रोखठोक – विंडसरमधील पछाडलेल्या वास्तू; राणीच्या गावात भुताटकी

भुते व आत्मे यांचा वावर आहे काय याचे संशोधन ज्यांना करायचे आहे व या सगळय़ाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी विंडसर कॅसल परिसरात दोन रात्री काढायला हव्यात. ही जागा ब्रिटनच्या राजघराण्याची. सर्व ‘शाही’ लोकांचे दफन येथेच होते. भव्य हॉटेल्स, वास्तू, पॅलेस सुंदर आहेत, पण यातील अनेक वास्तूंत ‘आत्मे’ वावरत आहेत. विंडसर प्रशासनानेच या वास्तू पछाडलेल्या असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्ष भेटीवर आधारित लेख.

लंडनपासून 40 किलोमीटरवर विंडसर आहे. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील मतदान आटोपल्यावर विंडसर येथे जाण्याचा योग आला. पॅडिंग्टन स्टेशनवरून ट्रेनने आास्टर्ली येथे उतरायचे. विंडसर हे एक टुमदार गाव आहे व इंग्लंडच्या साम्राज्यशाहीशी, राजवंशाशी निकटच्या नात्याने जोडलेले आहे. हे गाव एका अदृश्य शक्तीने पछाडलेले आहे. गावात राजेशाही वैभवाच्या खुणा आहेत. 1000 वर्षांचा इतिहास या गावाला आहे. इंग्लंडच्या शाही परिवाराचा राजवाडा ‘विंडसर कॅसल’ येथे दिमाखात उभा आहे, पण अनेक राजे व राण्यांप्रमाणे ‘विंडसर’चा संपूर्ण परिसर हा चिरनिद्रा घेत आहे असेच दिसते. विंडसरमध्ये शाही राजवाडय़ांसह अनेक सरदार, वतनदारांचे लहानमोठे वाडे आहेत. शिवाय अनेक भव्य वास्तू आहेत. या वास्तूंत माणसांचा वावर कमी. कारण वास्तू पछाडलेल्या आहेत व येथे भूत, आत्मे वावरतात असा विश्वास आहे. विंडसर हे राजघराण्याचे प्रिय स्थान. त्यामुळे राजघराण्यातील अनेक प्रमुख व्यक्तींना मृत्यूनंतर येथेच दफन केले जाते. महाराणी एलिझाबेथ यांनाही विंडसर कॅसल येथेच दफन केले गेले. कॅसल परिसरात सेंट जॉर्ज चॅपल आहे. तेथेच महाराणीस माती दिली. महाराणीचे पती प्रिन्स फिलिप्स यांनाही येथेच दफन केले. या परिसरात शाही परिवार, सरदार, योद्धे अशा अनेकांची थडगी आजही आहेत. 13 हेक्टर परिसरात विंडसर कॅसल विस्तारले आहे. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर हा राजवाडा आणि अनेक आलिशान घरे दिसतात. पण त्यात माणसे व जिवंतपणा नाही. संपूर्ण परिसरावर निराशेचे मळभ आले आहे असे दिसते. लोक म्हणतात, या गावावर भय आणि भुताटकीच्या सावल्या वावरत आहेत. येथे जागोजाग भुतांच्या कहाण्या आहेत.

वाकडी इमारत

आास्टर्ली रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडताच एक डाव्या बाजूला कललेली इमारत आहे. ‘वाकडी’ इमारत केव्हाही कोसळेल असे वाटते. क्रूकेड हाऊस ज्याला मार्केट क्रॉस हाऊसही म्हटले जाते, अशी इमारत विंडसर हायस्ट्रीटवर आहे. एकेकाळी या इमारतीत चांगलीच वर्दळ होती. येथे एक कॉफी हाऊस होते व गावातील लोक संध्याकाळी येथे काफी पिण्यासही येऊन बसत. आता ही इमारत निर्मनुष्य आहे. एका महिलेचे भूत या इमारतीत वावरते. ‘टी हाऊस’मध्ये रात्री उशिरा एक महिला एकटीच येते व नंतर गायब होते. ती किचनमध्येही जाते. जिन्यावरून वर जाताना तिच्या वाजणाऱ्या पावलांचा भास होतो. टी आणि कॉफी-रूम त्यामुळे लवकर बंद करण्यात येऊ लागले. त्यानंतर येथे काम करणारा कर्मचारी वर्ग संध्याकाळनंतर येथे थांबेनासा झाला. ही आकर्षक इमारत निर्मनुष्य झाली. आता या इमारतीत कोणी प्रवेश करीत नाहीत. समोरच्या फुटपाथवरून या पछाडलेल्या इमारतीकडे लोक भीतीने पाहात असतात. हासुद्धा भय पर्यटनाचाच एक भाग आहे.

