रोखठोक – दिल्ली ते महाराष्ट्र, किरण पटेल सर्वत्र आहेत!

नवीन वर्ष आले आणि गेले. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने कहर केला. तो उद्ध्वस्त झाला. कसली गुढी व कसली तोरणे? पंतप्रधान रोज एक खोटे बोलतात. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे उद्योग दिल्ली ते महाराष्ट्र सुरू आहेत. किरण पटेल तसे सर्वत्रच दिसत आहेत!

मराठी नववर्ष आले आणि गेले. अवकाळी पाऊस, गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रात नवीन वर्ष साजरे झालेच नाही. मंगळवारी मी दिल्लीत होतो. दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरू होता. संसदेत पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्रातील शिंदे गटाचे खासदार हातात लहान गुढी घेऊन पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी उभे होते. महाराष्ट्रावरील स्वाभिमानाची गुढी-तोरणे ज्यांनी उचकटून टाकली त्यांच्या दारात महाराष्ट्राचे खासदार स्वाभिमान गुंडाळून उभे राहिलेले त्या दिवशी पाहिले. दोन गोष्टी त्या दिवशी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातील विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाच्या टोपल्या घेऊन ठाण मांडले होते. उद्ध्वस्त शेतकऱ्यांची वेदना त्यांना मांडायची होती, पण ऐकणारे सरकार आज दिल्ली आणि महाराष्ट्रात नाही. दुसरी बातमी त्याच दिवशी प्रसिद्ध झाली. पंतप्रधानांच्या दारात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी घेऊन ताटकळणाऱ्यांनी ती बहुधा वाचली नसावी. टेक्स्टाईल कमिशनरचे मुख्यालय, जे 1943 पासून मुंबईत होते, ते मुंबईतून हलविण्याचे फर्मान दिल्लीने काढले. हा महाराष्ट्राला डिवचण्याचा आणखी एक प्रकार. वस्त्र आयुक्तालय मुंबईतून का हलवताय? असे पंतप्रधानांना विचारण्याची हिंमत दारात गुढी घेऊन ताटकळणाऱ्या त्या मराठी खासदारांकडे नाही. मुंबईत एकेकाळी सर्वाधिक कापड गिरण्या होत्या. त्यातल्या बऱ्याच बंद पडल्या. भिवंडी, इचलकरंजी येथे आजही कपडा उद्योग आहे. त्यादृष्टीने वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यांच्या आयुक्तांचे कार्यालय मुंबईत थाटले. मोदी यांच्या सरकारने ते आता बंद केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा असा की, मोठाच हास्यस्पह्ट व्हावा. मुंबईतून फक्त वस्त्रोद्योग आयुक्तांना हलवले व दिल्लीत नेले. कार्यालय इथेच आहे. महाराष्ट्रावरील अन्यायाची ही सरळ पाठराखण आहे. मुंबईचे महत्त्व नष्ट करण्याचा हा आणखी एक डाव. मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर फक्त बोलतात, पण त्यांचा स्वाभिमान पंतप्रधानांच्या दारात पायपुसण्यासारखा पडून आहे.

मोदी काय करतात?

पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करत नाहीत. सत्ता आणि निवडणुका जिंकण्यासाठी ते व त्यांचे लोक खोटे बोलतात. विदर्भातील एक शेतकरी दिल्लीत भेटले. त्यांनी सांगितले, ‘‘विदर्भातील शेतकऱ्यांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यात हा आता अवकाळी पाऊस. काय करायचे? कसे जगायचे?’’

‘‘मोदींचे विदर्भावर विशेष प्रेम आहे. ते मदत करतील?’’ मी.

यावर तो शेतकरी म्हणाला, ‘‘साहेब, पंतप्रधान फक्त थापा मारून जातात. 20 मार्च 2014 या दिवशी यवतमाळ जिल्हय़ातील दाभडी या गावात श्रीमान मोदी साहेबांनी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम जोरात केला होता. यामध्ये कापूस उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्याचे वचन त्यांनी दिले होते. आज त्या वचनास 10 वर्षे होत आली तरी विदर्भ आणि यवतमाळला असा कोणताच उद्योग आलेला नाही. उलट शेतकरी जास्तच आत्महत्या करू लागलाय.’’ शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करू असे सांगून फसवणाऱ्या सरकारचे हे धंदे. देशाचे कृषी मंत्रालय हे शेतकऱ्यांसाठी नेमके काय करतेय याचे एक लहानसे उदाहरण देतो. गेल्या वर्षीच्या कृषी मंत्रालयाच्या बजेटमध्ये शेती व शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले 44 हजार कोटी रुपये सरकार खर्च करू शकले नाही. पैसे सरकारी खजिन्यात परत गेले. शेतकरी हवालदिल होऊन मदत, अनुदानासाठी आक्रोश करीत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे व सरकार शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले पैसे खर्च करू शकले नाही. ही आपल्या शेतकऱ्यांची सरळ फसवणूक आहे.

