रोखठोक – बादशहा मुर्गे लड़ाता है…

rokhthok

गरिबी, उपासमारीच्या बाबतीत हिंदुस्थानने पाकिस्तान, बांगलादेशलाही मागे टाकले. नोकऱ्या नाहीत म्हणून पदवीधर चहाच्या टपऱ्यांवर काम करीत आहेत. महागाई, बेरोजगारी हे मुख्य प्रश्न आहेत. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी बादशहा कोंबड्यांना झुंजवत आहेत!

राष्ट्रीय ऐक्य आणि अखिल भारतीयत्व हे शब्द आता निकाली काढण्यात आले आहेत. रामनवमी, हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे हे अन्न, वस्त्र, निवारा व रोजगार या विषयांपेक्षा महत्त्वाचे ठरले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात हिंदू-मुसलमान असे दंगलीचे वातावरण तयार केले जात असताना पाटण्यातील एका बातमीने मी अस्वस्थ झालो. पाटण्यातील अर्थशास्त्रातील पदवीधर विद्यार्थिनीने पाटणा महिला कॉलेजसमोर चहाची टपरी उघडली आहे. प्रियंका गुप्ता असे त्या मुलीचे नाव. 2019 साली ही मुलगी पदवीधर झाली. दोन वर्षे प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही. शेवटी ज्या कॉलेजात शिकली त्याच कॉलेजसमोर चहाची टपरी तिने टाकली. ‘स्टार्टअप’साठी अनेक बँकांकडे लोनसाठी चपला झिजवल्या, पण एकाही बँकेने या होतकरू, पदवीधर तरुणीस लोन दिले नाही. शेवटी चहाची टपरी टाकून सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत ही मुलगी चहा विकते. प्रियंका गुप्ता ही देशातील लाखो-करोडो बेरोजगार तरुण-तरुणींची प्रतिनिधी आहे. आपले पंतप्रधान मोदीही एकेकाळी चहा विकत होते. ते राजकारणात आले. पंतप्रधान झाले व विश्वगुरू म्हणून प्रवचने झोडत आहेत, पण देशातील बेरोजगारी व तरुणांच्या निराशेवर उपाय नाही. उपाय एकच तो म्हणजे धर्मांध व्हा. बेबंद व्हा! रामनवमी, हनुमान जयंतीच्या शोभायात्रांत सहभागी होऊन बेधुंद व्हा! प्रियंका गुप्तासारख्या कमी मुली स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करीत आहेत. देशात फक्त मशिदींवरील भोंगे हीच मुख्य समस्या नाही. लोकांच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न त्यापेक्षा वेगळे आहेत. बिहारात भारतीय जनता पक्षाचेच राज्य आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव विद्यार्थ्यांवर परिणाम करीत आहेत. जे विद्यार्थी स्कुटर-बाईकवरून कॉलेजात येत-जात होते त्यांनी आता सायकलचा वापर सुरू केला. पेट्रोल परवडत नाही. बिहारमध्ये सायकल विक्रीत 20 टक्के वाढ इंधन दरवाढीमुळे झाली. पेट्रोल भाववाढीमुळे सायकलला बरे दिवस आले हे खरे, पण लोक आता गाड्या वापरू शकत नाहीत व सायकलवरून त्यांनी बैलगाडीकडे वळू नये. ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक मिळविणारी सीता साहू मध्य प्रदेशातील रिवा येथे गोलगप्पे विकून गुजराण करीत आहे. नोकरी नाही. सरकारने आश्वासन पाळले नाही. जगण्यासाठी काहीतरी करावेच लागेल असे सीता सांगते. या सगळ्यांची दुःखे आता भोंगे लावून जगासमोर मांडायलाच हवीत.