मोकळे, निर्मनुष्य रस्ते

विंडसर येथील रस्ते तसे दिवसाही मोकळे व निर्मनुष्य आहेत. श्रीमंतांची, शाही परिवाराची अनेक नटरंगी घरे व त्यांच्या मागे-पुढे हिरवळ आहे. पण मला कोठेच माणसांचा वावर दिसला नाही. हजारो एकर शेती व मळे आहेत. एका मोठया शेतात शंभराच्यावर गायी चरत होत्या. विंडसर राजवाड्याच्या या गायी आहेत असे सांगितले. त्या गायींमध्येही उत्साह नव्हता. राजवाड्यात कोणी नाहीत. गावात माणसे नाहीत. मग इतक्या गायींचे दूध जाते कोठे, हा प्रश्न मला पडला. थेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर इतिहासात बऱ्याच अप्रिय गोष्टी घडल्या. माणसे मारली व जागच्या जागी दफन केली. या सर्व घटना पाहणारा साक्षीदार म्हणून विंडसरचा टॉवर उभा आहे. या टॉवरभोवतीच आत्मे वावरत असावेत. या टॉवरखालच्या वास्तूत मिसेस मेरी पार्सन्स राहात होत्या. त्यांचे पती लष्करी अधिकारी होते. मिसेस मेरी पार्सन्स यांना अनेक विचित्र भास व अदृश्य शक्ती सभोवती वावरत असल्याची जाणीव होई. त्यांच्या बेडरूमचा दरवाजा आतून ‘लॉक’ असताना अनेकदा तो आपोआप उघडला जात असे. दरवाजाचे ‘हॅण्डल’ वळवून कोणीतरी आत प्रवेश केला व ती अदृश्य शक्ती नवऱ्याच्या डोक्याशी उभी आहे असे मिसेस मेरीला अनेकदा वाटले. तो जड दरवाजा व त्याचे लोखंडी हॅण्डल इतक्या सहजतेने कोण व कसे उघडत असेल हे रहस्यच होते. बाजूला कर्फ्यू टॉवर (curfew tower) आहे. त्या टावरसंदर्भातही भुतांच्या अनेक कथा जोडल्या आहेत. रात्री सर्व सामसूम असताना टॉवर्सच्या जिन्यावर कोणीतरी बोलत आहे, जिन्यांवरून चालत आहेत. कोणीतरी मध्येच मोठयाने ओरडत असल्याचे लोक आजही ऐकतात.

लायब्ररीतले भूत

‘किंग चार्ल्स 1’चे भूत अनेकांनी अनेक प्रसंगी या परिसरात अनुभवले आहे. रायल लायब्ररीत दिवसा अनेकजण जुने संदर्भ चाळण्यासाठी येतात. त्यात इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. रॉयल लायब्ररी पूर्वी चार्ल्सच्या वास्तव्याचे ठिकाण होते. नंतर त्याचे ग्रंथालयात रूपांतर केले. या वास्तूतील दोन बेडरूम कायम आहेत व संध्याकाळनंतर दोन्ही बेडरूम व बाथरूममधून हालचाली आणि वावर असल्याचे जाणवू लागले. रात्री उशिरा स्वत: ‘चार्ल्स 1’ हा लायब्ररीतील मुख्य खुर्चीवर बसून सिगार पीत असल्याचे अनेकांनी अनुभवले. आता ही रॉयल लायब्ररी व संपूर्ण इमारत ‘पछाडलेली’ म्हणून जाहीर करण्यात आली.