किरण पटेल व इतर

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत फसवणुकीचा व्यापार जोरात आहे. फसवणूक करणाऱ्यांना राजकीय आणि पोलिसांचे संरक्षण सहज मिळते. त्याची काही उदाहरणे पहा.

किरण पटेलचे प्रकरण आता जगभरात पोहोचले आहे. या पटेलने आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढले. पंतप्रधान मोदी व भाजपच्या नावाने त्याने फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला व पंतप्रधान कार्यालयाचा विशेष अधिकारी म्हणून सर्वत्र ‘प्रोटोकॉल’सह वावरू लागला. लष्कराच्या विशेष संरक्षणात तो भारतीय सीमेपर्यंत गेला. पंचतारांकित थाटमाट मिळवला. राष्ट्रीय सुरक्षेशी ही बेइमानी एक गुजराती ‘ठग’ पंतप्रधान मोदींच्या नावाने करीत होता व गृहमंत्रालयास त्याची माहिती नव्हती. या किरण पटेलची गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात व भाजप वरिष्ठ वर्तुळात ऊठबस होती. तो अनेक मोठी कामे त्या जोरावर करून घेत होता. ही ठगबाजी मोदींच्या नावानेच सुरू होती. त्यामुळे त्याला मोकळे रान मिळाले. हा किरण पटेल अहमदाबादच्या नवरंगपुरा भागात एक फर्म ‘Modified कन्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने चालवत होता. या कंपनीची स्थापना 2016 ला त्याने केली. तो व त्याची पत्नी त्यात डायरेक्टर बनले. कंपनीचे ‘ब्रँडिंग’ करताना त्याने इंग्रजीत Modified ला ‘Modi’fied अशा पद्धतीने पेश केले. या कंपनीने मोदींच्या नावाने अनेक उत्पादनांचे मार्केटिंग केले. किरण पटेल हा भाजप आणि संघाचा कार्यकर्ता होता.

मेहुल चोक्सी व श्री. मोदी यांचा याराना प्रसिद्ध आहे. चोक्सी यांचे गुणगान मोदी यांनी अनेकदा केले. पंजाब नॅशनल बँकेस 14 हजार कोटींना चुना लावून हे मेहुलभाई पळून गेले. ऑण्टिग्वा देशात ते नागरिकत्व विकत घेऊन राहत आहेत. त्यांचे जीवन ते मोदीकृपेने आनंदात व्यतीत करीत आहेत. आता त्याच कृपेने त्यांच्या आनंदात भर पडली. मेहुलभाईंच्या विरोधात ‘इंटरपोल’ने जाहीर केलेली ‘रेड कॉर्नर नोटीस’ मागे घेतली गेली. भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हते. शेवटी व्यापारीच व्यापाऱ्याला मदत करतो. ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतून इंटरपोलने मेहुल चोक्सीचे नाव उडवले. भारताच्या परवानगीशिवाय ते शक्यच नाही.

महाराष्ट्रात दादा भुसे हे मंत्री व राहुल कुल हे भाजप आमदार यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पैशांचा अपहार केला. भुसे यांनी गिरणा अॅग्रोच्या नावावर शेतकऱ्यांकडून 175 कोटी 25 लाख गोळा केले. त्याचे पुढे काय झाले? राहुल कुल यांनी तर दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात किमान 500 कोटींचे गैरव्यवहार पेले व ते ऑडिटर्सने पकडले. शेतकरी हा त्यांच्याच नेत्यांकडून लुटला जातो व त्या नेत्यांना मग राजकीय संरक्षण मिळते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व त्यांचे लोक विरोधकांवर रेटून आरोप करतात. त्यांच्यामागे तपास यंत्रणा लावतात, पण स्वतःवर काही आले की, ते विरोधकांचे फक्त हवेतले वार ठरवले जातात. महाराष्ट्रात सध्या तेच चालले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या एका फॅशन डिझायनर मुलीस तत्काळ अटक केली गेली. ‘बुकी’ असलेल्या तिच्या वडिलांना गुजरातमधून अटक केली. या सर्व प्रकरणाच्या खोलात नेमके कसले पाणी मुरते आहे ते कळायला हवे, पण श्री. राहुल कुल, दादा भुसे, किरीट सोमय्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे मुख्यमंत्र्यांनी अधांतरीच ठेवली. महत्त्वाचे म्हणजे श्रीमान गौतम अदानी हे आजही सरकारी कवचपुंडले घेऊन सुरक्षित जगात आहेत. महाराष्ट्राचे विद्यमान सरकार भ्रष्ट मार्गाने आले. दिल्लीचे सरकार भ्रष्ट उद्योगपतींना पाठीशी घालत आहे. युरोप आणि अमेरिकेत खलिस्तानी समर्थक भारतीय दूतावासांवर हल्ले करून थेट तिरंगाच उतरवत असताना आपण पाहिले.

तरीही देश मजबूत हातात आहे असे आपण मानायचे काय?

महाराष्ट्र पंतप्रधानांच्या दारात नववर्षाची गुढी घेऊन उभा आहे. हे ताटकळत राहणे कधी संपेल?

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]