मालकही मारले जाऊ लागले आहेत. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येने हेच सिद्ध केले.

प्रसन्न माणूस
व्ही. जी. सिद्धार्थ यांना मी बऱ्यापैकी ओळखत होतो. विमान प्रवासात व मुंबई-दिल्लीतील मोजक्या सोहळ्यांत त्यांच्याशी बोलता आले. दिल्ली-बंगळुरू प्रवासात एक प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती माझ्या बाजूच्या सीटवर बसली. तेव्हा केंद्रात रेल्वे खाते सांभाळणाऱया कर्नाटकच्या सदानंद गौडा यांच्याशी साम्य असलेला त्यांचा चेहरा होता. मी त्यांना सांगितले, ‘‘आताच पार्लमेंटला मी आमच्या नवीन रेल्वेमंत्र्यांना भेटलो. तुम्ही सदानंद गौडा यांचे भाऊच वाटताय.’’ यावर सिद्धार्थ म्हणाले, ‘‘ते आमच्याच राज्यातले आहेत, पण मी तो नाही. मी सिद्धार्थ. ‘कॉफी’ विकतो.’’ त्यांनी सांगितले की, ‘कॅफे कॉफी डे’ नावाची ‘चेन’ ते चालवतात. तोपर्यंत ‘सीसीडी’ ही कॉफी लोकप्रिय करणारी व तरुणाईस दोन घटका आनंद देणारी ‘हॉटेल्स चेन’ म्हणजे एक परदेशी कंपनी आहे असा माझा समज होता, पण ती एक हिंदुस्थानी कंपनी होती व कर्नाटकातील एका तरुणाने ती कल्पकता आणि मेहनतीने उभी केली होती. सिद्धार्थ यांनी ‘सीसीडी’ची देशभरात सतराशेच्या आसपास ‘आऊटलेट’ निर्माण केली. ‘सीसीडी’ने 30 हजार तरुणांना रोजगार दिला, शिवाय इतर अनेक लहान उद्योग त्यांनी जिवंत ठेवले. मॅकडॉनल्ड, केएफसी या परदेशी कंपन्यांना तोंड देत सिद्धार्थ यांनी त्यांचे ‘कॉफी साम्राज्य’ उभे केले. ते त्यांच्या मृत्यूने कोसळताना दिसत आहे. त्यांच्यावर बँकेचे मोठे कर्ज होते व आयकर विभागाने त्यांचा छळ सुरू केला. कर्ज फेडण्यासाठी त्यांची स्थावर, जंगम मालमत्ता विकण्याची परवानगी मागितली. ती नाकारण्यात आली. त्रासलेल्या सिद्धार्थ यांनी शेवटी नेत्रावती नदीत उडी मारून आत्महत्या केली.