भुतांवर विश्वास

इंग्लंडचे लोक विचाराने विज्ञानवादी व पुढारलेले आहेत, पण विंडसर व आजूबाजूला भुते व पछाडलेल्या वास्तू आहेत यावर त्यांचा विश्वास आहे. भारतात त्यास अंधश्रद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रात तर भुताखेतांचे, पिशाच्चांचे अवडंबर माजवणाऱ्यांविरुद्ध अंधश्रद्धाविरोधी कायद्याने कारवाई केली जाते. इंग्लंडमध्ये असे काहीच नाही. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी सत्ता स्थापनेसाठी आसाममधील कामाख्या देवीच्या मंदिरात अनेक रेडय़ांचा बळी दिला. ‘वर्षा’ बंगल्यावर मिरची यज्ञासारखे प्रकार झाले. भुताखेतांना वश करून सत्ता स्थापन करण्याचे तंत्र जसे भारतात आहे तसे इंग्लंडमध्ये नाही. विंडसरमधील भुते पछाडलेल्या वास्तू आपापले जीवन जगत आहेत. इंग्लंडमध्ये एक Ghost Club आहे. भुतांचा अनुभव घेतलेले लोक या क्लबचे सदस्य आहेत. ब्रायन लँगस्टन हे थेम्स व्हाली पोलीस स्टेशनचे काही काळ चीफ कॉन्स्टेबल म्हणून काम पाहात होते. त्यानंतर विंडसर व इटनचे पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्या काळात विंडसरमधील अनेक भुते, पछाडलेल्या वास्तूंशी त्यांचा संबंध आला. पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यावर ब्रायन यांनी विंडसर व थेम्सच्या किनाऱ्यावरील भटकत्या आत्म्यांवर संशोधन सुरू केले व हे आत्मे थेम्सच्या किनाऱ्यावर वावरत आहेत यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. ‘True Ghosts And Ghouls of Windser & Eton’ असे एक पुस्तक ब्रायन लँगस्टननी लिहिले व विंडसरची भुताटकी जगासमोर आणली. ब्रायन याने विंडसरमधील पछाडलेल्या भव्य वास्तू व त्यातील आत्मे यावर संशोधन केले म्हणून अंधश्रद्धाविरोधी मंडळींनी ब्रायन यांच्यावर खटले दाखल केले नाहीत. इ.सन 2000 च्या नोव्हेंबर महिन्यात थेम्स नदीवरील पार्कात दोन पोलीस वावरत असताना त्यांना दोन मुले खेळत असल्याचे दिसले. रात्रीचे 11 वाजता ही मुले इथे कशी? ती मुले त्यांच्या पोशाखावरून राजघराण्यातील दिसत होती. दोन्ही पोलीस त्या पार्काचे गेट खोलून आत शिरले. पण त्या मुलांचा पत्ताच नव्हता. या मुलांचा अनुभव अनेकांनी घेतला. हे पार्क आता कायमचे बंद करण्यात आले आहे. रॉयल आडलेड हॉटेल किंग्ज रोडवर आहे. क्वीन अॅडलेडचा हा पॅलेस होता. क्वीनचा मृत्यू येथेच झाला. पॅलेसमधील 110 खोल्यांचे रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये केले, पण त्यानंतर येथील अनेक पर्यटकांना येथे वेळीअवेळी क्वीनचा वावर दिसू लागला व ही वास्तू पछाडलेली म्हणून जाहीर झाली. लंडनमधील वास्तव्यात विंडसरच्या या किंग स्ट्रीटवरील हॉटेलात जाण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा तसे करू नका, क्वीनचे वास्तव्य आजही आत आहे, असे सांगून मला अडवण्यात आले. ती वेळ रात्री 10.30 ची होती व त्या सुंदर, भव्य पॅलेस हॉटेलातील काही दिवे पेटले होते हे मी पाहिले. 46, किंग रोडवर असे अनेक लहान पॅलेस आहेत व तेथे संध्याकाळी पाचनंतर माणसांचा वावर आपोआप बंद होतो. सर्व वास्तूंत अनैसर्गिक हालचाली सुरू आहेत असे वाटते. पर्यटक व गावातील लोकही त्या परिसरात जाणे टाळतात. रात्री 10 नंतर राजा हेन्री हा विंडसरला घोड्यावरून रपेट मारतो व त्याला कोणी आडवे आले तर तो जिवंत राहात नाही, अशी कथा येथे प्रचलित आहे. व्हिक्टोरिया रोडवरील न्यू ब्रिटिश स्कूलमध्ये आता विद्यार्थी नसून आत्म्यांचा वावर आहे. येथे आत्मे वावरत आहेत हे सिद्ध झाल्यावर 1980 साली ही इमारत पाडली व तेथे शिक्षण विभागाचे कार्यालय उभे केले. पण शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, जोसेफ चारजोर या लष्करी अधिकाऱ्याचे भूत तेथे वावरत आहे व तो संध्याकाळनंतर जिन्यावरून बूट वाजवत फिरतो. किंग रोडच्या लाँग वॉक हाऊसमध्ये एका म्हाताऱ्या बाईचे भूत अनेकांनी पाहिले. ती बहुधा राजघराण्यातील सदस्य असावी असे अनेकांचे मत आहे. विंडसरमधील शाळा, हॉस्पिटल, आापेरा थिएटर्स पछाडलेली आहेत. थेम्स स्ट्रीटवरील प्ले हाऊस, सिनेमाची इमारत भुतांच्या वावरामुळे जमीनदोस्त केली गेली. येथे पीस स्काड स्ट्रीटवरील एलिझाबेथ हाऊस सोळाव्या शतकात बांधले. तेथे आता व्यापारी संकुल आहे. तेथील कर्मचारी सांगतात, आमच्या जागेतील ‘टेम्परेचर’ अचानक खाली जाते व वर जाते. संध्याकाळी जिन्यावरून पावले वाजू लागतात व आमची अवस्था बिकट होते. विंडसरमधील बहुतेक वास्तू व रस्ते हे असेच पछाडलेले आहेत व लोकांनी ते स्वीकारले आहे. मुख्य म्हणजे विंडसर प्रशासनानेच तशा सूचना जारी केल्या आहेत.