‘ट्रोलर्स’ हाच रोजगार

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटविण्यासाठी दंग्यांचा उतारा दिला जात आहे. हजारो नव्हे, लाखो पदवीधर बेरोजगार तरुणांना ‘ट्रोलर’ बनविण्याचे काम दिले आहे. ‘ट्रोल’ नावाचा प्रकार कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा फटका मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष विष्णुदास शर्मा यांच्या डॉक्टर पत्नी स्तुती शर्मा यांना बसला. रामनवमी, हनुमान जयंतीच्या दंग्यात मध्य प्रदेशही होरपळला. अनेक भागांत तणाव व बंदची स्थिती होती. अशा वेळी डॉ. शर्मा यांना तातडीने एका औषधाची गरज भासली. रात्रीचे 11.30 वाजले. त्यात तणावपूर्ण वातावरण यामुळे ‘बंद’ होता. फक्त एका मुस्लिम दुकानदाराचे फार्मसीचे दुकान उघडे होते. डॉ. शर्मा त्याच्या दुकानात गेल्या. तिथून औषधे विकत घेतली. त्यातील एका औषधाबाबत त्या दुकानदाराने सल्ला दिला, ‘‘दीदी, हे औषध जपून घ्या. शक्यतो टाळा. या औषधाने गुंगी येते.’’ या प्रसंगाबाबत डॉ. स्तुती शर्मा यांनी समाज माध्यमांवर एक ‘पोस्ट’ टाकली. त्यांनी शेवटी लिहिले, ‘‘तो मुस्लिम माणूस किती प्रेमळ होता. त्याने किती काळजी घेतली!’’ यावर भारतीय जनता पक्षाचे ‘ट्रोलर्स’ संतापले व त्यांनी डॉ. स्तुती शर्मा यांच्यावर ट्रोलिंगचे हल्ले सुरू केले. एका मुसलमानास तुम्ही प्रेमळ किंवा काळजी घेणारा कसे म्हणू शकता, असा प्रश्न उपस्थित केला. जणू काही डॉ. शर्मा यांनी त्या मुसलमान दुकानदारास ‘प्रेमळ’ वगैरे म्हणून मोठा अपराधच केला. शेवटी डॉ. स्तुती शर्मा यांना त्यांचे ते प्रेमळ ‘ट्विट’ मागे घ्यावे लागले. देशात धार्मिक वाद आणि द्वेष कोणत्या थराला नेऊन ठेवला आहे? आणि आपले पंतप्रधान मोदी यावर आजही गप्प आहेत.

देश असा बुडेल

हनुमान जयंती, रामनवमी, भोंग्याचा वाद म्हणजे देश बुडविण्याचे कारस्थान आहे. देशात महागाई, बेरोजगारीवर कोणीच चर्चा करीत नाहीत. मोर्चे आणि आंदोलने बेरोजगारी, महागाईवर निघायला हवीत, पण ते हनुमान चालिसा व मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नांवर निघत आहेत. हिंदुस्थानचे चारित्र्य धार्मिक द्वेषाच्या बाबतीत अफगाणिस्तानपेक्षा जास्त बिघडले आहे. अफगाणिस्तानची सत्तासूत्रे ज्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात आहेत तसेच चित्र भविष्यात आपल्या देशात निर्माण होईल व तसे चित्र आज दिसू लागले आहे. ‘हनुमान जयंतीस पूर्वी शोभायात्रा निघत नव्हत्या, पण ‘भंडारा’ जरूर होत असे. या भंडाऱ्यात मी अनेकदा पुरी-भाजीचा स्वाद घेतला आहे,’ असे नसीम बानो या तरुणीने समाज माध्यमांवर लिहिले आहे, पण अशा विचारांना आज स्थान राहिलेले नाही. सबंध देशातच सर्व पातळीवर द्वेष वाढविणारी विचारसरणी वाढते आहे आणि लोक धर्मांध झालेले पाहणे क्लेशदायक आहे. देश अशाने बुडेल; परंतु त्याचे सोयरसुतक कितीजणांना आहे? या परिस्थितीवर काहीच उपाय नाही अशा मनःस्थितीत लोक चालले आहेत आणि ते अधिकाधिक जातील तर देशाचा श्रीलंका किंवा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. साध्वी ऋतंबरा यांनी याच वातावरणात एक महागर्जना केली. ती म्हणजे, ‘हिंदूंनी चार मुलांना जन्माला घालावे व त्यातली दोन मुले संघाला द्यावी.’ आता प्रश्न इतकाच आहे की, संघाला हे मान्य आहे काय? एका बाजूला भाजप लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणायच्या भूमिकेत आहे आणि दुसरीकडे भाजपचेच पुढारी लोकसंख्या संघ परिवारासाठी वाढवा असे बोलत आहेत. आहेत त्या लोकांना नोकऱ्या व अन्न नाही. मग वाढलेल्या लोकसंख्येचे काय? हिंदुस्थानात भूकबळी, उपासमार वाढली आहे. याबाबतीत पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळची स्थिती आपल्यापेक्षा उत्तम आहे. हे चित्र काय सांगते! देशातील सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे जातीय द्वेष व धार्मिक दंगली हाच आहे. विजय ढिल्लें यांची एक हिंदी चारोळी देतो आणि विषय संपवतो.
‘‘मुश्किल है अब इस मुल्क में,
अमन की वापसी
बादशहा खुद यहां
मुर्गे लड़ाता है…’’

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]