शेतकरी व उद्योगपती

एका शेतकऱयाच्या, बेरोजगाराच्या आत्महत्येचे जेवढे दुःख आपल्याला वाटायला हवे तितकेच दुःख सिद्धार्थ यांच्यासारख्या उद्योगपतीच्या आत्महत्येचे वाटायला हवे. सध्या बँकांचे काही बडे कर्जदार राजकीय संरक्षणाखाली मजा मारीत आहेत, तर ‘सिद्धार्थ’सारखे उद्योगपती सरळ जलसमाधी घेत आहेत. सिद्धार्थसारख्या लोकांनी कल्पकतेने त्यांचे साम्राज्य उभे केले. त्यांचे कॉफीचे मळे होते. त्यांनी ‘कॉफी’ला नव्या पिढीत लोकप्रिय केले. मोदी हे रेल्वे फलाटावर चहा विकत होते. चहावाल्याने राजकीय क्रांती केली. ते पंतप्रधानच झाले, पण चहावाल्यांच्या राज्यात ‘कॉफी किंग’ने आत्महत्या केली! गेल्या काही वर्षांत व्यापार, उद्योग कोसळला आहे. (ताज्या बातमीनुसार जगात पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची यावर्षी सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.) मुंबईसारख्या शहरातील बांधकाम व्यवसायाचे स्मशान झाले. नोटाबंदी निर्णयानंतर या ‘स्मशानां’चीही राखरांगोळी झाली. मुंबई-ठाण्यातील अनेक बिल्डर कंगाल झाले. काही बिल्डरांनी आत्महत्या केल्या. डोक्यावर बँकांची कर्जे आहेत व माल विकला जात नाही. मोठय़ा प्रमाणात रोजगार देणारा हा व्यवसाय थंड पडला आहे. पुण्यात अतुल चोरडिया या मोठय़ा बिल्डरने आत्महत्या केली. विमान कंपन्या बंद पडल्या. किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या हा टीकेचा विषय ठरतो, पण त्यांची कंपनी कोणत्या परिस्थितीत कोसळली? या कंपनीवरील बँकांचे कर्ज फेडण्यास मल्ल्या तयार होते. त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या, पण त्यांना पळून जावे लागले. मल्ल्यांवर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे, पण बँकांनी त्यांची पंधरा हजार कोटींची संपत्ती आधीच जप्त केली आहे. सरकारने 1500 कोटींची व्यवस्था केली असती तर ‘जेट’ कंपनीने उड्डाण भरले असते. नीरव मोदी यांनाही कर्ज फेडण्याची इच्छा आहे असे त्यांचे वकील सांगतात, पण कर्ज फेडून देण्यापेक्षा उद्योगपतींना बेडय़ा ठोकण्यात व त्यांना फरफटत आणण्यातच आम्हाला रस आहे. उद्योगपती म्हणजे दाऊद इब्राहिम, हाफीज सईद बनले. सिद्धार्थ हे पळून गेले नाहीत. त्यांना तुरुंगात जायचे नव्हते. त्यांनी जलसमाधी घेतली. 30 हजार लोकांनी त्यांच्या रूपाने जलसमाधी घेतली. कारण 30 हजार कुटुंबांचे भवितव्य डचमळू लागले आहे.

नवे दहशतवादी

इन्कम टॅक्स, ईडीसारख्या संस्था दहशतवाद्यांसारख्या वागत आहेत काय? हा आता प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडून पडते त्यास सरकार व त्यांची धोरणे जबाबदार असतात. अर्थ खाते हे निवडणुकांसाठी पक्षनिधी उकळण्याचे सगळ्यात मोठे साधन बनले आहे. नरसिंह राव यांनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचा ‘डोलारा’ दुरुस्त करण्यासाठी मनमोहन सिंग नावाचे डॉक्टर आणले. त्या काळात हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला पालवी फुटली. हिंदुस्थानच्या मदतीने अमेरिका व युरोपियन राष्ट्रांचा व्यापार वाढत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा भारही आम्ही उचललेला आहे, पण आम्ही मात्र असंख्य ‘सिद्धार्थ’ मारत आहोत. ‘इन्कम टॅक्स’ विभागाच्या छळाचा हा परिणाम आहे. कर दहशतवाद आणि अर्थव्यवस्था कोलमडल्याने सिद्धार्थ यांना आत्महत्या करावी लागली. ‘यूपीए’ सरकारच्या काळात भरभराटीस आलेल्या कंपन्या आता बंद पडत असून बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत आपण सरकारला धारेवर धरतो. तोच आवेश व धार सिद्धार्थसारख्या उद्योगपतीच्या आत्महत्येबाबत ठेवायला हवी. 30 हजार लोकांची कुटुंबे चालवणारा उद्योगपती हा अर्थव्यवस्थेतील बेशिस्तपणा व मंदीच्या तडाख्याचा बळी आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात दरी निर्माण करणे व श्रीमंतांविषयी द्वेषाची ठिणगी टाकून मते मागणे हे थांबल्याशिवाय देश आर्थिक महासत्ता होणार नाही.

‘कॅफे कॉफी डे’ने मध्यमवर्गीय तरुणांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणले. ‘कॉफी’ पित भेटीगाठीची, गप्पा मारण्याची, उद्योगावर चर्चा करण्याची जागा ज्या सिद्धार्थने मिळवून दिली तो मात्र हे जग सोडून गेला.

सिद्धार्थसारख्या अनेक घटना उंबरठय़ावर आहेत. त्यांना वाचवायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या