आपल्या देशात

विंडसरप्रमाणे महाराष्ट्रात व देशात अनेक राजवाडे व सरदारांचे पॅलेस आहेत. या सर्व राजवाडय़ांत व परिसरात अनेक दुर्घटना घडल्या, पण विंडसरप्रमाणे येथेही आत्म्यांचा वावर आहे काय? पुण्याच्या शनिवारवाड्यात असे भास होतात, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. नारायणराव पेशव्यांचा वाड्यात खून झाला तेव्हा ‘काका मला वाचवा’ अशी किंकाळी त्याने मारली. नारायणराव पुढे पळत होते व गारदी तलवारीचे वार त्याच्यावर मारत मागे धावत होते. त्या वेळच्या छोटय़ा नारायणराव पेशव्यांच्या ‘काका मला वाचवा’ या किंकाळीने शनिवारवाडा शहारला. त्याच किंकाळय़ा आजही शनिवार वाडय़ांत ऐकू येतात व तसे भास होतात, हे अनेकांचे म्हणणे आहे. बनारस, काशीच्या गंगाकिनारी व वास्तूंत अनेकानेक पछाडलेल्या जागा आहेत. गंगेवरील अनेक घाट यासाठी कुख्यात आहेत. येथे आत्मे वावरतात. बनारस हिंदू विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये आत्म्यांचा वावर आहे. अजून अनेकदा किंकाळय़ांचे आवाज येतात. 18 व्या शतकातील चेतसिंग किल्ला येथे आहे. सूर्य मावळला की आतून गाण्याचे, मैफिलीचे आवाज येतात. या किल्ल्यात अनेक भुयारे आहेत. त्यात पूर्वी अनेक मृतदेह फेकले गेले. किल्ल्याच्या राखणदाराचा आत्मा येथे फिरतो. विंडसरप्रमाणे अनेक पछाडलेल्या जागा युरोप, आफ्रिकेत आहेत. दिल्लीही त्यास अपवाद नाही. या पछाडलेल्या वास्तू जगभरात आहेत. विंडसर पासल व संपूर्ण परिसरात या वास्तूंचे दर्शन व अनुभव घेता आला. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांना ‘विंडसर’ येथे अधिक चांगले काम करता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीत जाऊन रेडय़ांचे बळी दिले व आत्म्यांना जागे केले. हे सर्व आत्मे आज कोणत्या पछाडलेल्या वास्तूंत वावरत आहेत?

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]